Thursday, 14 November 2019

लहान मुले व टाईप १ मधुमेह






               आज १४ नोव्हेंबर, भारताचा राष्ट्रीय बालदिन. देशभरात आजच्या दिवशी बालकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जगभरातही हा दिवस साजरा केला जातो, पण जागतिक मधुमेह दिवस म्हणून. आता हे दोन्ही विषय एकाच दिवशी साजरे व्हावेत हा जरी योगायोग असला तरी सध्याच्या काळात भारतीय मुलांमध्ये वाढत असलेले मधुमेहाचे प्रमाण पाहता बालदिनाच्या दिवशी मधुमेहाबद्दलसुद्धा जागृती करण्याची आवश्यकता वाढत आहे.
                बालकांमध्ये आढळणाऱ्या मधुमेहालाच जुवेनाईल किंवा टाईप 1 किंवा Insulin Dependent Diabetes (IDD) असे म्हणतात. या प्रकारातसुद्धा मोठ्यांच्या मधुमेहाप्रमाणे रक्तातील साखर अनियंत्रित होते पण असे होण्याचे कारण की इन्सुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडातील (pancreas) आयलेट्स ऑफ लँगरहान्समधील बीटा पेशी नष्ट होतात, हे असते.या पेशीच नष्ट झाल्याने शरीरात इन्सुलिन तयारच जात नाही आणि रक्तशर्करा अनियंत्रित होते. या आजाराला ऑटोइम्युन डिसऑर्डर* असे संबोधले जाते.टाईप १ प्रकारचा मधुमेह हा फक्त जन्मजातच असतो असे नाही तर जन्मापासून किशोरावस्थेत कधीही याची लक्षणे दिसू शकतात. या आजाराची कारणे अशी नक्की नसली तरी पुढे नमूद केलेल्या कारणांपैकी काही कारणे दिसून येतात, (Predisposing Factors ) पुढीलप्रमाणे,

  1. अनुवांशिकता - आई-वडिलांपैकी कोणाला जर बाळाच्या जन्माच्या आधीपासून मधुमेह असेल व त्यासाठी औषधे सुरु असतील तर बाळाला मधुमेह होण्याची शक्यता वाढते. (बीजदोष)
  2. मातेचे स्तनपान न देता काही वेळा बाळांना वयाच्या ४ महिन्यांच्या आतच गाईचे दूध किंवा बाहेरचे जद अन्न  सुरु केले जाते.
  3.  तसेच नन्तरही जी मुले मिठाई,बिस्किटे,बेकरीचे  पदार्थ, मैद्याचे-तळलेले असे जड , ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असलेले (ज्यामुळे रक्तशर्करेचे प्रमाण वाढते. ) असे पदार्थ मोठ्या प्रमाणात खातात त्यांना या पदार्थांचे पचन करण्यासाठी जास्त प्रमाणात इन्सुलिनची गरज भासते व छायापचयावर याचा गंभीर परिणाम होतो.
  4. उतारवयातील संतती. 



लक्षणे - 
  1. वजन सतत कमी होणे. 
  2. सतत थकवा जाणवतो.
  3. वारंवार भूक - तहान लागणे.
  4. थोड्या थोड्या वेळात लघवी होणे. लहान मुलांमध्ये तर झोपेत शू होतानासुद्धा दिसून येते.
  5. भावनिक आंदोलने (Mood Swings )



चिकित्सा
  1. हा व्याधी ऑटोइंम्युन प्रकारात मोडत असल्याने असाध्य ते कष्टसाध्य प्रकारात मोडतो. मात्र आयुर्वेदिक आहार, दिनचर्या आणि व्यायाम यांची सांगड घालून नियंत्रणात नक्की ठेवता येतो. तसेच किशोरवस्थेत किंवा ऐन तारुण्यात होणारा आजारसुद्धा या शिस्तीमुळे 10-15 वर्षे पुढे सहज ढकलता येतो.
  2. इन्सुलिन इंजेक्शन किंवा पंप -  डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे इन्सुलिनचा डोस निर्धारित करुन नियोजित वेळी घेतल्यास जवळजवळ सामान्य आयुष्य जगता  येते. 
  3.  नियमितपणे रक्तशर्करा तपासून त्याची नोंद करून ठेवणे. 
  4. नियमित व्यायाम योगासने आणि ध्यानधारणा यामुळे शरीराबरोबरच मनालासुद्धा बळ  मिळते. 
  5. टाईप १ मधुमेह झालेले मूल ,त्याचे पालक तसेच त्या मुलासोबत अधिक वेळ राहणाऱ्या व्यक्ती (सांभाळणाऱ्या व्यक्ती/कोच/मित्र) यांना  मधुमेह त्याचे स्वरूप व तात्कालिक उपाययोजना (Emergency mode of treatment). 
चला तर मग, या बालदिनाच्या  दिवशी बालदीन होऊ नयेत यासाठी जागरूक होऊया आणि आपल्या मुलांना मधुमेहापासून वाचवूया 




* ऑटोइम्युन डिसऑर्डर - या प्रकारच्या आजारांमध्ये शरीराची प्रतिकारक्षमता आपल्याच शरीरातील पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करते.

