Pages

Saturday, 30 May 2020

जगायचं कसं ?? घाबरत - रडत की हसत? - कोरोनाविरुद्धची लढाई



                                                            image courtesy - alfaenergy.com 


सकाळी -सकाळी फोन किणकिणला तेव्हा श्रियाच्या आईचा काळजीयुक्त सूर ऐकून स्निग्धाला वाटले की श्रियाच्या स्पर्धेच्या प्रकल्पाची काही अडचण असेल. पण सोनिया जरा जास्तच काळजीत होती. 

“खूप टेन्शन येतं  गं  मला, काही सुचत नाही. सगळं ठीक असल्याचा आव आणते मी , मुलांबरोबर,घरकामात मन रमवते पण सतत मनाला घोर लागून राहतो. अनिलला रोज ड्युटीसाठी बाहेर जावं लागतच. तो घरी आल्यावर पटकन आंघोळ करतो. त्याचे कपडे चटकन धुवून टाकतो. त्याचे बूट, गाडीची चावी निर्जंतुक करणे वगैरे सगळी खबरदारी आम्ही घेतो. तो आमच्याशी थेट संपर्कसुद्धा टाळतो. पण तरीही मला काळजी  राहते. परवाच त्याच्या काही सहकाऱ्यांची टेस्ट पॉसिटीव्ह आली. संजय त्यांच्या थेट संपर्कात नव्हता पण तरीही माझ्या जीवाची घालमेल होत राहते. काय करता येईल गं? घरी आम्ही सगळेजण तू पाठवलेले आयुर्वेदिक उपाय पाळतो. पिल्सपण मिळाल्या आहेत आमच्या सोसायटीमध्ये. च्यवनप्राश मिळतच नाहीये सध्या, तोही घ्यायला हवाच आता कुठूनतरी. आईपण आहेत ना घरी, त्यांचे BP, शुगर. त्यात आता जून महिना आल्यावर काय होतंय, श्रीया-आर्यनच्या  शाळा-कॉलेजेसचं कसं होईल? खूपच काळजी वाटते गं मला.......”

“हो, हो, अगं जरा दम घे.किती काळजी करशील? ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात ना त्यातली गत झालीये तुझी.”

“हो ना गं, म्हणतात ना, ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ त्यातली गत.”

“मला तुझं काळजी करणं समजतं. सुरुवातीला साध्य सर्दी-तापाची लक्षणे दाखवणारा हा आजार पाहता-पाहता  माणसाला अत्यवस्थ करतो आणि  त्यासाठी अजूनही काही सुनिश्चित चिकित्सा (Definitive  Treatment ) किंवा लस  (Vaccine) नाही हेच सर्वांना चिंताक्रांत करते आहे.

पण तू दुसरी बाजूसुद्धा बघ ना, कोरोनाची  बाधा होऊनही बरे होणारे कितीतरी रुग्ण आहेत. आजच्या घडीला भारतात एकूण _१७४००० कोरोनाबाधित रुग्ण नोंदले गेले आणि त्यापैकी बरे झालेले ८२३७० रुग्ण आहेत तर ४९७१ मृत्यू_ झाले आहेत. म्हणजे प्रत्येक कोरोनाबाधिताचा मृत्यू अटळ नाही उलट याआधी आलेल्या साथींपेक्षा बरीच कमी मारकता  आहे या आजाराची. बरं  दुसरी गोष्ट अशी की जे मृत्यू झाले आहेत, त्यापैकी बहुतांश व्यक्तींना आधीच काहीनाकाही आजार होते. उदा. - मधुमेह,उच्च रक्तदाब,किडनीचे आजार, श्वसनाचे आजार, हृदयविकार,स्थूलता. तसेच साठीपलीकडच्या  व्यक्ती ज्यांना असे आजार होते, बळी  पडल्या आहेत. _विज्ञानाच्या भाषेत याला Co-morbidity असे म्हणतात. म्हणजे आधीपासूनच आजारांनी जर्जर झालेल्या शरीरात जेव्हा कोरोना संसर्ग झाला, तेव्हा गुंतागुंतीची (Health Complications)ची शक्यता_ वाढते. जी जीवावर बेतू शकते. 

