Sunday, 7 June 2020

टाईम टेबल आणि आपण.


चित्रसौजन्य -आंतरजाल


हॅलो,स्निग्धा मावशी, आईचा फोन येईल तुला. प्लिज मॅनेज कर.”

“आर्यन?? काय रे काय झालंय?”

“सांगतो गं  नन्तर , रादर तीच सांगेल तुला. कर ना गं  आजचा दिवस मॅनेज.”

आर्यन फोन ठेवतो न ठेवतो तेवढ्यात सोनियाचा फोन आलाच.

“अगं हा आर्यन बघ ना….रोज जागरण ठरलेलं आहेच. त्या दिवशी तू म्हणालीस त्याप्रमाणे मी ताजं ,घरी बनवलेलं जेवण,तू बनवून दिलेला आमच्या प्रकृतीनुरूप डाएट चार्ट,त्याप्रमाणे सुचवलेले  व्यायाम- योगासने- ध्यानधारणा,पुरेशी झोप,काढा आणि इतर औषधे… आम्ही सगळे पाळतो पण याचं रोजचं जागरण. मग सकाळी उठतो उशीरा. जेवणाच्या वेळी नाश्ता,संध्याकाळी चहाच्या वेळी जेवण असं काहीतरी सुरु असतं. कधी झोपतो तेच कळत  नाही.कधीतरी ठीक आहे गं, मी अडवत नाही पण आता दोन महिने झाले रोजच चालले आहे हे. तू जरा बोल ना त्याच्याशी.”

आणि , अश्या प्रकारे आर्यन महाशय क्लीनिकमध्ये उगवले. 

“मावशी,वाचवलंस हं  तू.तुझ्याशी बोलून आई एक्दम chill -pill.”

“अच्छा,म्हणजे मुंबईकडे येणारे “निसर्ग” वादळ तू मोठ्या चतुराईने रायगडकडे ढकललंस तर….”

“गुड वन,पण ती उगाच चिडते.मग वैताग येतो. मी ८ तास झोपतो म्हणजे पुरेशी झोप, तू माझ्यासाठी दिलेल्या चार्टप्रमाणे जेवतो-व्यायाम करतो.”

“केव्हा??” त्याला मध्येच तोडत स्निग्धाने विचारलं.

“केव्हा??” किंचित गोंधळून आर्यन म्हणाला, “म्हणजे जसा वेळ मिळतो तसा,पण करतो हे नक्की.” 

“मग आता मी काही सांगितलं तर म्हणशील बोअर होतं.” स्निग्धा नक्कल करत म्हणाली.

किंचित ओशाळत आर्यन म्हणाला, “नाही तू सांग, तू सायंटीफिकली सांगतेस.”

“बघ हं, गणितात २ +४ + ६ = १२ होतात पण आयुष्यात फक्त पुरेशी झोप + सकस अन्न +व्यायाम = आरोग्य अशी गणितातली बेरीज होत नाही. आयुर्वेदामध्ये एक संकल्पना आहे - स्रोतस. . . शरीरातील वेगवेगळ्या क्रिया कशाप्रकारे घडतात शरीर संरचनांचा एकमेकांशी कसा संबंध असतो. हे समजण्यासाठी ‘स्रोतस’ संकल्पना महत्त्वाची आहे. स्रोतस म्हणजे मार्ग किंवा वाहिन्या.तीन दोष, सात धातू आणि त्यांपासून बनलेले सर्व अवयव, शिरा, धमन्या, नसा  यांना आपले काम व्यवस्थित करण्यासाठी पोषक घटक आवश्यक असतात. कारण सतत होत असलेल्या चलन-वलनामुळे शरीराची झीज होते. अशा वेळी आपण घेत असलेल्या आहाराचे पचन होऊन त्या पोषक घटकांना शरीरावयवांपर्यंत नेण्याचे काम करणाऱ्या मार्गांना ‘स्रोतस’ असे म्हणतात. सूक्ष्मातिसूक्ष्म शारीर घटकसुद्धा या स्रोतसांद्वारे आपले पोषक घटक घेत असतात.”

“म्हणजे ? नळ्या लावल्या आहेत का शरीरात?”

“नळ्या,असे नाही म्हणता येणार पण शरीरावयव किंवा धातूंच्या मध्ये असणारी सूक्ष्म किंवा दृष्य पोकळी म्हणता येईल. ज्याद्वारे शरीराच्या शारीरक्रिया  (Physiological functions ) चा विचार केला जातो.ज्याद्वारे नवीन शरीरघटक निर्माण होणे, तेथील सूक्ष्मपचन,टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेणे यासर्वांसाठी स्रोतसे गरजेची असतात.”

 पुढे जाऊन आचार्य असे सांगतात की  ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर कमळाची फुले उमलतात आणि सूर्यास्त झाला की  मावळतात त्याचप्रमाणे सूर्योदयानन्तर स्रोतसे विकसित होतात तर सूर्यास्तानंन्तर त्यांचा संकोच होतो.त्यामुळे आपण सूर्यास्तानंन्तर जितके उशिरा - उशिरा आपला दिनक्रम ठेवू तितके आपल्या स्रोतसांमध्ये बिघाड होऊन आजार निर्माण होतात. ”

“ह्याSSS  असा काहीच नसतं  हा , प्लिजच!! शरीर काय फुलं  आहेत का कोमेजायला?”

