महिन्यातील "ते" दिवस.
स्त्री प्रजनन संस्थेची रचना समजून घेतल्यावर आपण मासिक पाळीचे स्वरूप समजून घेऊ.
स्त्री च्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे किशोरावस्था. वयात येण्याची ही सुरुवात असते. या काळात शरीरात मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक बदल घडून येत असतात आणि मासिक पाळीची सुरुवात हा यातील खूप मोठा भाग असतो. या वयात मुलींच्या मनात भीती, लाज , कुतुहूल यासारख्या भावनांची सरमिसळ असते. यामुळे मनाची चलबिचल होते. याचा परिणाम म्हणून चिडचिड, बेफिकीर वृत्ती, नाराजी (मुलींनाच का हा असला ताप? ) अशी वृत्ती दिसून येते.आपल्या गुणी मुलींमधला बदल बघून पालक चिंतीत होतात.प्रसंगी भांडणेही होतात. पण अशा वेळी पालकांनी मुलीला समजून घ्यावे. मासिक पाळी विषयी शास्त्रीय माहिती द्यावी.या काळात शरीर- मनाची काळजी घेणे.भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे हे शिकवावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मासिक पाळी हा कोणत्याही प्रकारचा आजार किंवा न्यूनगंड वाटण्याचा प्रकार नसून ती एक आनंददायी नियमित शरीरस्थिती आहे हे समजवावे. हल्ली पाळी सुरु होण्याचे वय १२ ते १५ वर्षांवरून कमी होऊन ८- १२ वर्षांवर आले आहे. अशा वेळी या लहान मुलींना समजून घेण्याची तर जास्त गरज असते.
आयुर्वेदात सांगितले आहे की या काळात शरीरात वात दोष वाढलेला असतो, ज्यामुळे शरीरातील रजःचा स्राव होऊन शरीर शुद्ध होते.
म्हणून या पाळीच्या दिवसांत वेगळ्या प्रकारची दिनचर्या सांगितली आहे. त्यानुसार रजःस्वलेने वेगळया ख़ोलीत जाऊन रहावे… स्वयंपाक किंवा इतर कामेही करु नये, विश्रांती घ्यावी..... कोणत्याही प्रकारचा साज-शृंगार करु नये….. इतरांच्या स्वयंपाकातील अन्न खाऊ नये,हाताच्या ओंजळीत अन्न घेऊन खावे… वेगळया ताटात जेवावे.... चटईवर झोपावे… समागम करु नये… स्नान (😱 ) करु नये आणि चौथ्या दिवशी अंघोळ करुन मग पुन्हा घरात यावे....
हे वाचल्यावर पहिली संतापलेली प्रतिक्रिया येईल ती म्हणजे “यांचं डोकं तरी ठिकाणावर आहे का?अरे माणूस चंद्रावर चालला आणि हे निघाले बायकांना घराबाहेर बसवायला.” पण जरा थांबा !!! आयुर्वेदाच्या नावाने निषेधाच्या घोषणा देण्याआधी थोडं पुढे वाचा…
का बरं असं सांगितलं असेल याचा विचार तरी करून बघा.
- रजःस्वलेने वेगळ्या ठिकाणी राहणे आणि घरकाम न करणे हे तिच्या विश्रांतीसाठी सांगितले आहे.या काळात रजः निघून जावे या साठी शरीरात वात दोष वाढलेला असतो अश्या वेळी श्रमाची कामे केली तर वातप्रकोप होईल आणि उत्सर्जन-गर्भाशय शोधन कार्य नीट होणार नाही.
- साज-शृंगार हा सुंदर दिसण्यासाठी केला जातो ज्यामुळे शुक्र प्रीती, लालसा वाढते पण या काळात ब्रह्मचर्य पाळायचे आहे.
- पाळीच्या दिवसात समागम करु नये कारण मग रजःस्रावाला अडथळा निर्माण होईल आणि गर्भाशयशुद्धी होणार नाही.
- या काळात अग्नि म्हणजेच पाचनशक्ति मंद झालेली असते म्हणून रजःस्वलेने हाताच्या ओंजळीत मावेल इतके अन्न खावे.(यामुळे अन्न कमी खाल्ले जाईल) तसेच कोठ्याची शुद्धी करणारे ,पचायला हलके पदार्थ खावे.इतरांसाठी बनवलेला ,हॉटेलमधला पचायला जड असा नेहमीचा आहार घेतला तर तो त्रासदायक ठरेल. आम उत्पन्न करणारा असेल.
