उपवास हा शब्द 'उपविश ' या संस्कृत क्रियापदापासून बनला आहे. 'उप' म्हणजे जवळ आणि 'विश ' म्हणजे रहाणे /वास करणे. यामुळे उपवास या शब्दाचा अर्थ होतो शरीर - मनाने देवाच्या जवळ रहाणे . व्यक्तीच्या कायिक-मानसिक शुद्धतेसाठी उपवासाची योजना केली गेली आहे . पण हल्ली उपवास म्हणजे अतिकडक अन्न-पाणी वर्ज्य करून (निर्जळी ) किंवा याच्या अगदि विरुद्ध म्हणजे 'एकादशी आणि दुप्पट खाशी' अशा चमचमीत प्रकारचे तरी असतात. या दोन्ही प्रकारात कसली आली आहे हो शुद्धता ?
परमेश्वराच्या जवळ जायचे, ध्यानानंदात तल्लीन व्हायचे तर शरीरात लाघव म्हणजेच हलकेपणा आणि मनाला उत्साह हवा.
आयुर्वेदाचार्य चक्रपाणी म्हणतात ,
उपावृत्तस्य पापेभ्यः सहवासो गुणैः सह ।
उपवासो स विज्ञेयो न शारीरविशोषणम ।।
पापकर्मापासून दूर (निवृत्त) होऊन परमेश्वराच्या सहवासात राहणे. पुढे ते असेही म्हणतात उपवास म्हणजे शरीराचे शोषण नाही .
म्हणून उपवास करताना, मनाला चिंता,लोभ,मत्सर,दुःख यातून Break द्यायचा आणि देवाचे नाम-जप यात रमून जायचे आणि शरीराला - पर्यायाने पचन संस्थेला Break द्यायचा व पचायला हलके पदार्थ खायचे म्हणजे पचन सुधारते आणि सामता कमी होऊन शरीराला हलकेपणा (लाघव) येतो
पण प्रत्यक्षात आपण काय करतो तर उद्या शिवरात्र-एकादशी-अंगारकी आहे मग , " सगळ्यांसाठीच नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी करू" म्हणून ढीगभर साबुदाणे भिजत घातले जातात. साबुदाण्याची खिचडी-वडे ,वेफर्स,दाण्याची आमटी असे एकापेक्षा एक दणदणीत ,पचायला जड असलेले खाऊन आपण पचन संस्थेला अजून दमवून टाकतो आणि`मग अंग जड वाटणे , गॅसेस होणे, Hyperacidity, डोकेदुखी हे प्रकार सुरु होतात. त्यात अजून भूक दाबण्यासाठी म्हणून चहा-कॉफी चा मारा असतोच . मग सुरू होतात डॉक्टरांच्या वाऱ्या आणि ओरड सुरु होते कि हे उपास-तापास सोसत नाहित ब्वा आपल्याला …….
खरं तर उपवास नाही तर उपवासाची चुकीची पद्धत सोसत नसते आपल्याला. मनाचं-शरीराचं न ऐकता फक्त जिभेचं ऐकल्याचा हा परिणाम असतो.
म्हणून उपवास करताना पुढील पदार्थांचा वापर करावा .
- सामान्यतः उपवासाचे पदार्थ हे पचायला हलके मात्र पचायला सोपी शर्करा असलेले (Simple forms of sugars such as Glucose ,Fructose ) , Magnesium असलेले असावेत जेणेकरून शरीराला त्वरित उर्जा मिळू शकेल.
- चिक्की हा उत्तम पदार्थ आहे. यातील गूळ राजगिरा सुकामेवा हे पदार्थ त्वरित उर्जा देणारे , मिनरल्स आणि प्रमाणात स्निग्ध पदार्थ पुरवणारे असतात .
- उसाचा रस हा बलकारक , तहान शमन करणारा ,मूत्र शोधन करणारा आणि थंड आहे
- शहाळ्याचे पाणी सप्तधातूवर्धक,थंड,तृष्णाहर असे असूनही पचायला हलके तरीही दीपन करणारे आहे .
- वेगवेगळ्या प्रकारची ताजी आणि शक्यतो त्या ऋतुमानातील फळे चावून खावी . फळांचे रस घेतल्यास शरीराला आवश्यक चोथा फेकून दिला जातो आणि गरजेपेक्षा जास्तीची साखर शरीरात जाते म्हणून ते शक्यतो टाळावेत .
- खजूर खारका , जर्दाळू,मनुका,बदाम,अक्रोड,चारोळी यासारखा सुका मेवा मात्र थोड्या प्रमाणात खावा . काजू,पिस्ते,शेंगदाणे टाळावे.
- प्रवासात असताना उपवास करायचा असेल तर आंबापोळी ,फणसपोळी ,कोहळ्याचा पेठा , चिक्की ,सुकामेवा खाता येईल .
रस्त्यावरचे Juices , कापलेली फळे खाऊ नयेत . - गायीचे दूध,ताक,साजूक तूप वापरावे पण दूधापासून बनले आहेत म्हणून बासुंदी ,लस्सी, मिल्कशेक, श्रीखंड, पेढे, बर्फी किंवा पनीरचे पदार्थ खाऊ नयेत ते पचायला जड असतात .
- वेगवेगळे कंद जसे कि शिंगाडा,सुरण, कंदभाजी ,रताळी , कोनफळ हे उपवासासाठी उत्तम, पण ते शक्यतो भाजून किंवा उकडून खावे , तळून खाणे टाळावे .
- सगळ्यात महत्वाचे म्हणजे हॉटेलच्या Menu card वर, वेगवेगळ्या कूकिंग शोज मध्ये "उपवासाचा/ची/चे या विशेषणाने सुरु होणारे सर्व पदार्थ टाळावेत (उदा. डोसे,मिसळ,कचोरी,कटलेट ,सामोसे,कोफ्ते हे आणि असे सगळेच, हल्ली पिझ्झा सुद्धा आला आहे बरं का.. )
शेवटी उपवास का आणि कशासाठी करायचे या मागची कारणमीमांसा लक्षात घेणे महत्त्वाचे नाहीतर चवीसाठी खायचे असतील तर या पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी उपवासाचे निमित्त कशाला?
शेवटी आरोग्यासाठी , आनंदासाठी केलेला उपवास खरा,नाही का?
शेवटी आरोग्यासाठी , आनंदासाठी केलेला उपवास खरा,नाही का?
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 28 फेब्रुवारी 2016 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2016/02/blog-post.html?m=1
या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)