“ओके , मग आता गं? आईंना  आहेच ना BP /sugar, अनिललासुद्धा कोलेस्टेरॉलचा त्रास आहेच. अजून काही इम्युनिटी बूस्टर्स नाहीत का?किंवा आयुर्वेदिक लस वगैरे?”

“सोनिया,हरदासाची कथा परत मूळपदावर येते आहे. तुझं गोंधळलेपण,अगतिकता लक्षात येतेय माझ्या पण आयुर्वेदिक लस  असे काही प्रकार नाहीत गं. मुळात लस म्हणजे तरी काय?तर एखाद्या *संसर्गजन्य जीवाणू किंवा विषाणू (अनुक्रमे Bacterias आणि Viruses ) यांचे सूक्ष्मभाग ( ज्यांना Live attenuated किंवा Toxoids असे म्हणतात.) शरीरात प्रविष्ट केले जातात. त्यांना प्रतिसाद म्हणून शरीर प्रतिपिंडे(Antibodies) करते. मग पुढे  आजाराचे विषाणू/जिवाणू शरीरात संसर्ग करण्याच्या तयारीत असतील तर  antibodies त्यांचा फडशा पडतात. तसेच भविष्यात कधी पुन्हा त्या आजाराचा धोका असेल तर शरीराला त्याची आठवणसुद्धा करून देतात.* पण ही अश्या प्रकारची रोगप्रतिकारक्षमता त्या-त्या आजारापुरताच असते आणि प्रामुख्याने संसर्गजन्य आजारांसाठीच असते.पण आयुर्वेदात वर्णन केलेले  *व्याधीक्षमत्त्व* हे या सगळ्यांपेक्षा खूप व्यापक आहे. Immunity म्हणजे जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या आजाराविरुद्ध असलेली रोगप्रतिकारकक्षमता एवढाच अर्थ न घेता, *प्रत्येक आजाराचा (Systemic diseases, infectious diseases,Allergic disease and even Autoimmune diseases) यथाशक्ती प्रतिकार करण्याची शरीराची ताकद* असा घेतला पाहिजे. त्यामुळे व्याधीक्षमत्त्वासाठी ‘पी हळद न हो गोरी’ असा *कोणताही इन्स्टंट फॉर्मुला नाही.* फक्त काढे,पिल्स घेऊन नाही तर त्यांचा *नियमित सराव  गरजेचा* आहे. 

त्याही पुढे जाऊन आचार्य म्हणतात,

*‘समदोष: समाग्निश्च समधातु मल:क्रिया ।

प्रसन्नात्मेन्द्रियमनसश्चेति स्वस्थ इत्याभिधियते ।।*

म्हणजे  ज्या व्यक्तीचे _त्रिदोष (वात -पित्त-कफ) , अग्नि  म्हणजे पचन आणि सूक्ष्मपचन (digestion & metabolism), सप्तधातू (रस-रक्त-मांस-मेद-अस्थी-मज्जा-शुक्र), तीन मल (मल,मूत्र-घाम) यांचे व्यापार नियमित आणि प्रमाणात सुरु असतात.आत्मा, एकादश इंद्रिये आणि मन यांचा  एकमेकांशी योग्य ताळमेळ_ असतो. अश्या व्यक्तीला स्वस्थ म्हणावे. नीट विचार केलास तर ही *इसवीसनपूर्व ६०० साली केलेली  व्याख्या* WHO ने १९४८ साली वर्णन केलेल्या   _Health is a state of complete physical, mental, and social well-being, not merely the absence of disease or infirmity_. या व्याख्येचे सगळे निकष तर करतेच पण अधिक सूक्ष्मतेने विचार करणारी आणि परिपूर्ण आहे.”

