Pages

Wednesday, 20 December 2017

विरुद्धाहार ( Incompatible Diet) भाग 2



विरुद्धाहार ( Incompatible Diet) याविषयी पहिल्या भागात आपण विरुद्धाहार म्हणजे काय, सेवनानंतर त्याचे पाचन कसे होते तसेच संयोग विरुध्द म्हणजे काय हे पाहिले. या भागात आपण विरुद्ध आहाराचे इतर प्रकार, त्यामुळे होणारे आजार, विरुद्ध आहार कसा सोडावा आणि विरुद्धाहार सेवनाने झालेल्या आजारांची चिकित्सा या मुद्दयांविषयी माहिती घेऊ.


  • देशविरुद्ध - जांगल देशात, (कोरड्या हवामानाचा प्रदेश) , रुक्ष, शुष्क , कमी प्रमाणात स्नेह असलेले अन्नपान सेवन करणे किंवा आनूप देशात (किनारी प्रदेश, दलदल-पाणथळ जागा)अशा ठिकाणी कफ वाढवणारे पदार्थ सेवन करणे म्हणजे देश विरुद्ध होय.
           उदाहरणादाखल सांगायचे अशा वेळी खरं तर जांगल प्रदेशात बेसन,कडधान्ये यासारखे वात वाढवणारे पदार्थ खाऊ नयेत , आहारात तेला-तुपाचा वापर असावा. पोळी-पराठे यासाठी कणिक मळताना त्यात तेल-भाजताना तेल/तूप अवश्य असावे. सलाड खायचे झाल्यास ड्रेसिंग म्हणून कोणतेतरी तेल नक्कीच वापरावे. अशा युक्ति-प्रयुक्ति वापरून जेवणात स्निग्ध पदार्थांचा समावेश असावाच. याउलट आनूप देश , इथे कफ दोषांचे प्राबल्य निसर्गतः असते. त्यामुळे कफाच्या गुणांचे पदार्थ न खाता विरुद्ध गुणांचे पदार्थ सेवन करावे. कामानिमित्त/शिक्षणानिमित्त दूर देशी राहाणाऱ्या व्यक्तींनी याचा नीट विचार करायला हवा.
  • काल विरुद्ध - काळ विरुद्ध म्हणजे  काळाच्या विरुद्ध आहार.जसे की शीत काळात शीत रुक्षादी गुणांचे सेवन किंवा उष्ण काळात तिखट,उष्ण गुणांचे सेवन करणे. उदा. वर्षा तसेच हेमंत ऋतुमध्ये वातावरणातील शैत्य व रुक्षता यामुळे वात दोष वाढलेला असतो. अश्या वेळी वात दोष वाढवणारे पदार्थ सेवन केल्यास वातप्रकोप होण्याची शक्यता असते.याउलट ग्रीष्म,शरद ऋतुमध्ये तिखट, झणझणीत , पित्तवर्धक अन्नाचे सेवन त्रासदायक ठरेल.
  • मात्रा विरुद्ध - मात्रा म्हणजे प्रमाण. एखादी गोष्ट ज्या प्रमाणात सेवन करणे अपेक्षित आहे ते तसे न करता विपरीत प्रमाणात सेवन करणे म्हणजे मात्रा विपर्यय. उदा. लोणचे भाजीसारखे व भाजी लोणच्यासारखी खाणारे लोक म्हणजे ‘मात्रा विरुद्ध.’  तसेच च्यवनप्राशाची चव आवडते म्हणून ३-४ मोठ्ठे चमचे भरून नाष्टयाऐवजी च्यवनप्राशच खाणे हे मात्रा विरुद्ध (औषध औषधाप्रमाणेच खायचे, अन्नाप्रमाणे नाही.)  हेमंत-शिशिर ऋतुत अग्नि बलवान असताना/ कडकडून भूक लागलेली असताना डाएट म्हणून-जेवण आवडत नाही म्हणून थोडेेसेच जेवणे हेसुद्धा ‘मात्रा विरुद्धच’!!
तसेच पूर्वी सांगितल्याप्रमाणे मध,तूप,तेल वसा व पाणी यापैकी कोणतेही दोन तीन,चार किंवा पाचही पदार्थ एकत्र करताना समान मात्रेत एकत्र करून खाऊ नयेत.
एखादे औषध मध-तूपासोबत घ्यायला सांगितले असेल तर मध-तूप समान मात्रेत न घेता विषम प्रमाणात घ्यावे.
  • सात्म्य विरुद्ध - सात्म्य म्हणजे सवयीचे. ज्याची शरीराला पूर्वीपासून सवय आहे असे. म्हणजे ज्या व्यक्तीला शाकाहारी जेवण सवयीचे आहे त्याला जर मांसाहार करायला सांगितला तर ते सात्म्यविरुद्ध होईल. सर्वसाधारणपणे दिसणाऱ्या फूड अलर्जी या सात्म्य विरुद्ध अन्नाचे उदाहरण म्हणता येतील.
  • दोष विरुद्ध - वात-पित्त-कफ दोषांच्या गुणांच्या समान गुणांचे अन्न , औषध,कर्म करणे हे दोष विरुद्ध आहे.
             येथे हे लक्षात घ्यायला हवे की समान गुणांचे सेवन हे त्या-त्या दोषांचा प्रकोप करणारे असते त्यामुळे समान गुणाभ्यास (सारख्याच गुणधर्माच्या आहाराचे सतत सेवन) हे असलेल्या विकारांना अधिकच वाढवेल त्यामुळे ते विरुद्ध होते.
  • अग्नि विरुद्ध - अग्नि म्हणजे पचनशक्ति. मंदाग्नि असलेल्या व्यक्तिनी जर पचायला जड़ असे जेवण जेवले याउलट तीक्ष्णाग्नि असलेली व्यक्ति हलके, सहज पचणारे अन्न खात असेल तर ते अग्नि विरुद्ध आहे. कारण पचत नसताना पक्वान्ने खाल्ली तर अजीर्णच होणार आणि भूक/पचवण्याची ताकद असताना खिचडी/लाहया खाल्ल्या तरीही त्रास होणारच.
  • वीर्य विरुद्ध - उष्ण वीर्य व शीत वीर्य पदार्थ ( वीर्य म्हणजे potency शक्ति, कधी कधी व्यवहारात आपण असं म्हणतो की अमुक एक पदार्थ प्रकृतिला गरम असतो,तमुक थंड असतं सामान्यतः आपण त्यावेळी त्या पदार्थाचे वीर्य कसे आहे यासंदर्भात बोलत असतो.)
           तर असे उष्ण व शीत वीर्य पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. शीत वीर्य असलेले दूध - मलई  व शीत वीर्य असलेले मासे, खिचडी व दूध , दूधाचे पदार्थ , गोडाचा शिरा ,दूध-भात अशा पदार्थांबरोबर लोणचे-चटणी खाऊ नये.
