Thursday, 2 August 2018

प्रेमस्वरूप आई .... वात्सल्यरूप आई....... - भाग २











  • बाळ शक्यतो आईच्या कुशीत असावे , जेणेकरून बाळाची शी-शू , भूक ,झोपेच्या वेळा व इतर खाई गरजा आईच्या नीट लक्षात येतात . आवश्यकता असल्यास तात्काळ तज्ज्ञांची मदत मागता येते. तसेच  बाळ सतत आईच्या जवळ असेल तर दोघांमध्ये वात्सल्यबंध तयार होतो व आईला पान्हा फुटण्यास मदत होते .
  • प्रसूतिगृहातून घरी जाण्यापूर्वी स्तनपानाची शास्त्रशुद्ध पद्धत डॉक्टर्स/प्रशिक्षित नर्सेस / lactation consultants कडून नीट शिकून घ्यावी . बाळाला नीट दूध मिळावे यासाठी स्तनाग्र (nipple )  व बाजूचा काळा भाग (aerola ) अधिकाधिक बाळाच्या तोंडात असायला हवा ,तसेच बसण्याची स्थिती , बाळाला पकडण्याची पद्धत याचे नीट प्रात्यक्षिक शिकून घ्यावे.
  • स्तनपानाचा  कालावधी व वारंवारता - स्तनपानाच्या कालावधी व वारंवारता हे  प्रत्येक बाळासाठी वेगवेगळे असतात . त्यामुळे दुसरे बाळ दिवसातून १२ वेळा पिते आणि माझे बाळ ६च वेळा का पिते हा निकष लावू नये. बाळाचे पोट नीट भरते आहे कि नाही याचे निकष वेगळे असतात ते आपण पुढे पाहू. बाळाला जेव्हा भूक लागेल तेव्हा स्तनपान करणे गरजेचे  आहे , यालाच डिमांड फीडिंग (बाळ मागेल तेव्हा) असे म्हणतात . रात्रीसुद्धा स्तनपान करता येते. झोपलेल्या स्थितीतही स्तनपान करता येते. फक्त त्या स्थितीत आईला झोप लागणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच स्तनाचे वजन बाळाच्या नका-तोंडावर येणार नाही असे पाहावे.
  • मातृस्तन्याचे घटक - बाळ स्तनपान करत असताना त्याच्या गरजेप्रमाणे स्तन्यात (घटकद्रव्यांत) थोडा बदल होतो. म्हणजे मुदतपूर्व प्रसूती झाली असेल तर आईच्या दुधातील घटक बाळाच्या गरजे प्रमाणे बदलतात. तसेच पूर्ण दिवस भरल्यानन्तर प्रसूती झाली तरी सामान्य बाळाला दूध पाजतानाही सुरुवातीचे दूध (foremilk)  थोडे पातळ असते कारण त्यात स्निग्धांश थोडा कमी असतो आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते . हे दूध बाळाची तहान भागवण्यास मदत करते. जसे स्तनपान होत जाते तसा स्निग्धांश वाढत जातो व तसतशी या दूधाची  घनता वाढते. याला Hindmilk असे म्हणतात . हे दूध बाळाची भूक भागवते. त्यामुळे बाळाला पाजताना एकाच बाजूने संपूर्ण पाजावे आणि एका बाजूने दूध येणे बंद झाले कि मग दुसऱ्या बाजूने दूध द्यावे. म्हणजे बाळाचे पोट भरते. जर दोन्ही बाजूचे दूध थोडे थोडे दिले गेले तर बाळाचे पोट भरल्यासारखे वाटते पण त्यातील जास्तीच्या द्रवांशामुळे बाळाला परत लगेच भूक लागते .
  • आई ऑफिसला जात असल्यास - आईने किमान ४ महिने बाळाला अंगावर पाजलेच पाहिजे. खरेतर आदर्शरित्या हा काळ ६ महिन्यांचा आहे म्हणूनच हल्ली मातेला ६ महिने प्रसूती रजा  मिळावी अशी कायद्याने तरतूद आहे .तिचा अधिकाधिक लाभ घ्यावा. पण काही कारणाने हे शक्य होत नसेल तर आईने स्वतःचे दूध काढून साठवण्याची पद्धत शिकून घ्यावी. हे हाताने किंवा breastpump सारख्या यंत्रद्वारे शक्य आहे. ते निर्जंतुकरित्या साठवावे . असे साठवलेले दूध बाहेर ६ तास, फ्रीजमध्ये १ दिवस व फ्रीजर मध्ये १ आठवड्यापर्यंत चान्गले राहते असे नवीन संशोधन सांगते. हे दूध बाळाला देतात कोमट पाण्यात ठेवून (गॅसवर गरम करू नये.) सामान्य तापमानाला आणून बाळाला देता येते . (प्रस्तुत लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत आणि आयुर्वेदानुसार कोणतेही अन्न  इतके दिवस ठेवून सेवन करू नये. पण अडचणीच्या वेळी तसेच बाळ झोपले असताना दूध गळत असल्यास ते काढून ठेवून लवकरात लवकर किंवा दिवसभरात संपवता येईल. )
  • तसेच कोणतेही वरचे दूध मग ते गाईचे असो वा  म्हशीचे किंवा कोणत्याही प्रकारचे तयार इन्फन्ट फॉर्म्युले हे आईच्या दूधासाठी समर्पक पर्याय असू शकत नाहीत त्यामुळे आईला पुरेसे दूध येत असेल तर बाळाला हे पर्यायी दूध देऊ नये. त्याऐवजी आधी सांगितल्याप्रमाणे आईचे दूध साठवता येईल.

(क्रमशः )


संदर्भ : ब्रेस्टफीडिंग प्रमोशन नेटवर्क, इंडिया.
        टेक्स्टबूक ऑफ ऑब्स्ट्रेटिक्स
चित्रसंदर्भ : वर्ल्ड अलायन्स ऑफ ब्रेस्टफीडिंग ऍक्शन वेबसाइट.

Wednesday, 1 August 2018

Breastfeeding - Foundation of Life. - part 1


Breastfeeding - Foundation of Life.

