Pages

Wednesday, 2 August 2017

‘प्रेमस्वरूप आई…. वात्सल्यरूप आई..’ भाग १


   ‘प्रेमस्वरूप आई…. वात्सल्यरूप आई..’
(World Breastfeeding week 2017 च्या निमित्ताने )



         आई व बाळाचे नाते यावर सर्व भाषा-संस्कृतीमध्ये भरभरुन लिहिले- बोलले जाते. भारतीय सिनेमांनी तर यात मोलाची भर टाकली आहे. “ दूध का कर्ज….माँ का दूध पिया है तो….” असले “अस्सल इमोस्सनल” संवाद आजही तितकेच पॉप्युलर आहेत चित्रपटांमध्ये. विनोदचा भाग सोडा पण खरंच आई व बाळाच्या नात्यातील प्रेमबंध आगळेच असतात आणि स्तनपान यामध्ये खूप मोलाची भूमिका बजावते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसेच मानसिक विकासाच्या दृष्टिकोनातून स्तनपान- मातृस्तन्य आई व बाळ दोघांसाठी महत्वाचे आहे.
           हे महत्व जगातील सर्व मातांपर्यंत पोहोचावे आणि जगभरातील प्रत्येक नवीन मातेला, मग तिचा आर्थिक स्तर-सामाजिक स्तर कुठलाही असो,तिला आपल्या बाळाला स्तनपान देता यावे यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या पहिल्या आठवडयामध्ये १९९१ सालापासून ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ साजरा केला जातो. स्तनदा माता व त्यांचे कुटुंबिय यांना स्तनपानाबाबत शास्त्रशुद्ध माहिती मिळून स्तनपानासाठी नवीन मातेला जास्तीत जास्त आधार मिळावा हाच यामागचा उद्देश आहे.
            खरे तर पहिले सहा महिने आईच्या दूधाइतका सकस आणि संपूर्ण आहार इतर कोणताही नसतो. तुम्हीच विचार करा, बाळाच्या तब्येतीनुसार आईच्या दुधातील घटक कमी-जास्त होतात (Customized), नेमक्या तापमानाचे, जन्तुसंसर्गविरहीत (आईच्या स्तनांतून थेट बाळाच्या तोंडात), द्रव आणि घन पदार्थांचे योग्य संतुलन असलेला तसेच बिन खर्चाचा असा सर्वर्थाने परिपूर्ण आहार दूसरा कोणता असेल? मात्र असे असूनही बऱ्याच नवजात बाळांना अजूनही पुरेसे आईचे दूध मिळत नाही. यासाठी कारणांची चर्चा, गैरसमजुतींचे निराकरण आणि साधन-सुविधांची सुलभ उपलब्धता करून देणे यासाठी World Alliance for Breastfeeding Action (WABA), World Health Organization (WHO) आणि UNICEF यांनी एकत्र येऊन कामाला सुरुवात केली आहे. या इतक्या महत्वाच्या संस्थांचा सहभागच या कामाचे महत्व आणि व्याप्ति यांची जाणीव करून देण्यास पुरेसा आहे. या वर्षीचे ध्येय आहे ‘Sustaining Breastfeeding Together.’ (सर्वांच्या सहकार्याने स्तनपानाचा दर्जा टिकवून ठेवणे) कारण या संस्थान्नी केलेल्या इतक्या  वर्षांच्या मेहनतीचे फळ म्हणून आजकाल स्तनपानाचे महत्व लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. पण असे असले तरीही बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान कायम राखणे सर्वच मातांना शक्य होत नाही. यामागे पोषण घटकांचा अभाव, घरच्या सदस्यांचा पाठिंबा, मातेला मिळणारी विश्रांती, तिचे मानसिक स्वास्थ्य (घर-नोकरीचा ताण) यासारख्या एक किंवा अनेक घटकांचा अभाव असल्याने हे घडत असते.
           यासाठी नवीन स्तनदा मातांना व त्यांचे जोडीदार तसेच घरातील सदस्य या सर्वांना स्तनपानाबद्दल आवश्यक ती माहिती मिळणे गरजेचे आहे, जेणेकरून उपरोक्त कारणे दूर करून मातांना आवश्यक तो आधार मिळेल. यासाठी गायनेकोलॉजिस्ट, सपोर्ट ग्रुप, प्रशिक्षित कार्यकर्ते, Lactation Consultants यांची मदत होते. प्रसूतिपूर्व मार्गदर्शन कार्यशाळेत स्तनपानाचे फायदे, वरच्या दूधाचे तोटे, बाटलीने दूध पाजताना काळजी न घेतल्यास उद्भवणाऱ्या समस्या यांसारख्या विविध मुद्दयांवर चर्चा- प्रशिक्षण दिले जाते. तसेच प्रत्यक्ष स्तनपान करताना अडचणी व त्यांवर मात करण्यासाठी घ्यायची काळजी है शिकवून नवीन मातांवर येणारे दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. घरातील इतर सदस्यांच्या मानसिक तयारीची आवश्यकता काय असा प्रश्न इथे काही जणांना पडू शकतो पण बाळ घरी आल्यावर त्याच्या संगोपनासाठी अधिक मनुष्यबळाची गरज भासू शकते, इतरांच्या दिनक्रमात बदल होणे सहाजिक असते अश्या वेळी घरातील सर्वांचीच मानसिक तयारी असेल तर आईला स्तनपानासाठी पुरेसा वेळ, पोषक अन्न,विश्रांती आणि सहयोगी वातावरण घरातच मिळेल.
स्तनपानाविषयी लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे -
  • पहिला स्पर्श व स्तनपान - प्रसूतिनंतर बाळ रडले व श्वासोच्छवास नीट सुरु झाला की लगेचच बाळाला स्वच्छ,मऊ कापडाने कोरडे करून आईजवळ स्तनपानासाठी द्यावे.
  • पहिल्या तीन दिवासांमध्ये स्तनांतून पिवळसर ,जाड चिक,ज्याला कोलोस्ट्रम असे म्हणतात, तो स्रवत असतो. हे दूध प्रमाणाने कमी असले तरी पोषणमूल्याने अधिक संपृक्त असते.( Nutrients are in concentrated form in low volume). तसेच हे दूध थोडे सारक असते ज्यामुळे बाळाला शी करणे (passing meconium) सुलभ होते.ज्यामुळे अधिकचे बिलीरुबिन,लाल रक्तपेशींचे टाकावू घटक यांचा निचरा होतो व बाळाला कावीळ होण्याची शक्यता कमी होते. तसेच कोलोस्ट्रममध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ति निर्माण करणारे घटक (IgM, IgG, IgA antibodies) असतात  ज्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ति नैसर्गिकरित्या विकसित होण्यास मदत होते.
                                                   (क्रमशः)
संदर्भ : ब्रेस्टफीडिंग प्रमोशन नेटवर्क, इंडिया.
        टेक्स्टबूक ऑफ ऑब्स्ट्रेटिक्स
चित्रसंदर्भ : वर्ल्ड अलायन्स ऑफ ब्रेस्टफीडिंग ऍक्शन वेबसाइट.