Thursday, 30 November 2017

विरुद्धाहार ( Incompatible Diet ) भाग १







                 हल्ली दूरचित्रवाणीवरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे कुकिंग शोज.. यांची लोकप्रियता इतकी वाढली आहे की फक्त खाद्यन्तिसारख्या विषयावर कार्यक्रम सादर करणाऱ्या वाहिन्यांचासुद्धा स्वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग तयार होत आहे. अशाच एका कार्यक्रमात मला “तो” दिसला. अगदी फ्रेश ,दिमाखदार…. माझ्यासारख्या जातीच्या खवय्याला त्याची भुरळ पडली नसती तर नवलच. त्याचे नावही बाजूलाच दिमाखात चमकत होते, “अजवायनि पोम्फ्रेत..” (😋😉)  एवढा मोठा, ताजा,फडफडित पापलेट पाहून जीभेला पाणी सुटले नाही तर नवलच!! उत्सुकतेने पाककृती पाहिली तर त्यासाठी शेफनी एका सगळ्यात आधी पापलेटला दहयाचा चक्का लावला,त्यावर मीठ व इतर मसाले लावले , मग हे सगळे फेटलेल्या अंडयामध्ये घोळवले. ही प्रत्येक कृती बघताना माझ्या वैद्यकीय मनाला सुग्रास जेवणात प्रत्येक घासाला खडा यावा तशी खटकत होती. तरीही एखादीच डिश अशी असेल म्हणून दुर्लक्ष केले पण पुढील डिश तर त्यापेक्षा वरचढ होती.. ‘बेकन आईसक्रीम’. आणि ते बनवताना त्यांनी जी सामग्री सांगितली ती ऐकून मी टीव्हीच बंद केला कारण त्यात असणार होते, बेकन (एक प्रकारचे खारवलेले सुके मांस) ,अंडी, मीठ, दूध, क्रीम, मेपल सिरप…. या पदार्थांनी आणि कृतींनि बनलेल्या या दोन्ही पाककृति कितीही चवदार असल्या तरी त्या ‘विरुद्ध आहार’ आहेत. जिभेचे क्षणिक लौल्य पुरवताना आपण करत असलेले हे विरुद्ध आहाराचे सेवन अनेक जीर्ण (Chronic) आजार होण्यासाठी कारणीभूत ठरते.
          आता बरेच जण विचारतील की, डॉक्टर,तुम्ही सारखा हा शब्द वापरत आहात पण हे ‘विरुद्ध’ म्हणजे आहे तरी काय??? कारण आपल्याला विरुद्ध म्हणजे Opposite/ contrast/ reverse असाच अर्थ पटकन आठवतो. इथे हे anti/ adverse या अर्थी पहायला हवे. असो, विषयांतर होण्यपेक्षा  भाषाशास्त्राचा तास इथेच थांबवून आयुर्वेद शास्त्रातील ‘विरुद्ध आहार’ ही संकल्पना आपण समजून घेऊ. तर ‘विरुद्ध आहार’ ही आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. ‘विरुद्ध आहार’ म्हणजे असा आहार ज्या मधील  घटकपदार्थ वेगवेगळे खाल्ले असता कदाचित काही त्रास होणार नाही परंतु जे चुकीच्या पद्धतीने एकत्र करून खाल्ले असता वेगवेगळ्या आजारांना कारणीभूत होतात. आता हेच पहा ना, वर वर्णन केलेल्या पाककृतींमध्ये  दही, अंडी ,मासे , मीठ ,दूध हे पदार्थ वेगवेगळे खाल्ले तर अपायकारक नाहीत पण जर एकत्र करून खाल्ले तर त्यातून तयार होणारा पदार्थ विरुद्धान्न असल्याने त्रासदायक आहे.