  • कोष्ठ विरुद्ध - ‘कोष्ठ’ म्हणजे ‘कोठा’. एखाद्याचा कोठा हलका आहे असा शब्दप्रयोग आपण ऐकतो तेव्हा त्या व्यक्तीला परसाकडे जाताना काही त्रास होत नाही, उलट काही जड अन्न खाल्ले की शौचास होतेच, पोट फुगणे, ढेकरांचा त्रास होतो. त्यामुळे ‘मृदू कोष्ठी’ व्यक्तिन्नी पचायला जड अन्न खाणे ‘कोष्ठ विरुद्ध’ आहे. याउलट ‘क्रूर कोष्ठी’, ज्यांचा कोठा जड आहे अशांनी, कडधान्य,ब्रेड सारखे पदार्थ खाणे हेसुद्धा ‘कोष्ठ विरुद्ध’च की.
  • अवस्था विरुद्ध - शरीरअवस्थेच्या विपरीत आहार करणे म्हणजे अवस्था विरुद्ध. उदा. मेहनतीचे काम, मैथुन , व्यायाम आदि क्रियांमुळे शरीरात स्वाभाविकतः वातवृद्धि होते अशा वेळी वातवर्धक आहार करणे किंवा निद्रा , तंद्रा, आलस्य अश्या अवस्थेमध्ये कफवर्धक आहार करणे हे अवस्था विरुद्ध समजावे.
  • क्रम विरुद्ध - आपल्याकडे भोजनाचा एक सामान्य क्रम निर्देशित आहे, त्या विषयी अजून विस्ताराने नन्तर बोलता येईल, ज्यानुसार आधी मल-मूत्र विसर्जन करून, भूक लागली की जेवावे असे सांगितले आहे. याचे पालन न करणे म्हणजे क्रम विरुद्ध. बऱ्याचदा खाल्ल्यावर “प्रेशर” येते म्हणून भूक लागलेली नसताना खाणारे महाभाग असतात की.
  • परिहार विरुद्ध - परिहार म्हणजे काय करु नये याचे नियम. अमुक पदार्थ खाल्ल्यानंतर ठराविक पदार्थ टाळावे. जसे की मांसाहार किंवा किंवा चीज़/बटरयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिऊ नये कारण असे केल्यास या खाद्यपदार्थांमधील स्निग्धपदार्थ अधिक घट्ट आणि पचण्यास जड होतात. पण हल्ली आम्हाला पिझ्झा खाताना, हॉटेलमध्ये बार्बेक्यू चापताना कोल्ड ड्रिंक्सचीच आठवण होते. मस्त पार्टी हादडल्यानंतर पोटात जागा नसताना dessert बळेबळे फक्त रसनातृप्तिसाठी खाल्ली जातात. हे सगळेच परिहार विरुद्ध आहे.
  • पाक विरुद्ध - पाक म्हणजे शिजणे/पिकणे आणि पाक विरुद्ध म्हणजे त्याउलट कच्चे किंवा अति शिजलेले, करपलेले किंवा अति पिकलेले.
         उदा. जर पेरू कच्चाच खाल्ला तर कसा लागतो? पोटातही थोडी गडबड होते ना? काहींना दुखते , गैसेस होतात. आणि अति पिकलेला नरम पेरू? त्याचाही त्रासच होतो. टिफीन सर्विसेस, रेस्टॉरंट किंवा लग्नपंगती जेथे मोठ्या प्रमाणात अन्न शिजवले जाते अशा वेळी कधी कधी जेवण कमी-अधिक प्रमाणात शिजलेले किंवा करपलेले असते. असे अन्न वारंवार सेवनात आले तर त्रास होतोच.
  • संस्कार विरुद्ध - संस्कार म्हणजे एखादा पदार्थ गुणात्मक चांगला करण्यासाठी केलेली कृती. उदा. डाळीला फोडणी देऊन केलेले वरण किंवा आमटी, तांदूळ धुवून कुकरमध्ये शिजवुन केलेला भात यासारखे धुणे, वाटणे, घुसळणे व अग्निचे संस्कार आपण रोजचा  स्वयंपाक करताना नेहमीच करतो. पण एकदा तळण झाल्यानंतर उरलेल्या तेलात पुन्हा तळणे(अग्नि संस्कार) ,  काश्याच्या, तांब्याच्या भांड्यात तूप ठेवणे (काल संस्कार) , दही तापवून खाणे (अग्निसंस्कार, जो मुग़लई/पाश्चिमात्य पदार्थ बनवताना सर्रास केला जातो.) , तिच गोष्ट मधाची, मधसुद्धा चुकुनही तापवू नये. कल्हई न दिलेली पितळी भांडी स्वयंपाक करताना वापरु नये. तांब्याच्या भांड्यांत आंबट पदार्थ ठेवू नयेत.
  • हृद विरुद्ध - म्हणजे मनाला न पटणारे. आफ्रिकेमध्ये काही जमाती मुंग्यांची चटणी चवीने खातात, चायनामध्ये कित्येक प्राणी चविष्ट मानले जातात पण जर तेच आपल्या पानात वाढले तर? भाजलेला उंदीर.. पट्टिच्या मांसाहारी व्यक्तीलासुद्धा कल्पना करवणार नाही की काही जमातींमध्ये आलेल्या पाहुण्याचे आदरातिथ्य करण्याची ही पद्धत आहे. ही सगळी हृद विरुद्ध अन्नाची उदाहरणे आहेत. असे न आवडणारे पदार्थ मनाविरुद्ध खायला लागणं म्हणजे हृद विरुद्ध होय.
  • संपद् विरुद्ध - संपद् म्हणजे संपन्नता. आहारीय पदार्थ हे गुणसंपन्न असणे फार गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण अन्नाचे पोषक गुण विचारात घेऊन आहार ठरवतो तेव्हा ताज्या भाजीचे गुण सुकलेल्या भाजीत असतील का याचा विचार करायला हवा. पण नेमका हाच विचार आपण करत नाही. आणि रेडीमेड सूप्सची/नूडल्सची  पाकिटं उचलून आणतो. या भाज्या कुठच्या/कशा आणल्यात, इडलीसाठी तयार पीठ आणताना तो दुकानदार तांदूळ-उडिद कोणत्या प्रतीचे वापरतो याचा याचा विचारही आपण करत नाही.
  • विधि विरुद्ध - विधि म्हणजे अन्नविधि. अन्न कसे, केव्हा ,कुठे ,कधी खावे याबाबत आयुर्वेदात काही नियम दिले आहेत, यालाच ‘अन्नविधि’ असे म्हणतात. अन्न ताजे, स्वच्छ असावे, भूक लागल्यावर, एकाग्रचित्ताने जेवावे, जेवताना खाली मांडी घालून बसावे,अन्न एकदम वाफाळते किंवा अति थंड असू नये. हे असे साधे सोपे नियम मोडून केलेला आहार म्हणजे ‘विधि विरुद्ध’