“पण मग हे सर्व सगळे शरीरघटक समावस्थेत असतात का?”

“नाही , कारण *गर्भधारणेच्या वेळी आपली जनुकीय घडण (Genetic  makeup), त्या वेळेचा ऋतू,राहता देश यावर गर्भाची प्रकृती* ठरत असते. त्या प्रकृतीच्या अनुषंगाने आहार-विहार करत आरोग्य सांभाळणे म्हणजे व्याधीक्षमत्त्व कायम राखणे. यासाठी *दिनचर्या-ऋतुचर्या आणि पंचकर्मादि उपचार* सांगितले आहेत. *आपला दिनक्रम - सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे-काय टाळावे, म्हणजे दिनचर्या.* उदा.- दात घासताना टूथपेस्ट वापरावी का?ब्रश कसा असावा?व्यायाम का आणि कसा करायचा?आहार किती आणि कोणता या आणि अश्या अनेक दिनचर्येच्या उपायांबद्दल आचार्यांनी विस्ताराने सांगितले आहे. तसेच *ऋतुचर्या म्हणजे ऋतूनुसार पाळायचे पथ्य.* कारण पृथ्वीच्या परिवलन-परिभ्रमण गतीमुळे, स्वतःच्या अंशाभोवती  कळण्यामुळे निसर्गात होणारे दिवस-रात्र, ऋतुमानाचे बदल शरीरावर दिसतात. त्यानुसार त्रिदोषांचा नैसर्गिकरित्या संचय-प्रकोप-शमन होत असतो. तेव्हा *त्या-त्या ऋतूनुसार आहार-विहार आधी सांगितल्याप्रमाणे दोष-धातू-मलांचे  सात्म्य राखण्यास मदत करतो.* ”

“पण तरीही अश्या काही गोष्टी असतीलच ना, नाहीतर मग प्रत्येकजण दीर्घायुषी होईल.”

“बरोबर आहे तुझं म्हणणं,पण आधी सांगितल्याप्रमाणे, *प्रकृती हा एक महत्त्वाचा घटक* आहे तसेच सध्याच्या काळात बऱ्याच जणांना *चुकीच्या जीवनशैलीमुळे  प्रकृतीच्या तक्रारी असतातच. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे जन्मतः दुर्बल प्रकृती असणारे, स्थूल, सतत चुकीच्या वेळी किंवा नेहमीच्या आहारापेक्षा वेगळा आहार घेणाऱ्या व्यक्ती (असात्म्य आहार), मानसिकरित्या दुर्बल व्यक्ती (अल्पसत्त्व) यांना  आजार पटकन गाठतात.* ”

“हो , व्यवहारातही हे दिसताच की मनाने कच खाल्ली तर साधा आजारही जीवघेणा ठरतो आणि मन खंबीर असेल तर असाध्य आजारांतूनही लोक बरे झाले आहेत.”

“बरोब्बर, म्हणून *नियमित वेळी,घरी शिजवलेला-ताजा आहार घेणं, रोज व्यायाम-योगासने-प्राणायाम करणं, आवश्यक तेवढी झोप घेणं,नियमित पंचकर्म करून घेणं हे गरजेचं* आहे. मात्र हे *उपचार करताना आणि आधीपासूनच काही आजार असतील तर आपल्या जीवनशैलीप्रमाणे आवश्यक असा ऋतूनुसार आहार-विहार नीट वैद्यांच्या सल्ल्यानेच* ठरवून घ्यावा. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने एकच सरसकट डाएट प्लॅन सगळ्यांनीच दामटून करणे हे अजिबात योग्य नाही.

