......कंबर लचकली (भाग १) पुढील लिंकवर वाचा, कंबर दुखण्याची कारणे ,प्रकार
https://samanwayayurved.blogspot.in/2017/01/blog-post.html?m=1
.....कंबर लचकली (भाग २) - उपाय व औषधोपचार.
..तर नीताताई “बऱ्याच केसेसमध्ये कंबरदुखी,पाठदुखी ही अभिघात(Trauma ) , कुपोषण,मर्माघात,अतिव्यायाम अश्या कारणांनी होते ज्यामध्ये पाठीशी संबंधित पेशी,स्नायू, मणके किंवा त्यांच्याशी संबंधित कूर्चा दुखावल्या जातात. त्यामुळे या सामान्य कारणांमुळे होणाऱ्या दुखण्याचे निराकरण कसे करायचे ते आपण पाहू. यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे नक्की कोणत्या कारणांमुळे हे पाठीचे दूखणे झाले आहे ती कारणे ओळखणे,ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे. यासाठी सर्व स्थानिक व सार्वदेहिक (Local and Generalised) लक्षणांची विचारपूर्वक चिकित्सा करावी लागते. यासाठी,
- दैनंदिन जीवनात बदल
- व्यायाम आणि फिजियोथेरेपी
- आयुर्वेदीय औषधी चिकित्सा
- पंचकर्म
या सर्व पर्यायांचा सर्वंकष विचार करावा लागतो.
- दैनंदिन जीवनातल्या चुका - बऱ्याचदा रोज धावपळीत आपल्या हातून अनवधानाने घाईघाईत काही चुकीच्या हालचाली- गोष्टी होतात ज्यामुळे पाठीचे दूखणे सुरु होते आणि या दुखण्याचे मूळ नक्की कशात आहे हे जाणून न घेताच थातुरमातुर उपचार केले जातात ज्यामुळे तात्पुरते बरे वाटले तरी दुखणे समूळ नष्ट होत नाही. बऱ्याचदा या कृतीमुळे पाठीचे दुखणे उद्भवले असेल याचीही कल्पना आपल्याला नसते. मात्र अशा चुकीच्या हालचाली टाळल्या तरीही पुन्हा-पुन्हा दुखणारी पाठ बारी होते. यासाठी दैनंदिन हालचाली करताना आवश्यक अशा काही बदलांचा चित्रमय तक्ता या लेखाच्या अखेरीस दिला आहे.*
- व्यायाम-फिजियोथेरपी -. पाठीच्या दुखण्यासाठी व्यायाम हा जसा उपचार आहे तसेच ते एक कारणसुद्धा आहे. आश्चर्य वाटले ना?? म्हणजे असे की चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम तसेच काही विशिष्ट व्यायामप्रकार यामुळे पाठदुखी सुरु होते. तसेच अचानक उद्भवलेल्या कंबरदुखीसाठी (Acute stage) व्यायाम निषिद्ध आहे मात्र दीर्घकालीन त्रासासाठी (chronic) तज्ञ वैदयांच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम व फिजियोथेरपीचा वापर करावा. तसेच पाठीच्या दुखण्यासाठी बऱ्याचदा योगासने केली जातात. यापैकी कंधरासन,मार्जारासन, भुजंगासन, नौकासन, वीरभद्रासन यासारखी आसने पाठीच्या स्नायूंना ताकद देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र योगासने करताना शरीरस्थिती-श्वासगती यांचा ताळमेळ महत्वाचा असतो. तसेच 'पाठी'साठी म्हणून सांगितलेली सगळीच आसने सगळ्यांनाच लाभदायक असतील असेही नाही. कारण इजा नक्की कोणत्या स्वरूपाची आहे हे समजून नुसतेच वीडियो बघून करण्यापेक्षा तज्ञ मार्गदर्शकाकडूनच शिकून घ्यावी.
- औषधी चिकित्सा - कंबरदुखीच्या चिकित्सेसाठी वेगवेगळे गुग्गुलु कल्प, पाचन चूर्ण, आमपाचन, बृंहण चूर्ण, घृत, तेल, काढे , क्षीरपाक वापरले जातात.ही औषधे पोटातून घेण्यासाठी ,अंगाला लावण्यासाठी,बस्ति , नस्य, धारा अशा वेगवेगळ्या प्रकारांनी वापरता येतात. यामध्ये कंबरेचे दुखणे कशा प्रकारचे आहे हे तपासून मग औषधे कोणत्या प्रकारची द्यावी हे ठरवले जाते.पुन्हा उपस्तंभित व निरुपस्तम्भित अशा पाठदुखीच्या प्रकारानुसार औषधी चिकित्सा - गुग्गुलु कल्प, काढ़े ,तेले वेगवेगळ्या प्रकारे वापरावे लागतात. त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखीचे योग्य निदान होणे महत्वाचे आहे.
- पंचकर्म चिकित्सा - पंचकर्म चिकित्सेसाठी संवाहन,कटि बस्ति, पत्रपोट्टली स्वेद, शालि-षष्टिक पिंडस्वेद, अग्निकर्म , भल्लातक कर्म, बस्तिक्रम, क्षीर बस्ति, वैतरण बस्ति, रक्तमोक्षण,पिचु यासारखे पंचकर्म उपाय दुखणे कोणत्या प्रकारचे आहे ते पाहून केले जातात.
- बस्तिकर्मचिकित्सा ही अत्यंत प्रभावशाली चिकित्सा आहे.बस्ति म्हणजे औषधी काढे/तेल स्वरूपात शौचमार्गाद्वारे देणे.वाताच्या आजारांवर बस्ति ही अत्यंत प्रभावी चिकित्सा आहे. कंबरेच्या दुखण्यासाठी चिकित्सा करताना रुग्ण प्रकृती - व्याधी स्वरूप यानुसार ८/ १५ / २१ बस्ति व त्याबरोबर क्षीरबस्ती/यापन बस्ति/वैतरण बस्ति अशी चिकित्सायोजना केली जाते.
- कटिबस्ती - कटि म्हणजे कंबर .कटिबस्ती या चिकित्सेमध्ये कंबरेच्या ज्या भागात तीव्र वेदना आहेत तेथे सहन होईल असे कोमट तेल ठेवले जाते. स्थानिक वात दोषाचे शमन व स्नायूंना ताकद मिळावी यासाठी हा उपचार केला जातो.
टीप : *प्रस्तुत लेखामध्ये सामान्यतः दिसणाऱ्या पाठदुखीची कारणे ,निदान व उपचार यांचा विचार केला आहे. यामध्ये अर्बुद, क्षयरोगजन्य यासारख्या इतरही काही कारणांचा विचार विस्तारभयास्तव टाळला आहे. हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल.
** लेखामध्ये ठिकठिकाणी निदान, उपचारांविषयी माहिती देताना वैद्यकीय सल्ल्याचे महत्व अधोरेखित केले आहे, यावरून या विषयाचे गांभीर्य लक्षात यावे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाला येतील तसे उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
टीप - (सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी २१ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.in या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)
*दैनंदिन जीवनातील बदल (Routine corrections)