Thursday, 10 October 2019

श्वेतप्रदर (Leucorrhea )

श्वेतप्रदर (Leucorrhea )

             आजचा विषय आहे, श्वेतप्रदर (Leucorrhea), ज्याला सामान्य भाषेत अंगावरुन पांढरे जाणे असे म्हणतात. आपल्या समाजात मासिकपाळीप्रमाणेच हासुद्धा कुजबुजत बोलण्याचा विषय आणि त्यामुळेच स्त्रियांमध्ये अगदी सहज आढळणारा आजार. आजही ‘पांढरे जाणे’ यासारख्या साध्या आजाराभोवती गैरसमजांचे वलय आहे त्यामुळे बऱ्याचदा बायका याविषयी इतरांकडे बोलणे- वैद्यकीय सल्ला घेणे टाळतात. त्यामुळे या आजाराचे समाजातील प्रमाण व गांभीर्य वाढते. श्वेतप्रदर म्हणजे मासिक पाळीच्या व्यतिरिक्त अंगावरुन जाणारा पाण्यासारखा पातळ किंवा शेंबडासारखा  पांढरा स्राव. सामान्यतः योनिमार्ग जंतुसंसर्गमुक्त, ओलसर तसेच सौम्य राखला जावा यासाठी शरीर योनिमार्गा मध्ये वंगणासारखा , पातळ द्रवाचा स्राव करत असते, ही क्रिया ईस्ट्रोजेन या हॉर्मोनच्या नियंत्रणाखाली असते. त्यामुळे गरोदरपणात, दर महिन्याला स्त्री बीज निर्माण (Ovulation) तसेच वयात येताना योनिमार्गातील स्राव प्राकृत प्रमाणात वाढतात. मात्र या सर्व घटना तात्कालिक आणि स्वाभाविक असतात, त्यासाठी कुठल्याही औषधोंपचारांची गरज नसते, ते आपोआप कमी होतात. पण जेव्हा या स्रावांचे प्रमाण, कालावधी नेहमीपेक्षा वाढतो तेव्हा मात्र या प्रकाराची चिकित्सा अत्यावश्यक आहे. पूर्वी स्त्रीरोगतज्ञ श्वेतप्रदर हा वेगळा आजार मानत नसत. डॉ. राणी बंग यांनी त्यांच्या ‘सर्च’ या संस्थेद्वारे गडचिरोली जिल्ह्यात श्वेतप्रदर या समस्येवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. त्यावेळी एका  ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञांनी श्वेतप्रदर हा सर्दीच्या वेळी वाहाणाऱ्या नासास्रावा इतकाच मामुली असल्याचे सांगून त्यांच्या कामाला कमी लेखले होते पण त्यांनी आकडेवारीनिशि या आजाराचे गांभीर्य सिध्द केले.
              व्यवहारात मात्र श्वेतप्रदर आणि प्राकृत योनिस्राव यात वैद्यकीय तपासणी करुनच फरक जाणून घ्यावा लागतो. कारण श्वेतप्रदर हा विकृत प्रमाणात वाढलेला योनिस्राव असतो. तसेच एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या जन्तुसंसर्ग किंवा फिस्टुला तसेच श्वेतप्रदर यामध्ये स्रावाचा रंग,प्रमाण, प्रकार यांत फरक असतो. तसेच शारीरिक संबंधाच्या वेळी वेदना, इच्छा नसणे, कंबरेचे दुखणे, पोटात दुखणे, योनिप्रदेशी खाज, योनिप्रदेशी-मूत्रमार्गाकडे वेदना,जळजळ अश्या वेळी तज्ञ वैदयांकडून निदान करून घ्यावे. योनिस्राव दोन प्रकारचा असतो. *योनिमार्गातून* होणारा स्राव हा प्राकृत अवस्थेत स्वच्छता राखणे, pH कायम ठेवणे,वंगण पुरवणे यासाठी उपयोगी असतो मात्र गर्भाशय व अंतःफले (ovaries) यांची जागा सरकणे, Pelvic Inflammatory disease (प्रजननसंस्थेचा आजार), योनिमार्गाला येणारी सूज, जीर्ण मलावबंध यामुळे योनिगत स्राव मोठ्या प्रमाणात वाढतो. *गर्भाशयमुखातून* होणाऱ्या स्रावाचे विकृत स्वरूप गर्भाशयमुख क्षरण(cervical erosion) , गर्भाशयमुखाला येणारी सूज (cervical inflammation) , संसर्ग, पॉलीप अश्या आजारांमध्ये दिसते. 