त्याबरोबर हेसुद्धा समजून घ्यावं लागेल की  आता हळूहळू लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची प्रक्रिया सुरु होईल. कारण कायमस्वरूपी लॉकडाऊन  शक्यच नाही. आणि जगभरातील देशोदेशीच्या एपिडेमीओलॉजिस्टस नी  दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे  कदाचित पुढचे वर्षभर तरी कोरोनाची लक्षणे दाखवणारे रुग्ण दिसून येऊ शकतील. पुन्हा पुन्हा waves सारखे येऊ शकेल हे infection. त्यामुळे वर नमूद केलेल्या उपायांनी आपले *व्याधीक्षमत्त्व चांगले ठेवणे, सोशल डिस्टंसिन्ग पाळणे,मास्क वापरणे, हात साबणाने स्वच्छ धुणे, अनावश्यक स्पर्श टाळणे,गर्दीची ठिकाणे टाळणे* या गोष्टी आपल्याला मनात पक्क्या बसवाव्या लागतील. पुढे कधीही सर्दी-तापाची लक्षणे दिसली तर पूर्वीसारखे ‘काही नाही,साधा वायरल तर आहे.’ असे म्हणून गाफील न राहता *वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे,स्वतःला इतरांपासून थोडे विलग ठेवणे*  गरजेचे राहील.तरंच  ही  कोरोनाविरुद्धची लढाई आपल्याला जिंकता येईल.”

 “बरं  वाटलं गं  तुझ्याशी बोलून. आजपासूनच आम्ही ही सप्तसूत्री कटाक्षाने पाळू.”


टीप - वैद्यांचा सल्ला घेताना ते शिक्षित आणि नोंदणीकृत वैद्य आहेत याची खात्री करून घ्यावी.

आपली मते व काही शंका असल्यास त्या आपण मला वैयक्तिक क्रमांक अथवा इमेलद्वारे विचारू शकता. यापुढील लेख दर रविवारी सकाळी ०९:०० ते ११:०० च्या दरम्यान प्रसिद्ध केले जातील. हे लेख आपल्याला व्हाट्सऍप /फेसबुक/इमेलद्वारे हवे असल्यास आपण खाली दिलेल्या क्रमांकावर मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. 

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ३१ मे २०२० रोजी आपल्या *https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/blog-post_30.html* या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)

Thursday, 21 May 2020

स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू - भाग 6 व अंतिम

दूध 




“काय श्रीया , करायची का सुरुवात?”

“हो, आजचा विषय थोडा समजावून सांग हं मावशी , दूध आणि शत्रू हे जरा गोंधळवून टाकणारे आहे.”

“नक्कीच, आयुर्वेदशास्त्रात दूध खूप महत्त्वाचे सांगितले आहे. ‘मधुर,पिच्छिल (viscous /दाट ) , शीत (थंड), स्निग्ध , गुरु ,श्लक्ष्ण ,सर (सारक), आणि  गुणांचे आहे.मधुर रस आणि विपाकाचे आहे. त्यामुळे ते आपले शरीर  बनवणाऱ्या सातही धातूंना पोषण देणारे आहे. आयुर्वेदामध्ये एक संकल्पना आहे ‘ओजस’. हे ओज रस-रक्तादी सप्तधातूंचा सारभाग असते. या ओजाचे आणि दुधाचे गुण सारखेच आहेत त्यामुळे दुध खूप महत्त्वाचे आहे.आपल्याला जन्मापासून आईच्या दुधाची सवय असते त्यामुळे मूल  सहा महिन्यांचे झाल्यावर त्याला बाहेरचे अन्न  सुरु करताना दुधापासूनच सुरुवात करतात. यालाच ‘आजन्मसात्म्य’ असेही म्हणतात. गायीचे दूध बुद्धिवर्धक , बलवर्धक आहे. सतत श्रम करणारी माणसे,मग ते शारीरिक श्रम असो किंवा अभ्यास-ऑफिसच्या कामामुळे येणारे मानसिक श्रम , यांच्यासाठी गायीचे दूध खूप लाभदायक असते.”