आयुर्वेदात सांगितले आहे,
                   “ यत्किंचिद्दोषमुत्क्लेश्य न हरेत् तत् समासतः ।
                     विरुद्धम् इति………”

म्हणजे असा आहार जो सतत सेवन केल्याने कफादि दोषांना अनावश्यक प्रमाणात वाढवतो पण शरीरातून काढून टाकू शकत नाही. त्याला ‘विरुद्ध’ असे समजावे. मग अशा दोषांचे पुढे होते तरी काय? तर हे अनावश्यक वाढलेले दोष शरीरात साचून राहतात आणि विषाप्रमाणे विविध आजारांना निर्माण करतात. (ज्याप्रमाणे एखादे विष शरीरात दीर्घकाळासाठी थोड्या-थोड्या प्रमाणात जात राहीले तर ते तात्काळ मारक होत नाही पण त्याच्या विषाक्ततास्वरूप शरीरात ,कालांतराने घातक ठरणारे, वेगवेगळे आजार जाणवू लागतात - Slow Poisoning).
                  यामागील कारण असे की सतत विरुद्ध आहार खाण्यात आला तर त्यामुळे ‘आमनिर्मिती’ होते. ‘आम’ म्हणजे काय हा खरतर एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. त्यामुळे त्याविषयी आपण नन्तर सविस्तर पाहू पण सध्या हे समजणे पुरेसे आहे की ‘आम’ म्हणजे ‘अपाचित, अपायकारक  आहाररस.’ त्यामुळे ही क्रिया दीर्घकाळ सुरु राहिली तर शरीरात साचणाऱ्या आणि सतत निर्माण होत राहणाऱ्या या आमदोषामुळे वेगवेगळे जीर्ण, कष्टसाध्य व्याधी होतात. उदा. अपचन, मलावरोध, अम्लपित्त यासारख्या वरवर साध्या वाटणाऱ्या पण प्रत्यक्षात गंभीर अशा आजारांपासून थेट त्वचारोग, वाढलेले कॉलेस्टेरोल किंवा अगदी हृदयरोगापर्यंत आजाराचे मूळ सतत/दीर्घकाळासाठी केल्या जाणाऱ्या विरुद्धाहार सेवनाच्या सवयीत दिसते. सध्याच्या काळात याचे मूळ बदलत्या खाद्य शैलीमध्येसुद्धा आहे.  आपण सगळेजण जाणता- अजाणता थोड्याफार प्रमाणात विरुद्धाहार सेवन करतच असतो. त्यामुळे आता आपण कोणते अन्नपदार्थ व का विरुद्धाहार आहेत ते पाहूयात,
  • संयोग विरुद्ध - संयोग म्हणजे एकत्र करणे. जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र करून एखादी पाककृति तयार केली जाते तेव्हा त्याला संयोग असे म्हणतात. या तयार होणाऱ्या पदार्थात काही असे चुकीच्या पद्धतीने पदार्थ मिश्रित केल्यास त्याला ‘संयोग विरुद्ध’ असे म्हणतात. जसे की, लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या उदाहरणांमध्ये दही-मासे, दही-अंडी, मांस(बेकन)- दूध, मांस-क्रीम, मांस-अंडी, दूध-अंडी हे संयोग विरुद्ध आहाराचे उदाहरण आहे. अजून काही उदाहरणे पुढीलप्रमाणे
  1. आनूप मांस (अधिक पाण्यातील, दलदलीच्या प्रदेशात , किनारी भागात पोसल्या गेलेल्या प्राण्यांचे मांस,मासे) हे उडिद, मध,मोड आलेले धान्य, कमलनाल, मूळा ,गुळ याबरोबर खाऊ नये.
  2. दूध व मीठ एकत्र खाऊ नये. (दूधात मिठाचा खडा पडणे हा वाक्प्रचार आपल्याला माहित असतो आणि म्हणजे काय होते तेसुद्धा माहित असते पण पास्ताचा व्हाइट सॉस बनवताना मात्र आपण ते विसरतो.)
  3. दूध व मासे अजिबातच खाऊ नयेत
  4. दूध आंबट पदार्थ तसेच फळे यांच्या बरोबर खायचे नसते.(म्हणजे फ्रूट सलाड, फ्रूट मिल्कशेक्स यांना कायमचे टाटा-बाय , अपवाद फक्त नैसर्गिकरित्या पिकलेल्या गोड चवीचा आंबा, जो दूधासोबत खाता येतो.) शिकरण खाणाऱ्या सर्वांनी याचा विचार करायला हवा.
  5. दही व कोंबडयाचे मांस एकत्र खाऊ नये (मुग़लई डिशेस)
  6. मोड आलेले धान्य व कमलनाल खाऊ नये.
  7. ताक , दही किंवा ताडगोळा यांच्या बरोबर केळी खाऊ नये.
  8. मध,तूप,तेल वसा व पाणी यापैकी कोणतेही दोन तीन,चार किंवा पाचही पदार्थ एकत्र करताना समान प्रमाणात एकत्र करून खाऊ नयेत.
  9. एखादे औषध मध-तूपासोबत घ्यायला सांगितले असेल तर मध-तूप समान मात्रेत न घेता विषम प्रमाणात घ्यावे.
  10. उडदाच्या वरण/सूपासोबत गुळ, दूध, दही,मूळा खाऊ नये. (मराठी पाककृतींमध्ये उडिद याप्रकारे वापरले जात नसावे पण ‘मां की दाल’, ‘दाल मखनी’ , ‘काली दाल’ या पूर्णपणे उडिदापासून बनवलेले पदार्थ आहेत.तसेच दाल तड़का , दाल फ्राय या पाककृतींमध्येही उडिद असते.

