- देशविरुद्ध - जांगल देशात, (कोरड्या हवामानाचा प्रदेश) , रुक्ष, शुष्क , कमी प्रमाणात स्नेह असलेले अन्नपान सेवन करणे किंवा आनूप देशात (किनारी प्रदेश, दलदल-पाणथळ जागा)अशा ठिकाणी कफ वाढवणारे पदार्थ सेवन करणे म्हणजे देश विरुद्ध होय.
- काल विरुद्ध - काळ विरुद्ध म्हणजे काळाच्या विरुद्ध आहार.जसे की शीत काळात शीत रुक्षादी गुणांचे सेवन किंवा उष्ण काळात तिखट,उष्ण गुणांचे सेवन करणे. उदा. वर्षा तसेच हेमंत ऋतुमध्ये वातावरणातील शैत्य व रुक्षता यामुळे वात दोष वाढलेला असतो. अश्या वेळी वात दोष वाढवणारे पदार्थ सेवन केल्यास वातप्रकोप होण्याची शक्यता असते.याउलट ग्रीष्म,शरद ऋतुमध्ये तिखट, झणझणीत , पित्तवर्धक अन्नाचे सेवन त्रासदायक ठरेल.
- मात्रा विरुद्ध - मात्रा म्हणजे प्रमाण. एखादी गोष्ट ज्या प्रमाणात सेवन करणे अपेक्षित आहे ते तसे न करता विपरीत प्रमाणात सेवन करणे म्हणजे मात्रा विपर्यय. उदा. लोणचे भाजीसारखे व भाजी लोणच्यासारखी खाणारे लोक म्हणजे ‘मात्रा विरुद्ध.’ तसेच च्यवनप्राशाची चव आवडते म्हणून ३-४ मोठ्ठे चमचे भरून नाष्टयाऐवजी च्यवनप्राशच खाणे हे मात्रा विरुद्ध (औषध औषधाप्रमाणेच खायचे, अन्नाप्रमाणे नाही.) हेमंत-शिशिर ऋतुत अग्नि बलवान असताना/ कडकडून भूक लागलेली असताना डाएट म्हणून-जेवण आवडत नाही म्हणून थोडेेसेच जेवणे हेसुद्धा ‘मात्रा विरुद्धच’!!
- सात्म्य विरुद्ध - सात्म्य म्हणजे सवयीचे. ज्याची शरीराला पूर्वीपासून सवय आहे असे. म्हणजे ज्या व्यक्तीला शाकाहारी जेवण सवयीचे आहे त्याला जर मांसाहार करायला सांगितला तर ते सात्म्यविरुद्ध होईल. सर्वसाधारणपणे दिसणाऱ्या फूड अलर्जी या सात्म्य विरुद्ध अन्नाचे उदाहरण म्हणता येतील.
- दोष विरुद्ध - वात-पित्त-कफ दोषांच्या गुणांच्या समान गुणांचे अन्न , औषध,कर्म करणे हे दोष विरुद्ध आहे.
- अग्नि विरुद्ध - अग्नि म्हणजे पचनशक्ति. मंदाग्नि असलेल्या व्यक्तिनी जर पचायला जड़ असे जेवण जेवले याउलट तीक्ष्णाग्नि असलेली व्यक्ति हलके, सहज पचणारे अन्न खात असेल तर ते अग्नि विरुद्ध आहे. कारण पचत नसताना पक्वान्ने खाल्ली तर अजीर्णच होणार आणि भूक/पचवण्याची ताकद असताना खिचडी/लाहया खाल्ल्या तरीही त्रास होणारच.
- वीर्य विरुद्ध - उष्ण वीर्य व शीत वीर्य पदार्थ ( वीर्य म्हणजे potency शक्ति, कधी कधी व्यवहारात आपण असं म्हणतो की अमुक एक पदार्थ प्रकृतिला गरम असतो,तमुक थंड असतं सामान्यतः आपण त्यावेळी त्या पदार्थाचे वीर्य कसे आहे यासंदर्भात बोलत असतो.)
- कोष्ठ विरुद्ध - ‘कोष्ठ’ म्हणजे ‘कोठा’. एखाद्याचा कोठा हलका आहे असा शब्दप्रयोग आपण ऐकतो तेव्हा त्या व्यक्तीला परसाकडे जाताना काही त्रास होत नाही, उलट काही जड अन्न खाल्ले की शौचास होतेच, पोट फुगणे, ढेकरांचा त्रास होतो. त्यामुळे ‘मृदू कोष्ठी’ व्यक्तिन्नी पचायला जड अन्न खाणे ‘कोष्ठ विरुद्ध’ आहे. याउलट ‘क्रूर कोष्ठी’, ज्यांचा कोठा जड आहे अशांनी, कडधान्य,ब्रेड सारखे पदार्थ खाणे हेसुद्धा ‘कोष्ठ विरुद्ध’च की.
- अवस्था विरुद्ध - शरीरअवस्थेच्या विपरीत आहार करणे म्हणजे अवस्था विरुद्ध. उदा. मेहनतीचे काम, मैथुन , व्यायाम आदि क्रियांमुळे शरीरात स्वाभाविकतः वातवृद्धि होते अशा वेळी वातवर्धक आहार करणे किंवा निद्रा , तंद्रा, आलस्य अश्या अवस्थेमध्ये कफवर्धक आहार करणे हे अवस्था विरुद्ध समजावे.