                A Mother and her child share unique bond. Every culture- every literature has many quotes about Mother -child’s bond of love. Our Indian cinemas are also cashed it very much. Bollywood always tries to get us “emmossionall” with dialogues like “Doodh ka karj……”  “Agar Maa ka Doodh piya hai,to…..” Let’s ignore the fimly angle but we all know and have experienced the ‘Real bond of Love’ between a Mother and her child. And Breastfeeding plays a pivotal role in it. Hence it is an important developmental aspect for a mother and her child’s physical as well as mental well being.
               That is why, every year during first week of August i.e 1st-7th August, ‘World Breastfeeding Week’ is being celebrated all over the world in order to spread awareness about Breastfeeding and to make Breastfeeding convenient for every lactating mother, irrespective of her socio-economic status. Concept and celebration of Breastfeeding was started since 1991 and every year they decide a theme for awareness campaign . the main aim is to make every lactating mother and her family aware about benefits of breastfeeding and to provide encouraging environment for breastfeeding  to a lactating mother.
              The reason for giving such emphasis on Breastfeeding is in its uniqueness. For every newborn There is no other wholesome and nutritious diet than mother’s milk. Just give it a thought , is there any other diet for a newborn which is more customized (changing its constitution as per individual child’s nutritional requirement), of precise temperature. Totally sterile (as it goes directly from mother’s breast to child’s mouth), balanced with solids-liquids-fat-nonfat-carbohydrates and micronutrients and yet inexpensive??? You will find that only solution to the question is ‘Mother’s Milk.’ But still in many countries children are still deprived from their fundamental right of breastfeeding , many children cannot get enough breastfeeding.  Hence since 1991 World Alliance of Breastfeeding Action (WABA) , World Health Organization (WHO) and UNICEF are working in collaboration In order to clear out misunderstandings regarding breastfeed , to discuss difficulties during about breastfeeding and to make it sustainable during at least initial life of a newborn . Involvement of such repites health organisations marks  the importance and necessity of Breastfeeding. It has definitely helped to increase awareness about breastfeeding.
Even so, for many mothers,it seems  difficult to continue breastfeeding for 2 years. As there are many reasons like inadequate nutrition, support from family, enough physical and mental rest, which force mother to discontinue it.
               Hence to encourage breastfeeding , first we need to educate lactating mothers,their partners and other family members about need and importance of breastfeeding. It can be done with the help of gynecologists , trained nurses, lactation consultants , and other support groups. There should be prepartum lactation guidance workshops for the family members where they will be made aware of various issues like advantages of breastfeeding, disadvantages of top feeds, use of other devices like breast pump or bottles and storage of breastmilk. Also pregnant mothers will be taught correct method of  breastfeeding , practical difficulties and its solutions, which helps to relieve any lactation related stress . now some may question need of awareness of family members as well  but with the arrival of a little guest, everyone’s set routine may get disturbed.You may need extra helping hands to take care of a newborn. So it is helpfull to understand importance of breastfeeding and be prepared for the alterations in oyour schedule asper baby’s need so that the lactating mother can get enough cooparation,nutrition,rest and time for breastfeeding her child.
Key points to remember
  • First touch and breastfeeding - post delivery first cry and breathing is confirmed and baby should be given to the mother for breastfeeding as soon as possible.
  • For first few days mamary glands (breasts) produce thick yellowish liquid know as Colostrum which is enriched with nutrients and antibodies which provide protection against various diseases. It is also mild laxative in nature which helps a newborn to pass first stools (meconium). Due to which excess fo bilirubin , residual red blood cells can be excreeted and chances of physiological jaundice are reduced. Also colostrum is rich in IgM,IgG,IgA antibodies which helps to develope baby’s immune system naturally.
(continues)

References ;
  1. . Breastfeeding Promotion Network , India
  2. Textbook of obstretics
  3. Picture reference - World Alliance of Brerastfeeding Action (WABA) official website

Saturday, 30 June 2018

बचके रहना रे बाबा….. ( अर्थात वर्षा ऋतचर्या)



             मुंबईकरांचा हा आठवडा सुरु झालाच तो मुळी पाऊस घेऊन आणि आजच यावर्षी पहिला लेप्टोचा रुग्ण आढळला अशी बातमीही वृत्तपत्रात वाचली. आणि खऱ्या अर्थाने पावसाळा सुरु झाल्याची खात्री पटली.
            खरं तर पावसाळा हा मोठा रोमँटिक ऋतु. पाऊस सुरु झाला की उत्कट भावनांनी ओथंबलेल्या कविता , भजी-चहाचे कप्स यांचे फोटो-शुभेच्छा viral होतात. घरोघरी भजी, समोसे, फ्राइज , आलं-मसाल्याचा चहा, गरमागरम मॅगी, वाफाळती सूप्स…. अहाहा !! काय राव वाचूनंच पाणी सुटलं की नाही?
आणि मग हळूहळू पोटदुखी, अॅसिडिटी, जुलाब, सर्दी ताप खोकला यासारख्या तक्रारी घेऊन रुग्ण दवाखान्यात दाखल होऊ लागतात. आता तुम्ही लगेच म्हणाल , ‘ काय डॉक्टर तुम्हीपण, मौसम मस्ताना और आप का हमेशा बिमारी का रोना??’ पण करणार तरी काय, सध्या चिकित्सालयात येणारी गर्दी बहुतांश हेच आजार घेऊन येत आहे. आणि याचे कारण आहे ऋतुचर्येचे न पाळलेले नियम.
यापूर्वी आपण ग्रीष्म ऋतुचर्या पाहिली होती. त्यावेळी आपण पाहिले होते की ग्रीष्म ऋतुत चय अवस्थेत असलेला वात दोष सतत पडणाऱ्या पावसामुळे उत्पन्न झालेल्या गारव्याची जोड मिळून आणखीन प्रकुपित होतो. त्यातच वाढलेली आर्द्रता , गारवा आणि पावसामुळे येणारा ओलावा कफाच्या वेगवेगळ्या आजारांना (उदा. सर्दी , खोकला,दमा) बळ देतो. त्यातच या काळात पाणीही गढूळ, अशुद्ध असते. वनस्पती हीन वीर्य (कमी गुणांच्या), अम्ल रसप्राधान्य असलेल्या असतात. या स्थितीमुळे नैसर्गिकरित्या पित्त दोष वाढतो (चय अवस्था). त्यामुळे भूक कमी होणे, अपचन, अॅसिडिटी, शौचाला साफ न होणे किंवा पातळ जुलाबासारखे होणे, पोटात दुखणे यासारखे त्रास दिसतात. अशी ही वात-पित्त-कफ हे तिन्ही दोष थोड्या-फार फरकाने बिघडलेली शरीरस्थिती शरीराचे बळ हीन आणि पाचनशक्ति मंद करते. त्यामुळे सतत दमल्यासारखे वाटणे, उत्साह नसणे, बेचैनी वाटत राहते. त्यातच सूर्यकिरणांचा अभाव, अशुद्ध पाणी, ओलावा यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जंतुसंसर्ग ,साथीचे रोग होतात. (ज्यांना “commonly” Viral infections म्हणतात हल्ली).
या सगळ्याचा विचार करता ऋतुचर्या महत्वाची आहे. ऋतुचर्या म्हणजे ऋतुनुसार आपले आचरण बदलणे. म्हणजे कसे ते पाहू,