(क्रमशः)

टीप - पुढील भागात वाचा विरुद्ध आहाराचे इतर प्रकार, विरुद्ध आहार सेवन केल्याने होणारे आजार, त्यांची चिकित्सा व विरुद्ध आहार कसा कमी करावा याविषयी उपाय.



(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०१ डीसेंबर २०१७ रोजी आपल्या http://samanwayayurved.blogspot.com या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)

Tuesday, 14 November 2017

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता.....


 ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता



                   विंदा करंदीकरांची ही कविता वाचली की आम्ही मराठी माध्यमातील मुले परत आपल्या शाळेत जातो. दर वर्षी हिवाळा आला की थंडीत कुडकुडताना,सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरताना ही माझी लाडकी कविता मला हमखास आठवतेच. आताही फक्त शीर्षक देताना या सर्व आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. थंडीचे वर्णन या कवितेत इतक्या छान शब्दांत मांडले आहे की साधं-सहज वाचतानासुद्धा निर्जीव, बोचरी थंडी जिवंत झाल्याचा भास होतो.
                 असो, तर या पूर्वीच्या लेखात आपण थंडीत घ्यायची त्वचेची आणि केसांची काळजी याविषयी माहिती घेतली. या लेखात आपण आहार-विहार याविषयी माहिती घेऊ. आहार म्हणजे काय खावे - काय खाऊ नये. विहार म्हणजे या ऋतुत दिनचर्येमध्ये काय बदल केले पाहिजेत हे समजून घेऊ.

आहारातील पथ्य :