- क्रम विरुद्ध - आपल्याकडे भोजनाचा एक सामान्य क्रम निर्देशित आहे, त्या विषयी अजून विस्ताराने नन्तर बोलता येईल, ज्यानुसार आधी मल-मूत्र विसर्जन करून, भूक लागली की जेवावे असे सांगितले आहे. याचे पालन न करणे म्हणजे क्रम विरुद्ध. बऱ्याचदा खाल्ल्यावर “प्रेशर” येते म्हणून भूक लागलेली नसताना खाणारे महाभाग असतात की.
- परिहार विरुद्ध - परिहार म्हणजे काय करु नये याचे नियम. अमुक पदार्थ खाल्ल्यानंतर ठराविक पदार्थ टाळावे. जसे की मांसाहार किंवा किंवा चीज़/बटरयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिऊ नये कारण असे केल्यास या खाद्यपदार्थांमधील स्निग्धपदार्थ अधिक घट्ट आणि पचण्यास जड होतात. पण हल्ली आम्हाला पिझ्झा खाताना, हॉटेलमध्ये बार्बेक्यू चापताना कोल्ड ड्रिंक्सचीच आठवण होते. मस्त पार्टी हादडल्यानंतर पोटात जागा नसताना dessert बळेबळे फक्त रसनातृप्तिसाठी खाल्ली जातात. हे सगळेच परिहार विरुद्ध आहे.
- पाक विरुद्ध - पाक म्हणजे शिजणे/पिकणे आणि पाक विरुद्ध म्हणजे त्याउलट कच्चे किंवा अति शिजलेले, करपलेले किंवा अति पिकलेले.
- संस्कार विरुद्ध - संस्कार म्हणजे एखादा पदार्थ गुणात्मक चांगला करण्यासाठी केलेली कृती. उदा. डाळीला फोडणी देऊन केलेले वरण किंवा आमटी, तांदूळ धुवून कुकरमध्ये शिजवुन केलेला भात यासारखे धुणे, वाटणे, घुसळणे व अग्निचे संस्कार आपण रोजचा स्वयंपाक करताना नेहमीच करतो. पण एकदा तळण झाल्यानंतर उरलेल्या तेलात पुन्हा तळणे(अग्नि संस्कार) , काश्याच्या, तांब्याच्या भांड्यात तूप ठेवणे (काल संस्कार) , दही तापवून खाणे (अग्निसंस्कार, जो मुग़लई/पाश्चिमात्य पदार्थ बनवताना सर्रास केला जातो.) , तिच गोष्ट मधाची, मधसुद्धा चुकुनही तापवू नये. कल्हई न दिलेली पितळी भांडी स्वयंपाक करताना वापरु नये. तांब्याच्या भांड्यांत आंबट पदार्थ ठेवू नयेत.
- हृद विरुद्ध - म्हणजे मनाला न पटणारे. आफ्रिकेमध्ये काही जमाती मुंग्यांची चटणी चवीने खातात, चायनामध्ये कित्येक प्राणी चविष्ट मानले जातात पण जर तेच आपल्या पानात वाढले तर? भाजलेला उंदीर.. पट्टिच्या मांसाहारी व्यक्तीलासुद्धा कल्पना करवणार नाही की काही जमातींमध्ये आलेल्या पाहुण्याचे आदरातिथ्य करण्याची ही पद्धत आहे. ही सगळी हृद विरुद्ध अन्नाची उदाहरणे आहेत. असे न आवडणारे पदार्थ मनाविरुद्ध खायला लागणं म्हणजे हृद विरुद्ध होय.
- संपद् विरुद्ध - संपद् म्हणजे संपन्नता. आहारीय पदार्थ हे गुणसंपन्न असणे फार गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण अन्नाचे पोषक गुण विचारात घेऊन आहार ठरवतो तेव्हा ताज्या भाजीचे गुण सुकलेल्या भाजीत असतील का याचा विचार करायला हवा. पण नेमका हाच विचार आपण करत नाही. आणि रेडीमेड सूप्सची/नूडल्सची पाकिटं उचलून आणतो. या भाज्या कुठच्या/कशा आणल्यात, इडलीसाठी तयार पीठ आणताना तो दुकानदार तांदूळ-उडिद कोणत्या प्रतीचे वापरतो याचा याचा विचारही आपण करत नाही.
- विधि विरुद्ध - विधि म्हणजे अन्नविधि. अन्न कसे, केव्हा ,कुठे ,कधी खावे याबाबत आयुर्वेदात काही नियम दिले आहेत, यालाच ‘अन्नविधि’ असे म्हणतात. अन्न ताजे, स्वच्छ असावे, भूक लागल्यावर, एकाग्रचित्ताने जेवावे, जेवताना खाली मांडी घालून बसावे,अन्न एकदम वाफाळते किंवा अति थंड असू नये. हे असे साधे सोपे नियम मोडून केलेला आहार म्हणजे ‘विधि विरुद्ध’
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी २१ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.in/?m=1 या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)