मुंबईकरांचा हा आठवडा सुरु झालाच तो मुळी पाऊस घेऊन आणि आजच यावर्षी पहिला लेप्टोचा रुग्ण आढळला अशी बातमीही वृत्तपत्रात वाचली. आणि खऱ्या अर्थाने पावसाळा सुरु झाल्याची खात्री पटली.
खरं तर पावसाळा हा मोठा रोमँटिक ऋतु. पाऊस सुरु झाला की उत्कट भावनांनी ओथंबलेल्या कविता , भजी-चहाचे कप्स यांचे फोटो-शुभेच्छा viral होतात. घरोघरी भजी, समोसे, फ्राइज , आलं-मसाल्याचा चहा, गरमागरम मॅगी, वाफाळती सूप्स…. अहाहा !! काय राव वाचूनंच पाणी सुटलं की नाही?
आणि मग हळूहळू पोटदुखी, अॅसिडिटी, जुलाब, सर्दी ताप खोकला यासारख्या तक्रारी घेऊन रुग्ण दवाखान्यात दाखल होऊ लागतात. आता तुम्ही लगेच म्हणाल , ‘ काय डॉक्टर तुम्हीपण, मौसम मस्ताना और आप का हमेशा बिमारी का रोना??’ पण करणार तरी काय, सध्या चिकित्सालयात येणारी गर्दी बहुतांश हेच आजार घेऊन येत आहे. आणि याचे कारण आहे ऋतुचर्येचे न पाळलेले नियम.
यापूर्वी आपण ग्रीष्म ऋतुचर्या पाहिली होती. त्यावेळी आपण पाहिले होते की ग्रीष्म ऋतुत चय अवस्थेत असलेला वात दोष सतत पडणाऱ्या पावसामुळे उत्पन्न झालेल्या गारव्याची जोड मिळून आणखीन प्रकुपित होतो. त्यातच वाढलेली आर्द्रता , गारवा आणि पावसामुळे येणारा ओलावा कफाच्या वेगवेगळ्या आजारांना (उदा. सर्दी , खोकला,दमा) बळ देतो. त्यातच या काळात पाणीही गढूळ, अशुद्ध असते. वनस्पती हीन वीर्य (कमी गुणांच्या), अम्ल रसप्राधान्य असलेल्या असतात. या स्थितीमुळे नैसर्गिकरित्या पित्त दोष वाढतो (चय अवस्था). त्यामुळे भूक कमी होणे, अपचन, अॅसिडिटी, शौचाला साफ न होणे किंवा पातळ जुलाबासारखे होणे, पोटात दुखणे यासारखे त्रास दिसतात. अशी ही वात-पित्त-कफ हे तिन्ही दोष थोड्या-फार फरकाने बिघडलेली शरीरस्थिती शरीराचे बळ हीन आणि पाचनशक्ति मंद करते. त्यामुळे सतत दमल्यासारखे वाटणे, उत्साह नसणे, बेचैनी वाटत राहते. त्यातच सूर्यकिरणांचा अभाव, अशुद्ध पाणी, ओलावा यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जंतुसंसर्ग ,साथीचे रोग होतात. (ज्यांना “commonly” Viral infections म्हणतात हल्ली).
या सगळ्याचा विचार करता ऋतुचर्या महत्वाची आहे. ऋतुचर्या म्हणजे ऋतुनुसार आपले आचरण बदलणे. म्हणजे कसे ते पाहू,
वर्षा ऋतुचा विहार -
- आपले घर-ऑफिस नेहमी कोरडे, स्वच्छ हवे.
- शक्यतो घरात संध्याकाळी धूप करावा. धूपनाने कीड़-मुंग्या दूर होतात.
- बाहेर पडताना नेहमीच छत्री ,रेनकोट जवळ असावे. गळा-छातीचा भाग जॅकेट किंवा स्कार्फने झाकलेला असावा.
- भिजणे शक्यतो टाळलेले बरे, चुकून भिजल्यास लगेचच अंग विशेषतः डोके पुसावे व स्वच्छ ,कोरडे कपडे घालावे.
- लहान मुले भिजल्यास अंग-डोके कोरडे करून छाती गरम कापडी पुरचुंडीने शेकावी.
- पायात चांगल्या प्रतीचे पावसाळी बूट असावे. जास्त चालणे होत असल्यास बंद बूट वापरावे.
- चिखल, साचलेले पाणी यातून चालणे टाळावे. खरुज, नायटा, कीडे/साप/उंदीर चावणे, लेप्टोस्पायरोसिस, चिखल्या होणे यासारखे आजार होऊ शकतात., विजेच्या उघडया तारांचा धक्का लागू शकतो.