  1. या ऋतुत कफकर आहार असावा. मधुर, अम्ल व लवण रसात्मक अन्न आहारात असावे. --------- याउलट कटु-तिक्त-कषाय रसात्मक आहार वातकारक असल्याने टाळला पाहिजे.
  2. तृणधान्य - या काळात पचनशक्ति चांगली असते. त्यामुळे या सुमारास बाजारात येणारे नवीन धान्य, जे कफकर असल्याने इतर ऋतूंत वर्जित असते , ते या काळात खावे असा निर्देश आहे. तांदूळ,ज्वारी,बाजरी तसेच गहू आहारात असावा. ------- जुने ,भाजलेले धान्य रुक्ष असते. असे धान्य, नाचणी, जव, वरीचे तांदूळ खाऊ नये.
  3. कडधान्य खाताना मटकी, उडिद, तूर , चवळी ही कडधान्ये आहारात असावी. -------- वाल, वाटाणे,चणे, कुळीथ यासारखे धान्य टाळणे योग्य.
  4. पथ्याच्या भाज्या - कॉलिफ्लॉवर, बटाटा, बीट, दोडका, दूधी भोपळा, लाल भोपळा, भेंडी,गाजर,मूळा, पडवळ ,सुरण, नवलकोल, कोहळा  खाव्य ------ कारली, गवार, कमलकंद (अरबी), शिंगाडा या भाज्या खाऊ नये.
  5. पालेभाज्या - पालक,शेवग्याचा पाला,आंबट चुका, तांदूळजा या भाज्या पथ्यकारक आहेत ------ तर शेपू, टाकळा, अळू या भाज्या अपथ्य आहेत.
  6. सिताफळ, केळी, चिकू, संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळींब, अननस, पपई, पपनस यासारख्या फळांचा मोसम असल्याने ही फळे आवर्जून खावी, स्ट्रॉबेरी, द्राक्षे ही फळे अजून एखाद - दोन महिन्यांनी खाता येतील. ------- याउलट जांभूळ, ताडगोळा, कमरख (star fruit) ही फळे खाऊ नयेत.
  7. सुका मेवा - सगळ्या प्रकारचा सुका मेवा काजू,बदाम, अक्रोड, जर्दाळू, खजूर,पिस्ते,मनुका,बेदाणे या ऋतुत आवर्जून खावे.
  8. दूध व दुधाचे पदार्थ - दूध , दही, लोणी, मलई , तूप , लस्सी,पनीर, चीज़ (प्रोसेस केलेले नव्हे) , श्रीखंड यासारखे सर्व पदार्थ पाचकाग्नि बलवान असल्याने योग्य प्रमाणात खाता येतात. ------- मात्र हे पदार्थ फ्रीजमध्ये गार करून किंवा आईसक्रीम घालून खाऊ नये. किंबहुना या ऋतुमध्ये आईसक्रीमच खाऊ नये. तसेच कोल्डड्रिंक सुद्धा पिऊ नये.
  9. ऊस, उसाचा रस, साखर (पण केमिकलयुक्त, साखर नेहमीच वर्ज्य आहे) , मध या काळात जरूर वापरावे
  10. तेल , तूप , चरबी यांचा वापर सढळ हस्ते करावा. तरीही तळलेले पदार्थ खाऊ नये. --------- स्निग्ध आहेत म्हणून डालडा, पाम तेल, मार्गरीन मात्र अजिबात वापरु नये.
  11. मांसवर्ग सगळ्या प्रकारचे मासे, मांस या काळात खाता येते मात्र ते प्रमाणातच खावे. -------- सुके मांस - मासे , भाजलेले मांस वातकारक असल्याने खाऊ नये.
  12. मसाले - अग्निदीपन व पचनास मदत करत असल्याने सगळ्या प्रकारचे मसाले जरूर वापरावे मात्र अति तिखट मसालेदार अन्न जेवू नये.
  13. पाणी मात्र सध्या गरम करुनच प्यावे. --------- नळाचे , फ्रिजमधले थंड पाणी पिऊ नये.


