Pages

Saturday, 2 January 2021

उदकाचिये अर्ती.....अर्थात पाणी किती आणि कसे प्यावे

   


    

  सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आंग्ल नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्ष 2021 मधील पहिल्याच लेखाचा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. *तो म्हणजे पाणी*. अर्ति म्हणजे पीडा/व्यथा. मिलिंद बोकीलांचे हे पुस्तक खरं तर पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे होणाऱ्या व्यथा सांगणारे आहे. तसेच आज या लेखात आपण कमी पाणी पिणे किंवा अति पाणी पिणे या दोन्ही टोकाच्या विचारांमुळे शरीरावर ओढावणाऱ्या समस्या(अर्तिंचा) विचार करणार आहोत.

*पाणी कसे प्यावे?*

              कोविड काळात सर्वांनी काढे/गरम पाणी यांचा जोरदार मारा केला शरीरावर. पण आयुर्वेदात ऋतूनुसार जल,द्रवपदार्थ दिले आहेत. शीत ऋतूंमध्ये काढे,कोष्ण जल (कोमट पाणी) तर उष्ण ऋतूंमध्ये पानक,फांट असे सौम्य प्रकार, सिद्ध जल किंवा श्रुतशीत जल (उकळवून थंड केलेले पाणी वापरण्यास सांगितले आहेत. यातील कोष्ण जल आणि श्रुतशीत जल या प्रकाराबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कारण दैनंदिन जीवनात यांचाच वापर जास्त होतो. इतर प्रकार हे व्यक्तीची प्रकृती-विकृतीनुरूप वैद्यकीय सल्ल्यानेच वापरावेत.

             तर कोष्ण जल म्हणजे उकळलेले पाणी. सर्वप्रथम उकळलेले पाणी म्हणजे पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा नसतो तर *पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करून किमान 10 मिनिटे तरी उकळवावे* . त्यामुळे ते पचायला हलके होते,त्यातील बॅक्टरीया, मायक्रोब्स नष्ट होतात. औषधोपचार करताना आम्ही वैद्य तर कधीकधी आजारानुसार एक अष्टमांश (१/८) , एक चतुर्थांश (१/४) आटवलेले पाणी पिण्याचाही सल्ला देतो. असे गरम पाणी,उकळते नव्हे फक्त गरम, शीत ऋतू, जसे की हिवाळा-पावसाळा असताना प्यावे. उकळलेले पाणी थर्मासमध्ये भरून मग गरजेप्रमाणे ऊनऊन पिता येईल.

याउलट श्रुतशीत जल म्हणजे उकळून थंड केलेले पाणी. उन्हाळ्यात, शरद ऋतूंमध्ये (ऑक्टोबर हीट हो) असे श्रुतशीत जल प्यावे.


*RO चे पाणी VS उकळलेले पाणी*

               क्लिनिकमध्ये बरेच पेशन्ट्स विचारतात की वॉटर फिल्टर्स किंवा UV/RO वापरत असताना पाणी उकळवण्याची खरंच गरज आहे का? शुद्धच असते ते पाणी. पण पाणी फक्त शुद्ध करण्यासाठीच उकळले पाहिजे असे नाही तर उकळल्यामुळे ते लघु आणि सुपाच्य (पचायला हलके) होते. त्यामुळे पाणी उकळवून प्यावे आणि रोज उकळलेले पाणी त्या दिवशीच संपवावे.


*जेवताना पाणी किती?*

या संदर्भात एक छोटेसे संस्कृत सुभाषित मी उद्धृत करू इच्छिते,


*अजीर्णे भेषजं वारि, जीर्णे वारि बलप्रदम्* ।

*भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्* ।।


अर्थात-अपचन झाले असता,थोडे थोडे पाणी पित रहावे.अन्नपचन पूर्ण झाल्यानंतर(जेवणानंतर 2-3 तासांनी) पाणी पिणे शरीराला बळ देते. जेवताना अधून-मधून पाणी पिणे हे अमृतासमान उपकारक आहे;तर जेवणानंतर लागलीच पाणी पिणे हे विषासमान आहे.

