Monday, 17 April 2017

देह देवाचे मंदिर - भाग २


             दिनचर्या या विषयावरील दोन भागांच्या दीर्घ लेखाचा हा दुसरा आणि अंतिम भाग आहे.मागील लेखात आपण उत्थान(उठण्याची वेळ),शौच,दंतधावन, अंजन, नस्य,गंडूष ,स्नेहाभ्यंग, व्यायाम, स्नान,ध्यान आदि दिनक्रियाविशेषांचा विचार केला. या लेखात दिवसभराचा आहार,शतपावली,निद्रा यांबद्दल जाणून घेऊ.

आहार - व्यवसाय-चरितार्थाचे काम करताना आवश्यक असा दिनाक्रमाचा भाग म्हणजे आहार. शरीर आणि मनाचे पोषण, स्वास्थ्य यासाठी आहार चांगला असणे आणि तो वेळेवर घेणे गरजेचे आहे. चांगला आहार हा प्रमाण आणि गुणात्मक पुरेसा हवा. तो कसा ते आपण पाहू. आयुर्वेदात म्हटले आहे की
‘याममध्ये न भोक्तव्यं , यामयुग्मं न लङघयेत् ।
याममध्ये रसोद्वेगो युग्मेऽतीते बलक्षयः॥
म्हणजेच काहीही खाल्ल्यानंतर किमान तीन तास काही खाऊ नये परंतु कमाल सहा तासांपेक्षा जास्त काळ उपाशी राहू नये. पण  यामध्येही अजून सूक्ष्म विचार सांगितला आहे,बरं का. आधी घेतलेले जेवण पचले असेल तरच पुन्हा आहार घ्यावा नाहीतर लंघन करावे. यावरून आपल्या लक्षात येईल की वजन वाढवणे किंवा कमी करणे यासाठी दर दोन तासांनी खात राहणे किंवा “Diet”च्या नावाखाली कडक उपवास करणे हे दोन्ही टोकाचे उपाय चुकीचे आहेत. वजन वाढणे किंवा कमी होणे हे शरीरातील इतर अवयवसंस्थांवरही परिणाम करते त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानेच वजन कमी करावे. आहार-पचन व त्याचा वजनाशी असलेला संबंध यावर सविस्तर बोलायचे झाले तर तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल त्यामुळे आता आपण रोजच्या आहाराविषयी पाहू,
                     न्याहारी - सकाळच्या वेळेत प्रातर्विधी झाल्यानंतर हलका नाश्ता (चहा-कॉफी नाही) घ्यावा. यात दूध,आंबील, भुकेनुसार थोडा आणि ठराविक सुका मेवा घेता येईल. यामुळे रात्रीची भूक कमी होईल आणि व्यायाम करताना पोटाला जडपणा जाणवणार नाही. यानंतर ज्यांचे दुपारचे जेवण उशीरा होते अशांनी पोटभर न्याहारी करावी
  • न्याहारीची वेळ साधारण सकाळी ८.३० ते ९.३०ची असावी.
  • न्याहारीचे पदार्थ पोटभरीचे, मात्र तडस निर्माण करणारे नसावे.
  • दिवसाची सुरुवात आईस क्रीम, चॉकोलेट,मिठाई यासारखे अतिगोड किंवा समोसे, ढोकळा यासारखे अति तिखट,तेलकट किंवा तळलेले नसावे.
  • न्याहारी करताना घरी शिजवलेल्या पदार्थांचाच आग्रह मी धरते.
  • न्याहारीचे पदार्थ - न्याहारी म्हटले की बऱ्याच घरांमध्ये दिवसाची सुरुवात म्हणजे कॉर्नफ्लेक्स, मुसेली, ब्रेड-बटर, च्यवनप्राश(??? एक मोठ्ठा चमचा हो..) आणि त्याबरोबर उंच मग भरुन चहा-कॉफी किंवा मग उंच ग्लास भरुन दूध अथवा ज्यूस (It's healthy,u know?) अशी होत आहे. पण खरंच हा असा नाश्ता गरजेचा असतो का? तर नाही.
  • नाश्त्यासाठी सहज पचणारे,हलके,पोटभरीचे पदार्थ हवेत.
  • आपले पारंपरिक पदार्थ या सर्व निकषांत अगदी उत्तम बसतात.त्यामुळे या पदार्थांचा जरूर विचार करावा.
  • पोहे, सांजा,शिरा,लापशी,दलिया उपमा,शेवया उपमा हे सर्व पदार्थ out dated, बोअरिंग नसून आवश्यक आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.
          दुपारचे जेवण- दुपारचे जेवण दुपारी ११ ते ०१ या काळात असावे.म्हणजेच सकाळी लवकर घराबाहेर पडणाऱ्यांनी ११ वाजता जेवण घेतले पाहिजे.
  • हा काळ पित्त दोष प्राबल्याचा असतो त्यामुळे पचन सुधारते.
  • मग संध्याकाळी आवश्यकता वाटली तर पचायला हलके पदार्थ ,दूध, लाडू,चिक्की खाता येईल.

                    संध्याकाळचे जेवण -  आता संध्याकाळच्या जेवणासाठी मी जी वेळ सांगणार आहे ती ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावतील,
  • कारण संध्याकाळच्या जेवणाची आदर्श वेळ आहे ०६.३० ते ०८.३० (म्हणजेच ०८.३०वाजण्याच्या आत जेवण झालेच पाहिजे). यामागचे कारण असे की सूर्यास्तानंतर आपल्या शरीराचे व्यापार हळूहळू मंदावू लागतात. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपापला दिनक्रम लक्षात घेऊन जेवणाची वेळ लवकर कशी करता येईल त्याकडे लक्ष द्यावे.
  • रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणाच्या अर्ध्या प्रमाणात असावे.