विहारातील पथ्य -

  1. आहारात तिक्त, कटु,कषाय रस वर्ज्य असले तरीही दात घासण्यासाठी मात्र याच रसांचा वापर करावा. म्हणजेच या चविंचे दंतमंजन, टूथपेस्ट वापरावे. गोड टूथपेस्ट वापरु नये.
  2. तोंड धुवायला- शौच - स्नानासाठी गरम पाणी वापरावे.
  3. आधी सांगितलेल्या लेखामध्ये थंडीच्या दिवसांत अभ्यंग व उद्वर्तन यांचे महत्व सांगितले आहे. त्यामुळे अभ्यंग-उद्वर्तन जरुर करावे.
  4. या काळात दिवस लहान असतो त्यामुळे ( रजईत गुरफटून झोपणे कितीही प्रिय असले तरीही) पहाटे लवकर उठावे. व वातप्रकोप टाळण्यासाठी दिवसा झोपणे टाळावे.
  5. या ऋतुत शरीरबळ अधिक असल्याने जास्त व्यायाम केला तरी चालतो. बळ अधिक आणि पाचकाग्नि जास्त असल्यामुळे शरीर कमवण्यासाठी (बॉडी बिल्डिंग) हा ऋतु अगदी योग्य आहे.
  6. यासाठी कुस्ती, पोहणे , जिममध्ये वेट-ट्रेनिंग यासारखे ताकदीचे व्यायाम प्रकार करता येतात.
  7. घर शेगडी किंवा हीटर वापरून उबदार ठेवावे. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे.
  8. मात्र बसताना गार वाऱ्यावर बसू नये शक्यतो अंगाला थेट वारा लागणार नाही असे पहावे.
  9. बाहेर फिरताना, प्रवास करताना अंग-कान प्रामुख्याने गळा व छाती गरम कपडयानीं झाकुन घ्यावे.
  10. पायात नेहमी चपला/सपाता असाव्यात.

या लेखाचा पूर्वार्ध , हिवाळ्यात घ्यायची त्वचेची व केसांची काळजी , वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा

असा हा थंडीचा मोसम, सर्व ऋतूंमध्ये आल्हाददायक ,बळ देणारा, आणि वर सांगितलेल्या टिप्सचे पालन केले तर मग ही थंडी सजा न वाटता मजा वाटू लागेल. समारोप करताना विंदांची कविता पुन्हा उधृत करते,

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्ध वडावर !
मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.
कविवर्य विंदा करंदीकर


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी १४ नोव्हेंबर २०१७ रोजी आपल्या http://samanwayayurved.blogspot.com या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)

Wednesday, 1 November 2017

हिवाळ्यात घ्यायची त्वचेची व केसांची काळजी




               दसरा गेला….दिवाळीही झाली…. आता कुठे ,सकाळच्या वेळेस का होईना पण हळूहळू थंडी जाणवत आहे. तसेही पु.ल. म्हणतातच की मुंबईला ऋतु दोनच उन्हाळा आणि पावसाळा. सदैव आपल्या घामाच्या नाही तर पावसाच्या धारा. म्हणूनच ही थोडीशी थंडी हवीहवीशी वाटते. गावाकडेही आता थंडी जाणवत असेल आणि हळूहळू वाढेलही. त्यामुळे या थंडीत शरीराची काळजी कशी घ्यावी यासाठी काही टिप्स.
                थंडीचा काळ, हेमंत ऋतु, म्हणजे कफ दोषाचा काळ. कफ म्हणजे बल -- स्निग्ध, शीत, गुरु ,मंद गुणांचा हा कफ दोष शरीराचे पोषण करण्यासाठी महत्वाचा असतो. तसेच थंडीमुळे शरीराग्नि व पचनस्थितिसुद्धा चांगली असते त्यामुळे शरीरबल सुधारते. पण याच कालावधीत वातावरणात आर्द्रता कमी झाल्याने रुक्षता (कोरडेपणा ) वाढतो. या रुक्ष गुणाला शीत हवेची जोड मिळून परिणामी वात दोष वाढतो. त्यामुळे थंडीमध्ये बऱ्याच लोकांमध्ये वाताचे आजार दिसून येतात.

