Thursday, 2 August 2018

प्रेमस्वरूप आई .... वात्सल्यरूप आई....... - भाग २











  • बाळ शक्यतो आईच्या कुशीत असावे , जेणेकरून बाळाची शी-शू , भूक ,झोपेच्या वेळा व इतर खाई गरजा आईच्या नीट लक्षात येतात . आवश्यकता असल्यास तात्काळ तज्ज्ञांची मदत मागता येते. तसेच  बाळ सतत आईच्या जवळ असेल तर दोघांमध्ये वात्सल्यबंध तयार होतो व आईला पान्हा फुटण्यास मदत होते .
  • प्रसूतिगृहातून घरी जाण्यापूर्वी स्तनपानाची शास्त्रशुद्ध पद्धत डॉक्टर्स/प्रशिक्षित नर्सेस / lactation consultants कडून नीट शिकून घ्यावी . बाळाला नीट दूध मिळावे यासाठी स्तनाग्र (nipple )  व बाजूचा काळा भाग (aerola ) अधिकाधिक बाळाच्या तोंडात असायला हवा ,तसेच बसण्याची स्थिती , बाळाला पकडण्याची पद्धत याचे नीट प्रात्यक्षिक शिकून घ्यावे.
  • स्तनपानाचा  कालावधी व वारंवारता - स्तनपानाच्या कालावधी व वारंवारता हे  प्रत्येक बाळासाठी वेगवेगळे असतात . त्यामुळे दुसरे बाळ दिवसातून १२ वेळा पिते आणि माझे बाळ ६च वेळा का पिते हा निकष लावू नये. बाळाचे पोट नीट भरते आहे कि नाही याचे निकष वेगळे असतात ते आपण पुढे पाहू. बाळाला जेव्हा भूक लागेल तेव्हा स्तनपान करणे गरजेचे  आहे , यालाच डिमांड फीडिंग (बाळ मागेल तेव्हा) असे म्हणतात . रात्रीसुद्धा स्तनपान करता येते. झोपलेल्या स्थितीतही स्तनपान करता येते. फक्त त्या स्थितीत आईला झोप लागणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच स्तनाचे वजन बाळाच्या नका-तोंडावर येणार नाही असे पाहावे.
  • मातृस्तन्याचे घटक - बाळ स्तनपान करत असताना त्याच्या गरजेप्रमाणे स्तन्यात (घटकद्रव्यांत) थोडा बदल होतो. म्हणजे मुदतपूर्व प्रसूती झाली असेल तर आईच्या दुधातील घटक बाळाच्या गरजे प्रमाणे बदलतात. तसेच पूर्ण दिवस भरल्यानन्तर प्रसूती झाली तरी सामान्य बाळाला दूध पाजतानाही सुरुवातीचे दूध (foremilk)  थोडे पातळ असते कारण त्यात स्निग्धांश थोडा कमी असतो आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते . हे दूध बाळाची तहान भागवण्यास मदत करते. जसे स्तनपान होत जाते तसा स्निग्धांश वाढत जातो व तसतशी या दूधाची  घनता वाढते. याला Hindmilk असे म्हणतात . हे दूध बाळाची भूक भागवते. त्यामुळे बाळाला पाजताना एकाच बाजूने संपूर्ण पाजावे आणि एका बाजूने दूध येणे बंद झाले कि मग दुसऱ्या बाजूने दूध द्यावे. म्हणजे बाळाचे पोट भरते. जर दोन्ही बाजूचे दूध थोडे थोडे दिले गेले तर बाळाचे पोट भरल्यासारखे वाटते पण त्यातील जास्तीच्या द्रवांशामुळे बाळाला परत लगेच भूक लागते .
  • आई ऑफिसला जात असल्यास - आईने किमान ४ महिने बाळाला अंगावर पाजलेच पाहिजे. खरेतर आदर्शरित्या हा काळ ६ महिन्यांचा आहे म्हणूनच हल्ली मातेला ६ महिने प्रसूती रजा  मिळावी अशी कायद्याने तरतूद आहे .तिचा अधिकाधिक लाभ घ्यावा. पण काही कारणाने हे शक्य होत नसेल तर आईने स्वतःचे दूध काढून साठवण्याची पद्धत शिकून घ्यावी. हे हाताने किंवा breastpump सारख्या यंत्रद्वारे शक्य आहे. ते निर्जंतुकरित्या साठवावे . असे साठवलेले दूध बाहेर ६ तास, फ्रीजमध्ये १ दिवस व फ्रीजर मध्ये १ आठवड्यापर्यंत चान्गले राहते असे नवीन संशोधन सांगते. हे दूध बाळाला देतात कोमट पाण्यात ठेवून (गॅसवर गरम करू नये.) सामान्य तापमानाला आणून बाळाला देता येते . (प्रस्तुत लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत आणि आयुर्वेदानुसार कोणतेही अन्न  इतके दिवस ठेवून सेवन करू नये. पण अडचणीच्या वेळी तसेच बाळ झोपले असताना दूध गळत असल्यास ते काढून ठेवून लवकरात लवकर किंवा दिवसभरात संपवता येईल. )
  • तसेच कोणतेही वरचे दूध मग ते गाईचे असो वा  म्हशीचे किंवा कोणत्याही प्रकारचे तयार इन्फन्ट फॉर्म्युले हे आईच्या दूधासाठी समर्पक पर्याय असू शकत नाहीत त्यामुळे आईला पुरेसे दूध येत असेल तर बाळाला हे पर्यायी दूध देऊ नये. त्याऐवजी आधी सांगितल्याप्रमाणे आईचे दूध साठवता येईल.

(क्रमशः )


संदर्भ : ब्रेस्टफीडिंग प्रमोशन नेटवर्क, इंडिया.
        टेक्स्टबूक ऑफ ऑब्स्ट्रेटिक्स
चित्रसंदर्भ : वर्ल्ड अलायन्स ऑफ ब्रेस्टफीडिंग ऍक्शन वेबसाइट.

No comments:

Post a Comment