उपाय -
          आता खरं मुद्दयाचं बोललात डॉक्टर!!! कारण हे सगळं वाचून बऱ्याच जणांना धाप लागली असेल. कित्येक जण हे पदार्थ खातही असतील यामुळे ‘आता काय करायचं/हया!!!काsssssही होत नाही.’ अशा संमिश्र भावना काहींच्या मनात असतील. कारण आहाराचे एवढे नियम म्हणजे आमच्या खाण्यावर उगाच बंधने असे वाटणे शक्य आहे. पण खरं सांगायचे तर जगात सगळ्या ठिकाणी बनणारी पक्वान्ने आपण खरंच खाऊ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पचवू शकत नाही हे कटु असले तरी सत्य आहे. कारण असे विरुद्ध आहारी पदार्थ सतत खाण्यात येत असतील तर होणाऱ्या आजारांची यादी तर एकदा बघा.
ग्रहणीरोग (IBS), पचनासंबंधी आजार, अम्लपित्त, अतिसार, धमनीप्रतिचय (रक्तवाहिनीमध्ये अवरोध) , अपस्मार (आकडी येणे), शिरःशूल,, नपुंसकता (स्त्री व पुरुष दोघांमध्ये) , संतानदोष (वीर्य व स्त्रीबीज दोष) , विसर्प,विस्फोट,किलास,कुष्ठ यासारखे त्वचारोग, उदररोग , पांडुरोग (रक्ताल्पता) , सतत ताप येणे, वारंवार होणारी सर्दी खोकला, अलर्जी चे आजार, श्वास लागणे , सर्वाङ्ग किंवा एका अवयवावर सूज असणे हे सगळे आजार विरुद्ध आहार खाल्ल्याने होतात. मग आता या आजारांचे गाम्भीर्य लक्षात घेता फक्त जिभेचे चोचले किंवा लेटेस्ट स्टाइल म्हणून असा आहार घेत रहाणे कितपत योग्य आहे??
            आता पुढचा प्रश्न लगेच मनात येईल “मग, हे पदार्थ आम्ही कध्धी म्हणजे कध्धीच  खायचेच नाही का? तर याचे उत्तर असे आहे की असे पदार्थ पचण्यासाठी गरजेची आहे ति म्हणजे उत्तम पाचनशक्ति जी काहींना अनुवांशिकतेने मिळते आणि मिळाली किंवा नाही मिळाली तरी सर्वांनाच कमवावी लागते. हे कमवणे कष्ट करुनच होते. याचा अर्थ इथे नियमितपणे केलेले शारीरिक कष्टच अपेक्षित आहेत. सध्याच्या यांत्रिक जगात कमी कष्ट + जास्त खाणं हा जो आपला “लाइफचा फंडा” आहे तो बदलायला हवा. आणि जर कधी अपरिहार्यतेने जर असे पदार्थ खायची वेळ आलीच तर हे पदार्थ अतिशय कमी प्रमाणात खावे. वैद्यकीय सल्ल्याने आमपाचक औषधे घ्यावी. मात्र विरुद्ध आहार सेवनाने जर आधीच  आजार झाले असतील तर मात्र त्यांच्या उपचारार्थ विरोधी क्रिया- पंचकर्म उपचार करून घेणे क्रमप्राप्त आहे.

टीप - विषयाचा आवाका मोठा असल्याने दोन भागांत विषय मांडला तरी विस्तारभयाने आवरते घेताना काही त्रुटि राहू शकतात. त्यामुळे आपल्या काही शंका असल्यास निःसंकोचपणे खाली असलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये विचाराव्यात.

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी २१ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या  https://samanwayayurved.blogspot.in/?m=1 या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)

