मांसरस
मांसरस म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर मांसापासून बनवलेले अर्थात Meat soup .
(अहो असे दचकू नका … हो हो .. आयुर्वेदातसुद्धा मांसाहाराचा चिकित्सेसाठी उल्लेख आहे हो )
या मांसरसाचे ३ प्रकार आहेत .
- घन - १भाग मांस तर २ भाग पाणी ( १:२ )
- मध्यम - १भाग मांस तर ३ भाग पाणी ( १:३ )
- तनु - १ भाग मांस तर ४ भाग पाणी ( १:४ )
साहित्य
मांस - १ भाग ( हे मांस सामान्यतः कोंबडी अथवा बकरीचे व हाडांसहित घ्यावे)
पाणी - २/३/४ पट
हळद
आले - लसूण वाटण
जिरेपूड
मिरेपूड
सुंठ पूड
पिंपळी चूर्ण
हिंग
मीठ
तूप
कृती
कृती
- मांसाला हळद आले-लसूण वाटण लावून १/२ तास ठेवावे .
- कुकर मध्ये आवश्यक त्या प्रमाणात , म्हणजेच २/३/४ पट पाणी , मांस घेऊन पूर्ण शिजेपर्यंत ( हाडे मऊ होऊन आतील मज्जाभाग पाण्यात विरघळेपर्यंत ) शिजवावे .
- शिजल्यावर त्यातील पाणी व मांस वेगळे करून घ्यावेत . (अकृत मांसरस )
- भांड्यात तूप गरम करून त्यात लसून पाकळी ठेचून हिंग घालून फोडणी करावी .
- मांसरस त्यामध्ये घालून जिरेपूड मिरेपूड सुंठ पिंपळी याचे चूर्ण घालावे आणि उकळी येऊ द्यावी .
- चवीपुरते मीठ घालावे .
मांसरस तयार आहे .
टीप
- वरील कृतीपैकी तिसऱ्या पायरीपर्यंत तयार केल्यास त्याला 'अकृत मांसरस' (फोडणी न देता) म्हणतात . हा असाच पिता येतो व तुलनेने पचायला हलका असतो .
- ५-६ पायरी पर्यंत तयार केल्यास त्याला 'कृत मांसरस' म्हणतात
- हाच मांसरस आधी मांसाचे तुकडे तूप - हिंग, जिरे, मिरे आदि मसाल्यावर भाजून घेऊन मग पाणी घालून सुद्धा बनवता येतो .
- चार पट पाणी घालून बनवताना जर मांसरस खूप पातळ वाटत असेल तर मांसासकट उकळी काढून आटवून दाट करावा .
- वेसवार - यामध्ये बोनलेस मांस वापरून १ ते ३ पायऱ्या कराव्यात व नंतर हे मांस मिक्सर मध्ये वाटून ४-५ कृती करावी .
गुण
मांसरस हा वात-पित्तनाशक , बलदायी,थकवा दूर करणारा , तृप्ती देणारा, शुक्र धातुला वाढविणारा आहे . त्यामुळे उरःक्षत , तापातून उठेलेले रोगी,fracture - dislocations चा त्रास असल्यास, जुनाट तापामध्ये शक्ती येण्यासाठी, पचनशक्ती कमी झाली असेल तर, थकवा आला असेल तर,विस्मरणाचा त्रास होत असेल तर मांसरस आहारात वापरावा .
तसेच वेसवारसुद्धा मांसरसाप्रमाणेच असतो, पण मांसाचा वापर असल्याने पचायला अधिक जड पण बलदायी,स्निग्ध, वातरोगनाशक असतो.