            खरंच असे असते का हो? तर हो. क्लिनिकमध्ये अपचनाचे त्रास घेऊन येणाऱ्या बऱ्याच रुग्णांमध्ये चुकीच्या पाणी पिण्याच्या सवयी के कारण मोठया प्रमाणात दिसून येते. बघा हं,  म्हणजे त्रास खाण्याशी संबंधित पण त्याचे मूळ पाण्याशी संबंधित. अजीर्ण म्हणजे अपचन झाले असतानाही 'ताकद कशी येणार' म्हणून हट्टाने खात राहणे अजून त्रास देते. तशीच बऱ्याच जणांना सवय असते , _जेवताना पाणी न पिता जेवण झाले की मोठा पेला/दोन-तीन पेले पाणी रिचवतात अगदी लोटाभर पाणी सुद्धा पिणारे काही लोक पाहिलेत मी_ पण असे पाणी पोटाचे व्यापार बिघडवते. साधा विचार करा हं, मिक्सरमध्ये वाटण करायचे असेल तर आपण एकदाच मोठा पेलाभर पाणी ओतू का त्यात?काय होईल मग त्या वाटणाचे?,चोथापाणीच राहील ना?किंवा कणिक मळतानासुद्धा आई त्यात हळूहळू थोडे पाणी घालून मळते ना? तसेच आहे आपल्या जठराचे. हा शरीरातील सगळ्यात मोठा , physical मिक्सर आहे आणि फिजिक्स,केमिस्ट्रीचे सगळे गुण या बायोलॉजीमध्ये पण लागू होतात बरं. असे अति पाणी अन्न आणि पाचक रस पातळ करेल त्यामुळे पचनक्रिया नीट होणार नाही. त्यामुळे जेवताना थोडे-थोडे छोटे घोट पाणी प्यावे, म्हणजे अन्नाचा नीट गोळा होतो. वाग्भट म्हणतात, जेवताना 2 भाग अन्नासाठी,  1 भाग द्रवपदार्थांसाठी (फक्त पाणी नव्हे) आणि एक भाग रिकामा ठेवावा म्हणजे पोटावर ताण न येता पचन नीट होईल.

           जेवणापूर्वी पाणी पिणे जी सुद्धा एक अशीच चुकीची सवय. मुख्यत्वे वजन कमी करणाऱ्या लोकांमध्ये पाहायला मिळणारी. हे जेवणाआधी प्यायलेले पाणी, जेवण पचवण्यासाठी लागणारे पाचकरस धुवून पुढे घेऊन जाते. हे पाचकरस भुकेच्या वेळेसच स्रवतात आणि पचनाला मदत करतात. जर पाचकरसच नसतील तर पचन कसे होईल? तसेच भूक आणि तहान या दोन वेगळ्या संवेदना आहेत कारण त्या शरीराच्या दोन वेगळ्या  गरजा आहेत. भूक लागली असता आपण शरीराला , अग्निला (पचनसंस्थेला) पाणी देणार असू तर ते अग्निमांद्य आणि पचनाचे विविध आजार निर्माण करेल. पण जेवणाआधी पाणी प्यायले की मग अशी बिघडलेली पचनसंस्था ,शरीराचे पोषण करू शकत नाही. मग दिसतात केस गळणे, त्वचा खराब होणे,सांधेदुखी, अस्थिसौषिर्य, दौर्बल्य यासारखे आजार. डाएट करूनही हे असे का होते याचे उत्तर चुकीच्या डाएटमध्ये असते. म्हणून डाएट गुगल करण्याऐवजी/स्वघोषित डाएटीशीयन्स कडून घेण्याऐवजी क्वालिफाईड डॉक्टरांकडून घ्यावे.

(क्रमशः)

उद्याच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत, 

◆टॉक्सिन फ्लश करण्यासाठी प्यायला जाणाऱ्या 5-7 लिटर पाण्याचे दुष्परिणाम,

◆तहान लागली असतानाही पाणी न पिणे

◆अति पाणी आणि किडन्या

◆पाणी-ज्यूस-सरबते

◆पाणी आणि बद्धकोष्ठता यातील संबंध.


मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 3 जानेवारी 2021 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2021/01/blog-post.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)



No comments:

Post a Comment