Friday, 3 October 2014

शरदाचे चांदणे की कडक उन्हाळा??

                           शरद ऋतू म्हटले की सगळ्यांच्या मनात पहिला विचार येतो तो कोजागिरी पौर्णिमेचा………  ते आटीव दूध , गारवा..  अहाहा…
                           पहिल्यांदा नवरात्र मग कोजागिरी या सगळ्यांचा अत्युच्च परमबिंदू म्हणजे दिवाळी.
हे म्हणजे अगदी, "ऋतू आहे मोठा… नाही सण-आनंदा तोटा…" अशी अवस्था होते या कालावधीत.सण-वार,पक्वान्ने, मिठाया,चमचमीत पदार्थ, फराळ ,फटाके,यांची अगदी रेलचेलच. त्यात आणखी यावर्षी तर एवढ्या सुट्ट्या जोडून आल्यामुळे सर्वांचेच बेतही ठरले असतीलच.
                          पण एवढे सगळे छान-छान चालले असताना सध्या हैराण व्हायला होतेय ते मात्र उन्हाने…. ज्याच्या-त्याच्या तोंडी एकच नाव 'October Heat' (छ्या बुवा, या वर्षी ऑक्टोबर हीट फारच जोरदार..) पण या उष्णतेचा मुकाबला करायचा तरी कसा??
                          यासाठी आपले भारतीय ऋतू- हवामान समजून घ्यायला हवे.भारतीय हवामान साधारणतः सहा ऋतुंमध्ये वर्गीकृत केले जाते. सध्या शरद ऋतू सुरु आहे. हा काळ घटस्थापना- अश्विन शुद्ध प्रतिपदा ते कार्तिक अमावास्येपर्यंत, दोन महिन्यांचा असतो. भाद्रपद महिन्याचा उत्तर काळ ते अश्विन महिना हा काळ उत्तर भारतात तर आश्विन आणि कार्तिक महिना म्हणजे साधारणतः २२ सप्टेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण भारतात शरद ऋतूची लक्षणे दिसतात. या ऋतूत पाऊस संपून वातावरणामध्ये उष्णता वाढू लागते.
                     शारीर स्थिती - शरदामध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे वात दोषाचे निसर्गतःच शमन होते तर उष्णतेमुळे पित्त दोष वाढतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या पित्त प्रकोपाची स्थिती व लक्षणे दिसून येतात. त्यामुळे पित्त तसेच रक्त दोषज विकार तसेच उष्णतेचे विकार या काळात दिसून येतात. शरदाच्या आधीचा ऋतू वर्षा (पावसाळा )या पावसाळ्यात शरीरबळ एकदम कमी असते त्यामुळे शरद ऋतुतही  शरीरबळ आणि पचन शक्ती हीन  स्वरुपाची असते.त्यामुळे कमी शरीर बल, मंदावलेली भूक आणि वाढलेले पित्त यांचा विचार करून दिनक्रम आणि आहार यामध्येही आवश्यक ते बदल करावे लागतात.
                                      नाहीतर शरीराच्या या नाजूक अवस्थेमुळे आपण आजारांना बळी पडू शकतो. म्हणून या काळात साथीचे /तापाचे आजार वाढलेले दिसतात
                       दिनचर्या - शरद ऋतूमध्ये वाढलेल्या उष्णतेचा मुकाबला करण्यासाठी थंड-शीतल उपाय वापरायला हवेत. थांबा.. थांबा.. पण थंड म्हणजे A.C नाही हं वापरायचा. (A.C. मुळे येणारा कोरडेपणा,अतिथंड तापमान यामुळे त्रास अजूनच वाढेल), त्या ऐवजी वाळ्याचे पडदे वापरा (A.C. वापरायाचाच असेल तर तापमान २८ ते ३० डिग्री से. एवढेच ठेवा,जेणेकरून सामान्य शरीर तापमानाच्या समान तापमान असेल.), आंघोळीसाठी गरम पाणी न घेता कोमट  पाणी/साधे पाणी वाळा घालून वापरा. उष्णतेमुळे अंगाची काहिली होते तर कापूर , चंदन पावडर नेहमीच्या पावडर ऐवजी वापरा. दिवसा झोप घेणे टाळावे.
                       प्राणायाम करणाऱ्यानी कपालभाती, भस्रिका कमी प्रमाणात अथवा करू नये,त्याऐवजी अनुलोम-विलोम, सित्कारी, शीतली या प्रकारांचा अभ्यास करावा. कानामध्ये खोबरेल तेलात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावे. 
                      आहार - शरद ऋतू म्हणजे पित्त प्रकोप काळ. त्यामुळे पित्त दोषाच्या विरुद्ध गुणाचे - मधुर,कडू आणि तुरट चवीचे पदार्थ घेता येतील. दूध आणि तूप हे उत्तम पित्तघ्न आहेत. म्हणून जेवणात योग्य त्या प्रमाणात तुपाचा वापर करता येईल. पण हे तूप कच्चेच, वरण-भात-तूप अशा प्रकारे घ्यावे याउलट तळलेले -तेलकट पदार्थ त्रासदायक होतील. तेल-चरबीयुक्त पदार्थसुद्धा (उदा. चीझ,डालडा,मेयोनिझ,करडई,मोहरीचे तेल,मार्गारीन) कमीच घ्यावे. दही-ताक  घेऊ नये.चायनीज- शिळे पदार्थ खाऊ नयेत.तांदूळ,ज्वारी,बाजरी घ्यावी. कडू रसांचे पदार्थ सांगितले तरी गवार,मेथी,कारले,यासारख्या भाज्या टाळा. पालेभाज्या,दुधी,पडवळ,घोसाळे,दोडका खाण्यात असावा.डाळींब,द्राक्षे,मनुका,खारका,चिकू,सफरचंद खावीत. मासे,शेल फिश,सुके मांस खाऊ नयेत. लसूण, मिरची,गरम मसाला या ऐवजी लवंग,दालचिनी,धने-जिरे वापरावे. गरम पाणी,मद्य टाळावे.त्या ऐवजी माठाचे पाणी,वाळ्याचे पाणी, लिंबू सरबत,कोकम सरबत,आवळा सरबत,शहाळ्याचे पाणी प्या. अननस,स्ट्रोबेरी क्रश, आर्टीफ़िशिअल सरबते (रंग आणि प्रीझार्वेटीव्स घातलेली असल्याने - उदा. फ्रुटी,स्लाईस) टाळा. फ्रीज चे थंड पाणी,कोल्ड ड्रिंक्स घेऊ नका(ती फक्त स्पर्शाला थंड असतात पण शरीराला अपायकारकच असतात.).दूध सांगितले असले तरीही मिल्कशेक्स मात्र घेऊ नयेत.