“बरं २००० हजार वर्षांपूर्वी सांगितलंय म्हणून खोटं  वाटतंय का? मग ‘सर्काडियन रिदम’ ही कल्पना ऐकली आहेस का कधी?”

“नाही , ते काय आहे?”

“आपणा सर्व सजीव शरीरामध्ये एक यंत्रणा असते, जी पृथ्वीच्या परिवलन म्हणजेच दिवस-रात्रीच्या चक्राशी, सूर्यप्रकाशाशी संबंधित असते.हे जैविक घड्याळ म्हणजेच बायोलॉजिकल क्लॉक सजीवांना दिवसभरात होणाऱ्या नैसर्गिक चढ-उतारांशी जुळवून घ्यायला शिकवते. आणि या जैवघड्याळाला आपण कृत्रिम प्रकाश, सतत काळोख यांनी फसवू  शकत नाही बरं का. १९व्या शतकापासून विविध शास्त्रंज्ञांनी यावर प्रयोग केले आणि शेवटी २०१७ साली या तीन शास्त्रज्ञांनी ते जनुक, म्हणजे जीन, वेगळे केले ज्यामुळे जैविक घड्याळ खरोखरच असते हे सिद्ध झाले.आता हे जैविक घड्याळ वनस्पती,प्राणी आणि मनुष्य सगळ्यांमध्ये कार्यकारी असते. म्हणून सामान्यांनाही कळावे म्हणून आयुर्वेदामध्ये कमळाच्या फुलाची उपमा देऊन स्पष्ट केले होते जे तुला पटले ना पण आता  २००० हजार वर्षांपूर्वी सांगितलेली संकल्पना पुन्हा सिद्ध झाली, बरोबर?”

“हो.”

“हे जैविक घड्याळ आपल्या शरीरातील विविध शरीरक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. पण अतिशय जागरण , वेगवेगळ्या शिफ्ट ड्युटीज, मोबाईल -टीव्ही-लॅपटॉप्सचा वाढता आणि सलग तासनतास होणारा वापर यामुळे हळूहळू रात्रीच्या वेळेत होणाऱ्या झोपेचा वेळ आकसत  जातो. सलग पण थोड्या दिवसांसाठी हे होत असेल तर दमल्यासारखे वाटणे, एकाग्रता भंग पावणे , काही गोष्टी समजून घेण्यास वेळ लागणे असे त्रास होतात. पण जर सतत हा अत्याचार शरीरावर होत राहिला तर स्थूलता, रक्तशर्करेचे प्रमाण अनियंत्रित होणे , मधुमेह, पॅनिक अटॅक्स , नैराश्य आणि अतिदीर्घकाळ हे सुरु राहिले तर बऱ्याच प्रकारच्या कर्करोगाचे मूळ या जैविक घड्याळाच्या बिघाडात  दिसून येते.हे सुद्धा आता बऱ्याचशा संशोधनांनी सिद्ध झाले आहे. म्हणजे मी सांगितलेला दुसरा भागसुद्धा सिद्ध झाला, हो ना?”

“हो, पण रात्री शांतता असते गं . अरे पण ती शांतता पहाटे ४ mn वाजतासुद्धा असते. आयुर्वेदात सांगितलंच आहे, सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठा. आणि सगळे प्राणी,पक्षी सूर्योदयापूर्वीच उठतात. आणि रात्री तुम्ही जे काम करणार ते या सकाळच्या शांततेतसुद्धा होऊ शकतंय.. आणि खरं  सांग बिंज वॉचिंग असतं ना तुमचं, पाताललोक, होमकमिंग, मनी हेस्ट काय चालू आहे?”

“पाताललोक आणि नार्कोज. म्हणून रात्री बघतो नाहीतर आई ओरडेल..”

“हे बघ, सारखं- सारखं आई ओरडेल हे पालुपद लावणं बंद कर.आईला काळजी वाटते म्हणून ती बोलते. पण तुम्ही जेव्हा सारखं सांगूनही ऐकत नाही.तेव्हा ती चिडते. आणि बिंज वॉचिंगसुद्धा ऍडिक्शन निर्माण करणारे आहे. त्यावर  तुला थोडं नियंत्रण आणावेच लागेल. तू काय काय करू शकतोस.??”

“ …………………. मला थोडा वेळ दे , मी विचार करतो आपण परवा परत भेटू, तेव्हा मी काही आयडियाज घेऊन येतो, त्या बरोबर आहेत की नाही ते तू मला सांग. कारण मला सीरिज आवडतात पण हे बायोलॉजीकल क्लॉक जास्त सिरियस आहे.”

“नक्की सांगेन आणि आईशीपण तू याबद्दल नक्की बोलून बघ. ती काळजी करते पण तुला नक्की समजून घेईल."


चित्र सौजन्य - आंतरजाल


डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक.

9870690689


(प्रस्तुत लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०७ जून २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/06/blog-post.html?m=0 या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखिकेधिन  आहेत. इतरत्र शेअर करायचे झाल्यास लेखात कुठलाही बदल न करता शेअर केल्यास हरकत नाही.)

No comments:

Post a Comment