'उदकाचिया आर्ति' अर्थात पाणी कसे आणि किती प्यावे या लेखमालेच्या पूर्वार्धात आपण, 'पाणी कसे प्यावे? / जेवताना पाणी किती प्यावे? / RO चे पाणी व उकळलेले पाणी / कोष्ण जल- श्रुतशीत जल याविषयी थोडक्यात माहिती घेतली. आजच्या भागात,
◆टॉक्सिन फ्लश करण्यासाठी प्यायला जाणाऱ्या 5-7 लिटर पाण्याचे दुष्परिणाम,
◆तहान लागली असतानाही पाणी न पिणे
◆अति पाणी आणि किडन्या
◆पाणी-ज्यूस-सरबते
◆पाणी आणि बद्धकोष्ठता यातील संबंध
या मुद्द्यांची माहिती घेऊ.
©Drsnigdha@samanwaya
*तहान म्हणजे काय?*
तहान म्हणजे शरीराला आवश्यक असलेले पाणी पिण्यासाठी निर्माण होणारी संवेदना आहे. पण बऱ्याचदा आपण कामाच्या नादात, आळसामुळे या संवेदनेकडे दुर्लक्ष करतो. आयुर्वेदात तहान(तृष्णा) ही एक आधारणीय म्हणजे अडवू नये संवेदना सांगितली आहे. तहानेकडे दुर्लक्ष करुन पाणी न प्यायल्यास टाळू-घशाला शुष्कता येणे, चक्कर येणे ,डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात तसेच हे वारंवार किंवा दीर्घ काळासाठी होत राहिले तर कर्णबधिर्य , श्रमश्वास, हृदय प्रदेशी वेदना यासारखी लक्षणेही दिसतात. त्यामुळे कमी पाणी पिण्याची सवय असल्याससुद्धा ती गंभीरपणे मोडून काढणे गरजेचे आहे.©Drsnigdha@samanwaya
तहान लागेल तेव्हा घटाघट पाणी न पिता नीट घोट-घोट पाणी प्यावे.तसेच उभ्याने पाणी पिऊ नये. हल्ली सर्व ऑफिसेस AC असतात त्यामुळे घाम येत नाही अश्या वेळी घामावाटे जाणारे पाणी कमी होते.त्यामुळे AC मध्ये काम करणाऱ्या लोकांनी वैद्यांच्या सल्ल्याने आपला पाण्याचा दिनक्रम आखून घ्यावा.
*पाणी-ज्यूस-सरबते* -
हल्ली बऱ्याच वेळा पार्टीमध्ये/कॉम्बो मील्स बरोबर खाद्यपदार्थांबरोबर शीतपेयाचा उंच ग्लास असतो.स्टाईल म्हणून कोल्डड्रिंक्स,स्टेटस म्हणून हार्डड्रिंक्स, "हेल्दी" म्हणून ज्यूसेस/हर्बल टीज बऱ्याचदा पाण्याला "रिप्लेसमेंट" म्हणून वापरले जातात. पाण्याची गरज असताना प्यायलेली ज्यूस-सरबते-कोल्डड्रिंक पाण्याबरोबरच कृत्रिम रंग,प्रिहर्वेटिव्हज,क्षार तसेच मोठया प्रमाणात साखरेचा अनावश्यक साठा शरीरात घेऊन जातात. आणि त्यामुळे दुसरेच काही त्रास सुरू होतात.©Drsnigdha@samanwaya
'जब वी मेट'मध्ये आपली लाडकी गीत रतलाम स्टेशनवर त्या स्टॉलवाल्याला सांगतेच ना, 'कोला-शोला सब अपनी जगह पर है पर पानी का काम पानी ही करता है,बाय गॉड ।' तुम्ही सर्वांनीही हे कधी ना कधी नक्कीच अनुभवले असेल.
