Thursday, 22 October 2015

नवरंग , नवरात्राचे…… स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग 3)

     नवरंग , नवरात्राचे…… स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग 3)




७                            गर्भिणी (Pregnant Women) गरोदरपणाचा काळ खूप महत्वाचा असतो.या अवस्थेत स्त्रीने स्वतःची व पोटातल्या बाळाची काळजी घेणे गरजेचे असते.या काळात जर आईला अपुरे पोषण मिळाले तर गर्भाला त्रास होतोच.पण आईलासुद्धा पोषण कमी मिळते ज्यामुळे तिच्या शरीराची सुद्धा हानी होते.याचा परिणाम म्हणून अकाली प्रसव,गरोदरपणातील रक्तस्राव या व अशा अनेक गुंतागुंतीचे त्रास दिसतात ज्यामुळे माता व बालमृत्युच्या घटना दिसतात.
हे होऊ नये म्हणून आईने षड्रसात्म क ,चौरस आहार घ्यावा.आवश्यक प्रथिनांचे योग्य प्रमाणात सेवन करावे.लोह Calcium व Folic Acid चे नियमित सेवन करावे.मातेची मानसिक स्थिति आनंदी असावी यासाठी स्वतः आई व घरातील इतर सदस्यांनी काळजी घ्यावी.यासाठी ध्यानधारणा,योगासने,स्नेहाभ्यंग यासरखे उपाय करावेत.

८.                     चिंता (Sterss ) - घर - मुले- काम यांचा सुवर्णमध्य साधताना स्त्रियांची मोठ्या प्रमाणावर दमछाक होत असते.त्यामुळे स्त्रिया/गृहिणींना मोठ्या प्रमाणावर ताण-तणावांना सामोरे जावे लागते. 
                       हे तणाव वेळीच ओळखून ते मुळापासून दूर करणे गरजेचे आहे. घरच्यांशी किवा जवळच्या मित्र-मैत्रिणींशी याबाबत बोलता येईल. यासाठी स्वतःला आवर्जून वेळ द्या. ग़रज वाटली तर ब्रेक घ्या . आवडीचे छंद जोपासा. छंद तुमच्या आयुष्याला एक वेगळीच आनंदी दिशा देतील. जीवनातील आनंद अधिक जाणवू लागेल. (फक्त TV Serials बघणे किवा gossip column वाचणे ,कुचाळक्या करणे असे छंद असू नयेत,)  समस्या गंभीर वाटत असेल तर तज्ञ सायकोलोजिस्ट शी सुद्धा बोलावे. 
                     ताणमुक्त जीवन हा आयुष्याचा भाग असू दे,  Antidepressants किंवा झोप येण्याच्या गोळ्या नाही. 

९.                स्त्रीच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा  टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती (Menopause ) -
 टप्प्यावर मासिकपाळी हळूहळू बंद होऊ लागते . त्यामुळे शरीरातील संप्रेरकांची (Hormones) ची पातळी बदलते. बेचैनी , उष्णता वाढणे (Hot  Flushes ) अंग दुखणे, भावनाप्रधान वागणूक (Mood Swings ) दिसून येतात . काही स्त्रियांना महिनोंमहिने पाळी न येणे किंवा भरपूर रक्तस्राव होणे यासारखे त्रास होतात .
                  त्यातच हे वय येईपर्यंत मुले मोठी झालेली असतात . त्यामुळे Generation Gap , Empty Nest Syndrome (मुले शिक्षण-नोकरीसाठी इतर शहरात किंवा देशात स्थायिक होतात) अशा गोष्टींचीसुद्धा भर पडते. स्त्रियांना आयुष्यात वेगवेगळ्या आघाडीवर होत असलेले हे मोठ्या प्रमाणातील बदल अस्वस्थ करतात. आपल्याला होणारा त्रास समजून घेणे, तो नेमक्या शब्दात व्यक्त करणे आणि या त्रासाचे उपाय शोधणे जमतेच असे नाही.
                  त्यामुळे Menopause जवळ आल्याचे जाणवले की  वैद्यकीय सल्ल्याने वात-पित्तशामक चिकित्सा घ्यावी. 
दक्षिणात्य अभिनेत्री व दिग्दर्शक रेवती हिचा  Mitra -My   Friend नावाचा या नावाचा एक सुंदर सिनेमा  आहे.
या मध्ये घर न  मुली मध्ये रमलेली  स्त्री मुलगी मोठी होत असताना जीवनात येणारे बदल स्वीकारून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्त्व आवडी-निवडी यांची निवड कशी करते हे खूप सुंदररीत्या दाखवले आहे.
                   आपल्यालाही जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर अशा मित्राची-खंबीर आधाराची गरज असते. पण स्वतः स्वतःचे मित्र होणे हे जास्त गरजेचे आहे. स्वतःचे प्रश्न ओळखून ते सोडवणे गरजेच्जे असते.
                    म्हणून या नवरात्रीच्या निमित्ताने तुमच्यातील स्त्रीशक्तिलासुद्धा बळ  मिळो  ही  देवीच्या चरणी प्रार्थना.
                                                     ।।   शुभं  भवतु ।।