शारदीय विरेचन -

                         विरेचन ही आयुर्वेदीय पंचकर्मामधील शास्त्रीय परिभाषा आहे. पित्त दोष आणि पित्तज विकार यामध्ये प्रामुख्याने विरेचन प्रक्रियेचा वापर केला जातो. तसेच शरद ऋतूमध्ये पित्ताचा नैसर्गिक प्रकोप होत असल्यामुळे वाढलेल्या पित्ताचा निचरा करण्यासाठी या ऋतूमध्ये सामान्य व्यक्ती तसेच पित्त प्रकृती-पित्त विकार असलेल्या व्यक्ती शास्त्रोक्त-विधिवत विरेचन घेऊ शकतात.म्हणून या काळात शारदीय पंचकर्म विचार व प्रचार कार्यक्रमसुद्धा केला जातो.

कोजागिरी पौर्णिमा व विरेचन

                        कोजागिरी म्हणजे 'कोs  जागर्ति'. पूर्वी कोजागिरी म्हणजे गच्चीवर-अंगणात जागवलेली रात्र,गाण्याची मैफिल,आटीव मसाला दूध आणि गप्पांची मैफिल हीच आपली पूर्वकल्पना होती.पण सध्या मात्र कोजागिरी हा एक इवेन्ट होऊ लागलाय. Cause for a celebration!!!! आटीव मसाला दूधाऐवजी मिल्कशेक्स, कोल्ड ड्रिंक्स पासून पाव-भाजी,समोसे,बिर्याणी,भजी यासारखा उष्ण,तीक्ष्ण "पित्त खवळणारा"  मेनू कोजागिरी साठी 'हिट' मेनू होऊ लागलाय. गाणी आणि गप्पांची जागाही डी.ज़े. घेऊ पाहतोय.त्यामुळे रात्र उत्तर रात्रीपर्यंत जागवली जातेय आणि आणि अजून पित्त वाढवले जाते आहे.
                      पण कोणी कधी विचार केलाय का कि हा दिवस शरद पौर्णिमेचाच का बरे असतो?आणि आटीव दूधच का प्यायचे असते? कारण आधी सांगितल्याप्रमाणे या काळात पित्त दोषाचे प्राबल्य असते.मग हे उष्ण,तीक्ष्ण अग्निच्या गुणाचे पित्त कमी करायचे तर मधुर,शीत, सौम्य गुणाच्या दुधासारखे दुसरे औषध नाही. तसेच दूध हे उत्तम रेचक आहे. आणि पित्ताची चिकित्सा करण्यासाठी असे नैसर्गिक रेचन उत्तमच. आणि म्हणूनच आटीव मसाला दूध पिण्यासाठी रात्री सुखद हवेत जागायचे असते,चांदण्यात दूध आटवणे हा चान्द्रसंस्कार आहे.यासाठी पौर्णिमेचा दिवस. आणि आरोग्याचे विशेषण लावले तर लोक करणार नाहीत म्हणून देवादिकांचे कारण.
मग  असे हे आटीव दूध नंतर उत्तम रेचनाचे कार्य करत वाढलेले पित्त सहजी कमी करते,हे यामागचे शास्त्र आहे.
झाले, साधे-सोपे शारदीय विरेचन. आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाची कास धरून सणाद्वारे आरोग्याचा ताळमेळ ठेवला, तो असा.
                      तर काय मग यावर्षीची कोजागिरी कशी साजरी करणार तुम्ही??