हिवाळ्यात घ्यायची त्वचेची काळजी -  या दिवसांत त्वचेचा वाढलेला कोरडेपणा स्त्रिया-पुरुष-मुले सर्वांसाठीच त्रासदायक असतो. त्वचेवर पुरळ येणे, ओठ फुटणे, टाचांना भेगा पडणे, काही अति रुक्ष प्रकृतीच्या माणसांमध्ये तर त्वचेचे पापुद्रे निघणे, भेगा पडून रक्त येणे यासारखे गंभीर त्रास सुद्धा दिसतात.
यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे अभ्यंग आणि उद्वर्तन म्हणजे औषधी तेलाने सर्वाङ्गाला मालिश करणे व नंतर औषधी उटणे वापरून आंघोळ करणे. अभ्यंगासाठी तेल निवडताना शरीरप्रकृती व व्याधी अनुरुप तेल निवडावे. हे तेल पाण्यात ठेवून कोमट करावे व त्वचेवर जिरवावे. त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने उटणे लावून आंघोळ करावी. त्रासाची तीव्रता व ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसातून दोन वेळा हे मालिश केले तर उत्तमच. पण किमान एकदा तरी करावेच.

अभ्यंग करण्याचे फायदे -
  1. त्वचा मृदू व घट्ट होते, तिची कांती वाढते.
  2. त्वचेतील रक्तवाहिन्या व मज्जातंतु कार्यक्षम राहतात आणि त्यामुळे स्पर्शज्ञान सुयोग्य होते.
  3. स्नायू पिळदार होतात, शरीर स्थिर होते
  4. ग्लानि, आळस, श्रम दूर होतात. 

ओठ फुटत असल्यास - यालाच आयुर्वेदात ‘ओष्ठप्रकोप’ असे म्हणतात. फुटणाऱ्या ओठांसाठी गाईचे साजूक तूप , शताधौत घृत किंवा कोकम तेल अतिशय परिणामकारक असते. लिपबाम पेक्षाही हे शरीराला सात्म्य असलेले पदार्थ दीर्घकाळ टिकणारे परिणाम देतात. आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ओठ फुटत असतील तर ओठांची साले काढणे, सुकलेल्या ओठांना लाळ लावून ते ओले करणे कटाक्षाने टाळायला हवे.

टाचा फुटणे / पाय फुटणे - आयुर्वेदानुसार या विकाराला ‘पाददारी’ असे म्हणतात. वात-पित्त दोषात्मक असा हा आजार आहे. यासाठी सर्वप्रथम कोमट पाण्यात पावले बुडवून ठेवावी. चिरांमधील माती, कचरा, मृत त्वचा हलक्या हाताने चोळून साफ करावी, अजिबात त्वचेचे पापुद्रे सोलून काढू नयेत. मग पावले टॉवेलने कोरडी करून शताधौत घृत लावावे.
फुटलेल्या त्वचेमधून रक्त, पू येत असेल किंवा खाज होत असेल, जंतुसंसर्ग झाला असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि यासाठी औषधोपचार व पायाला लावण्यासाठी औषधे घेणे आवश्यक आहे.
तरीही टाचा, ओठ फुटणे कायम राहिल्यास त्यामागील कारणे शोधणे गरजेचे असते. रक्ताल्पता, दीर्घकाळ असणाऱ्या पचनाच्या तक्रारी, आहाराच्या सवयी, व्यसने यांचाही परिणाम त्वचेवर होत असतो. त्यामुळे वरवर साध्या दिसणाऱ्या या आजारांचे मूळ शोधणे महत्वाचे आहे.