“म्हशीचे दूध पण वापरतात ना?”

“हो, म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा स्निग्धपदार्थ जास्त असतात, त्यामुळे ते पचायला जड, जास्त थंड गुणाचे आणि कफ वाढवणारे असते. त्यामुळे ज्यांना वारंवार भूक लागते , झोप येत नाही अश्या व्यक्तींनी वैद्यांच्या सल्ल्याने म्हशीचे दूध घेता येईल.”

“पण मग एवढं चांगलं आहे तरी दुधाला पांढरा  शत्रू का म्हणत आहेत सध्या?”

“कारण हे सगळे गुण  जेव्हा आयुर्वेदात सांगितले गेले तेव्हा भारतात देशी गाई होत्या. देशी गाई म्हणजे पांढऱ्या किंवा तपकिरी रंगाच्या आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वशिंड असलेल्या गायी. पूर्वी संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात गीर, राठी , हरियाणवी , देवणी ,डांगी , कंधारी, खिल्लारी अश्या तब्बल ३८ वेगवेगळ्या जातींच्या गायीचे दूध वापरले जाई. आजही या जाती आहेत पण यांचे दूध कमी प्रमाणात वापरले जाते. दूध देण्याची क्षमता आणि कालावधी कमी असल्यामुळे हळूहळू यांचा वापर कमी झाला आणि त्याचवेळी जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन मिळवण्यासाठी भारतात जर्सी - होल्स्टिन फ्रिजियन या जातीच्या विदेशी गायींचे  दूध वापरले जाऊ लागले. त्यातही उत्पादन मिळावे म्हणून दुधात पाणी मिसळणे , त्याहीपुढे जाऊन आरारूट सारखे स्टार्च , कॉस्टिक सोडा , युरियासारखी घातक  रसायने मिसळणे असे प्रकार होऊ लागले. भारतात दुधाची मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने असे प्रकार वारंवार घडतात आणि त्यावर नियंत्रण आणणे कठीण होऊन बसले आहे. काही ठिकाणी उत्पादकच गायींना दूध जास्त यावे म्हणून हार्मोन्सची इंजेकशन्स देतात किंवा त्या आजारी पडू नयेत म्हणून अँटिबायोटिक्स त्यांच्या अन्नात आधीपासूनच मिसळले जातात. हे हॉर्मोन्स आणि अँटिबायोटिक्सचे घातक अंश गायींच्या  दुधातून शेवटी ते पिणाऱ्यांच्या शरीरातही जाऊन अपाय करतात.तसेच गायींना आणि हा प्रकार तर म्हशीच्या दुधाबाबतसुद्धा होतो.त्यात सध्या दुधावर होमोजिनायझशन नावाची प्रक्रिया केली जाते.हे करताना दुधातील स्निग्धांश (fat  globule ) चा आकार लहान केला जातो ज्यामुळे दूध दात होते. दूध लवकर खराब होत नाही. दुधाची प्रत चांगली दिसते. आणि या दुधाला साय येत नाही.पण त्याचमुळे हे छोटे स्निग्धकण रक्तात सहज शोषले जातात. ज्यामुळे रक्तवाहिनीत हे कण  साचण्याची शक्यता वाढते. तसेच होमोजिनायझेशनच्या प्रक्रियेत व्हिटॅमिन D  आणि A चा ह्रास होतो. यासाठी मग काहीवेळा बाहेरून व्हिटॅमिन D  आणि A त्यामध्ये मिसळले जाते पण ते शरीरात शोषले जाईलच याची खात्री देता येत नाही.   ”

“अरे बाप रे!!   आणि मावशी A2 हे काय आहे?”

“A2 आणि A1 हे बीटा केसीन नावाच्या प्रथिनांचे प्रकार आहेत. जे गायीच्या दुधात आढळतात. A2 प्रथिन भारतीय वाणाच्या गायीच्या दुधात तर  A1 विदेशी वाणाच्या गायीच्या दुधात आढळते. काही संशोधने असे सांगतात कि हे A1 बीटा केसीन मधुमेह , हृदयरोग,स्वमग्नतेसारख्या आजारांना कारणीभूत असू शकते.”