श्वेतप्रदराचे गंभीर स्वरूप
  •            अंगावरुन जाणारे हे पांढरे पाणी बऱ्याचदा दुर्लक्षिले जाते. पण जर हा त्रास बरेच दिवस होत राहिला तर स्त्रीला अशक्तपणा जाणवतो. तसेच श्वेतप्रदराबरोबर इतर दुय्यम प्रकारचे जंतुसंसर्ग होण्याची शक्यतासुद्धा असते. बऱ्याचदा तर हे दूसरे इन्फेक्शन (दुर्लक्ष केल्यामुळे) अधिक गंभीर असू शकते. कारण Candidaisis, Gonorrhea, Trichomonas, Chlamydia अथवा Bacterial infection यामुळे होणाऱ्या संसर्गात योनिस्रावाचे प्रमाण , रंग , गंध बदलतात व सामान्य माणसाना यातील फरक ओळखता येत नाही आणि आजाराची गंभीरता वाढते.
  • आयुर्वेद शास्त्रात श्वेतप्रदर हा वेगळा आजार सांगितला नाही तर वेगवेगळ्या स्त्रीरोगांमध्ये लक्षणस्वरूप वर्णन केला आहे. पण कधी कधी हेच लक्षण एवढे त्रासदायक ठरते कि मूळ आजार सोडून श्वेतप्रदराचीच चिकित्सा करावी लागते. आयुर्वेदानुसार वात-कफ दोषांची विकृती असलेला हा आजार. जेव्हा प्रकुपित वात दोष शरीरातील आप धातुला प्रकुपित करतो आणि हा आप(द्रव) धातु अधोमार्गाने स्रवतो त्याला ‘सोमरोग- श्वेतप्रदर’ असे म्हणतात. या आजारात 
  • गावपातळीवर स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा त्रास दिसतो यामागे तज्ञ डॉक्टरांचा अभाव, पुरुष डॉक्टरांकडे जायचा प्रसंग आल्यास वाटणारी लाज, आर्थिक दुर्बलता यासारखी कारणे असतात.
  • प्रजननसंस्थेशी निगडित त्रास असल्याने याचे पडसाद घरात, वैवाहिक ताण-तणाव यासारख्या स्वरुपात दिसतात.

व्याधीनिश्चिती आणि उपाय - 
  
  •            श्वेतप्रदराचे निदान निश्चित करण्यासाठी संपूर्ण माहिती(History taking) , योनिमार्गाची बाहेरुन तसेच आतून नीट तपासणी, गरज पडल्यास गर्भाशयमुख व योनिमार्ग यांच्या पृष्ठभाग व तेथील स्राव यांची तपासणी गरजेची असते. तसेच पुढील तपासणीसाठी या स्रावांचे माइक्रोस्कोपद्वारे परीक्षण केले जाते.
  • यानंतर गरजेप्रमाणे व प्रकृतीप्रमाणे तोंडावाटे काढे अथवा चूर्ण वापरली जातात. खालच्या भागाला लावण्यासाठी जेल, मलम किंवा चूर्ण दिले जाते.
  • योनिप्रदेशी धावन (Vaginal Douches )केले जाते व योनी वर्तीचा (Vaginal  Suppositories ) वापर केला जातो. 
  • विवाहित स्त्रियांना हा त्रास असेल तर एकाकडून दुसऱ्याला होणारे संक्रमण टळावे यासाठी पती-पत्नी दोघांनीही औषधोपचार घ्यावेत.

Saturday, 5 October 2019

नऊ रंग नवरात्राचे...... स्त्रीशक्तीचे ..... आरोग्याचे......... या मालिकेतील लेख हा रक्ताल्पता याआजाराविषयी.....







नऊ रंग नवरात्राचे...... स्त्रीशक्तीचे ..... आरोग्याचे......... या मालिकेतील लेख हा रक्ताल्पता याआजाराविषयी.....

पण्डु रोग (रक्ताल्पता)

          रक्ताल्पता आणि स्त्री या विषयावर लिहीण्याआधी जरा या आजाराची भारतीय समाजातील सद्यस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर काही धक्कादायक माहिती मिळेल. काही अभ्यास सर्वेक्षणांनुसार भारतात अर्ध्याहून अधिक ( ५५-५९% ) स्त्रिया या रक्ताल्पता (Anaemia) या आजाराने ग्रस्त आहेत. म्हणजेच दर दोन स्त्रियांमधील एक स्त्री ही अॅनिमिक असते.
                आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर स्त्रियांचे हिमोग्लोबिन किमान १२ mg/dl असणे ही आहे आदर्श स्थिती पण बऱ्याच स्त्रियांमध्ये हे असते साधारण १०- ११.९ mg/dl च्या पातळीत, ज्याला कमी तीव्रतेची रक्ताल्पता (Mild Form Anaemia) असे म्हणतात. ( “बऱ्याच बायकांमध्ये असतं नं मग ठीक आहे,बघू नंतर”, हा संवाद याच स्टेजला ऐकायला मिळतो आणि खरं तर हाच दृष्टिकोन पुढे जास्त घातक असतो). त्यानंतर नंबर असतो यापेक्षा कमी म्हणजे ७ - ९.९ mg/dl Hb (हीमोग्लोबिन) असणाऱ्यांचा (Moderate form) आणि ६.९ mg/dl पेक्षाही कमी हिमोग्लोबिन असल्यास स्थिती गंभीर मानली जाते व या अवस्थेत तातडीचे उपाय आवश्यक असतात.

