Pages

Sunday, 21 November 2021

संध्याछाया…… विचार ज्येष्ठांच्या प्रश्नांचा, भाग 3



 

              मागच्या लेखात आपण जेष्ठवस्थेतील शारीर स्थिती , दोषस्थिती, त्यामुळे होणारे त्रास यांची माहिती घेतली. या लेखाची लिंक इथे खाली शेअर केली आहे.

https://samanwayayurved.blogspot.com/2021/10/1.html

 या लेखात आपण, आता हे त्रास टाळावे यासाठी काय करता येईल याची माहिती घेऊ. आता हे त्रास कमी व्हावे-टळावे म्हणून सगळ्यात महत्त्वाचे पाळावयाचे पथ्य म्हणजे अट्टाहास सोडावा. आता मी हे असे काही टोमणा किंवा चेष्टा म्हणून बोलत नाहीये हं. अट्टाहास सोडावा म्हणजे याआधी मी अमुक गोष्ट तमुक प्रकारे करत होतो म्हणून आताही ती मला अशाच पद्धतीने हवी ही विचारसरणी बदलायची. कालानुरूप-स्वतःच्या प्रकृतीनुरूप होणारे बदल स्वीकारायचे. थोडक्यात अट्टाहास सोडायचा.

आहार -

             पूर्वी मी एवढे खात होतो-होते मग आताही तेवढे जायलाच हवे हा हट्ट नको.आधी झणझणीत रस्सा आवडीने ओरपता येत होता पण आता ते जमेलच असे नाही, उलट तिखट-तेलकट खाण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आहार शक्यतो ताजा, पचायला हलका असावा. तिखट-तळलेले, खारट-आंबट कमी प्रमाणात खावे. शिळे अन्न तर टाळलेलेच बरे. दोघेच रहात असल्यास दरवेळी वेगळे ताजे अन्न बनवण्याऐवजी बिस्किटे-फरसाण-चिवडा यासारखे तयार पदार्थ सोयीचे म्हणून खाण्यात येतात. त्याऐवजी ताजे पदार्थ कसे खाण्यात येतील याची सोय पहायला हवी.


झोप - 

            झोप हा या वयातील एक मोठा मुद्दा आहे. फार कमी ज्येष्ठ नागरिक स्वस्थ झोपतात.मेंदूच्या उत्तम कार्यक्षमतेसाठी झोप अत्यावश्यक असते. त्यामुळे किमान 6 ते 8 तासांची झोप तरी मिळेल हे पहावे. आणि ही झोप शक्यतो रात्रीच्या वेळीच आणि सलग मिळेल यासाठी प्रयत्न करावे. 

             सर्वांसाठी झोपेचे वैज्ञानिक महत्त्व , आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार यांचा विचार याआधीही या ब्लॉगवर करून झाला आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी झोपेची गरज यावर सविस्तर पुढे लेखमालेत चर्चा होईलच. 


दिनचर्या

             दिनचर्या म्हणजे रोजचा नियमित दिनक्रम. 

आयुष्यभर नोकरीच्या रहाटगाडग्यात फिरल्यानंतर रिटायरमेंटनंतर ही टाईमटेबल नुसार जगण्याची कल्पना काही जणांना असह्य होऊ शकते. खासकरून ज्यांचे आयुष्य - घड्याळाच्या काट्याना आणि लोकलच्या उद्घोषणांना जोडलेले होते अश्या मुंबईच्या लोकांना जास्तच वाटू शकेल. पण जगण्यातील नियमितता आपल्या शरीराला एक स्थिरता देते. त्यामुळे  शारीरिक आणि मानसिक बळ मिळते.बळ मिळते. कधी एखादा आजार किंवा कठीण परिस्थिती आल्यास त्यांचा सामना करण्यास मदत होते. 

              त्यामुळे आपली प्रकृती, शक्ती ब आवड लक्षात घेऊन दिनक्रम आखावा. काही मदत लागल्यास वैद्यांचा सल्ला घेता येईल. यामध्ये व्यायाम, ध्यानधारणा ,विश्रांती आणि झोप यांना पुरेशी वेळ असावी. आणि हो, छंद ही महत्त्वाचे आहेतच. छंदांची गरज, त्यांचे महत्त्व याविषयी आपण लेखमालेतील पुढे येणाऱ्या लेखांत बोलूच. पण ते महत्त्वाचे आहेत , हे मात्र लक्षात घ्या.

आपल्या दिनक्रमात, रोज सर्व शरीराला तेलाने मालिश करावे. काहीही त्रास नसल्यास साधे तीळ तेलसुद्धा चालेल पण प्रकृती, त्वचा व त्रासानुरूप तेलाची निवड केल्यास अधिक चांगले. रोज रात्री झोपताना टाळूप्रदेशी थोडे थोडे तेल लावावे. निद्रानाशाचा त्रास असल्यास रोज पायाच्या तळव्यांना ही गायीचे तूप लावून मालिश करावी. हे तेलाने/तुपाने मालिश करणे काहींना नकोसे वाटू शकेल कारण त्यांचा वास…. पण वात दोषाला नियंत्रणात ठेवण्यात तेल-तुपाचा मोठा वाटा असतो आणि वृद्धावस्थेत वात दोषाचे असलेले प्राबल्य याविषयी आपण मागाच्याच लेखात चर्चा केली होती. 

             हे सर्व नियमित करायचे उपाय आहेत. ज्यामुळे बरेचसे त्रास टळतात. तरीही वयानुरूप काही लहान-सहान दुखणी-खुपणी होणे साहजिक आहे. अश्या वेळी वेळीच औषधोपचारासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा. महिन्या-दोन महिन्यातून एकदा शास्त्रोक्त आयुर्वेदीय अभ्यंग व वर्षातून योगबस्तीक्रम-विरेचनादि पंचकर्म चिकित्सा करुन घेणे फायद्याचे असते. यामुळे शरीरातील आमशोधन होते, रक्तप्रवाह सुधारतो, शरीर मृदू व बळकट होते,  रक्तवाहिन्या व मज्जातंतु कार्यक्षम राहतात आणि त्यामुळे स्पर्शज्ञान सुयोग्य होते. स्नायू पिळदार होतात, शरीर स्थिर होते, त्यामुळे दुर्बलता कमी होते.

           तर मागच्या लेखात आपण ज्येष्ठांची शारीर स्थिती व त्यांना होणाऱ्या त्रासांमागची कारणे ढोबळ स्वरूपात जाणून घेतली व या लेखात आपण त्या त्रासांसाठी साधारणतः करावयाचे उपाय जाणून घेतले. लेखमालेतील पुढील लेखांत आपण हे सर्व मुद्दे सविस्तर जाणून घेणार आहोत. 

(क्रमशः)

पुढील भाग - ज्येष्ठांचे  पचन व आहार.



मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 21 नोव्हेंबर 2021 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2021/11/3_01620830066.html?m=1

 या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)



No comments:

Post a Comment