“मग आता काय करायचं ग?

“यासाठी देशी गायीचं होमोजिनायझेशनची प्रक्रिया न केलेलं दूध वापरता येईल. दुधाची भेसळ टाळण्यासाठी खात्रीच्या विक्रेत्याकडून दूध घेता येईल.  आपले पचन कसे आहे हे बघून , गरज वाटली तर वैद्यांचा सल्ला घेऊन, गायीचे दूध वापरावे कि म्हशीचे हे ठरवावे. रोज दूध पिताना त्यामध्ये थोडी हळद किंवा सुंठ घालून उकळवून घ्यावे. पण दूध हे गुरु म्हणजे पचायला जड असते त्यामुळे मेहनत,व्यायाम  करणाऱ्या व्यक्तीला , ज्याची पचनशक्ती चांगली आहे त्यालाच ते पचेल. पोटभर नाश्ता करून वर भलामोठ्ठा पेला भरून दूध पिणे अजिबातच नको, प्रमेह ,मधुमेहाच्या रुग्णांसाठी दूध आणि दुधाचे पदार्थ वर्ज्य सांगितले आहेत. त्यामुळे त्यांनी तर वैद्यकीय सल्ल्यानुसारच दूध घ्यावे. चला आज आपले  पाचवे आणि शेवटचे सत्र झाले. काय काय मुद्दे मिळालेत तुला?”

“खूप इंटरेस्टिंग माहिती मिळाली आहे मला. आपल्या आहारातले नेहमीचे ,पारंपरिक आणि गुणकारी असे हे पाच पदार्थ पण तपकिरी-पिंगट म्हणजे वाईट आणि पांढरे म्हणजे शुद्ध , चांगले अश्या गैरसमजामुळे आणि खूप प्रक्रिया करण्याच्या नादात आपण त्यांचा चांगुलपणा हरवून बसलो आणि अनावश्यक आजारांना निमंत्रण दिले. सोपं- इन्स्टंट करण्याच्या नादात कस,पोषणमूल्ये हरवली , चवीच्या-दिखाऊपणाच्या सोसामुळे निकृष्ट अन्न  आपणच आपल्या घरात घेऊ लागलो. या सगळ्याच्या परिणामस्वरूप देशी वाणे , बी-बियाणे यांचा ह्रास होत आहे. त्यामुळे हे दुष्टचक्र मोडून आपल्या पारंपरिक  पद्धती पुन्हा प्रवाहात आणणे हेच आपल्यापुढील मुख्य ध्येय असायला हवे.”

“वाहवा, क्या बात है!! श्रीया  तू आपल्या चर्चेचं सार तर सांगितलंसच  आणि सादरीकरणाचा अगदी परिपूर्ण समारोप केलास. असेच उत्तम सादरीकरण कर. स्पर्धेसाठी तुला शुभेच्छा. ‘विजयी भव’. “

“थँक यु , मावशी.”

(समाप्त)


टीप - स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू या लेखमालेचा आज समारोप होत आहे. आशा  आहे कि आपल्याला ही  लेखमाला जरूर आवडली असेल. आपली मते व काही शंका असल्यास त्या आपण मला वैयक्तिक क्रमांक अथवा इमेलद्वारे विचारू शकता. यापुढील लेख दर रविवारी सकाळी ०९:०० ते ११:०० च्या दरम्यान प्रसिद्ध केले जातील. हे लेख आपल्याला व्हाट्सऍप /फेसबुक/इमेलद्वारे हवे असल्यास आपण खाली दिलेल्या क्रमांकावर मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. 


डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी २१ मे २०२० रोजी आपल्या *https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/6.html* या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)



Wednesday, 20 May 2020

स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू - भाग 5


साखर .