आयुर्वेदानुसार रक्ताल्पता - 

              आयुर्वेद शास्त्रामध्ये हा आजार पंडुरोग या नावाने वर्णन केला आहे. पंडु या शब्दाचा अर्थ आहे फिकटपणा . ------>  ज्या आजारात रुग्णाच्या त्वचा,नेत्र,नख या अवयवांच्या ठिकाणी पांडुता येते आणि रोगी केवड्याच्या कणसातील गाभ्याप्रमाणे फिकट आणि निस्तेज दिसू लागतो असा हा पंडुरोग या आजाराविषयी विस्तारपूर्वक सांगताना फक्त रक्ताल्पता हा एकच निकष न मानता इतर शरीरलक्षणेही विचारात घेतली जातात.  तसेच ओजक्षय ही संकल्पनासुद्धा सांगितली आहे. त्यानुसार अंग गळून गेल्यासारखे वाटणे, त्वचेवर कोरडेपणा जाणवणे,अशी लक्षणे सुरूवातीपासूनच जाणवतात. ( या लक्षणांना पूर्वरूपे असे म्हणतात. म्हणजे असे की या अवस्थेत आजाराचे व्यक्त स्वरूप दिसेलच असे नाही पण ही सुरूवात असू शकते.) यानंतर वेळेत औषधोपचार केले नाहीत तर अधिक तीव्र लक्षणे दिसू लागतात. भूक न लागणे, भ्रम(गरगरणे) ,श्रम (नेहमीचे काम करतानाही याआधी न जाणवलेला थकवा), दम-धाप लागणे, सर्वांग वेदना, पोटऱ्यांमध्ये गोळे येणे, केस गळणे, छातीमध्ये धडधड-घाबरल्यासारखे वाटणे यापैकी काही अथवा सर्व लक्षणे आजाराच्या तीव्रतेनुसार दिसतात. अधिक तीव्र लक्षणांमध्ये त्वचा,नखे,डोळ्यांच्या ठिकाणि फिकटपणा येतो,हे अवयव निस्तेज दिसतात, स्वभाव त्रासिक-चिडचिडा होतो, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळल्यासारखे वाटते, अंगात बारीक ताप जाणवतो.

स्त्रियांमध्ये दिसणारे गंभीर परिणाम - 
             स्त्रियांमध्ये पंडुता अधिक तीव्रतेने दिसण्याची पुढील मुख्य कारणे आहेत.
  • मासिक पाळी - दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या काळात प्रत्येक वेळी साधारण ३० ते ४० मिली रक्तस्राव होतो होतो. (हे फक्त एका महिन्याचे प्रमाण आहे जे प्रकृतीनुसार कमी-जास्त असू शकते पण सरासरी काढली तर एका वर्षात साधारण 350-500मिली रक्तस्राव होतो. ) जर अंगावरुन जास्त जात असेल किंवा पाळी २१ दिवसापेक्षा कमी कालावधीत येत असेल तर हे प्रमाण अजून जास्त होईल. यामुळे रक्ताल्पतेची लक्षणे दिसतात.
                    पाळीवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होऊन पाळी अनियमित होणे,कमी प्रमाणात रक्तस्राव किंवा अधिक दिवस थोडे-थोडे अंगावर जाणे अशी लक्षणे दिसतात.
  • गर्भारपण - या काळात स्त्री दोन जीवांची असते.ज्यामुळे शरीरातील रक्त वाढते.(Hypervolemia- यात serum व plasma यांचे प्रमाण वाढल्याने रक्तकणांचे प्रमाण कमी होते.अशा वेळी मातेला ३०-६०mg लोह व ४००माइक्रोग्राम फोलिक ऍसिड मिळणे गरजेचे असते. ज्यामुळे हीमोग्लोबिन चे प्रमाण वाढू शकेल. रक्ताल्पता असल्यास अपूऱ्या कालावधीत प्रसूतीचा धोका वाढतो, बाळाचे वजन कमी असणे,प्रसूतिच्या वेळी जंतुसंसर्गाचा धोका शक्यता वाढते.
भारतात शिक्षणाचा अभाव, वैद्यकीय सुविधांबद्दल अज्ञान,आर्थिक अडचणी,वारंवार होणाऱ्या बाळंतपणामुळे येणारा निष्काळजीपणा यामुळे गरोदरपणातील रक्तल्पतेचे प्रमाण अधिक आहे.
  • प्रसूती - एका प्रसूतिच्या वेळी साधारण 500-800मिली रक्तस्राव होतो. प्रसूतीनंतर रक्तस्राव (Post partum haemorrhage) झाल्यास हे प्रमाण वाढते व प्रसंगी मातेचा जीव धोक्यात येऊ शकतो.
  • अस्वच्छता <----> कृमि प्रादुर्भाव - स्वयंपाक बनवताना , जेवताना स्वच्छता न राखणे, अस्वच्छ भांडी-हात यामुळे कृमि संसर्ग होतो जे रक्तल्पतेचे मुख्य कारण आहे.
तसेच अस्वच्छ पाण्यात वाढणाऱ्या anapheles डासांमुळे होणाऱ्या मलेरिया या आजारामुळेही रक्ताल्पता दिसून येते.
  • निकृष्ट दर्जाचे अन्न - सर्वसाधारण भारतीय घरात स्त्रिया व मुलींना पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा मिळत नाही, तसेच परंपरागत विचारांमुळे त्या सुद्धा स्वतःचे स्थान कमी समजतात. त्यामुळे शिळे अन्न जेवणे, कुटुंबातील सगळ्यांना वाढल्यानंतर उशीरा जेवणे , उरलेल्या अन्नातच भूक भागवणे असे प्रकार घरा-घरांतून सर्रास दिसतात. अशा वेळी लोहाचा नैसर्गिक स्रोत असलेले सुकामेवा, डाळी, फळे, मांसाहार यांचे सेवन सगळ्यांना शक्य होत नाही त्यात स्त्रियांच्या वाटयाला त्याचा गरजेइतका भाग येईल याची शक्यता कमी असते. मुलांच्या पोषण -गरजा यांच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणारी आई स्वतःच्या आरोग्याकडे सहज दुर्लक्ष करते.