Wednesday, 21 October 2015

नवरंग , नवरात्राचे…… स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग २)

        नवरंग , नवरात्राचे…… स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग २)



     4.           संधिवात  - पूर्वी साठीच्या वयात दिसणारा संधिवाताचा आजार हल्ली चोरपावलांनी चाळीशीच्या आसपास दिसू लागला आहे.वाढणारे वय,कामाची दगदग,व्यायामाचा अभाव,अपुरे पोषण यामुळे वात दोष वाढतो व शरीरातील सांध्यांची झीज होते. 
              वेदनाशामक (painkillers) च्या गोळ्या किंवा मलम,Calcium च्या गोळ्या खाणे हे तात्पुरते ठरते मात्र हा कायम स्वरूपी इलाज नाही.शेवटी Knee Replacementसाठी अस्थिरोगविशारदाची (Orthopedic Surgeonची  पायरी चढावी लागते. 
               त्याऐवजी आहारात दूध,बदाम,नाचणी,तीळ,हिरव्या पालेभाज्य असाव्यात.वजनावर ताबा ठेवावा.आवश्यकता असल्यास वैद्यांच्या सल्ल्याने स्नेहन-स्वेदन,बस्तिक्रमासारखे उपाय करता येतील. Menopause च्या नंतर वातशामक आहार-विहार आणि औषधे वापरता येतील . 

5.           अंगावरून पांढरे जाणे(Leucorrhea) -
           या आजाराची बऱ्याचदा लज्जेस्तव चर्चा केली जात नाही.पण याचे गांभीर्य खूप जास्त आहे. अंगावरून पांढरे-पिवळे पाणी किंवा घट्ट स्त्राव जात असेल,योनिमार्गात घाण  वास, खाज किंवा पुरळ येत असेल तर वैद्यांचा सल्ला घ्यावा. स्त्री विवाहित असेल तर पति-पत्नी दोघांनाही औषध घेण्याची गरज असते. 
               तसेच योनीमार्ग आणि जननांगे स्वच्छ ठेवावी.  अन्तर्वस्त्रे स्वच्छ,फिक्या रंगाची,सुति आणि पूर्णपणे सुकलेली असावीत.अतिघट्ट किंवा दमट वस्त्रे हा त्रास वाढण्यास कारणीभूत असतात. 

6.          व्यायाम - नियमित व्यायाम करणे हे अत्यावश्यक आहे.व्यायामामुळे शरीर लवाचिक बनते.उत्साह वाढतो.त्यामुळे शरीर आणि मनाचीसुद्धा ताण सहन करण्याची ताकद वाढते.
             व्यायाम करण्यासाठी सकाळी चालायला जाणे , Warm -Up ,योगासने ,Cardio Exercise यांचा क्षमतेनुसार वापर करावा 

(क्रमशः )

Tuesday, 20 October 2015

नवरंग , नवरात्राचे…… स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग १)

 नवरंग , नवरात्राचे……  स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग १)





 