- चटईवर झोपावे कारण गादीवर झोपणे सुखदायी असते,ते कफ वाढवते ज्यामुळे रजःस्रावाला अडथळा होऊ शकतो.
- स्नान करताना गरम पाणी वापरले तरीही पाण्याचा मूळ स्वभाव शीत आहे जो कफकर आहे.पण याचा अर्थ असा अजिबात नाही की स्थानिक स्वच्छता करू नये.ती तर अत्यावश्यक आहे.
- तर हे आहेत खरे नियम पण कालौघात स्त्रियांना बंधनात अडकवण्यासाठी यांचा दुरुपयोग केला गेला.स्त्रियांनाही यापुढे मान तुकवली आणि त्यामुळे या नियमांचे शास्त्रीय स्वरूप लांबच राहिले आणि बायकांच्या आरोग्याला घातक ठरणारे विकृत स्वरूप आले.
त्यामुळे पालकांनी हे नियम समजून आपल्या मुलींनाही समजवावे आणि त्यांचे शक्य तितके पालन करण्याचा प्रयत्न करावा. कारण हल्ली स्त्रिया-मुलींना अल्ट्रा थिन सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे “स्वच्छंद-बेधुंद जगत” “न थांबता, न डगमगता,पुढे पुढे धावत” राहण्याची ओढ वाटते. अशा वेळी हे नियम कालबाह्य,जाचक आणि स्त्री स्वातंत्र्यावर गदा आणणारे वाटतात.पण अनियमित पाळी, अंगावरुन जास्त/कमी स्राव जाणे, पाळीच्या असह्य होणाऱ्या वेदना, डोकेदुखी तसेच Polycystic ovarian disease, Uterine fibroids, Infertility या पाळीशी संबंधित आजारांचे सध्या वाढलेले प्रमाण पाहता मुलींनी राहणीमानात बदल करणे आवश्यक वाटू लागले आहे.
(क्रमशः)
टीप - परवाचा विषय तरुणावस्थेतील मासिक पाळी
स्त्रियांच्या विश्रांतीकरता ते नियम आहेत हे माहीत आहे. पण आजच्या काळात कोणते किती प्रमाणात पाळायचे हे जिचं तिने ठरवावं असं मला वाटतं.
ReplyDeleteमाझ्या काही तरुण मैत्रिणींना पाळीच्या वेळच्या वेदनांचा खूप त्रास होतो त्यामुळे काही अंशी या गोष्टी पाळल्या जातात. पण धार्मिक बाबतीत खूप गैरसमजूती अजून पाळल्या जातात व मुलींवर बंधनं येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कित्येक मुलींचे शिक्षण (आजच्या काळात कमी प्रमाणात) आणि खेळ बंदच होऊ शकतात.
तरीही लेखातील तत्वांना प्रसिद्धि मिळून सत्य लोकांना कळलं पाहिजे. जेणेकरुन आरोग्य चांगले होण्यास मदत होईल.
खरं सांगायचं तर पूर्वी सांगितलेले हे सर्व नियम अतिशय योग्य आहेत. मागील काही काळात शुचितेच्या नियमांचे अवडंबर माजविल्यामुळे त्यामागील सुद्धा हेतू हरवला आणि उलट मोठ्या प्रमाणावर अस्वच्छतेचे आजार,मानसिक कुचंबणा स्त्रियांना सहन करावी लागली. पण आता जसजशी परिस्थिती बदलली तसतसा परिस्थितीचा लंबक दुसऱ्या टोकाला जाऊन पीसीओडी , पाळीच्या वेळी अंगावरून अतिशय कमी जाणे किंवा अतिशय जास्त रजस्राव होणे , मूड स्विंगस्,फायब्रॉइड्स , पाळीच्या वेळी असह्य वेदना होणे या आणि अश्या अनेक तक्रारी घेऊन स्त्रीरुग्णा चिकित्सालयात येऊ लागल्या आहेत. म्हणूनच हे खरे नियम काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
Delete