Sunday, 3 October 2021

*संध्याछाया…… विचार ज्येष्ठांच्या प्रश्नांचा, भाग 1* वृद्धावस्था आणि वातदोष -


ऱ्याचदा चिकित्सलयात येणाऱ्या मध्यमवयीन अथवा ज्येष्ठांकडून एक वाक्य नेहमी ऐकायला मिळते  की मला वाताचा त्रास आहे/ सांधेदुखी म्हणजे वात का? 

तर असे नाही.

आपल्या जीवनाचे ढोबळमानाने 3 टप्पे असतात. 

बाल्यावस्था , तरुणावस्था आणि वृद्धावस्था.


■ *बाल्यावस्था* - बाल्यावस्थेत कफ दोषाचे प्राबल्य असते.

हे वाढीचे वय असल्याने बाल्यावस्थेत शरीरामध्ये कोशिका आणि उतींची वाढ होत असते. काही दुखले-खुपले (wear and tear) तर त्या जखमा लवकर भरून येतात.कारण या टप्प्यात वाढ होण्याचा वेग हा झीजेच्या वेगापेक्षा जास्त असतो.

साधारण 18 ते 20 वर्षापर्यंत ही अवस्था दिसून येते. 


■ *तरुणावस्था* -  ही अवस्था साधारणतः पुढील 25 ते 30 वर्षे राहते. या अवस्थेत पित्त दोषाचे प्राबल्य असते. तरुणाईचा जोश,धडाडी, नवीन काही करून दाखवण्याची उर्मी या पित्त दोषामुळेच मिळते. या काळात आपल्या सवयी, दिनचर्येनुसार शरीरातील सूक्ष्म पचन होत असते. वाढीचा (नवीन कोशिका-उती तयार होण्याचा) वेग आणि जीझेचा वेग हा सामान्यतः सारखाच असतो. पण या वयात आपला जो आहार-विहार (lifestyle) असतो त्यातच आपल्या वृद्धावस्थेची बीजे रोवली जातात.

                 या दोन अवस्थांबद्दल अजून बरेच काही सविस्तर सांगता येईल, जे आपण इतर लेखनामध्ये त्या - त्या  अनुषंगाने पाहूच. पण आता या लेखमालेत आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत ते वृद्धावस्थेबद्दल. 

■ *वृद्धावस्था* - आपण सगळेच कधी ना कधी वृद्ध होणार असतो. आणि खरं सांगायचं तर ,

*शीर्यते तत् शरीरम्* ।

म्हणजेच क्षरण पावते (झीजते) ते शरीर. 

थोडक्यात आणि अचूक सांगणे ही आयुर्वेद शास्त्राची खासियत आहे. त्याचाच नमुना म्हणजे आयुर्वेदाच्या अभ्यासाला आम्ही सर्वप्रथम अभ्यासतो ते हे वाक्य. ' *जे क्षणोक्षणी झीजते ते शरीर* .' म्हणजे 'लय' होणे,नाश पावणे हाच या शरीराचा मूलभूत गुणधर्म आहे. या काळात वात दोषाचे प्राबल्य असते. तर वात दोष हा शरीरातील गतिशील क्रियांना कारणीभूत असणारा दोष आहे. त्यामुळे वृद्धावस्थेत हा झीज होण्याचा वेग अधिक वाढतो. याचा परिणाम सात धातू, तीन मल, अग्नि व ओज यांवर ही दिसून येतो.

 त्यामुळे विविध प्रणाली उदा. पचनसंस्था, चेतासंस्था, तसेच विविध शरीरावयवांचे कार्य मंदावते.

पूर्वी जसे आजारातून बरे होण्यासाठी शरीराची साथ मिळे, तशी ती या वयात मिळत नाही. त्यामुळे आजार बरे होण्यास वेळ लागतो. उदा. हळूहळू झिजत जाणाऱ्या सांध्यांमुळे संधीवातासारखे आजार, रक्तगत वात दोषामुळे उच्च रक्तदाब, स्वादुपिंडाच्या प्रभावित झाल्यास मधुमेहाची लक्षणे दिसतात, पचनशक्ती मंदावल्यामुळे पोटात गुबारा धरणे,शौचाला साफ ना होणे यासारखी लक्षणे दिसतात. आपल्या ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांवरही याचा परिणाम दिसून येतो. दृष्टी कमी होते,मोतीबिंदू तयार होतो,शब्दोच्चरण करताना त्रास होऊ शकतो, वास घेण्याची-ओळखण्याची शक्ती कमी होते, जिभेची चव-ऐकू येण्याची क्षमता कमी होते, हालचाली मंदावतात, एकाग्रता-स्मरणशक्ती-जाणिवा मंदावतात (various mental and cognitive functions (e.g., memory, intellect, reception, retention, analytic ability, etc.)., त्वचेवर सुरकुत्या येतात, केस पिकणे सुरू होते. अर्थात सर्वांनाच काही सगळीच लक्षणे दिसून येणार नाहीत पण शरीरप्रकृती तसेच शरीरातील दोषस्थिती यानुसार ही लक्षणे व्यक्त होतात.

 धन्वंतरी जयंती व राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2020 च्या निमित्ताने वात-पित्त-कफ दोष म्हणजे नक्की काय हे मी याआधीच सविस्तर सांगितले आहे त्यामुळे आता विस्तारभयास्तव ते परत सांगणार नाही. त्या ऐवजी त्या लेखाची लिंक येथे देत आहे.

https://samanwayayurved.blogspot.com/2020/11/2020.html?m=0

कधी कधी,  काही व्यक्तींचे वय तेवढे जास्त नसते परंतु त्यांची शारीरिक लक्षणे पाहता त्यांचे शरीर लवकर थकले आहे असे जाणवते. असे का होते तर याचे ही कारण आहे वात दोष, आपण वरील लिंक मध्ये वात-पित्त-कफाची लक्षणे पाहिली यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की या वात विकृतीला आता विकृत (बिघडलेल्या)पित्ताची जोड मिळाली तर शरीराची झीज अधिक वेगाने होते. काही वेळा पूर्वी झालेले क्षयात्मक मोठे आजार, मनमानी-स्वच्छंदपणे जगलेले आयुष्य (ज्यावेळी आहार-निद्रा-मैथुन यांचे नियम नीट पाळलेले नसतात म्हणजेच lifestyle disorders ज्यामुळे ओज क्षय होतो), जसे की शिळे अन्न,पचायला जड अन्न,आहारात अम्ल(आंबट), लवण (खारट), कटु(तिखट) चवींच्या पदार्थांचा  भरमसाठ वापर, रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करणाऱ्या झोपेच्या सवयी, शारीरिक व मानसिक ताणतणाव या सगळ्यामुळे शरीर कमकुवत होते. आणि याचा परिणाम म्हणून अकाली वार्धक्य येते.

(क्रमशः)


मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 03 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2021/10/1.html 

या  ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)


No comments:

Post a Comment