Monday, 23 January 2017

....कंबर लचकली. (भाग १)






"अगं आई गं!!" हातातून खाली पडलेले पाकीट उचलून घेताना नीता एकदम विव्हळली. आधीच सकाळी निघायची धावपळ होती त्यात हा पाठदुखीचा त्रास हल्ली वारंवार होत असे तिला. 'आह से आहा तक'वाली मलमे, मालीश ,गरम-गार शेक  यासारख्या उपायांनी,जसे पूर्वी थोडे बरे वाटे, तेही हल्ली वाटत नसे. त्यात ऑफिसमध्ये ऑडिटची दगदग होतीच.पण आता निभतच नाही म्हटल्यावर एके दिवशी तिचा नवरा अनिल तिला बळजबरीने घेऊनच आला दवाखान्यात.
"डॉक्टर, जरा हिच्या कंबरेचं काहीतरी बघा आणि जरा हिचंही तुमच्या स्टाईलने 'प्रबोधन' करा. "
"अहो काहीतरीच काय बोलता, डॉक्टर यांचं    काssही ऐकू नका हो, पण खरंच या कंबरेचं मात्र नक्की काही तरी करा, अगदी वात आणलाय या दुखण्याने" - इति नीता.
मी - "अहो वात आणला नाही , वात वाढलाय असं म्हणा. नाहीतर कंबर दुखेल कशी?"
नीता - वात वाढला आहे??? म्हणजे काय?मुळात या कंबर दुखण्याचे कारण तरी काय?
मी - म्हणजे असं बघा,कंबरदुखी हे एक प्रकारचं दुखणं आहे ज्याला आयुर्वेदामध्ये कटिशूल असं म्हणतात. ही वेगवेगळ्या कारणांमुळे होते, त्यातील काही कारणे आपण पाहू.
१. रचनात्मक कारणे -
◆पाठीच्या मणक्याच्या विकृती - जसे की मणक्यांमधील गादी सरकणे, तिची झीज होणे अथवा गादीला इजा होणे.
◆पाठीचा मणका सरकणे.
◆मणक्यावर आघात होणे.
◆पाठीचे स्नायू - पेशी जखडणे, दुखणे.

२. पाठीची / मणक्याची ठेवण (Posture)
  • पोक काढणे
  • कुबड असणे
  • Lordosis - पाठीचा कणा बाहेरच्या बाजूस झुकणे (सुटलेले पोट, गर्भारपण यासारख्या अवस्थेत)
  • Scoliosis - पाठीचा कणा आतल्या बाजूला वळलेला असणे.
  • चुकीच्या पद्धतीने बसणे/झोपणे
  • मणक्याच्या जन्मजात विकृती
३. पोषक घटकांचा अभाव
  • व्हिटॅमिन B12 किंवा व्हिटॅमिन D3 ची कमतरता
  • Calcium चे अपुरे पोषण

४ . कर्करोग किंवा अर्बुद ( malignant or benign tumours)
५. इतर ठिकाणी असलेल्या त्रासामुळे होणारी कंबरदुखी
  • मूतखडा
  • Hydronephrosis मूत्रपिंडाच्या कटिरामध्ये लघवी जमून राहणे.
  • वृक्क विद्रधी Nephrotic abscess
  • यकृत विद्रधी Liver abscess
६. इतर करणे -
  • चिंता,ताणतणाव
  • मलबद्धता
  • इतर जंतुसंसर्ग

“अरे बापरे डॉक्टर, अहो एवढे सगळे आजार?? कंबरेचं दुखणं एवढं त्रासदायक असेल असं वाटलं नव्हतं. मला हो कोणता त्रास असेल आता? काही गंभीर तर नसेल ना?”

“अहो नीता ताई, ही सर्व कारणे सांगताना मी तुम्हाला एका विशिष्ट क्रमाने सांगितली आहेत. साधारणतः बऱ्याच लोकांमध्ये दिसून येणाऱ्या कारणांपासून सुरुवात करुन आपण दुर्मिळात दुर्मिळ कारणेसुद्धा पाहिली. त्यामुळे नुसती कारणे ऐकून घाबरण्यासारखे काहीच नाही. आणि कोणाची कंबरदुखी कोणत्या कारणांमुळे आहे हे आम्ही वैद्य रुग्णाची स्थिती , नाडी प्रत्यक्ष तपासून ठरवतो. फक्त वाचून किंवा तक्रार ऐकून हे ठरवणे चुकीचे आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिन्त व्हा.”

“अच्छा , असेही असते का? बरं मग डॉक्टर, आता कसे करायचे?”
                                                   ( क्रमशः)
टीप - पुढील भागात वाचा कंबरेच्या दुखण्याचे निराकरण करण्याचे उपाय तसेच आयुर्वेदिक विचार.
चित्रसौजन्य : आंतरजाल.

No comments:

Post a Comment