वर्षा ऋतुचा विहार -
  • आपले घर-ऑफिस नेहमी कोरडे, स्वच्छ हवे.
  • शक्यतो घरात संध्याकाळी धूप करावा. धूपनाने कीड़-मुंग्या दूर होतात.
  • बाहेर पडताना नेहमीच छत्री ,रेनकोट जवळ असावे. गळा-छातीचा भाग जॅकेट किंवा स्कार्फने झाकलेला असावा.
  • भिजणे शक्यतो टाळलेले बरे, चुकून भिजल्यास लगेचच अंग विशेषतः डोके पुसावे व स्वच्छ ,कोरडे कपडे घालावे.
  • लहान मुले भिजल्यास अंग-डोके कोरडे करून छाती गरम कापडी पुरचुंडीने शेकावी.
  • पायात चांगल्या प्रतीचे पावसाळी बूट असावे. जास्त चालणे होत असल्यास बंद बूट वापरावे.
  • चिखल, साचलेले पाणी यातून चालणे टाळावे. खरुज, नायटा, कीडे/साप/उंदीर चावणे, लेप्टोस्पायरोसिस, चिखल्या होणे यासारखे आजार होऊ शकतात., विजेच्या उघडया तारांचा धक्का लागू शकतो.
  • अंतर्वस्त्र स्वच्छ व कोरडी असावी. दमट कपडे वापरल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊन त्वचाविकार, गुप्तांगात खाज, चट्टे येऊ शकतात.
  • व्यायाम हलक्या स्वरुपाचा करावा.
  • वातशामक तेलाने अभ्यंग करून नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी.
  • दिवसा झोपणे व रात्री जागरण करणे टाळावे. नाहीतर वात-पित्ताचे त्रास वाढतात.
  • शरीरबल कमी असल्याने या काळात रतिक्रीडा निषिद्ध आहे.

पावसाळ्यात घ्यायची केसांची काळजी-
  • केस साध्या सुती पंचाने कोरडे करावेत.
  • कोरडे झाल्यावर मग रुंद दात्यांच्या कंगव्याने विंचरावे.
  • केस ओले अस्वच्छ राहील्यास किंवा ओल्या केसांवर तेल लावल्यास कोंडा, फोड पुटकुळ्या येऊ शकतात.
  • Hair styling equipments व रसायने यांचा वापर मर्यादित करावा.
  • शक्य असल्यास ‘केशधूपन’ करवून घ्यावे. केशधूपन केल्याने केसांतील कृमि, कोंडा कमी होण्यास मदत होते.
  • रात्री झोपताना केसांना तेल लावल्यास उत्तम नाहीतर किमान टाळूप्रदेशी तरी तेल लावावे.

पावसाळ्यात घ्यायचा आहार -

  • पावसाळा म्हटले की पाचनशक्ति मंद झाल्याने अन्नावर रुचि वाटत नाही. पण काहीतरी गरम,चमचमित, रुचिकर पदार्थ खावेसे वाटतात. त्यामुळे भजी, समोसे,कबाब अश्या पदार्थांचा बेत केला जातो. क्षणिक आनंद देणारे हेच पदार्थ नन्तर पोट बिघडण्यास कारणीभूत ठरतात.
  • भाज्यांची कमतरता असल्याने सुकवलेल्या भाज्या, पापड ,सांडगे,मसाल्याच्या मिरची, लोणची , मांसाहारी घरांत सुके मासे-मांस यांचा वापर वाढतो. मात्र सुकवलेले पदार्थ पचायला जड असतात. तसेच त्यात तेल, मीठ मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे या सर्व पदार्थांचे सेवन जरा जपूनच करावे.
  • पानातील डावी बाजू, लोणची पापड आदि रुचिकर असतात त्यामुळे थोड्या प्रमाणात (भाजीसारखे नव्हे) खावे. मात्र पापड नीट भाजलेला असावा, लोणचे घरगुती,आंबा किंवा लिम्बाचे असावे.विकतच्या लोणच्यात विनेगरचा वापर असतो त्यामुळे ते टाळावे.
  • चिंच , कैरी पूर्णपणे वर्ज्य आहे
  • चणा डाळ, बेसन याऐवजी मूग डाळ, मूगडाळीचे पीठ वापरावे.
  • जुने धान्य वापरावे किंवा नवीन धान्य असल्यास भाजून घ्यावे.
  • आंबवलेले पदार्थ , दही मिसळून/शिजवून  केलेले पदार्थ इडली,मेदुवडा, उत्तपा, ब्रेड खाऊ नये. प्रवासात नाइलाजाने खायचे असल्यास नीट भाजलेला टोस्ट, डोसा खावा.
  • कच्चे सलाड खाऊ नये,खायचे असल्यास थोडे वाफवुन खावे.
  • दूध पिताना त्यात पाव चमचा हळद घालून उकळवून घ्यावे.
  • ताक उत्तम पाचक आहे. त्यामुळे अधून-मधून दुपारच्या जेवणात जीरे-सैंधव घालून घेता येईल.
  • फिटनेसच्या गैरसमजापोटी बऱ्याचदा लोणी-तूप टाळले जाते. पण वात प्रकोप करणाऱ्या या ऋतुत घरच्या लोणी, तूपाचा आवर्जून वापर करावा. (पण म्हणून लगेच वडे तूपात तळण्याचा बेत करु नका हं, हे लोणी तूप कच्चेच म्हणजे पोळीला लावून किंवा भातावर घालून घ्यायचे आहे.)
तुमच्या आणखी काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये निःसंकोचपणे विचारा..

तर या पावसाळ्यात ही काळजी जरूर घ्या आणि येणाऱ्या धुवांधार पावसाचा आनंद घ्या.

Thursday, 21 June 2018

।। योगः चित्तवृत्तिनिरोध ।।


On occasion of 4th internaInternYoga Day,

First we pay our tribute to Acharya Patanjali,

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन।
यो पां करोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोस्मि।।


21st June 2018
4th international yoga day


Samanwaya Ayurveda in collaboration with Keshayurved brings you special aspect of Yogasanas on this special day.
*Keshayoga - 7 simple Yoga poses for healthy hair.

*Keshayurved* is a visionary project where we work to give you healthy hair and peaceful mind.
Till date 60 subcenters have joined hands together all over India and abroad. Proud to be the part of such a great team.

For appointment and queries 
Contact 
 Samanwaya Ayurvedic and
 Panchakarma Clinic.
(Authorised subcenter - Keshayurved)
Dr Snigdha Vartak
9870690689














Thursday, 1 February 2018

........कंबर लचकली (भाग २) - उपाय व औषधोपचार.


......कंबर लचकली (भाग १) पुढील लिंकवर वाचा, कंबर दुखण्याची कारणे ,प्रकार 
https://samanwayayurved.blogspot.in/2017/01/blog-post.html?m=1


.....कंबर लचकली (भाग २) - उपाय व औषधोपचार.