उपाय
  • आहार - आहारामधून मिळणारे लोह हे सौम्य रक्ताल्पता व हीमोग्लोबिनची पातळी नियमित ठेवण्यासाठी उपयोगी असते. पालक, बीट,टॉमेटो, डाळी, कडधान्ये, राजमा, चवळी यासारख्या भाज्या, मनुका, सुकामेवा, कलेजी, कोंबडीचे- बकरीेचे मांस,मासे यातून पुरेसे लोह मिळते.
  • औषधे - पंडु रोग चिकित्सा करताना फक्त रक्तवाढिसाठी लोह देणे पुरेसे नाही तर रसधातु पासून चांगला रक्तधातु तयार व्हावा यासाठी रक्ताग्निवर्धक  व रक्तधातु वर्धक अशी दुहेरी औषधयोजना करावी लागते. रक्तक्षय---> दुर्बलता---->धातुक्षय---->वातप्रकोप----> रुक्षता ,असे हे दुष्टचक्र आहे. यासाठी स्नेहन, मृदू विरेचन अशी पंचकर्म चिकित्सा करून नंतर पुनर्नवा मंडूर, नवायस लोह यासारखी औषधे  दिली जातात. औषध योजना करताना त्यासोबत फोलिक एसिड देतात ज्यामुळे लोहाचे शोषण वाढते. तोंडावाटे द्यायची औषधे मध्यम तीव्रतेच्या रक्ताल्पतेसाठी उपयोगी असतात.
  • तीव्र रक्ताल्पता असल्यास इंजेक्शन्स किंवा blood transfusion केले जाते व त्यानंतर दीर्घ कालावधीसाठी गोळ्या दिल्या जातात.

टीप - मात्र लोहाच्या कमतरतेमुळे जसा रक्तल्पतेचा त्रास होतो तसेच अति लोह सेवनाने विषाक्तता (लोहाचे शरीरावर दिसून येणारे विषारी परिणाम) दिसून येतात. प्रस्तुत लेखामध्ये व्यक्त केलेली मते ही सामान्य वाचकांच्या माहितीसाठी आहेत. त्यामुळे डॉक्टर नसताना स्वतःच स्वतःवर प्रयोग करु नये वैद्यकीय सल्ल्यानेच औषधे घ्यावित.

Sunday, 1 September 2019

गणेशोत्सव, उकडीचे मोदक आणि आयुर्वेद


गणेशोत्सव, उकडीचे मोदक आणि आयुर्वेद


                                                                छायाचित्र सौजन्य सौ. मधुरा पोडूवाल


घरी गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरु होती. अनया आजीला म्हणाली, "आजी गं, यावर्षीही नैवेद्याला उकडीचेच मोदक करूया. मला,नीलला, आरवला,श्रीयाला सगळ्यांनाच आवडतात, मऊ मऊ मोदक आणि गणपती बाप्पालासुद्धा…. पण आजी बाप्पाला मोदकच का गं आवडतात?"
आजी म्हणाली, " एकदा काय झालं,गणेशाचे परशुरामाशी युद्ध झाले आणि तेव्हा बाप्पाचा एक दात तुटला. या तुटलेल्या दातामुळे त्यांना काही खाता येईना म्हणून मग बाप्पासाठी मऊ मोदक बनवण्यात आला. हा पदार्थ खाल्ल्यावर गणरायाला त्याची चव खूप आवडली आणि ते आनंदित झाले.म्हणून या पदार्थाला मोद(आनंद ) देणारा असा, मोदक असे नाव मिळाले."
"पण मग आज्जी,मोदकच का? श्रीखंड, पुरणपोळी किंवा केक का नाही?"
"त्याचं काय आहे…" एवढा वेळ त्या दोघींच्या गप्पा ऐकत असलेली स्निग्धा मावशी म्हणाली, "उकडीचे मोदक बनवण्यासाठी वापरतात, ओलं खोबरं, गूळ, जायफळाची आणि वेलचीची पूड,केशर आणि तांदळाचे पीठ. यातील तांदळाच्या पिठीची छान,मऊ उकड बनवून बाहेरचे आवरण बनवतात. तांदुळ मुळात पचण्यास हलके, त्यात उकड काढताना झालेल्या अग्निसंस्कारामुळे(उकड काढण्याच्या प्रक्रियेत पिठावर होणारी अग्नीची क्रिया) ते अधिक पथ्यकर बनते. शिवाय तांदुळ मधुर रसात्मक असून शक्तिवर्धन करणारे आहे, ओलं खोबरं चवीला गोड, गुरु गुणाचे(पचावयास जड), स्निग्ध, पौष्टिक आणि वात व पित्त कमी करणारे आहे तसेच शरीरातील दाह, तहान कमी करणारे, बल देणारे, केसांसाठी हितकर, कान्ति वाढवणारे आहे. त्यासोबत वापरला जाणारा गुळ हा सुद्धा उत्तम कफ-वातशामक,गुरु गुणाचा(पचायला जड), अग्निवर्धक, पौष्टिक, उष्ण, श्रम-थकवा कमी करणारा आहे. गूळ जेवढा जुना तेवढा वापरायला चांगला. वेलची आणि जायफळ हे फक्त सुगंधासाठी किंवा स्वादासाठीच नाही तर पचनासाठी, अजीर्ण, पित्त, सर्दी-पडसे यासारख्या आजारांवर गुणकारी आहे, तसेच पाचक गुणांचे असल्याने गूळ-खोबऱ्याचे सारण पचवण्यासही मदत करते. त्यात घातलेले केशरसुद्धा वातशामक, दीपक(पचनशक्ती वाढवणारे),
असा हा मोदक पुन्हा उकडल्यामुळे अजून चवदार, पौष्टिक आणि पचण्यास हलका बनतो."
"आणि मावशी ह्या गरमागरम मोदकाची शेंडी मोडून त्यात तूपाची धार धरुन खायला कित्ती मज्जा येते गं…"
"हो तर, आणि अनया, तूपसुद्धा विशेषतः गाईच्या दुधाचे लोण्यापासून कढवलेले तूप हे बुद्धि, कांति, स्मृति वाढवणारे, बल्य, वात-पित्त कमी करणारे, थकवा घालवणारे आहे. जठराग्नि वाढवून, वीर्यवर्धक, दृष्टिला हितकर, शरीराला स्थैर्य, बळकटी देणारे असं आहे."
"काय अनया, कसल्या गप्पा चालल्यात?" , आईने आत येत विचारले.
"अगं आई, स्निग्धामावशी सांगत होती आयुर्वेदात उकडीच्या मोदकाबद्दल काय सांगितलं आहे."

