दर वर्षी उन्हाळा सुरू झाला की सर्व social media वर एक मेसेज फिरायला लागतो तो म्हणजे डालडा पासून बनवलेले Ice Cream. पहिल्यांदा हा मेसेज वाचणारा माणूस एकदम शहरतोच. "ई sss , शीssss, नकोच ते Ice Cream" अशा सगळ्या प्रतिज्ञा होतात. पण मग उन्हाळा आहे आणि ice cream नाही खायचं म्हणजे कसं? मग अमूक एका कंपनी ऐवजी दुसऱ्या तमक्या कंपनीचे दुधापासून बनवलेले ice cream पण डालडावाले Ice Cream नकोच हे सर्वानुमते ठरते.
पण हे एवढे पुरेसे आहे का? इतर कितीतरी मार्गांनी आपण या विषारी डालडाचे सेवन करत आहोत.
काय आहे हे डालडा??? खरे तर डालडा हे ब्रँड नेम आहे या पदार्थाला म्हणतात वनस्पतीजन्य खाद्य तूप थोडक्यात 'वनस्पती.' आपण जे तेल स्वयंपाकासाठी वापरतो ते जर जास्त काळ राहिले तर त्यावर हवा आणि प्रकाशाची रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यामुळे त्याला एक विशिष्ट चव आणि वास येतो यालाच खवटपणा किंवा Rancity म्हणतात.असे तेल मग स्वयंपाकासाठी वापरले जात नाही.त्यामुळे उत्पादकांचे नुकसान होते.हे टाळण्यासाठी 20व्या शतकात तेलावर Hydrogenation ही प्रक्रिया केली जाऊ लागली.यामुळे ही पातळ तेले घट्ट,टिकाऊ, वास न येणारी आणि वाहतुकीला सोयीची झाली. या सर्व कारणांमुळे हे वनस्पती खूप लोकप्रिय झाले. Margarine हासुद्धा वनस्पती चा भाऊच. त्यात भर म्हणून याला म्नाव दिले वनस्पती तूप यामुळे लोकांचा गैरसमज झाला आणि एवढे स्वस्त "तूप" म्हटल्यावर रोजचे जेवण,तळण, पक्वान्ने एवढेच काय लोक दिवाळीचा फराळसुद्धा डालडामध्ये बनवू लागले. (दचकलात ना?डालडामध्ये बनलेले रवा-बेसनाचे लाडू,करंज्या आणि चकल्यासुद्धा.. मीसुद्धा एका रुग्णाकडून हे सर्वप्रथम ऐकलं तेव्हा अशीच दचकले होते)
या वनस्पतीचे शरीरावर काय घातक परिणाम होतात ते जरा पहा -
- वनस्पतिज तूप शरीरातील वाईट Cholesterol (LDL) वाढवते आणि चांगले Cholesterol (HDL) कमी करते.
- या वनस्पतिज तूपातील घटक रक्तवाहिन्यांच्या अंतःत्वचेमध्ये साचून राहतात ज्यामुळे धमनीप्रतीचय (Coronary artey blockeges) , हृद्रोग, उच्च रक्तदाब, Hyperlipidemia (वाढलेलं Cholesterol) यासारखे आजार दिसून येतात.
- शरीरामध्ये Inflammation म्हणजे पेशींना आलेली सूज कमी करण्यासाठी जी रसायने आवश्यक असतात ती तयार होण्यास बाधा आणते.
- Hyperallergy म्हणजेच प्रत्युर्जता वाढवते, यामुळे शरीरावर पुरळ , कंड ,लालसर चट्टे उठणे असे त्रास दिसून येतात
पण सध्या या वनस्पती विरोधात बराच गदारोळ झाल्यामुळे जेवणात होणारा वापर तरी बऱ्याच प्रमाणात कमी झाला असला तरी पुरता हद्दपार नाही, कारण आपण अजूनही पुरेसे जागरूक नाही.
वनस्पती तूप, Hydrogenised oil , trans fat हे एकमेकांचे प्रतिशब्द आहेत आणि हे हमखास मिळण्याची जागा म्हणजे
- तयार खाद्यपदार्थ. बाजारातले Ready to eat food, बिस्किटस्, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ (processed food)
- Bakery पदार्थ म्हणजे खारी, बटर, नानकटाई, केक्स
- तळलेले फ्रेंच फ्राईज,नाचोज
- Butter जो बटर ही नही किंवा बटर से बेटर च्या नावाने विकले जाणारे table margarine (यात खूप मखलाशीने हे butter नाही असे सांगतात पण हे margarine म्हणजे बटर पेक्षा जास्त धोकादायक आहे हे सांगत नाहीत.)
- Eggless cake म्हणून विकताना वापरले जाणारे फॅट,क्रीम किंवा फ्रॉस्टिंग
- टपरीवाले, हलवाई , कॅन्टीनवाले, लग्नादी समारंभाची जेवणे बनवणारे आचारी हे सगळे खर्च वाचवण्यासाठी बऱ्याचदा वनस्पती वापरत असतात.
त्यामुळे हे घातक वनस्पती जीवनातून पूर्णपणे हद्दपार करणे कठीण होऊन बसते परंतू या बाबत नीट माहिती असेल तर जागरूकपणे आपण त्याचा वापर कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो.
मूळ लेखिका-
वै. स्निग्धा चुरी-वर्तक.
समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.
बोरीवली, मुंबई.
*9870690689*
(कृपया लेख फॉरवर्ड करताना मूळ लेखिकेच्या नावसाहित फॉरवर्ड करावा.आपल्या या छोट्याशा नैतिक कृतीने त्यांनी लिखाणासाठी केलेले श्रम सार्थकी लागतात.
धन्यवाद.
सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 13 एप्रिल 2022 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2016/04/blog-post_29.html
या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत.)