             ..तर नीताताई    “बऱ्याच केसेसमध्ये कंबरदुखी,पाठदुखी ही अभिघात(Trauma ) , कुपोषण,मर्माघात,अतिव्यायाम अश्या कारणांनी होते ज्यामध्ये पाठीशी संबंधित पेशी,स्नायू, मणके किंवा त्यांच्याशी संबंधित कूर्चा दुखावल्या जातात. त्यामुळे या सामान्य कारणांमुळे होणाऱ्या दुखण्याचे निराकरण कसे करायचे ते  आपण पाहू. यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते  म्हणजे नक्की कोणत्या कारणांमुळे हे पाठीचे दूखणे झाले आहे ती कारणे ओळखणे,ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे. यासाठी सर्व स्थानिक व सार्वदेहिक (Local and Generalised) लक्षणांची विचारपूर्वक चिकित्सा करावी लागते. यासाठी,
  • दैनंदिन जीवनात बदल
  • व्यायाम आणि फिजियोथेरेपी
  • आयुर्वेदीय औषधी चिकित्सा
  • पंचकर्म
या सर्व पर्यायांचा सर्वंकष विचार करावा लागतो.

  1. दैनंदिन जीवनातल्या चुका - बऱ्याचदा रोज धावपळीत आपल्या हातून अनवधानाने घाईघाईत काही चुकीच्या हालचाली- गोष्टी होतात ज्यामुळे पाठीचे दूखणे सुरु होते आणि या दुखण्याचे मूळ नक्की कशात आहे हे जाणून न घेताच थातुरमातुर उपचार केले जातात ज्यामुळे तात्पुरते बरे वाटले तरी दुखणे समूळ नष्ट होत नाही. बऱ्याचदा या कृतीमुळे पाठीचे दुखणे उद्भवले असेल याचीही कल्पना आपल्याला नसते. मात्र अशा चुकीच्या हालचाली टाळल्या तरीही पुन्हा-पुन्हा दुखणारी पाठ बारी होते. यासाठी दैनंदिन हालचाली करताना आवश्यक अशा काही बदलांचा चित्रमय तक्ता या लेखाच्या अखेरीस दिला आहे.*
  2. व्यायाम-फिजियोथेरपी -.   पाठीच्या दुखण्यासाठी व्यायाम हा जसा उपचार आहे तसेच ते एक कारणसुद्धा आहे. आश्चर्य वाटले ना?? म्हणजे असे की चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम तसेच काही विशिष्ट व्यायामप्रकार यामुळे पाठदुखी सुरु  होते. तसेच अचानक उद्भवलेल्या कंबरदुखीसाठी (Acute stage) व्यायाम निषिद्ध आहे मात्र दीर्घकालीन त्रासासाठी (chronic) तज्ञ वैदयांच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम व फिजियोथेरपीचा वापर करावा. तसेच पाठीच्या दुखण्यासाठी बऱ्याचदा योगासने केली जातात. यापैकी कंधरासन,मार्जारासन, भुजंगासन, नौकासन, वीरभद्रासन यासारखी आसने पाठीच्या स्नायूंना ताकद देण्यासाठी  उपयुक्त ठरू शकतात. मात्र योगासने करताना शरीरस्थिती-श्वासगती यांचा ताळमेळ महत्वाचा असतो. तसेच 'पाठी'साठी म्हणून सांगितलेली सगळीच आसने  सगळ्यांनाच लाभदायक असतील असेही नाही. कारण इजा नक्की कोणत्या स्वरूपाची आहे हे समजून   नुसतेच वीडियो बघून करण्यापेक्षा तज्ञ मार्गदर्शकाकडूनच शिकून घ्यावी.
  3. औषधी चिकित्सा -  कंबरदुखीच्या चिकित्सेसाठी वेगवेगळे गुग्गुलु कल्प, पाचन चूर्ण, आमपाचन, बृंहण चूर्ण, घृत, तेल, काढे  , क्षीरपाक वापरले जातात.ही औषधे पोटातून घेण्यासाठी ,अंगाला लावण्यासाठी,बस्ति , नस्य, धारा अशा वेगवेगळ्या प्रकारांनी वापरता येतात.  यामध्ये कंबरेचे दुखणे कशा प्रकारचे आहे हे तपासून मग औषधे कोणत्या प्रकारची द्यावी हे ठरवले जाते.पुन्हा  उपस्तंभित व निरुपस्तम्भित अशा पाठदुखीच्या प्रकारानुसार औषधी चिकित्सा - गुग्गुलु कल्प, काढ़े ,तेले वेगवेगळ्या प्रकारे  वापरावे लागतात. त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखीचे योग्य निदान होणे महत्वाचे आहे.
  4. पंचकर्म चिकित्सा - पंचकर्म चिकित्सेसाठी संवाहन,कटि बस्ति, पत्रपोट्टली स्वेद, शालि-षष्टिक पिंडस्वेद, अग्निकर्म , भल्लातक कर्म, बस्तिक्रम, क्षीर बस्ति, वैतरण बस्ति, रक्तमोक्षण,पिचु यासारखे पंचकर्म उपाय दुखणे कोणत्या प्रकारचे आहे ते पाहून केले जातात.
  • बस्तिकर्मचिकित्सा ही अत्यंत प्रभावशाली चिकित्सा आहे.बस्ति म्हणजे औषधी काढे/तेल स्वरूपात शौचमार्गाद्वारे देणे.वाताच्या आजारांवर बस्ति ही अत्यंत प्रभावी चिकित्सा आहे. कंबरेच्या दुखण्यासाठी चिकित्सा करताना  रुग्ण प्रकृती - व्याधी स्वरूप यानुसार ८/ १५ / २१ बस्ति व त्याबरोबर क्षीरबस्ती/यापन बस्ति/वैतरण बस्ति अशी चिकित्सायोजना केली जाते.


  • कटिबस्ती - कटि म्हणजे कंबर .कटिबस्ती या  चिकित्सेमध्ये कंबरेच्या ज्या भागात तीव्र वेदना आहेत तेथे सहन होईल असे कोमट तेल ठेवले जाते. स्थानिक वात  दोषाचे शमन व स्नायूंना ताकद मिळावी यासाठी हा उपचार केला जातो.