Thursday, 30 November 2017

विरुद्धाहार ( Incompatible Diet ) भाग १







                 हल्ली दूरचित्रवाणीवरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे कुकिंग शोज.. यांची लोकप्रियता इतकी वाढली आहे की फक्त खाद्यन्तिसारख्या विषयावर कार्यक्रम सादर करणाऱ्या वाहिन्यांचासुद्धा स्वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग तयार होत आहे. अशाच एका कार्यक्रमात मला “तो” दिसला. अगदी फ्रेश ,दिमाखदार…. माझ्यासारख्या जातीच्या खवय्याला त्याची भुरळ पडली नसती तर नवलच. त्याचे नावही बाजूलाच दिमाखात चमकत होते, “अजवायनि पोम्फ्रेत..” (😋😉)  एवढा मोठा, ताजा,फडफडित पापलेट पाहून जीभेला पाणी सुटले नाही तर नवलच!! उत्सुकतेने पाककृती पाहिली तर त्यासाठी शेफनी एका सगळ्यात आधी पापलेटला दहयाचा चक्का लावला,त्यावर मीठ व इतर मसाले लावले , मग हे सगळे फेटलेल्या अंडयामध्ये घोळवले. ही प्रत्येक कृती बघताना माझ्या वैद्यकीय मनाला सुग्रास जेवणात प्रत्येक घासाला खडा यावा तशी खटकत होती. तरीही एखादीच डिश अशी असेल म्हणून दुर्लक्ष केले पण पुढील डिश तर त्यापेक्षा वरचढ होती.. ‘बेकन आईसक्रीम’. आणि ते बनवताना त्यांनी जी सामग्री सांगितली ती ऐकून मी टीव्हीच बंद केला कारण त्यात असणार होते, बेकन (एक प्रकारचे खारवलेले सुके मांस) ,अंडी, मीठ, दूध, क्रीम, मेपल सिरप…. या पदार्थांनी आणि कृतींनि बनलेल्या या दोन्ही पाककृति कितीही चवदार असल्या तरी त्या ‘विरुद्ध आहार’ आहेत. जिभेचे क्षणिक लौल्य पुरवताना आपण करत असलेले हे विरुद्ध आहाराचे सेवन अनेक जीर्ण (Chronic) आजार होण्यासाठी कारणीभूत ठरते.
          आता बरेच जण विचारतील की, डॉक्टर,तुम्ही सारखा हा शब्द वापरत आहात पण हे ‘विरुद्ध’ म्हणजे आहे तरी काय??? कारण आपल्याला विरुद्ध म्हणजे Opposite/ contrast/ reverse असाच अर्थ पटकन आठवतो. इथे हे anti/ adverse या अर्थी पहायला हवे. असो, विषयांतर होण्यपेक्षा  भाषाशास्त्राचा तास इथेच थांबवून आयुर्वेद शास्त्रातील ‘विरुद्ध आहार’ ही संकल्पना आपण समजून घेऊ. तर ‘विरुद्ध आहार’ ही आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. ‘विरुद्ध आहार’ म्हणजे असा आहार ज्या मधील  घटकपदार्थ वेगवेगळे खाल्ले असता कदाचित काही त्रास होणार नाही परंतु जे चुकीच्या पद्धतीने एकत्र करून खाल्ले असता वेगवेगळ्या आजारांना कारणीभूत होतात. आता हेच पहा ना, वर वर्णन केलेल्या पाककृतींमध्ये  दही, अंडी ,मासे , मीठ ,दूध हे पदार्थ वेगवेगळे खाल्ले तर अपायकारक नाहीत पण जर एकत्र करून खाल्ले तर त्यातून तयार होणारा पदार्थ विरुद्धान्न असल्याने त्रासदायक आहे.

आयुर्वेदात सांगितले आहे,
                   “ यत्किंचिद्दोषमुत्क्लेश्य न हरेत् तत् समासतः ।
                     विरुद्धम् इति………”

म्हणजे असा आहार जो सतत सेवन केल्याने कफादि दोषांना अनावश्यक प्रमाणात वाढवतो पण शरीरातून काढून टाकू शकत नाही. त्याला ‘विरुद्ध’ असे समजावे. मग अशा दोषांचे पुढे होते तरी काय? तर हे अनावश्यक वाढलेले दोष शरीरात साचून राहतात आणि विषाप्रमाणे विविध आजारांना निर्माण करतात. (ज्याप्रमाणे एखादे विष शरीरात दीर्घकाळासाठी थोड्या-थोड्या प्रमाणात जात राहीले तर ते तात्काळ मारक होत नाही पण त्याच्या विषाक्ततास्वरूप शरीरात ,कालांतराने घातक ठरणारे, वेगवेगळे आजार जाणवू लागतात - Slow Poisoning).
                  यामागील कारण असे की सतत विरुद्ध आहार खाण्यात आला तर त्यामुळे ‘आमनिर्मिती’ होते. ‘आम’ म्हणजे काय हा खरतर एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. त्यामुळे त्याविषयी आपण नन्तर सविस्तर पाहू पण सध्या हे समजणे पुरेसे आहे की ‘आम’ म्हणजे ‘अपाचित, अपायकारक  आहाररस.’ त्यामुळे ही क्रिया दीर्घकाळ सुरु राहिली तर शरीरात साचणाऱ्या आणि सतत निर्माण होत राहणाऱ्या या आमदोषामुळे वेगवेगळे जीर्ण, कष्टसाध्य व्याधी होतात. उदा. अपचन, मलावरोध, अम्लपित्त यासारख्या वरवर साध्या वाटणाऱ्या पण प्रत्यक्षात गंभीर अशा आजारांपासून थेट त्वचारोग, वाढलेले कॉलेस्टेरोल किंवा अगदी हृदयरोगापर्यंत आजाराचे मूळ सतत/दीर्घकाळासाठी केल्या जाणाऱ्या विरुद्धाहार सेवनाच्या सवयीत दिसते. सध्याच्या काळात याचे मूळ बदलत्या खाद्य शैलीमध्येसुद्धा आहे.  आपण सगळेजण जाणता- अजाणता थोड्याफार प्रमाणात विरुद्धाहार सेवन करतच असतो. त्यामुळे आता आपण कोणते अन्नपदार्थ व का विरुद्धाहार आहेत ते पाहूयात,
  • संयोग विरुद्ध - संयोग म्हणजे एकत्र करणे. जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र करून एखादी पाककृति तयार केली जाते तेव्हा त्याला संयोग असे म्हणतात. या तयार होणाऱ्या पदार्थात काही असे चुकीच्या पद्धतीने पदार्थ मिश्रित केल्यास त्याला ‘संयोग विरुद्ध’ असे म्हणतात. जसे की, लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या उदाहरणांमध्ये दही-मासे, दही-अंडी, मांस(बेकन)- दूध, मांस-क्रीम, मांस-अंडी, दूध-अंडी हे संयोग विरुद्ध आहाराचे उदाहरण आहे. अजून काही उदाहरणे पुढीलप्रमाणे
  1. आनूप मांस (अधिक पाण्यातील, दलदलीच्या प्रदेशात , किनारी भागात पोसल्या गेलेल्या प्राण्यांचे मांस,मासे) हे उडिद, मध,मोड आलेले धान्य, कमलनाल, मूळा ,गुळ याबरोबर खाऊ नये.
  2. दूध व मीठ एकत्र खाऊ नये. (दूधात मिठाचा खडा पडणे हा वाक्प्रचार आपल्याला माहित असतो आणि म्हणजे काय होते तेसुद्धा माहित असते पण पास्ताचा व्हाइट सॉस बनवताना मात्र आपण ते विसरतो.)
  3. दूध व मासे अजिबातच खाऊ नयेत
  4. दूध आंबट पदार्थ तसेच फळे यांच्या बरोबर खायचे नसते.(म्हणजे फ्रूट सलाड, फ्रूट मिल्कशेक्स यांना कायमचे टाटा-बाय , अपवाद फक्त नैसर्गिकरित्या पिकलेल्या गोड चवीचा आंबा, जो दूधासोबत खाता येतो.) शिकरण खाणाऱ्या सर्वांनी याचा विचार करायला हवा.
  5. दही व कोंबडयाचे मांस एकत्र खाऊ नये (मुग़लई डिशेस)
  6. मोड आलेले धान्य व कमलनाल खाऊ नये.
  7. ताक , दही किंवा ताडगोळा यांच्या बरोबर केळी खाऊ नये.
  8. मध,तूप,तेल वसा व पाणी यापैकी कोणतेही दोन तीन,चार किंवा पाचही पदार्थ एकत्र करताना समान प्रमाणात एकत्र करून खाऊ नयेत.
  9. एखादे औषध मध-तूपासोबत घ्यायला सांगितले असेल तर मध-तूप समान मात्रेत न घेता विषम प्रमाणात घ्यावे.
  10. उडदाच्या वरण/सूपासोबत गुळ, दूध, दही,मूळा खाऊ नये. (मराठी पाककृतींमध्ये उडिद याप्रकारे वापरले जात नसावे पण ‘मां की दाल’, ‘दाल मखनी’ , ‘काली दाल’ या पूर्णपणे उडिदापासून बनवलेले पदार्थ आहेत.तसेच दाल तड़का , दाल फ्राय या पाककृतींमध्येही उडिद असते.