"अच्छा, काय सांगितलंय मग?"

मग स्निग्धा थोडक्यात सांगू लागली, "श्रावण-भाद्रपद महिन्याचा काळ म्हणजे वर्षा ऋतू. या काळात पावसामुळे गारवा वाढलेला असतो.शरीरात वात दोषाचा प्रकोप झाला असल्याने रुक्षता,क्लम(थकवा), वाताचे आजार वाढलेले असतात.अश्या वेळी येणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक केले जातात. हे मोदक चवीला गोड असल्याने पौष्टिक, उत्साह वाढवणारे, शुक्रल, आणि वातशामक, अस्थि व मांस धातूला बल देतात. मनाला आनंद देणारे आहेत. मुख्य म्हणजे वातावरणातील बदलांमुळे बिघडलेल्या शारिरीक संतुलनाचे, आपल्या स्निग्ध,किंचित् उष्ण, वातघ्न व कफकर गुणांनी नियमन करतात."
मग आजी म्हणाली, " उकडीच्या मोदकाप्रमाणे तळणीचे मोदक हे कणकेपासून बनवतात. यात ओले खोबरे-गूळ /ओले खोबरे-साखर / सुके खोबरे-पिठीसाखर असे सारण असते. म्हणजे सुकं खोबरं किसून ते थोडंसं भाजून घेऊन त्यात पिठी साखर, भाजलेली खसखस, चारोळी, सुका मेवा, वेलदोडा पूड वा पंचखाद्य घालून सारण तयार करायचं आणि कणिक भिजवून त्याची लाटी करून त्यात हे सारण भरून मोदक करायचे आणि तेलात वा तुपात तळायचे."
"अरे वाह, मग या गणपतीत आपण छोटा भीम सारखी मोदक खाण्याची स्पर्धा ठेवू,११-२१ किंवा ५१????"तेवढ्यात धावत आलेल्या नीलने सूचना केली.
"अहो छोटे भीम,मोदक पचायला जड असतात बरं, आणि आपण काही बाप्पा नाही एवढे मोदक एकाच वेळी फस्त करायला.त्यामुळे पोटाची काळजी घेऊन आवडतील तेवढे मोदक खा,पैज लावून नको."
हे ऐकून सगळी वानरसेना एकसाथ ओरडली…
"गणपति बाप्पा मोरया…."

लेखिका-
वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक.
समन्वय आयुर्वेदिक व पंचकर्म क्लिनिक.
बोरीवली, मुंबई.
9870690689
प्रस्तुत लेख शेअर करायचा असल्यास लेखिकेचे नाव पत्त्यासहित शेअर केल्यास हरकत नाही.








Wednesday, 7 August 2019

स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन भाग २







स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन 
         (वर्ल्ड ब्रेअस्टफीडिंग डे - जागतिक स्तनपान सप्ताह २०१९)





या  भागामध्ये आपण आयुर्वेदीय संहितांमध्ये सांगितलेले स्त्रीदुग्ध म्हणजेच स्तन्याचे गुण  पाहणार आहोत. सुश्रुत संहितेत सांगितले आहे कि स्तन्य परीक्षा पाण्यामध्ये करावी. ही अत्यंत साधी परीक्षा असून घरच्या  घरी करता येते. काचेच्या भांड्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात स्त्रीदुग्धाचे काही थेंब  टाकून बघितले जातात. 