टीप : *प्रस्तुत लेखामध्ये सामान्यतः दिसणाऱ्या पाठदुखीची कारणे ,निदान व उपचार यांचा विचार केला आहे. यामध्ये अर्बुद, क्षयरोगजन्य यासारख्या इतरही काही कारणांचा विचार विस्तारभयास्तव टाळला आहे. हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल.
** लेखामध्ये ठिकठिकाणी निदान, उपचारांविषयी माहिती देताना वैद्यकीय सल्ल्याचे महत्व अधोरेखित केले आहे, यावरून या विषयाचे गांभीर्य लक्षात यावे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाला येतील तसे उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

टीप - (सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी २१ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.in या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


*दैनंदिन जीवनातील बदल (Routine corrections)






Wednesday, 20 December 2017

विरुद्धाहार ( Incompatible Diet) भाग 2



विरुद्धाहार ( Incompatible Diet) याविषयी पहिल्या भागात आपण विरुद्धाहार म्हणजे काय, सेवनानंतर त्याचे पाचन कसे होते तसेच संयोग विरुध्द म्हणजे काय हे पाहिले. या भागात आपण विरुद्ध आहाराचे इतर प्रकार, त्यामुळे होणारे आजार, विरुद्ध आहार कसा सोडावा आणि विरुद्धाहार सेवनाने झालेल्या आजारांची चिकित्सा या मुद्दयांविषयी माहिती घेऊ.