(क्रमशः)

टीप - पुढील भागात वाचा विरुद्ध आहाराचे इतर प्रकार, विरुद्ध आहार सेवन केल्याने होणारे आजार, त्यांची चिकित्सा व विरुद्ध आहार कसा कमी करावा याविषयी उपाय.



(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०१ डीसेंबर २०१७ रोजी आपल्या http://samanwayayurved.blogspot.com या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)

Tuesday, 14 November 2017

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता.....


 ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता



                   विंदा करंदीकरांची ही कविता वाचली की आम्ही मराठी माध्यमातील मुले परत आपल्या शाळेत जातो. दर वर्षी हिवाळा आला की थंडीत कुडकुडताना,सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरताना ही माझी लाडकी कविता मला हमखास आठवतेच. आताही फक्त शीर्षक देताना या सर्व आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. थंडीचे वर्णन या कवितेत इतक्या छान शब्दांत मांडले आहे की साधं-सहज वाचतानासुद्धा निर्जीव, बोचरी थंडी जिवंत झाल्याचा भास होतो.
                 असो, तर या पूर्वीच्या लेखात आपण थंडीत घ्यायची त्वचेची आणि केसांची काळजी याविषयी माहिती घेतली. या लेखात आपण आहार-विहार याविषयी माहिती घेऊ. आहार म्हणजे काय खावे - काय खाऊ नये. विहार म्हणजे या ऋतुत दिनचर्येमध्ये काय बदल केले पाहिजेत हे समजून घेऊ.

आहारातील पथ्य :

  1. या ऋतुत कफकर आहार असावा. मधुर, अम्ल व लवण रसात्मक अन्न आहारात असावे. --------- याउलट कटु-तिक्त-कषाय रसात्मक आहार वातकारक असल्याने टाळला पाहिजे.
  2. तृणधान्य - या काळात पचनशक्ति चांगली असते. त्यामुळे या सुमारास बाजारात येणारे नवीन धान्य, जे कफकर असल्याने इतर ऋतूंत वर्जित असते , ते या काळात खावे असा निर्देश आहे. तांदूळ,ज्वारी,बाजरी तसेच गहू आहारात असावा. ------- जुने ,भाजलेले धान्य रुक्ष असते. असे धान्य, नाचणी, जव, वरीचे तांदूळ खाऊ नये.
  3. कडधान्य खाताना मटकी, उडिद, तूर , चवळी ही कडधान्ये आहारात असावी. -------- वाल, वाटाणे,चणे, कुळीथ यासारखे धान्य टाळणे योग्य.
  4. पथ्याच्या भाज्या - कॉलिफ्लॉवर, बटाटा, बीट, दोडका, दूधी भोपळा, लाल भोपळा, भेंडी,गाजर,मूळा, पडवळ ,सुरण, नवलकोल, कोहळा  खाव्य ------ कारली, गवार, कमलकंद (अरबी), शिंगाडा या भाज्या खाऊ नये.
  5. पालेभाज्या - पालक,शेवग्याचा पाला,आंबट चुका, तांदूळजा या भाज्या पथ्यकारक आहेत ------ तर शेपू, टाकळा, अळू या भाज्या अपथ्य आहेत.
  6. सिताफळ, केळी, चिकू, संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळींब, अननस, पपई, पपनस यासारख्या फळांचा मोसम असल्याने ही फळे आवर्जून खावी, स्ट्रॉबेरी, द्राक्षे ही फळे अजून एखाद - दोन महिन्यांनी खाता येतील. ------- याउलट जांभूळ, ताडगोळा, कमरख (star fruit) ही फळे खाऊ नयेत.
  7. सुका मेवा - सगळ्या प्रकारचा सुका मेवा काजू,बदाम, अक्रोड, जर्दाळू, खजूर,पिस्ते,मनुका,बेदाणे या ऋतुत आवर्जून खावे.
  8. दूध व दुधाचे पदार्थ - दूध , दही, लोणी, मलई , तूप , लस्सी,पनीर, चीज़ (प्रोसेस केलेले नव्हे) , श्रीखंड यासारखे सर्व पदार्थ पाचकाग्नि बलवान असल्याने योग्य प्रमाणात खाता येतात. ------- मात्र हे पदार्थ फ्रीजमध्ये गार करून किंवा आईसक्रीम घालून खाऊ नये. किंबहुना या ऋतुमध्ये आईसक्रीमच खाऊ नये. तसेच कोल्डड्रिंक सुद्धा पिऊ नये.
  9. ऊस, उसाचा रस, साखर (पण केमिकलयुक्त, साखर नेहमीच वर्ज्य आहे) , मध या काळात जरूर वापरावे
  10. तेल , तूप , चरबी यांचा वापर सढळ हस्ते करावा. तरीही तळलेले पदार्थ खाऊ नये. --------- स्निग्ध आहेत म्हणून डालडा, पाम तेल, मार्गरीन मात्र अजिबात वापरु नये.
  11. मांसवर्ग सगळ्या प्रकारचे मासे, मांस या काळात खाता येते मात्र ते प्रमाणातच खावे. -------- सुके मांस - मासे , भाजलेले मांस वातकारक असल्याने खाऊ नये.
  12. मसाले - अग्निदीपन व पचनास मदत करत असल्याने सगळ्या प्रकारचे मसाले जरूर वापरावे मात्र अति तिखट मसालेदार अन्न जेवू नये.
  13. पाणी मात्र सध्या गरम करुनच प्यावे. --------- नळाचे , फ्रिजमधले थंड पाणी पिऊ नये.