                 शतपावली - जेवणानंतर काही लोक शतपावली घालतात तर बऱ्याच जणांचा Night Walk तर काही जणांचा Dessert walk/Chaat walk सुद्धा होतो. पण शतपावली घालण्यामागचे शास्त्र असे आहे की जमिनीवर मांडी घालून जेवताना पायाकडे कमी झालेला रक्तपुरवठा पूर्ववत व्हावा. हल्ली किती जण जमिनीवर मांडी घालून बसतात हो? टेबल-खुर्ची वर बसणाऱ्यांचे पाय लोंबकळत/उभे असतात त्यामुळं त्यांनी थोडा वेळ घरात चालणे किंवा पायाचे हलके व्यायाम करणे जास्त संयुक्तिक होईल.

                  निद्रा - हा मनुष्याच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग (स्तंभच म्हणा ना, ज्यावर मानवी आयुष्याचे आरोग्य अवलंबून असते.)
  • रात्रीचे जेवण झाल्यानंतर साधारणतः २ ते ३ तासांनी झोपेची वेळ हवी. मात्र झोपेच्या आधी दूरचित्रवाणी(मराठीत टीव्ही),स्मार्टफोन,टॅबलेट या आणि यासारख्या इतर साधनांचा वापर टाळावा. मालिकांमधील नाट्य,पार्श्वसंगीत,तसेच स्क्रीनचा तेजस्वीपणा यामुळे मेंदू व चेतासंस्था उत्तेजित होतात.याउलट त्या क्षणी आपल्या शरीराला विश्रांतीची गरज असते.
  • झोप शरीराला अत्यावश्यक असते, व ती योग्य त्या प्रमाणात मिळाली तरच शरीर व्यापार उदा. उत्साह,संप्रेरकांचे,पाचक स्रावांचे स्रवण, भूक, मलमूत्रादि वेगांचे उत्सर्जन व्यवस्थित होते.
  • किती - रोज साधारण ६-८ तास झोप आवश्यक आहे,मात्र ८ तास झोपायचे म्हणून रात्री १-२ वाजता झोपून सकाळी ८-१० वाजता उठणे चुकीचेच आहे.
  • नाईलाजाने जागरण झाल्यास किंवा रात्रपाळी करणाऱ्यांनी रात्री जेवढी झोप कमी पडते त्याच्या निम्मीच झोप दिवसा घ्यावी.
  • दिवसा झोप फक्त ग्रीष्म ऋतूतच घ्यावी,तीसुद्धा उपरोक्त सांगितल्याप्रमाणे मर्यादित प्रमाणात. एरवी लहान मुले,आजारी माणसे यांनाच दिवसा झोप घेणे शास्त्र संमत आहे.
  • अवेळी झोपणं, रात्री जागरण करणे, दुपारी झोपणे, या मुळे अनेक आजार उत्पन्न होतात.
  • अकाल शयन - अवेळी झोपल्यामुळे मोह, ताप, डोकं दुखणे, शरीर जखड्ल्या सारखे वाटणे,अपचन,अम्लपित्त, वारंवार सर्दी, डोकेदुखी, दिवसभर आळस येणे, भूक मंदावणे यासारखे आजार होतात. आणि यातल्या बऱ्याच आजारांचे मूळ कारण चुकीची झोप आहे हे आपल्याला जाणवतही नाही.
  • त्यामुळे शांत व सलग झोप लागावी यासाठी शयनगृहातील दिवे मंद असावेत. रात्री खोलीत संपूर्ण काळोख असावा. बाहेरून येणारा उजेड टाळण्यासाठी जाड पडदे वापरावे.
  • शांत झोप लागावी यासाठी पावलांना गायीचे तूप लावून काशाच्या वाटीने मालिश करावे.पादाभ्यंग केल्याने दृष्टी सुधारते व झोप शांत लागते.
अशा प्रकारे पहाटे उठाण्यापासून रात्री झोपेपर्यंत दिनचर्या एका ठराविक क्रमाने सांगितली आहे. दोषांच्या प्राबल्यानुसार आपण आपला दिनक्रम कसा पार पाडावा हे त्यात सांगितले आहे. स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य दीर्घकाळ टिकून राहावे यासाठी केलेली ती योजना आहे. म्हणूनच या लेखांना ‘देह देवाचे मंदीर’ हे शीर्षक  हेतूतः दिले आहे. जीवात्मा हा परमात्म्याचा अंश मानला आहे.  मग त्याचे अधिष्ठान म्हणजे आपले शरीर हेसुद्धा मंदिराप्रमाणेच शुद्ध स्वच्छ हवे,त्याची निगा राखायला हवी.यासाठीच हे सर्व आपणा सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून केलेला हा लेखनाचा प्रयास.
अशा प्रकारे आयुर्वेद शास्त्रात सांगितलेले ‘दिनचर्या’आख्यान सफळ-संपूर्ण झाले.
देह देवाचे मंदिर लेखमालेचा प्रथम भाग खालील लिंकवर उपलब्ध आहे.

http://samanwayhealth.blogspot.in/2017/03/blog-post.html?m=1



टीप - हा लेख लिहिताना पुढील व्यक्तींचे सहाय्य लाभले त्याबाबत मी त्यांची ऋणी आहे.

१. वैद्य श्रेया चुरी.(BAMS, मित्तल आयुर्वेद महाविद्यालय)

(कृपया हे लेखन लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी.तुमच्या या नैतिक कृतीने लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते.धन्यवाद. )

No comments:

Post a Comment