Friday, 7 April 2017

चला बोलूया, नैराश्य टाळू या….. Depression, Let's Talk

चला बोलूया, नैराश्य टाळू या….. Depression, Let's Talk.



आज जागतिक आरोग्य दिन, त्यामुळे सर्वप्रथम आपणा सर्वांना आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
                   यावर्षी आरोग्यदिनाचे ध्येय म्हणून जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच World Health Organization (WHO) यांनी नैराश्य म्हणजेच Depression या आजाराची निवड केली आहे. यासाठी बोधवाक्य निवडले आहे, “चला बोलूया, नैराश्य टाळूया… Depression, Let's talk.”  
हे फक्त आरोग्यदिनाचे ध्येय नाही तर आजच्या जागतिक आरोग्यदिनाचे औचित्य साधून संपूर्ण वर्षभरात या विषयावर जगभर मोहीम घेतली जाणार आहे. ‘नैराश्य’ हा मानसिक आजार असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याविषयी माहिती व उपाययोजना पोहोचावी हे याचे उद्दिष्ट आहे.जेणेकरुन नैराश्याने पीडित व्यक्तीला मदत मिळू शकेल तसेच त्यांच्या कुटुंबियांना या आजाराविषयी व नैराश्य बाधित व्यक्तीची कशी काळजी घ्यावी याविषयी माहिती मिळेल. आता आपणही नैराश्य या आजाराविषयी सर्वसाधारण माहिती घेऊ.

  • नैराश्य म्हणजे काय ?
 नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. पण नैराश्याची लक्षणे सुरवातीला अगदी सौम्य असतात. 
  1. नैराश्य पीडित व्यक्तीला सतत उदास वाटणे,कोणत्याही गोष्टीत,अगदी आवडीच्या विषयांतही आनंद-रस न वाटणे अशी लक्षणे दिसतात.
  2. याची सुरुवात आपला दिनक्रम,रोजची कामे करण्यात उत्साह न वाटणे यापासून होते.
  3. मग हळूहळू गळून गेल्यासारखे वाटणे,
  4. भूक न लागणे,
  5. भावनाप्रधानता, मनाची चलबिचल,
  6. झोप अचानक कमी होणे किंवा अधिक झोप येणे,
  7. एकाग्रता कमी-कामात लक्ष न लागणे,
  8. स्वतःविषयी कमीपणाची भावना,हताश झाल्याचे विचार मनात येऊ लागतात. कधी स्वतःविषयी-स्वतःच्या क्षमतेविषयी शंका निर्माण होते.
  9. याचे प्रमाण अति झाल्यास नैराश्याने पीडित व्यक्ती स्वतःचे काही नुकसान किंवा टोकाची भूमिका घेऊन जीवाचे बरे-वाईट करून घेऊ शकते. त्यामुळे नैराश्य हा गंभीर स्वरूपाचा आजार ठरतो.

  • नैराश्य कोणाला येऊ शकते?
  1. सध्याच्या स्पर्धेच्या,धावपळीच्या जगात स्वतःची जागा निर्माण करणे आणि ती टिकवणे याचा ताण प्रचंड आहे यामुळे नैराश्याबरोबर इतर मानसिक ताणसुद्धा वाढत आहे.गेल्या काही दशकांत नैराश्य आणि ताण सहन करण्याऱ्या व्यक्तींच्या संख्येत ५०% ची वाढ झाली आहे आणि सध्या जगातील १०% लोकसंख्या यापैकी एका आजाराने पीडित आहे. नैराश्य सर्व वयोगटांत, आर्थिक स्तरांत,सर्व देशांमध्ये दिसून येते.
  2. आर्थिक दुर्बलता,बेरोजगारी, जीवलगांचा मृत्यू-आजार, व्यक्तीचे स्वतःचे आजारपण, व्यावसायिक असफलता, व्यवसाय किंवा अभ्यासातील आत्यंतिक चढाओढ,  मद्यसेवन किंवा ड्रग चे सेवन यापैकी एक वा अनेक कारणे ज्यांच्या आयुष्यात असतात अशा व्यक्तींमध्ये नैराश्य मोठ्या प्रमाणात दिसते.
  3. तसेच स्त्रियांमध्ये गरोदरपणात किंवा बाळाच्या जन्मानंतर नैराश्य बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे.
  4. ब्रेकअप किंवा घटस्फोटीत व्यक्ती.
  5. वृद्धावस्था (Empty Nest Syndrome) -  मुलेबाळे मोठी होऊन उच्चशिक्षण,लग्न,नोकरी -व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडतात, स्वतः नोकरी-व्यवसायातून निवृत्त होणे अथवा स्वतःच्या प्रकृतीच्या तक्रारी यामुळे  ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा नैराश्याला बळी  पडू शकतात. 