विहारातील पथ्य -

  1. आहारात तिक्त, कटु,कषाय रस वर्ज्य असले तरीही दात घासण्यासाठी मात्र याच रसांचा वापर करावा. म्हणजेच या चविंचे दंतमंजन, टूथपेस्ट वापरावे. गोड टूथपेस्ट वापरु नये.
  2. तोंड धुवायला- शौच - स्नानासाठी गरम पाणी वापरावे.
  3. आधी सांगितलेल्या लेखामध्ये थंडीच्या दिवसांत अभ्यंग व उद्वर्तन यांचे महत्व सांगितले आहे. त्यामुळे अभ्यंग-उद्वर्तन जरुर करावे.
  4. या काळात दिवस लहान असतो त्यामुळे ( रजईत गुरफटून झोपणे कितीही प्रिय असले तरीही) पहाटे लवकर उठावे. व वातप्रकोप टाळण्यासाठी दिवसा झोपणे टाळावे.
  5. या ऋतुत शरीरबळ अधिक असल्याने जास्त व्यायाम केला तरी चालतो. बळ अधिक आणि पाचकाग्नि जास्त असल्यामुळे शरीर कमवण्यासाठी (बॉडी बिल्डिंग) हा ऋतु अगदी योग्य आहे.
  6. यासाठी कुस्ती, पोहणे , जिममध्ये वेट-ट्रेनिंग यासारखे ताकदीचे व्यायाम प्रकार करता येतात.
  7. घर शेगडी किंवा हीटर वापरून उबदार ठेवावे. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे.
  8. मात्र बसताना गार वाऱ्यावर बसू नये शक्यतो अंगाला थेट वारा लागणार नाही असे पहावे.
  9. बाहेर फिरताना, प्रवास करताना अंग-कान प्रामुख्याने गळा व छाती गरम कपडयानीं झाकुन घ्यावे.
  10. पायात नेहमी चपला/सपाता असाव्यात.

या लेखाचा पूर्वार्ध , हिवाळ्यात घ्यायची त्वचेची व केसांची काळजी , वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा

असा हा थंडीचा मोसम, सर्व ऋतूंमध्ये आल्हाददायक ,बळ देणारा, आणि वर सांगितलेल्या टिप्सचे पालन केले तर मग ही थंडी सजा न वाटता मजा वाटू लागेल. समारोप करताना विंदांची कविता पुन्हा उधृत करते,

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्ध वडावर !
मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.
कविवर्य विंदा करंदीकर


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी १४ नोव्हेंबर २०१७ रोजी आपल्या http://samanwayayurved.blogspot.com या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)

Wednesday, 1 November 2017

हिवाळ्यात घ्यायची त्वचेची व केसांची काळजी




               दसरा गेला….दिवाळीही झाली…. आता कुठे ,सकाळच्या वेळेस का होईना पण हळूहळू थंडी जाणवत आहे. तसेही पु.ल. म्हणतातच की मुंबईला ऋतु दोनच उन्हाळा आणि पावसाळा. सदैव आपल्या घामाच्या नाही तर पावसाच्या धारा. म्हणूनच ही थोडीशी थंडी हवीहवीशी वाटते. गावाकडेही आता थंडी जाणवत असेल आणि हळूहळू वाढेलही. त्यामुळे या थंडीत शरीराची काळजी कशी घ्यावी यासाठी काही टिप्स.
                थंडीचा काळ, हेमंत ऋतु, म्हणजे कफ दोषाचा काळ. कफ म्हणजे बल -- स्निग्ध, शीत, गुरु ,मंद गुणांचा हा कफ दोष शरीराचे पोषण करण्यासाठी महत्वाचा असतो. तसेच थंडीमुळे शरीराग्नि व पचनस्थितिसुद्धा चांगली असते त्यामुळे शरीरबल सुधारते. पण याच कालावधीत वातावरणात आर्द्रता कमी झाल्याने रुक्षता (कोरडेपणा ) वाढतो. या रुक्ष गुणाला शीत हवेची जोड मिळून परिणामी वात दोष वाढतो. त्यामुळे थंडीमध्ये बऱ्याच लोकांमध्ये वाताचे आजार दिसून येतात.

हिवाळ्यात घ्यायची त्वचेची काळजी -  या दिवसांत त्वचेचा वाढलेला कोरडेपणा स्त्रिया-पुरुष-मुले सर्वांसाठीच त्रासदायक असतो. त्वचेवर पुरळ येणे, ओठ फुटणे, टाचांना भेगा पडणे, काही अति रुक्ष प्रकृतीच्या माणसांमध्ये तर त्वचेचे पापुद्रे निघणे, भेगा पडून रक्त येणे यासारखे गंभीर त्रास सुद्धा दिसतात.
यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे अभ्यंग आणि उद्वर्तन म्हणजे औषधी तेलाने सर्वाङ्गाला मालिश करणे व नंतर औषधी उटणे वापरून आंघोळ करणे. अभ्यंगासाठी तेल निवडताना शरीरप्रकृती व व्याधी अनुरुप तेल निवडावे. हे तेल पाण्यात ठेवून कोमट करावे व त्वचेवर जिरवावे. त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने उटणे लावून आंघोळ करावी. त्रासाची तीव्रता व ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसातून दोन वेळा हे मालिश केले तर उत्तमच. पण किमान एकदा तरी करावेच.