शुद्ध स्तन्य लक्षणे -
  1. शुद्ध स्तन्य शीतल , अमल (स्वच्छ - clear ), तनु (पातळ), शंखाच्या वर्णनाप्रमाणे शुभ्र, पाण्यात टाकल्यावर पूर्णपणे मिसळून जाणारे असावे. 
  2. दुध फेसाळलेले नसावे. 
  3. त्यामध्ये तार  दिसून येऊ नये. ( दोन बोटांच्या चिमटीत दुधाचा थेम्ब दाबून बीट विलग केल्यावर तार  येते का, ते पाहावे.)
  4. दूधाचा  थेंब  पाण्यात अलगद टाकून बघितल्यास तो तरंगणारा किंवा बुडणारा  नसावा. पाण्यात सहज मिसळून जावा.  
  5. तसेच आईचे दूध नियमितपणे पिणाऱ्या बाळांची शारीरिक व मानसिक वाढ उत्तम होते. (पुष्टीकर आरोग्यकर: च इति )
  6. बाळाला तसेच आईला स्तन्यामुळे काहीही त्रास होत नाही.  (शिशु: धात्र्यो: अनापत्ति )
अशुद्ध  स्तन्य लक्षणे 
  1. स्तन्य अधिक मधुर रसाचे असल्यास बाळाला वारंवार आणि भरपूर शी-शू होते . (सध्या पावसाळ्यात सगळ्याच बाळांना वातावरणातील गारव्यामुळे वारंवार शू  होताना दिसते त्यामुळे मातांनी काळजी करू नये. पण बाळाच्या शू -शी कडे लक्ष द्यावे. )
  2. कषाय रसाचे स्तन्य असल्यास बाळाला कडक शी होते आणि शूसुद्धा कमी होताना दिसते. 
  3. वात -कफादी दोषांनी बिघडलेले स्तन्य असल्यास बाळाला उलटी-अपचनाचा त्रास दिसतो. 
अश्या वेळी आईला आहार-विहार नीट समजून घेऊन त्यात आवश्यक ते बदल करावे लागतात व वैद्यांच्या सल्ल्याने आईला औषधे देणे गरजेचे असते. 


खालील तक्त्यामध्ये मातृस्तन्य , गायीचे दूध व बाजारात उपलब्ध असलेले फॉर्म्युला  फीड यांची तुलना दिली आहे . यावरून लक्षात येते कि आईच्या दूधाला  पर्याय नाही व बाकीचे पर्यायांचा विचार आईचे दूध अगदीच उपलब्ध नसल्यास करावा हे योग्य . 


इतर लिंक - मागील दोन वर्षांपासून चालत आलेल्या या लेखमालेत स्तनपान या विषयावर वेगवेगळ्या पैलूने विचार करून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे . ते लेख खालील लिंक वर  वाचा. 

१.  स्तनपानाचे महत्व https://samanwayayurved.blogspot.com/2017/08/blog-post.html

२. स्तनपानाची पद्धत  https://samanwayayurved.blogspot.com/2018/08/blog-post.html

३. ब्रेस्ट क्रॉल , बाळ अथवा आई आजारी असल्यास https://samanwayayurved.blogspot.com/2018/08/blog-post.html

Wednesday, 31 July 2019

स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन



        स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन 
              (वर्ल्ड ब्रेअस्टफीडिंग डे - जागतिक स्तनपान सप्ताह २०१९)