केसांच्या तक्रारी - 
           वातावरणातील रुक्षतेचा परिणाम केसांवरही होतो. यामुळे केस कोरडे होणे,तुटणे, गळणे, केसांत कोंडा होणे , केसांत पुरळ-फोड होणे , केशत्वचेचे पापुद्रे निघणे यासारखे त्रास दिसून येतात. केसांत झालेला कोंडा चेहरा, मान, पाठ , छातीवर पडतो आणि तेथील त्वचेवर पुरळ, पुटकुळ्या येतात. या सर्व तक्रारींचे मूळ केस व केशत्वचा कोरडी असणे यात असते. त्यामुळे हा कोरडेपणा कमी करणे आवश्यक आहे. यासाठी
  1. अभ्यंग - केसांना चांगल्या प्रतीचे कोमट तेल लावून हलक्या हाताने केशभूमी (scalp) ला मालिश करावी व रात्रभर ठेवावे. केसांसाठी शक्यतो खोबरेल किंवा तीळ तेल वापरावे.यामध्ये आवळा, भृंगराज,ब्राह्मी,यष्टिमधु सिद्ध तेल असल्यास उत्तमच.
  2. मालिश करताना हलक्या हाताने करावी जेणेकरून केस तुटणार नाहीत व मुळांशी असलेला कोंडा मोकळा होईल व तेल जिरेल.
  3. शक्य झाल्यास केसांना वाफ द्यावी.
  4. शिकेकाई, रिठ्यासारखी नैसर्गिक द्रव्ये उत्तमच पण ते शक्य नसल्यास सौम्य शाम्पू पाण्यात विरघळवून वापरावे.
  5. केस धुतल्यावर त्यांना चांगल्या प्रतिचे कंडिशनर किंवा सुकल्यानंतर थोडेसे तेल जरूर लावावे.
  6. थंडीतील आहाराचा विचार नन्तर येईलच पण केस आणि त्वचेसाठी सांगायचे झाले तर अति खारट, अति आंबट , अति तिखट पदार्थ टाळावे.
  7. रुक्षता कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांमध्ये नस्य, शिरोधारा, शिरोबस्ति, बस्तिक्रम यांचा वापर केला जातो.
  8. केस गळणे, तुटणे, पिकणे तसेच मानसिक तणाव असल्यास दिसणाऱ्या तक्ररींमध्ये हे उपाय उत्तम काम करतात. त्यामुळे योग्य परीक्षण व वैद्यकीय मार्गदर्शनाखाली हे उपाय करावेत.

  त्वचा विकार - केसांचे विकार आणि समन्वय आयुर्वेद :

               हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी  होते आणि तिला छोटे तडे-भेगा जातात हे तर आपण पाहिलेच. पण अशी त्वचा वेगवेगळ्या इन्फेक्शनना कारणीभूत ठरू शकते. हिवाळ्यात गारवा असल्याने बरेचजण 'कावळ्याची अंघोळ' उरकतात. अश्या वेळी काखा,पावले,गुप्तांगाची जागा नीट साफ न केल्यास तिथं fungal infection होण्याची शक्यता वाढते. लायकेन प्लॅनस (Lichen planus), एक्झिमा, सोरायसिससारख्या त्वचविकारातही खाज,रक्त येणे,त्वचा फुटणे असे त्रास वाढतात. अश्या वेळी _समन्वय आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये आपण *त्वचा परीक्षण* करून त्यानुसार औषधीपचारांची दिशा_ ठरवतो.येणाऱ्या थंडीसाठी नीट आखणी करून औषधे व पंचकर्म उपचार ठरवावे लागतात.

केसांच्या विकारांत केशत्वचा म्हणजेच स्काल्प निरोगी असणे खूप महत्त्वाचे असते. कारण केशत्वचा जर सशक्त असेल तर कोंडा निर्माण करणारे सिबोरीक , फंगल, स्कॅल्प सोरायसिस असे आजार, केस रुक्ष होणे, केसांची टोके दुभंगणे-तुटणे हे सगळेच आजार आटोक्यात येतात. यासाठी आपण क्लिनिकमध्ये *संगणकीकृत केशत्वचा परीक्षण* (Computerized Scalp Analysis)  करतो. यामुळे आजार (disease diagnosis)नक्की होते आणि त्यानुसार वापरायची औषधे ठरतात.अगदी _तेल-शाम्पूसुद्धा तुमच्या केसांच्या प्रकृतीनुसार कोणता वापरावा हे ठरते_ .


टीप - पुढील भाग -  थंडीच्या दिवसात घ्यायची आहाराची काळजी. ( थोडक्यात हेमंत ऋतुतील आहार-विहार.)



मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 1 नोव्हेंबर 2017 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2017/11/blog-post.html?m=0

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)