                               नवरात्र हा जागर आहे स्त्री शक्तिचा.आदिशक्तिने महिषासुराशी नऊ दिवस घनघोर युध्द करून विजय  मिळवला.या स्त्री शक्तीचा सन्मान आपण नवरात्रा मध्ये देवीची स्तुती करून करत असतो.पण हे करताना घरातली कर्ती स्त्री मात्र दुर्लक्षितच असते. किंबहुना सर्वांच्या गरजांकडे लक्ष देणारी,घरचे आवरून ऑफिसला पळणाऱ्या,वाण सामान आणताना कुशलतेने घरचे बजट पण सांभाळणाऱ्या,मुलांचे अभ्यास परीक्षा,वडीलधाऱ्याच्या गरजा,पाहुणे-रावळे,सणवार सांभाळणारी स्त्री रोज घरात अष्टावधानी योद्धयाप्रमाणे सर्व आघाड्यांवर तोंड देत असते.हे करताना बऱ्याचदा तिला स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो.हे वाचत असतानाही आपल्यातील महिला होकाराच्या माना डोलावत असतील. 
             एवढी तारेवरची कसरत कुशलतेने करायची असेल तर स्त्रीला स्वतःचे आरोग्य जपलेच पाहिजे, आपले शक्तिस्वरूप टिकवलेच पाहिजे म्हणूनच नवरात्राच्या निमित्ताने 'स्त्री आरोग्याच्या' या नऊ टिप्स. 
  1. मुलीच्या जन्मापासूनच तिला योग्य आचार-विचार संस्कार देऊन एक समर्थ व्यक्ती म्हणून वाढविण्याचा निश्चय करावा. 
    आजच्या बालिका हे उद्याचे खंबीर आधारस्तम्भ आहेत हे समजून घेऊन त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचीसुद्धा  काळजी घ्यावी. या साठी योग्य आहार,व्यायाम,योगासने,ध्यानधारणा यांचा वापर करता येईल. (हा मुद्दा फक्त मुलीच नाही तर सर्वच लहान मुलांच्या बाबतीत लागू आहे.)
  2. स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे मासिकपाळीचे दिवस. या काळात शक्य तितकी विश्रांती घ्यावी.सकस आहार घ्यावा.शारीरिक -मानसिक ताण-तणाव टाळले पाहिजेत.
                हल्ली मासिकपाळीच्या तक्रारी वाढत आहेत.अनियमित पाळी,अंगावरून एकदम कमी किंवा एकदम जास्त जाणे,पाळीच्या वेळेस वेदना,पाळी न येणे हे सर्रास दिसून येते. अशा सर्व तक्रारींचे मूळ हल्लीच्या बदललेल्या जीवनशैली आणि आहारात आहे. त्यामुळे मासिकपाळीच्या त्रासाकडे कडे दुर्लक्ष करू नका.वेळीच वैद्यांचा सल्ला घ्या. 
  3. शिळे अन्न - उरलेले/शिळे अन्न संपवणे ही फक्त आईची जबाबदारी आहे असा अलिखित नियम आहे कि काय असे वाटावे इतक्या मोठ्या प्रमाणात शिळे जेवण स्त्रीया खात असतात .'कमी नको बाई पडायला,सगळ्यांना  पोटभर जेऊ दे ' म्हणून जेवण थोडे जास्तच बनवले जाते आणि मग उरलेले  दुसऱ्या दिवशी आईच संपवते.
    शिळे अन्न हे अम्लपित्त(Hyperacidity) चा आजार निर्माण करते.परत त्यात पोषणमूल्येही फारच कमी उरलेली असतात.मग असे अन्न टाळलेलेच बरे,हो नं?
    यासाठी मोजून-मापून अन्न शिजवावे.घरातील सर्वांनी  आपण किती जेवणार आहोत/घरी जेवणार नाही याचा अंदाज आईला द्यावा. तरीही अन्न उरले तर सर्वांनी मिळून थोडे थोडे संपवावे.
    आपल्या आई/आजी/बायको/ताईसाठी आपण हे एवढे तर करुच शकतो नं? 
(क्रमशः)