Tuesday, 20 October 2015

नवरंग , नवरात्राचे…… स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग १)

 नवरंग , नवरात्राचे……  स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग १)





 

                               नवरात्र हा जागर आहे स्त्री शक्तिचा.आदिशक्तिने महिषासुराशी नऊ दिवस घनघोर युध्द करून विजय  मिळवला.या स्त्री शक्तीचा सन्मान आपण नवरात्रा मध्ये देवीची स्तुती करून करत असतो.पण हे करताना घरातली कर्ती स्त्री मात्र दुर्लक्षितच असते. किंबहुना सर्वांच्या गरजांकडे लक्ष देणारी,घरचे आवरून ऑफिसला पळणाऱ्या,वाण सामान आणताना कुशलतेने घरचे बजट पण सांभाळणाऱ्या,मुलांचे अभ्यास परीक्षा,वडीलधाऱ्याच्या गरजा,पाहुणे-रावळे,सणवार सांभाळणारी स्त्री रोज घरात अष्टावधानी योद्धयाप्रमाणे सर्व आघाड्यांवर तोंड देत असते.हे करताना बऱ्याचदा तिला स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो.हे वाचत असतानाही आपल्यातील महिला होकाराच्या माना डोलावत असतील. 
             एवढी तारेवरची कसरत कुशलतेने करायची असेल तर स्त्रीला स्वतःचे आरोग्य जपलेच पाहिजे, आपले शक्तिस्वरूप टिकवलेच पाहिजे म्हणूनच नवरात्राच्या निमित्ताने 'स्त्री आरोग्याच्या' या नऊ टिप्स. 
  1. मुलीच्या जन्मापासूनच तिला योग्य आचार-विचार संस्कार देऊन एक समर्थ व्यक्ती म्हणून वाढविण्याचा निश्चय करावा. 
    आजच्या बालिका हे उद्याचे खंबीर आधारस्तम्भ आहेत हे समजून घेऊन त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचीसुद्धा  काळजी घ्यावी. या साठी योग्य आहार,व्यायाम,योगासने,ध्यानधारणा यांचा वापर करता येईल. (हा मुद्दा फक्त मुलीच नाही तर सर्वच लहान मुलांच्या बाबतीत लागू आहे.)
  2. स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे मासिकपाळीचे दिवस. या काळात शक्य तितकी विश्रांती घ्यावी.सकस आहार घ्यावा.शारीरिक -मानसिक ताण-तणाव टाळले पाहिजेत.
                हल्ली मासिकपाळीच्या तक्रारी वाढत आहेत.अनियमित पाळी,अंगावरून एकदम कमी किंवा एकदम जास्त जाणे,पाळीच्या वेळेस वेदना,पाळी न येणे हे सर्रास दिसून येते. अशा सर्व तक्रारींचे मूळ हल्लीच्या बदललेल्या जीवनशैली आणि आहारात आहे. त्यामुळे मासिकपाळीच्या त्रासाकडे कडे दुर्लक्ष करू नका.वेळीच वैद्यांचा सल्ला घ्या. 
  3. शिळे अन्न - उरलेले/शिळे अन्न संपवणे ही फक्त आईची जबाबदारी आहे असा अलिखित नियम आहे कि काय असे वाटावे इतक्या मोठ्या प्रमाणात शिळे जेवण स्त्रीया खात असतात .'कमी नको बाई पडायला,सगळ्यांना  पोटभर जेऊ दे ' म्हणून जेवण थोडे जास्तच बनवले जाते आणि मग उरलेले  दुसऱ्या दिवशी आईच संपवते.
    शिळे अन्न हे अम्लपित्त(Hyperacidity) चा आजार निर्माण करते.परत त्यात पोषणमूल्येही फारच कमी उरलेली असतात.मग असे अन्न टाळलेलेच बरे,हो नं?
    यासाठी मोजून-मापून अन्न शिजवावे.घरातील सर्वांनी  आपण किती जेवणार आहोत/घरी जेवणार नाही याचा अंदाज आईला द्यावा. तरीही अन्न उरले तर सर्वांनी मिळून थोडे थोडे संपवावे.
    आपल्या आई/आजी/बायको/ताईसाठी आपण हे एवढे तर करुच शकतो नं? 
(क्रमशः)

No comments:

Post a Comment