अभ्यंग करण्याचे फायदे -
  1. त्वचा मृदू व घट्ट होते, तिची कांती वाढते.
  2. त्वचेतील रक्तवाहिन्या व मज्जातंतु कार्यक्षम राहतात आणि त्यामुळे स्पर्शज्ञान सुयोग्य होते.
  3. स्नायू पिळदार होतात, शरीर स्थिर होते
  4. ग्लानि, आळस, श्रम दूर होतात. 

ओठ फुटत असल्यास - यालाच आयुर्वेदात ‘ओष्ठप्रकोप’ असे म्हणतात. फुटणाऱ्या ओठांसाठी गाईचे साजूक तूप , शताधौत घृत किंवा कोकम तेल अतिशय परिणामकारक असते. लिपबाम पेक्षाही हे शरीराला सात्म्य असलेले पदार्थ दीर्घकाळ टिकणारे परिणाम देतात. आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ओठ फुटत असतील तर ओठांची साले काढणे, सुकलेल्या ओठांना लाळ लावून ते ओले करणे कटाक्षाने टाळायला हवे.

टाचा फुटणे / पाय फुटणे - आयुर्वेदानुसार या विकाराला ‘पाददारी’ असे म्हणतात. वात-पित्त दोषात्मक असा हा आजार आहे. यासाठी सर्वप्रथम कोमट पाण्यात पावले बुडवून ठेवावी. चिरांमधील माती, कचरा, मृत त्वचा हलक्या हाताने चोळून साफ करावी, अजिबात त्वचेचे पापुद्रे सोलून काढू नयेत. मग पावले टॉवेलने कोरडी करून शताधौत घृत लावावे.
फुटलेल्या त्वचेमधून रक्त, पू येत असेल किंवा खाज होत असेल, जंतुसंसर्ग झाला असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि यासाठी औषधोपचार व पायाला लावण्यासाठी औषधे घेणे आवश्यक आहे.
तरीही टाचा, ओठ फुटणे कायम राहिल्यास त्यामागील कारणे शोधणे गरजेचे असते. रक्ताल्पता, दीर्घकाळ असणाऱ्या पचनाच्या तक्रारी, आहाराच्या सवयी, व्यसने यांचाही परिणाम त्वचेवर होत असतो. त्यामुळे वरवर साध्या दिसणाऱ्या या आजारांचे मूळ शोधणे महत्वाचे आहे.

केसांच्या तक्रारी - 
           वातावरणातील रुक्षतेचा परिणाम केसांवरही होतो. यामुळे केस कोरडे होणे,तुटणे, गळणे, केसांत कोंडा होणे , केसांत पुरळ-फोड होणे , केशत्वचेचे पापुद्रे निघणे यासारखे त्रास दिसून येतात. केसांत झालेला कोंडा चेहरा, मान, पाठ , छातीवर पडतो आणि तेथील त्वचेवर पुरळ, पुटकुळ्या येतात. या सर्व तक्रारींचे मूळ केस व केशत्वचा कोरडी असणे यात असते. त्यामुळे हा कोरडेपणा कमी करणे आवश्यक आहे. यासाठी
  1. अभ्यंग - केसांना चांगल्या प्रतीचे कोमट तेल लावून हलक्या हाताने केशभूमी (scalp) ला मालिश करावी व रात्रभर ठेवावे. केसांसाठी शक्यतो खोबरेल किंवा तीळ तेल वापरावे.यामध्ये आवळा, भृंगराज,ब्राह्मी,यष्टिमधु सिद्ध तेल असल्यास उत्तमच.
  2. मालिश करताना हलक्या हाताने करावी जेणेकरून केस तुटणार नाहीत व मुळांशी असलेला कोंडा मोकळा होईल व तेल जिरेल.
  3. शक्य झाल्यास केसांना वाफ द्यावी.
  4. शिकेकाई, रिठ्यासारखी नैसर्गिक द्रव्ये उत्तमच पण ते शक्य नसल्यास सौम्य शाम्पू पाण्यात विरघळवून वापरावे.
  5. केस धुतल्यावर त्यांना चांगल्या प्रतिचे कंडिशनर किंवा सुकल्यानंतर थोडेसे तेल जरूर लावावे.
  6. थंडीतील आहाराचा विचार नन्तर येईलच पण केस आणि त्वचेसाठी सांगायचे झाले तर अति खारट, अति आंबट , अति तिखट पदार्थ टाळावे.
  7. रुक्षता कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांमध्ये नस्य, शिरोधारा, शिरोबस्ति, बस्तिक्रम यांचा वापर केला जातो.
  8. केस गळणे, तुटणे, पिकणे तसेच मानसिक तणाव असल्यास दिसणाऱ्या तक्ररींमध्ये हे उपाय उत्तम काम करतात. त्यामुळे योग्य परीक्षण व वैद्यकीय मार्गदर्शनाखाली हे उपाय करावेत.

  त्वचा विकार - केसांचे विकार आणि समन्वय आयुर्वेद :

               हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी  होते आणि तिला छोटे तडे-भेगा जातात हे तर आपण पाहिलेच. पण अशी त्वचा वेगवेगळ्या इन्फेक्शनना कारणीभूत ठरू शकते. हिवाळ्यात गारवा असल्याने बरेचजण 'कावळ्याची अंघोळ' उरकतात. अश्या वेळी काखा,पावले,गुप्तांगाची जागा नीट साफ न केल्यास तिथं fungal infection होण्याची शक्यता वाढते. लायकेन प्लॅनस (Lichen planus), एक्झिमा, सोरायसिससारख्या त्वचविकारातही खाज,रक्त येणे,त्वचा फुटणे असे त्रास वाढतात. अश्या वेळी _समन्वय आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये आपण *त्वचा परीक्षण* करून त्यानुसार औषधीपचारांची दिशा_ ठरवतो.येणाऱ्या थंडीसाठी नीट आखणी करून औषधे व पंचकर्म उपचार ठरवावे लागतात.