  • देशविरुद्ध - जांगल देशात, (कोरड्या हवामानाचा प्रदेश) , रुक्ष, शुष्क , कमी प्रमाणात स्नेह असलेले अन्नपान सेवन करणे किंवा आनूप देशात (किनारी प्रदेश, दलदल-पाणथळ जागा)अशा ठिकाणी कफ वाढवणारे पदार्थ सेवन करणे म्हणजे देश विरुद्ध होय.
           उदाहरणादाखल सांगायचे अशा वेळी खरं तर जांगल प्रदेशात बेसन,कडधान्ये यासारखे वात वाढवणारे पदार्थ खाऊ नयेत , आहारात तेला-तुपाचा वापर असावा. पोळी-पराठे यासाठी कणिक मळताना त्यात तेल-भाजताना तेल/तूप अवश्य असावे. सलाड खायचे झाल्यास ड्रेसिंग म्हणून कोणतेतरी तेल नक्कीच वापरावे. अशा युक्ति-प्रयुक्ति वापरून जेवणात स्निग्ध पदार्थांचा समावेश असावाच. याउलट आनूप देश , इथे कफ दोषांचे प्राबल्य निसर्गतः असते. त्यामुळे कफाच्या गुणांचे पदार्थ न खाता विरुद्ध गुणांचे पदार्थ सेवन करावे. कामानिमित्त/शिक्षणानिमित्त दूर देशी राहाणाऱ्या व्यक्तींनी याचा नीट विचार करायला हवा.
  • काल विरुद्ध - काळ विरुद्ध म्हणजे  काळाच्या विरुद्ध आहार.जसे की शीत काळात शीत रुक्षादी गुणांचे सेवन किंवा उष्ण काळात तिखट,उष्ण गुणांचे सेवन करणे. उदा. वर्षा तसेच हेमंत ऋतुमध्ये वातावरणातील शैत्य व रुक्षता यामुळे वात दोष वाढलेला असतो. अश्या वेळी वात दोष वाढवणारे पदार्थ सेवन केल्यास वातप्रकोप होण्याची शक्यता असते.याउलट ग्रीष्म,शरद ऋतुमध्ये तिखट, झणझणीत , पित्तवर्धक अन्नाचे सेवन त्रासदायक ठरेल.
  • मात्रा विरुद्ध - मात्रा म्हणजे प्रमाण. एखादी गोष्ट ज्या प्रमाणात सेवन करणे अपेक्षित आहे ते तसे न करता विपरीत प्रमाणात सेवन करणे म्हणजे मात्रा विपर्यय. उदा. लोणचे भाजीसारखे व भाजी लोणच्यासारखी खाणारे लोक म्हणजे ‘मात्रा विरुद्ध.’  तसेच च्यवनप्राशाची चव आवडते म्हणून ३-४ मोठ्ठे चमचे भरून नाष्टयाऐवजी च्यवनप्राशच खाणे हे मात्रा विरुद्ध (औषध औषधाप्रमाणेच खायचे, अन्नाप्रमाणे नाही.)  हेमंत-शिशिर ऋतुत अग्नि बलवान असताना/ कडकडून भूक लागलेली असताना डाएट म्हणून-जेवण आवडत नाही म्हणून थोडेेसेच जेवणे हेसुद्धा ‘मात्रा विरुद्धच’!!
तसेच पूर्वी सांगितल्याप्रमाणे मध,तूप,तेल वसा व पाणी यापैकी कोणतेही दोन तीन,चार किंवा पाचही पदार्थ एकत्र करताना समान मात्रेत एकत्र करून खाऊ नयेत.
एखादे औषध मध-तूपासोबत घ्यायला सांगितले असेल तर मध-तूप समान मात्रेत न घेता विषम प्रमाणात घ्यावे.
  • सात्म्य विरुद्ध - सात्म्य म्हणजे सवयीचे. ज्याची शरीराला पूर्वीपासून सवय आहे असे. म्हणजे ज्या व्यक्तीला शाकाहारी जेवण सवयीचे आहे त्याला जर मांसाहार करायला सांगितला तर ते सात्म्यविरुद्ध होईल. सर्वसाधारणपणे दिसणाऱ्या फूड अलर्जी या सात्म्य विरुद्ध अन्नाचे उदाहरण म्हणता येतील.
  • दोष विरुद्ध - वात-पित्त-कफ दोषांच्या गुणांच्या समान गुणांचे अन्न , औषध,कर्म करणे हे दोष विरुद्ध आहे.
             येथे हे लक्षात घ्यायला हवे की समान गुणांचे सेवन हे त्या-त्या दोषांचा प्रकोप करणारे असते त्यामुळे समान गुणाभ्यास (सारख्याच गुणधर्माच्या आहाराचे सतत सेवन) हे असलेल्या विकारांना अधिकच वाढवेल त्यामुळे ते विरुद्ध होते.
  • अग्नि विरुद्ध - अग्नि म्हणजे पचनशक्ति. मंदाग्नि असलेल्या व्यक्तिनी जर पचायला जड़ असे जेवण जेवले याउलट तीक्ष्णाग्नि असलेली व्यक्ति हलके, सहज पचणारे अन्न खात असेल तर ते अग्नि विरुद्ध आहे. कारण पचत नसताना पक्वान्ने खाल्ली तर अजीर्णच होणार आणि भूक/पचवण्याची ताकद असताना खिचडी/लाहया खाल्ल्या तरीही त्रास होणारच.
  • वीर्य विरुद्ध - उष्ण वीर्य व शीत वीर्य पदार्थ ( वीर्य म्हणजे potency शक्ति, कधी कधी व्यवहारात आपण असं म्हणतो की अमुक एक पदार्थ प्रकृतिला गरम असतो,तमुक थंड असतं सामान्यतः आपण त्यावेळी त्या पदार्थाचे वीर्य कसे आहे यासंदर्भात बोलत असतो.)
           तर असे उष्ण व शीत वीर्य पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. शीत वीर्य असलेले दूध - मलई  व शीत वीर्य असलेले मासे, खिचडी व दूध , दूधाचे पदार्थ , गोडाचा शिरा ,दूध-भात अशा पदार्थांबरोबर लोणचे-चटणी खाऊ नये.
  • कोष्ठ विरुद्ध - ‘कोष्ठ’ म्हणजे ‘कोठा’. एखाद्याचा कोठा हलका आहे असा शब्दप्रयोग आपण ऐकतो तेव्हा त्या व्यक्तीला परसाकडे जाताना काही त्रास होत नाही, उलट काही जड अन्न खाल्ले की शौचास होतेच, पोट फुगणे, ढेकरांचा त्रास होतो. त्यामुळे ‘मृदू कोष्ठी’ व्यक्तिन्नी पचायला जड अन्न खाणे ‘कोष्ठ विरुद्ध’ आहे. याउलट ‘क्रूर कोष्ठी’, ज्यांचा कोठा जड आहे अशांनी, कडधान्य,ब्रेड सारखे पदार्थ खाणे हेसुद्धा ‘कोष्ठ विरुद्ध’च की.
  • अवस्था विरुद्ध - शरीरअवस्थेच्या विपरीत आहार करणे म्हणजे अवस्था विरुद्ध. उदा. मेहनतीचे काम, मैथुन , व्यायाम आदि क्रियांमुळे शरीरात स्वाभाविकतः वातवृद्धि होते अशा वेळी वातवर्धक आहार करणे किंवा निद्रा , तंद्रा, आलस्य अश्या अवस्थेमध्ये कफवर्धक आहार करणे हे अवस्था विरुद्ध समजावे.
  • क्रम विरुद्ध - आपल्याकडे भोजनाचा एक सामान्य क्रम निर्देशित आहे, त्या विषयी अजून विस्ताराने नन्तर बोलता येईल, ज्यानुसार आधी मल-मूत्र विसर्जन करून, भूक लागली की जेवावे असे सांगितले आहे. याचे पालन न करणे म्हणजे क्रम विरुद्ध. बऱ्याचदा खाल्ल्यावर “प्रेशर” येते म्हणून भूक लागलेली नसताना खाणारे महाभाग असतात की.
  • परिहार विरुद्ध - परिहार म्हणजे काय करु नये याचे नियम. अमुक पदार्थ खाल्ल्यानंतर ठराविक पदार्थ टाळावे. जसे की मांसाहार किंवा किंवा चीज़/बटरयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिऊ नये कारण असे केल्यास या खाद्यपदार्थांमधील स्निग्धपदार्थ अधिक घट्ट आणि पचण्यास जड होतात. पण हल्ली आम्हाला पिझ्झा खाताना, हॉटेलमध्ये बार्बेक्यू चापताना कोल्ड ड्रिंक्सचीच आठवण होते. मस्त पार्टी हादडल्यानंतर पोटात जागा नसताना dessert बळेबळे फक्त रसनातृप्तिसाठी खाल्ली जातात. हे सगळेच परिहार विरुद्ध आहे.
  • पाक विरुद्ध - पाक म्हणजे शिजणे/पिकणे आणि पाक विरुद्ध म्हणजे त्याउलट कच्चे किंवा अति शिजलेले, करपलेले किंवा अति पिकलेले.
         उदा. जर पेरू कच्चाच खाल्ला तर कसा लागतो? पोटातही थोडी गडबड होते ना? काहींना दुखते , गैसेस होतात. आणि अति पिकलेला नरम पेरू? त्याचाही त्रासच होतो. टिफीन सर्विसेस, रेस्टॉरंट किंवा लग्नपंगती जेथे मोठ्या प्रमाणात अन्न शिजवले जाते अशा वेळी कधी कधी जेवण कमी-अधिक प्रमाणात शिजलेले किंवा करपलेले असते. असे अन्न वारंवार सेवनात आले तर त्रास होतोच.
  • संस्कार विरुद्ध - संस्कार म्हणजे एखादा पदार्थ गुणात्मक चांगला करण्यासाठी केलेली कृती. उदा. डाळीला फोडणी देऊन केलेले वरण किंवा आमटी, तांदूळ धुवून कुकरमध्ये शिजवुन केलेला भात यासारखे धुणे, वाटणे, घुसळणे व अग्निचे संस्कार आपण रोजचा  स्वयंपाक करताना नेहमीच करतो. पण एकदा तळण झाल्यानंतर उरलेल्या तेलात पुन्हा तळणे(अग्नि संस्कार) ,  काश्याच्या, तांब्याच्या भांड्यात तूप ठेवणे (काल संस्कार) , दही तापवून खाणे (अग्निसंस्कार, जो मुग़लई/पाश्चिमात्य पदार्थ बनवताना सर्रास केला जातो.) , तिच गोष्ट मधाची, मधसुद्धा चुकुनही तापवू नये. कल्हई न दिलेली पितळी भांडी स्वयंपाक करताना वापरु नये. तांब्याच्या भांड्यांत आंबट पदार्थ ठेवू नयेत.
  • हृद विरुद्ध - म्हणजे मनाला न पटणारे. आफ्रिकेमध्ये काही जमाती मुंग्यांची चटणी चवीने खातात, चायनामध्ये कित्येक प्राणी चविष्ट मानले जातात पण जर तेच आपल्या पानात वाढले तर? भाजलेला उंदीर.. पट्टिच्या मांसाहारी व्यक्तीलासुद्धा कल्पना करवणार नाही की काही जमातींमध्ये आलेल्या पाहुण्याचे आदरातिथ्य करण्याची ही पद्धत आहे. ही सगळी हृद विरुद्ध अन्नाची उदाहरणे आहेत. असे न आवडणारे पदार्थ मनाविरुद्ध खायला लागणं म्हणजे हृद विरुद्ध होय.
  • संपद् विरुद्ध - संपद् म्हणजे संपन्नता. आहारीय पदार्थ हे गुणसंपन्न असणे फार गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण अन्नाचे पोषक गुण विचारात घेऊन आहार ठरवतो तेव्हा ताज्या भाजीचे गुण सुकलेल्या भाजीत असतील का याचा विचार करायला हवा. पण नेमका हाच विचार आपण करत नाही. आणि रेडीमेड सूप्सची/नूडल्सची  पाकिटं उचलून आणतो. या भाज्या कुठच्या/कशा आणल्यात, इडलीसाठी तयार पीठ आणताना तो दुकानदार तांदूळ-उडिद कोणत्या प्रतीचे वापरतो याचा याचा विचारही आपण करत नाही.
  • विधि विरुद्ध - विधि म्हणजे अन्नविधि. अन्न कसे, केव्हा ,कुठे ,कधी खावे याबाबत आयुर्वेदात काही नियम दिले आहेत, यालाच ‘अन्नविधि’ असे म्हणतात. अन्न ताजे, स्वच्छ असावे, भूक लागल्यावर, एकाग्रचित्ताने जेवावे, जेवताना खाली मांडी घालून बसावे,अन्न एकदम वाफाळते किंवा अति थंड असू नये. हे असे साधे सोपे नियम मोडून केलेला आहार म्हणजे ‘विधि विरुद्ध’