               आई व बाळाचे नाते यावर सर्व भाषा-संस्कृतीमध्ये भरभरुन लिहिले- बोलले जाते.आई आणि बाळाच्या नात्याचा बांध हा स्तनपानामुळेही जास्त घट्ट होताना दिसतो . आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसेच मानसिक विकासाच्या दृष्टिकोनातून आईचे दूध व स्तनपान, आई व बाळ दोघांसाठी महत्वाचे आहे.
             हे महत्व जगातील सर्व मातांपर्यंत पोहोचावे आणि जगभरातील प्रत्येक नवीन मातेला, मग तिचा आर्थिक स्तर-सामाजिक स्तर कुठलाही असो,तिला आपल्या बाळाला स्तनपान देता यावे यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या पहिल्या आठवडयामध्ये १९९१ सालापासून ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ साजरा केला जातो. स्तनदा माता व त्यांचे कुटुंबिय यांना स्तनपानाबाबत शास्त्रशुद्ध माहिती मिळून स्तनपानासाठी नवीन मातेला जास्तीत जास्त आधार मिळावा हाच यामागचा उद्देश आहे.
             याचसाठी  मागील दोन वर्षांपासून समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक सदर ब्लॉगद्वारे  लेखमाला प्रसारित करत आहोत. मागील दोन वर्षांत आपण प्रेमस्वरूप आई.... वात्सल्यरूप आई... या लेखामालेत स्तनपान , आहारशास्त्रीय महत्व (Nutritive value ), स्तनपानाची योग्य पद्धत , स्तनपानसाठी अर्ह-अनर्ह (Indications -Contraindications ), ब्रेस्ट क्रॉल पद्धत यांची माहिती पाहिली . यावर्षी आपण आयुर्वेदीय दृष्टिकोनातून स्तनपान कसे असावे हे पाहणार आहोत. 
  1. धात्री  -  आयुर्वेदीय संहितांमध्ये सगळ्यात आधी धात्रीचे वर्णन आहे. धात्री म्हणजे बाळाची आई किंवा आईच्या अभावात बाळाला दूध पाजणारी स्त्री. पूर्वीच्या काळी  तिला दूधआई म्हणत. हल्ली याच प्रकारची संकल्पना ब्रेस्टमिल्क बँकच्या स्वरूपात पाहायला मिळते.  दोन्ही संकल्पनांमध्ये आईचे दूध मिळत नसल्यास बाळाला किमान स्त्रीदुग्ध मिळावे याचा प्रयत्न दिसतो. 
                       यासाठी सगळ्यात आधी बाळाच्या आईने/धात्रीने  कसे राहावे , हे सांगितले आहे. स्त्रीने आहार-विहाराचे पथ्य पाळावे. कारण चुकीचा आहार- विहार करणाऱ्या स्त्रीचे वातादि दोष कुपित होऊन स्तन्य दूषित करतात.  ज्यामुळे बालकांमध्ये काही आजार होताना दिसतात.याशिवाय धात्री ही मध्यमवयीन (साधारणतः २० ते ४५ वयाची), अतिकृश किंवा अतिस्थूल नसावी, अव्यसनी, शुचिर्भूत (स्वच्छतेचे नियम पाळणारी), अरोगा (निरोगी), वत्सल,आनंदी  व प्रेमळ असावी. या सगळ्या नियमांकडे नीट लक्ष दिल्यास लक्षात येईल कि यामध्ये स्वच्छता, शारिरीक  व मानसिक स्वास्थ्य यावर जास्त भर दिला आहे.  
  2. स्तन्यानाश (दूध कमी होणे) कारणे  - क्रोध, शोक, अवात्सल्य(lack of love for child ) , कुपोषण ही कारणे  दूधाचे स्रवण कमी करणारी ठरू शकतात असे आचार्य सांगतात . आधुनिक संशोधनाद्वारे सुद्धा  हे  सिद्ध  झाले आहे की Oxytocin आणि prolactin  ही  संप्रेरके आणि स्तनपानाची मुख्य प्रक्रिया (let down  reflex ) यामध्ये मातेच्या भावना महत्त्वाच्या असतात.तसेच नकारात्मक-दुःख्खी  विचार करणाऱ्या स्त्रियांच्या स्तन्यातील IgA  या इम्युनोग्लोब्युलिनचे प्रमाण कमी असते. यामुळे आयुर्वेदीय संहितांमधील दावे योग्य असल्याचेच सिद्ध होते. 
  3. मातेने करावयाचे पथ्य - यासाठी मातेने पुरेशी विश्रांती घ्यावी. मन प्रसन्नचित्त ठेवावे.रोज संपूर्ण अंगाला मालिश करून शेक घ्यावा.  आहारात गहू,ज्वारी, साठेसाळी किंवा तांदळाची उकड काढून केलेली भाकरी, शिंगाड्याचे पीठ,खोबरे (ओले किंवा सुके), अहळीव , तीळ, दुधी भोपळा , पडवळ, शिराळे ,हिरवे मूग, मुगाची डाळ, शेवगा,सुरण, कच्ची केळी , मसाल्याच्या पदार्थांत लसूण , जीरे ,धणे, काळे मिरे,दालचिनी,खसखस,शेपा  , खारीक ,खजूर, अक्रोड,बदाम  यासारखा सुकामेवा , शतावरी ,ज्येष्ठमध, विदारीकंद  यासारखी द्रव्ये आहारातमोठ्या प्रमाणात वापरावी. 


(क्रमशः )

               

Wednesday, 20 March 2019

*Holi tips for Skin & hair*



*Samanwaya Ayurveda's*☘
*Holi tips for Skin & hair*

               The nation is gearing up to celebrate one of their most loved festivals, Holi.
             Also called the festival of colours, Holi is one of the most widely celebrated festivals of the subcontinent.
            We have all the tips and tricks you would need for your beauty needs.

*#Keshayurved* *#Samanwaya Ayurveda*

1. Hair-care
◆On the day of Holi, make sure you massage or oil your hair from the roots with coconut oil
◆ Tie your hair in a braid or bun to avoid maximum damage.Brush off the dry colors that must have been accumulated in your hair. Stand under running water for 10 minutes and let the colors wash off from your hair.
 Gentle rub on the scalp is good to loosen up the formation of clots blocking the pores.

To get rid of wet colors, first rinse hair thoroughly with cold water . You can then apply a homemade mask..

1/2 tbsp. olive oil

1 tbsp. coconut oil,

1 tsp honey

1 tsp yogurt.

Make a fine paste by blending all ingredients, apply it on your scalp and hair and leave it for an hour. Then, wash it off. This will deeply condition your hair. Use natural cleanser shikakai.ritha.

*#Keshayurved* *#Samanwaya Ayurveda*

2. Skin Protection
◆On the day of Holi, make sure you apply almond oil all over your body. Especially, on the parts that are most exposed. Oiling the skin prevents colours from sticking to the body, and makes it easier to rinse off the colours post the play. In addition to this, almond oil is also a rich source of vitamin E and provides nourishment to the skin.

◆Face masks
You can use chandan + dahi face mask.
Chandan + cucumber juice face mask works best on colour allergies.
Aloevera gel is also useful for cooling effect.
Avoid using soaps or face-wash as they are alkaline in nature and will dry your skin more.
Using banana peel - you can rub inner surface of banana peel to remove excess colour.

*Happy & safe holi*🍂
*Eco friendly holi*🌸🍃

*for More info contact*--
*Dr Snigdha Churi-Vartak*
Samanwaya Ayurveda And panchakarma clinic.
*Authorized Keshayurved Branch*
(India's first ISO certified Ayurvedic hair testing lab)
*9870690689*