- अंतर्वस्त्र स्वच्छ व कोरडी असावी. दमट कपडे वापरल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊन त्वचाविकार, गुप्तांगात खाज, चट्टे येऊ शकतात.
- व्यायाम हलक्या स्वरुपाचा करावा.
- वातशामक तेलाने अभ्यंग करून नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी.
- दिवसा झोपणे व रात्री जागरण करणे टाळावे. नाहीतर वात-पित्ताचे त्रास वाढतात.
- शरीरबल कमी असल्याने या काळात रतिक्रीडा निषिद्ध आहे.
पावसाळ्यात घ्यायची केसांची काळजी-
- केस साध्या सुती पंचाने कोरडे करावेत.
- कोरडे झाल्यावर मग रुंद दात्यांच्या कंगव्याने विंचरावे.
- केस ओले अस्वच्छ राहील्यास किंवा ओल्या केसांवर तेल लावल्यास कोंडा, फोड पुटकुळ्या येऊ शकतात.
- Hair styling equipments व रसायने यांचा वापर मर्यादित करावा.
- शक्य असल्यास ‘केशधूपन’ करवून घ्यावे. केशधूपन केल्याने केसांतील कृमि, कोंडा कमी होण्यास मदत होते.
- रात्री झोपताना केसांना तेल लावल्यास उत्तम नाहीतर किमान टाळूप्रदेशी तरी तेल लावावे.
पावसाळ्यात घ्यायचा आहार -
- पावसाळा म्हटले की पाचनशक्ति मंद झाल्याने अन्नावर रुचि वाटत नाही. पण काहीतरी गरम,चमचमित, रुचिकर पदार्थ खावेसे वाटतात. त्यामुळे भजी, समोसे,कबाब अश्या पदार्थांचा बेत केला जातो. क्षणिक आनंद देणारे हेच पदार्थ नन्तर पोट बिघडण्यास कारणीभूत ठरतात.
- भाज्यांची कमतरता असल्याने सुकवलेल्या भाज्या, पापड ,सांडगे,मसाल्याच्या मिरची, लोणची , मांसाहारी घरांत सुके मासे-मांस यांचा वापर वाढतो. मात्र सुकवलेले पदार्थ पचायला जड असतात. तसेच त्यात तेल, मीठ मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे या सर्व पदार्थांचे सेवन जरा जपूनच करावे.
- पानातील डावी बाजू, लोणची पापड आदि रुचिकर असतात त्यामुळे थोड्या प्रमाणात (भाजीसारखे नव्हे) खावे. मात्र पापड नीट भाजलेला असावा, लोणचे घरगुती,आंबा किंवा लिम्बाचे असावे.विकतच्या लोणच्यात विनेगरचा वापर असतो त्यामुळे ते टाळावे.
- चिंच , कैरी पूर्णपणे वर्ज्य आहे
- चणा डाळ, बेसन याऐवजी मूग डाळ, मूगडाळीचे पीठ वापरावे.
- जुने धान्य वापरावे किंवा नवीन धान्य असल्यास भाजून घ्यावे.
- आंबवलेले पदार्थ , दही मिसळून/शिजवून केलेले पदार्थ इडली,मेदुवडा, उत्तपा, ब्रेड खाऊ नये. प्रवासात नाइलाजाने खायचे असल्यास नीट भाजलेला टोस्ट, डोसा खावा.
- कच्चे सलाड खाऊ नये,खायचे असल्यास थोडे वाफवुन खावे.
- दूध पिताना त्यात पाव चमचा हळद घालून उकळवून घ्यावे.
- ताक उत्तम पाचक आहे. त्यामुळे अधून-मधून दुपारच्या जेवणात जीरे-सैंधव घालून घेता येईल.
- फिटनेसच्या गैरसमजापोटी बऱ्याचदा लोणी-तूप टाळले जाते. पण वात प्रकोप करणाऱ्या या ऋतुत घरच्या लोणी, तूपाचा आवर्जून वापर करावा. (पण म्हणून लगेच वडे तूपात तळण्याचा बेत करु नका हं, हे लोणी तूप कच्चेच म्हणजे पोळीला लावून किंवा भातावर घालून घ्यायचे आहे.)
तुमच्या आणखी काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये निःसंकोचपणे विचारा..
तर या पावसाळ्यात ही काळजी जरूर घ्या आणि येणाऱ्या धुवांधार पावसाचा आनंद घ्या.