उपाय -
          आता खरं मुद्दयाचं बोललात डॉक्टर!!! कारण हे सगळं वाचून बऱ्याच जणांना धाप लागली असेल. कित्येक जण हे पदार्थ खातही असतील यामुळे ‘आता काय करायचं/हया!!!काsssssही होत नाही.’ अशा संमिश्र भावना काहींच्या मनात असतील. कारण आहाराचे एवढे नियम म्हणजे आमच्या खाण्यावर उगाच बंधने असे वाटणे शक्य आहे. पण खरं सांगायचे तर जगात सगळ्या ठिकाणी बनणारी पक्वान्ने आपण खरंच खाऊ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पचवू शकत नाही हे कटु असले तरी सत्य आहे. कारण असे विरुद्ध आहारी पदार्थ सतत खाण्यात येत असतील तर होणाऱ्या आजारांची यादी तर एकदा बघा.
ग्रहणीरोग (IBS), पचनासंबंधी आजार, अम्लपित्त, अतिसार, धमनीप्रतिचय (रक्तवाहिनीमध्ये अवरोध) , अपस्मार (आकडी येणे), शिरःशूल,, नपुंसकता (स्त्री व पुरुष दोघांमध्ये) , संतानदोष (वीर्य व स्त्रीबीज दोष) , विसर्प,विस्फोट,किलास,कुष्ठ यासारखे त्वचारोग, उदररोग , पांडुरोग (रक्ताल्पता) , सतत ताप येणे, वारंवार होणारी सर्दी खोकला, अलर्जी चे आजार, श्वास लागणे , सर्वाङ्ग किंवा एका अवयवावर सूज असणे हे सगळे आजार विरुद्ध आहार खाल्ल्याने होतात. मग आता या आजारांचे गाम्भीर्य लक्षात घेता फक्त जिभेचे चोचले किंवा लेटेस्ट स्टाइल म्हणून असा आहार घेत रहाणे कितपत योग्य आहे??
            आता पुढचा प्रश्न लगेच मनात येईल “मग, हे पदार्थ आम्ही कध्धी म्हणजे कध्धीच  खायचेच नाही का? तर याचे उत्तर असे आहे की असे पदार्थ पचण्यासाठी गरजेची आहे ति म्हणजे उत्तम पाचनशक्ति जी काहींना अनुवांशिकतेने मिळते आणि मिळाली किंवा नाही मिळाली तरी सर्वांनाच कमवावी लागते. हे कमवणे कष्ट करुनच होते. याचा अर्थ इथे नियमितपणे केलेले शारीरिक कष्टच अपेक्षित आहेत. सध्याच्या यांत्रिक जगात कमी कष्ट + जास्त खाणं हा जो आपला “लाइफचा फंडा” आहे तो बदलायला हवा. आणि जर कधी अपरिहार्यतेने जर असे पदार्थ खायची वेळ आलीच तर हे पदार्थ अतिशय कमी प्रमाणात खावे. वैद्यकीय सल्ल्याने आमपाचक औषधे घ्यावी. मात्र विरुद्ध आहार सेवनाने जर आधीच  आजार झाले असतील तर मात्र त्यांच्या उपचारार्थ विरोधी क्रिया- पंचकर्म उपचार करून घेणे क्रमप्राप्त आहे.

टीप - विषयाचा आवाका मोठा असल्याने दोन भागांत विषय मांडला तरी विस्तारभयाने आवरते घेताना काही त्रुटि राहू शकतात. त्यामुळे आपल्या काही शंका असल्यास निःसंकोचपणे खाली असलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये विचाराव्यात.

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी २१ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या  https://samanwayayurved.blogspot.in/?m=1 या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)

Thursday, 30 November 2017

विरुद्धाहार ( Incompatible Diet ) भाग १







                 हल्ली दूरचित्रवाणीवरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे कुकिंग शोज.. यांची लोकप्रियता इतकी वाढली आहे की फक्त खाद्यन्तिसारख्या विषयावर कार्यक्रम सादर करणाऱ्या वाहिन्यांचासुद्धा स्वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग तयार होत आहे. अशाच एका कार्यक्रमात मला “तो” दिसला. अगदी फ्रेश ,दिमाखदार…. माझ्यासारख्या जातीच्या खवय्याला त्याची भुरळ पडली नसती तर नवलच. त्याचे नावही बाजूलाच दिमाखात चमकत होते, “अजवायनि पोम्फ्रेत..” (😋😉)  एवढा मोठा, ताजा,फडफडित पापलेट पाहून जीभेला पाणी सुटले नाही तर नवलच!! उत्सुकतेने पाककृती पाहिली तर त्यासाठी शेफनी एका सगळ्यात आधी पापलेटला दहयाचा चक्का लावला,त्यावर मीठ व इतर मसाले लावले , मग हे सगळे फेटलेल्या अंडयामध्ये घोळवले. ही प्रत्येक कृती बघताना माझ्या वैद्यकीय मनाला सुग्रास जेवणात प्रत्येक घासाला खडा यावा तशी खटकत होती. तरीही एखादीच डिश अशी असेल म्हणून दुर्लक्ष केले पण पुढील डिश तर त्यापेक्षा वरचढ होती.. ‘बेकन आईसक्रीम’. आणि ते बनवताना त्यांनी जी सामग्री सांगितली ती ऐकून मी टीव्हीच बंद केला कारण त्यात असणार होते, बेकन (एक प्रकारचे खारवलेले सुके मांस) ,अंडी, मीठ, दूध, क्रीम, मेपल सिरप…. या पदार्थांनी आणि कृतींनि बनलेल्या या दोन्ही पाककृति कितीही चवदार असल्या तरी त्या ‘विरुद्ध आहार’ आहेत. जिभेचे क्षणिक लौल्य पुरवताना आपण करत असलेले हे विरुद्ध आहाराचे सेवन अनेक जीर्ण (Chronic) आजार होण्यासाठी कारणीभूत ठरते.
          आता बरेच जण विचारतील की, डॉक्टर,तुम्ही सारखा हा शब्द वापरत आहात पण हे ‘विरुद्ध’ म्हणजे आहे तरी काय??? कारण आपल्याला विरुद्ध म्हणजे Opposite/ contrast/ reverse असाच अर्थ पटकन आठवतो. इथे हे anti/ adverse या अर्थी पहायला हवे. असो, विषयांतर होण्यपेक्षा  भाषाशास्त्राचा तास इथेच थांबवून आयुर्वेद शास्त्रातील ‘विरुद्ध आहार’ ही संकल्पना आपण समजून घेऊ. तर ‘विरुद्ध आहार’ ही आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. ‘विरुद्ध आहार’ म्हणजे असा आहार ज्या मधील  घटकपदार्थ वेगवेगळे खाल्ले असता कदाचित काही त्रास होणार नाही परंतु जे चुकीच्या पद्धतीने एकत्र करून खाल्ले असता वेगवेगळ्या आजारांना कारणीभूत होतात. आता हेच पहा ना, वर वर्णन केलेल्या पाककृतींमध्ये  दही, अंडी ,मासे , मीठ ,दूध हे पदार्थ वेगवेगळे खाल्ले तर अपायकारक नाहीत पण जर एकत्र करून खाल्ले तर त्यातून तयार होणारा पदार्थ विरुद्धान्न असल्याने त्रासदायक आहे.