  • नैराश्याचे दुष्परिणाम -
  1. नैराश्यमूळे व्यक्ती सतत खिन्न मनस्थितीत असते. त्यामुळे त्याचा व्यक्तीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो, अगदी रोजच्या जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टी करायचाही उत्साह त्यांना वाटत नाही.
  2. याचा इतर नातेसंबंधांवरही परिणाम होतो, नातेवाईक-जिवलग-मित्र दुरावतात.
  3. व्यवसाय-नोकरीवर परिणाम होतो.
  4. गरोदर स्त्री किंवा प्रसूतेच्या बाळाची वाढ आणि पोषण यावर नैराश्याचे दुष्परिणाम होतात.
  5. सतत नैराश्याने पिडीत व्यक्तीच्या सर्वसाधारण आरोग्यावरही परिणाम होतो, मधुमेह तसेच हृदयविकार यांचा धोका नैराश्यामुळे वाढतो तसेच या आजारांमुळे नैराश्य येण्याचाही धोका वाढतो.

  • नैराश्यापासून सुटका कशी करावी ?
नैराश्य सहज आणि प्रभावीरित्या बरे करता येते. पण सर्वप्रथम या आजाराला असलेले गैरसमजाचे वलय दूर करणे गरजेचे आहे. नैराश्य म्हणजे वेड नव्हे किंवा ती काही भूतबाधासुद्धा नाही. ही एक मानसिक अवस्था किंवा मनाला आलेली मरगळ समजा हवी तर….
  1. ही मरगळ दूर करण्यासाठी सर्वप्रथम बोलायला हवे. कोणाशीही बोला,तुमचे मित्र-कुटुंबाचे सदस्य,नातेवाईक यापैकी तुमचे विश्वासू असे कोणीही असू शकेल जे तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतील. सौम्य स्वरूपाचे नैराश्य बोलण्याने कमी होऊ शकते.
  2. गरज पडल्यास समुपदेशकाची मदत घ्यावी. समुपदेशक किंवा मनोविकार तज्ञ म्हणजे वेड्यांचा डॉक्टर...लोक काय म्हणतील हा विचार टाळला पाहीजे.
  3. मध्यम किंवा तीव्र स्वरूपाच्या केसेस मध्ये समुपदेशनासोबत औषधी उपायांचीही गरज भासते.अशा वेळी गोळ्यांची काय गरज,औषधांची सवय लागली तर?? असे विचार न करता वेळेवर औषधे घ्यावी ज्यामुळे त्रास आटोक्यात येऊन औषधेसुद्धा बंद होतील.
  4. स्वतःच्या ताण तणावांचे नियोजन करावे
  5. ताणाचा योग्य व शांतपणे सामना करण्याची सवय लावावी.
  6. स्वतःला आवडणारा एखादा छंद जोपासावा.
  7. तसेच आपल्याला काही त्रास नसेल पण आपल्या जवळच्या व्यक्तीला यापैकी काही त्रास जाणवत असेल तर तो वेळीच ओळखा, त्यांना बोलते करा, त्यांना मदतीचा हात द्या व तज्ञांची मदत घेण्यासाठी प्रवृत्त करा. 

आयुर्वेदशास्त्र आणि मन (थोडक्यात पण महत्त्वाचे )

                             आयुर्वेदशास्त्रामध्ये 'मनाचे' वेगळे अस्तित्त्व मान्य केले आहे. मन,बुद्धी ,अहंकार,आणि चित्त असे भाग सांगितले आहेत. 
  1. मन दिसत नसले तरी मनाचे पोषण हे आपल्या वर्तन आणि आहारावर अवलंबून असते. 
  2. सौम्य संगीत , मंत्रोच्चारण , ध्यानधारणा यांचा नियमित अभ्यास करणे मनःशांतीसाठी लाभदायक आहे. नियमित व्यायाम, योगासनांचा सरावसुद्धा चित्तवृत्ती उल्हसित करण्यासाठी मदत होते. मात्र यासाठी थोडी स्वयंशिस्त महत्वाची असते.  
  3. बैठी जीवनशैली, सिगारेट/तंबाखू/मद्य/अंमली -नशा  उत्त्पन्न करणारे व्यसनी पदार्थ , जंक फूडचे सेवन टाळणे महत्त्वाचे 

चला तर मग…
चला बोलूया,नैराश्य टाळूया.. आनंदी जीवन जगूया ।।



संदर्भ व छायाचित्र - जागतिक आरोग्य संघटना (WHO) संकेतस्थळ.

No comments:

Post a Comment