केसांच्या विकारांत केशत्वचा म्हणजेच स्काल्प निरोगी असणे खूप महत्त्वाचे असते. कारण केशत्वचा जर सशक्त असेल तर कोंडा निर्माण करणारे सिबोरीक , फंगल, स्कॅल्प सोरायसिस असे आजार, केस रुक्ष होणे, केसांची टोके दुभंगणे-तुटणे हे सगळेच आजार आटोक्यात येतात. यासाठी आपण क्लिनिकमध्ये *संगणकीकृत केशत्वचा परीक्षण* (Computerized Scalp Analysis)  करतो. यामुळे आजार (disease diagnosis)नक्की होते आणि त्यानुसार वापरायची औषधे ठरतात.अगदी _तेल-शाम्पूसुद्धा तुमच्या केसांच्या प्रकृतीनुसार कोणता वापरावा हे ठरते_ .


टीप - पुढील भाग -  थंडीच्या दिवसात घ्यायची आहाराची काळजी. ( थोडक्यात हेमंत ऋतुतील आहार-विहार.)



मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 1 नोव्हेंबर 2017 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2017/11/blog-post.html?m=0

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)



Monday, 16 October 2017

Pain management through Ayurveda

How to treat Pain without using Painkillers.

            Pain is defined as an unpleasant sensory or emotional experience associated with actual , potential tissue damage or described in terms of such damage. (Ref. International association for the study of Pain) .
              And how do WE treat this pain???? Just pop some pill into mouth. Because we want some fast results. And This mentality of masses has been the strongest USP for “Painkiller” medicines. No one is even bothered to think about the contents or molecular structure of such medicines. Let's take a Pop Quiz…
Which Painkillers do you use??How many of you know chemical composition of medicines which you pop as a painkiller ?? How these molecules work?? What are proper doses and how many follow it? What is overdose?? What are side effects of such medicines ??
These are very serious questions concerning your life. Popping pills without proper prescription can be hazardous to Health and can even be life threatening. Has anyone given it a thought?? One must seek some alternate options to treat pain.
                Normally we try to suppress sensation of pain by popping up some painkillers which actually stop sensory signals of pain to reach our brain and make us feel relieved, but suppression of pain and treating pain are two different things. These painkillers also have various side effects on our body like hyperacidity, Hepatotoxicity (liver damage), Reno toxicity(damage to kidneys). Hence it is advised to take painkillers when it is an ‘Absolute Necessity’ And under doctor's supervision only
                    Have we ever considered any other options which offer to treat pain and it's root cause excellently. Ayurveda has many solutions by which we can manage pain effectively.
Ayurveda science explains,   

             Ayurveda have described pain under three subcategories , depending on Dosha involved Such as

Vataj (Vata predominance) -

  1. Toda
  2. Bheda
  3. Taadan
  4. Chhedana
  5. Aayamana
  6. Manthana
  7. Vikshepana
  8. Chumchumayana
  9. Nirdahan
  10. Avabhanjana
  11. Sphotana
  12. Didaran
  13. Utpatana
  14. Kampana
  15. Vishleshan
  16. Vikirana
  17. Sthambhana
  18. Puran
  19. Aakunchana
  20. Ankushika

Pittaja (Pitta predominance)

  1. Osha
  2. Chosha
  3. Paridaah
  4. Dhumayana

Kaphaja ( Kapha Predominance)

  1. Kandu
  2. Gurutwa
  3. Suptata
  4. Upadeha
  5. Stabdhata
  6. Shaitya
This is a collection of various pain sensations as per definition of pain and it has been collected and listed with very minute details in order to give proper diagnosis and its  Association with Dosha.

Treatment of Pain

Snehanam ( Oleation ) - It includes massage to the whole body or an affected part with various medicated oils and Ghee. Type of medicated oil/ghee and procedure of Oletion depends on the disorder and type of pain.
         Various types like Sarvang-Ekang Snehan , Karnapooran , Akshitarpan, Katibasti, Manybasti, Hrudbasti, Shirodhara are used to treat knee pain,back pain,arthritic pain,headaches, earache, eye disorders , palpitations or arrhythmic heart conditions.
Snehana procedures at Samanwaya ayurvedic and panchakarma clinic


Swedanam ( Hot Fomentation)   -
Snehana is usually followed by Swedana. It means to sweat or to perspire. For this either dry or wet ingredients are used to create heat and make body sweat. So swedana is the process of inducing sweat either with the help of steam, generated from medicated herbal decoctions or by using pottali which contains dry powders,hot rice boluses or by Lepas.
(Lepas procedure at Samanwaya ayurvedic and panchakarma clinic)

Herbal decoctions are used in generalised body pain,spinal pain. Pinda swedan (Rice boluses) is used for localized specific tissue injury. And Churna Pottali is used for rheumatism,ankylosing spondylosis etc. 

Basti (Medicated enemas) - it is used as an internal treatment for pain management. Various combinations of decoctions,oils,ghee,honey,milk are used as per pain and disease. It is generally performed for 8/16/21 days.

Nasya ( medicated nasal drops) - medicated nasal drops are used to treat 'Urdhva jatrugat vikara’ ie supraclavicular (above neck) disorders. Which mainly includes diseases of head ,neck, ear,throat and eyes. We use various oils, juices,milks,ghee,kwath, powders as per type of pain.

Raktamokshana (Blood letting) - this procedure is done to treat pain caused by haematomas or by toxic blood. It is usually done by Leeches, suction,Venepuncture and by trained doctor only.

Agnikarma - Agnikarma is very useful technique in order to treat local acute pain. eg various joint pain,headache, cervical pain, foot corn, calcaneal sour are treated with this procedure.

All these treatments are used to treat pain and do not have any harmful side effects. But it is very important to know that  All of these procedures require thorough knowledge of anatomy and ayurvedic marma therapy. Hence it  must be performed by Ayurvedic Vaidya only.


P.S. - To read this article in Marathi, click on the link given below,

https://samanwayayurved.blogspot.in/2014/12/blog-post.html?m=1