आयुर्वेदात सांगितले आहे,
                   “ यत्किंचिद्दोषमुत्क्लेश्य न हरेत् तत् समासतः ।
                     विरुद्धम् इति………”

म्हणजे असा आहार जो सतत सेवन केल्याने कफादि दोषांना अनावश्यक प्रमाणात वाढवतो पण शरीरातून काढून टाकू शकत नाही. त्याला ‘विरुद्ध’ असे समजावे. मग अशा दोषांचे पुढे होते तरी काय? तर हे अनावश्यक वाढलेले दोष शरीरात साचून राहतात आणि विषाप्रमाणे विविध आजारांना निर्माण करतात. (ज्याप्रमाणे एखादे विष शरीरात दीर्घकाळासाठी थोड्या-थोड्या प्रमाणात जात राहीले तर ते तात्काळ मारक होत नाही पण त्याच्या विषाक्ततास्वरूप शरीरात ,कालांतराने घातक ठरणारे, वेगवेगळे आजार जाणवू लागतात - Slow Poisoning).
                  यामागील कारण असे की सतत विरुद्ध आहार खाण्यात आला तर त्यामुळे ‘आमनिर्मिती’ होते. ‘आम’ म्हणजे काय हा खरतर एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. त्यामुळे त्याविषयी आपण नन्तर सविस्तर पाहू पण सध्या हे समजणे पुरेसे आहे की ‘आम’ म्हणजे ‘अपाचित, अपायकारक  आहाररस.’ त्यामुळे ही क्रिया दीर्घकाळ सुरु राहिली तर शरीरात साचणाऱ्या आणि सतत निर्माण होत राहणाऱ्या या आमदोषामुळे वेगवेगळे जीर्ण, कष्टसाध्य व्याधी होतात. उदा. अपचन, मलावरोध, अम्लपित्त यासारख्या वरवर साध्या वाटणाऱ्या पण प्रत्यक्षात गंभीर अशा आजारांपासून थेट त्वचारोग, वाढलेले कॉलेस्टेरोल किंवा अगदी हृदयरोगापर्यंत आजाराचे मूळ सतत/दीर्घकाळासाठी केल्या जाणाऱ्या विरुद्धाहार सेवनाच्या सवयीत दिसते. सध्याच्या काळात याचे मूळ बदलत्या खाद्य शैलीमध्येसुद्धा आहे.  आपण सगळेजण जाणता- अजाणता थोड्याफार प्रमाणात विरुद्धाहार सेवन करतच असतो. त्यामुळे आता आपण कोणते अन्नपदार्थ व का विरुद्धाहार आहेत ते पाहूयात,
  • संयोग विरुद्ध - संयोग म्हणजे एकत्र करणे. जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र करून एखादी पाककृति तयार केली जाते तेव्हा त्याला संयोग असे म्हणतात. या तयार होणाऱ्या पदार्थात काही असे चुकीच्या पद्धतीने पदार्थ मिश्रित केल्यास त्याला ‘संयोग विरुद्ध’ असे म्हणतात. जसे की, लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या उदाहरणांमध्ये दही-मासे, दही-अंडी, मांस(बेकन)- दूध, मांस-क्रीम, मांस-अंडी, दूध-अंडी हे संयोग विरुद्ध आहाराचे उदाहरण आहे. अजून काही उदाहरणे पुढीलप्रमाणे
  1. आनूप मांस (अधिक पाण्यातील, दलदलीच्या प्रदेशात , किनारी भागात पोसल्या गेलेल्या प्राण्यांचे मांस,मासे) हे उडिद, मध,मोड आलेले धान्य, कमलनाल, मूळा ,गुळ याबरोबर खाऊ नये.
  2. दूध व मीठ एकत्र खाऊ नये. (दूधात मिठाचा खडा पडणे हा वाक्प्रचार आपल्याला माहित असतो आणि म्हणजे काय होते तेसुद्धा माहित असते पण पास्ताचा व्हाइट सॉस बनवताना मात्र आपण ते विसरतो.)
  3. दूध व मासे अजिबातच खाऊ नयेत
  4. दूध आंबट पदार्थ तसेच फळे यांच्या बरोबर खायचे नसते.(म्हणजे फ्रूट सलाड, फ्रूट मिल्कशेक्स यांना कायमचे टाटा-बाय , अपवाद फक्त नैसर्गिकरित्या पिकलेल्या गोड चवीचा आंबा, जो दूधासोबत खाता येतो.) शिकरण खाणाऱ्या सर्वांनी याचा विचार करायला हवा.
  5. दही व कोंबडयाचे मांस एकत्र खाऊ नये (मुग़लई डिशेस)
  6. मोड आलेले धान्य व कमलनाल खाऊ नये.
  7. ताक , दही किंवा ताडगोळा यांच्या बरोबर केळी खाऊ नये.
  8. मध,तूप,तेल वसा व पाणी यापैकी कोणतेही दोन तीन,चार किंवा पाचही पदार्थ एकत्र करताना समान प्रमाणात एकत्र करून खाऊ नयेत.
  9. एखादे औषध मध-तूपासोबत घ्यायला सांगितले असेल तर मध-तूप समान मात्रेत न घेता विषम प्रमाणात घ्यावे.
  10. उडदाच्या वरण/सूपासोबत गुळ, दूध, दही,मूळा खाऊ नये. (मराठी पाककृतींमध्ये उडिद याप्रकारे वापरले जात नसावे पण ‘मां की दाल’, ‘दाल मखनी’ , ‘काली दाल’ या पूर्णपणे उडिदापासून बनवलेले पदार्थ आहेत.तसेच दाल तड़का , दाल फ्राय या पाककृतींमध्येही उडिद असते.

(क्रमशः)

टीप - पुढील भागात वाचा विरुद्ध आहाराचे इतर प्रकार, विरुद्ध आहार सेवन केल्याने होणारे आजार, त्यांची चिकित्सा व विरुद्ध आहार कसा कमी करावा याविषयी उपाय.



(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०१ डीसेंबर २०१७ रोजी आपल्या http://samanwayayurved.blogspot.com या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)