Tuesday, 11 October 2016

नऊ रंग नवरात्राचे.. स्त्री शक्तीचे.. आरोग्याचे... लेखमाला भाग ४


महिन्यातील “ते” दिवस लेखमाला - लेख ४था
रजोनिवृत्ती जवळ येताना……..



               साधारणतः वयाच्या ३६ ते ५० वर्षांच्या काळात स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती जवळ येत असल्याची लक्षणे दिसतात. प्रकृती ,देश,कार्यस्वरुप यानुसार स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या वयाचा फरक दिसून येतो. या काळात स्त्रीबीज निर्मितीचे कार्य मंदावते पण पूर्णपणे थांबलेले नसते.त्यामुळे अधून-मधून नियमित किंवा अनियमितपणे रजःस्राव होतो. काही स्त्रियांमध्ये हा काळ (Premenopausal stage) काही महिन्यांचा असतो तर काही स्त्रियांमध्ये तो काही वर्षांपर्यंत लांबतो.

 रजोनिवृत्ती जवळ येण्याची लक्षणे -
             सामान्यतः रजोनिवृत्तीची लक्षणे सुरुवातीला सौम्य स्वरूपात दिसतात व हळूहळू त्यांची तीव्रता वाढत जाते. Hot flushes (अचानक उष्णतेची जाणीव होऊन परत सामान्य वाटणे),भावनाप्रधानता ,क्वचित हातापायांवर सूज येणे,ओटी-पोटात वेदना,पायात पेटके येणे,डोकेदुखी, स्थौल्य किंवा शरीरात जडपणा वाटणे.
             तसेच या काळात शरीरात स्त्रीबीज निर्माती मंदावत असते त्यामुळे कधीतरी अचानक रजःस्राव होतो.हा स्राव कधी नियमित चक्रपेक्षा कमी किंवा अचानक जास्त, कधी एखाद दिवस तर कधी आठवाड्यापेक्षा जास्त असा अनपेक्षित होऊ लागतो.स्त्रीचे नियमित चक्र बदलू लागते. मग कधी पाळी एखाद महिना येतंच नाही असे चक्र हळूहळू लांबत जाते आणि दोन चक्रांमधील अंतर वाढत जाते. या काळात पहाटे hot flushes आणि रात्री अचानक घाम फुटणे किंवा अचानक झोप कमी होणे हे तीव्रतेने दिसते.भावनाप्रधानता वाढते. असे दोन पाळीमधील अंतर वाढत जाऊन पूर्णपणे बंद होते.
Premenopausal period मध्ये वात दोषाचा स्वाभाविक प्रकोप होत असल्याने रजोनिवृत्तीची लक्षणे सौम्य प्रमाणात दिसतात. ती वेळीच ओळखून त्या प्रमाणे उपाययोजना करावी आणि नकोशा वाटणाऱ्या रजोनिवृत्तीचा स्वीकार करण्याची तयारी सुरु करावी.

वैद्यकीय सल्ला - पुढील परिस्थितीत वैद्यकीय सल्ला घ्यावा.
  1. जर रजःस्राव अतिप्रमाणात असेल
  2. रजःस्रावाद्वारे रक्ताच्या गाठी पडत असतील
  3. नेहमीपेक्षा जास्त काळ लांबल्यास
  4. समागम झाल्यावर रक्तस्राव झाल्यास.
  5. आधी वर्णन केलेली लक्षणे तीव्र स्वरूपात असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
  6. तसेच या काळातही पुरेशी काळजी न घेतल्यास गर्भधारणा होऊ शकते. 

क्रमशः

पुढील विषय - रजोनिवृत्तीचे दिवस आणि कुटुंब।                 

No comments:

Post a Comment