*अति पाणी व किडन्या*
देवाने जसा आपल्या शरीरात जठररूपी मिक्सर-ग्राईंन्डर बसवला आहे तश्याच फिल्टररूपी किडन्यासुद्धा दिल्या आहेत. शरीरातील हानिकारक द्रव्ये, चयापचयातील उत्सर्जन करण्याजोगे पदार्थ(end products of metabolism) हे सर्व शरीरातून शौच व लघवीद्वारे बाहेर टाकले जातात. शरीरातील रक्त किडनीमध्ये आले की सर्व द्रवांशातील अशुद्ध घटक दूर करून मूत्राद्वारे काढून टाकण्याचे काम या किडनी करत असतात. पण बऱ्याचदा अभिनेते-अभिनेत्री आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतात की 'नितळ त्वचेसाठी मी दिवसभरात 8-10 लिटर पाणी पिऊन सगळी टॉक्सिन्स फ्लश करते' आणि मग सगळी जनता "टॉक्सिन्स फ्लश" करण्यासाठी भरपूर पाणी पिऊ लागते. यात मग सकाळी सकाळी पाणी पिण्यापासून दिवसभरात 1 लिटरच्या 10 ते 12 बाटल्या बाटल्या पिणारे सगळेच प्रकार आले. माझे एक पेशंट तर सकाळी तब्बल 2 लिटर पाणी अनशापोटी पीत आणि मग दिवसभरातील वेगळे. पण शरीर हे काही टॉयलेट नाही ना की फ्लशचे बटन दाबले की बदाबदा वाहणाऱ्या पाण्याने स्वच्छ होईल, उलट असे अति पाणी किडन्यांवर अतिरिक्त आणि अनावश्यक दाब निर्माण करेल.
*अति पाणी प्यायल्याने शरीरावर होणारे इतर हानीकारक परिणाम.*
फक्त किडन्याच नाही तर इतर शरीरावरसुद्धा अति पाणी पाण्यामुळे दुष्परिणाम होत असतात. आणि गमतीची गोष्ट म्हणजे टॉक्सिन्स थिअरीची वकिली करणारे ही दुसरी बाजू लक्षात घेतच नाहीत. शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकताना त्याबरोबर सोडियमचे प्रमाणही कमी होते. सोडियमचे प्रमाण कमी झाल्यास थकवा,मसल क्रॅम्पस,डोकेदुखी, रक्तदाब वाढणे अशी लक्षणे दिसतात. अतिरिक्त पाणी शरीरातील उतींमध्ये राहिल्याने सूज येते. आयुर्वेद शास्त्रात तर अजीर्णाच्या प्रकारांमध्ये पाण्याचे अजीर्ण सुद्धा सांगितले आहे.
*पाणी आणि बद्धकोष्ठता यातील संबंध.*
पोट साफ न होण्याची किंवा शौचाला कठीण होण्याची तक्रार असणाऱ्या व्यक्तिना बऱ्याचदा अशी सकाळी पाणी पिण्याची सवय असते. क्लिनिकमध्ये मी प्रत्येक पेशंटला पाणी पिण्याच्या सवयीबद्दल विचारतेच आणि बहुतांश जण पोट साफ होण्यासाठी सकाळी पाणी आवर्जून पितात. एका वेळी भरपूर पाणी प्यायल्याने पोटावर दाब येतो आणि त्यामुळे ते आतड्यांना संकेत पाठवून पोट रिकामे करायला सांगते. पण जर बद्धकोष्ठतेचे कारण वेगळेच असेल तर ही युक्ती दर वेळी काम करेलच असे नाही. *सतत पाणी कमी प्यायल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते पण दर वेळी बद्धकोष्ठतेचे कारण कमी पाणी पिणे हेच असेल असे गरजेचे नाही.* ©Drsnigdha@samanwaya
न्याय-वैशेषिक दर्शनशास्त्रात सांगितलेला 'पिंड ब्रह्मांड न्याय' (जे पिंडी ते ब्रह्मांडी) आयुर्वेदातही आहे. जे संपूर्ण ब्रह्मांडात असते तसेच पिंडातही (शरीरात) असते. पिंडसुद्धा ब्रह्मांडाप्रमाणे आहे असे हा न्याय सांगतो. त्यामुळे वर वर साधे निरुपद्रवी वाटणारे पाणी जेव्हा अति होते, साठून राहते तेव्हा त्रासदायकच होते हे आपल्याला निसर्गात येणारे पूर, फुटलेली धरणे,घरातले लिकेज पुरेपूर दाखवून देतात.
तसेच असे अतिरिक्त पाणी शरीरासाठी किती त्रासदायक ठरू शकते हे आपल्याला लक्षात येईल.
आपल्या काही शंका असल्यास वर दिलेल्या लिंकवर क्लिक करुन कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
मूळ लेखिका,
डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक.
समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.
बोरीवली.
9870690689
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 04 जानेवारी 2021 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2021/01/blog-post_3.html
या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)