“स्निग्धा मावशी,आज मी साखरेबद्दल वाचत होते तेव्हा मी सल्फरलेस शुगर असा शब्द ऐकला.म्हणजे काय गं?”

“उसाचा रस यंत्राने काढताना त्या रसात अनेक प्रकारचे इतरही घटक असतात. जसे कि सालीचे तुकडे,गोंदासारखे चिकट पदार्थ, तंतुमय पदार्थ ज्यामुळे साखर नीट तयार होऊ शकत नाही आणि हे सगळे पदार्थ फक्त गाळल्याने निघू शकत नाहीत.तसेच उसाच्या रसापासून साखर बनवताना,तो आटवला जातो. त्यामुळे त्याचा रंग गडद तपकिरी असतो. गुळाचा रंग असतो तसा. आता त्यापासून साखरेचे पांढरेशुभ्र स्फटिक तयार व्हावेत, साखर जास्त दिवस टिकावी आणि या अशुद्धी काढता याव्यात यासाठी म्हणून सल्फरचा वापर केला जातो. कधीकधी ऊस तयार व्हायच्या आधीच काढला गेला असेल तर सल्फरचा वापर केला जातो.या पद्धतीला Double sulphatization असे नाव आहे.  हे सल्फर प्रामुख्याने सल्फर डायॉक्साईड म्हणून वापरले जाते. आणि या प्रक्रियेत साखरेच्या स्फटिकांमध्ये सल्फरचे अंश राहतात.  या सल्फरमुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. हे  सल्फरचे अंश शरीरात शोषले गेल्यावर कोशिकाभित्तीना (Cell Membranes ) इजा पोहोचवतात. कारण हे सल्फर डायॉक्साईड जेव्हा शरीरातील पाण्याच्या अंशासोबत मिसळते तेव्हा H2SO3 / H2SO4 चे अंश तयार होतात.आणि यामुळे सर्दी-खोकला-श्वास घ्यायला त्रास होणे-छातीआवळाल्याप्रमाणे वाटणे असे श्वसनसंस्थेचे आजार जाणवतात.वारंवार सर्दी-खोकला होणारी माणसे,लहान मुले, दम्याचे रुग्ण,COPD,LUNG FRIBOSIS, INTERSTITIAL LUNG DISEASE असे श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांसाठी हि साखर म्हणजे विषच. आपण जेव्हा साखरेला शत्रू असे म्हणतो तेव्हा ही पांढरी साखरच आपल्या शरीरावर विषसमान कार्य करत असते. कारण फक्त आधीपासून श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तीच नाही तर लक्षणे नसलेल्या निरोगी व्यक्तींनाही अशी साखर सतत खाल्ल्यामुळे त्रास होतो. तसेच या साखर कारखान्यांतून निघणारा सल्फर पुढे वायू प्रदूषणाचालासुद्धा कारणीभूत ठरतो. ”

“अरे बापरे, कठीणच आहे हे सगळं प्रकरण.”

“हो तर, आणि सल्फरलेस साखरेमध्ये calcium क्षार वापरून मळी शुद्ध केली जाते. “

“पण  मग कळणार कसे  कि साखर कशी  बनवली आहे?”

“कसं  आहे , सल्फर वापरून बनवलेल्या साखरेला म्हणतात  प्लांटेशन व्हाईट शुगर (Plantation White Sugar) आणि सल्फरलेस साखरेबाबत पिशवीवर उल्लेखसुद्धा असतो तसेच त्या साखरेला म्हणतात रिफाईंड शुगर (Refined Sugar).आता तिसरा एक प्रकार असतो तो म्हणजे ऑरगॅनिक साखर , या प्रकारात मळी  शुद्ध करण्यासाठी ऑरगॅनिक म्हणजे नैसर्गिक स्वरूपाचे पदार्थ वापरले जातात. तसेच कच्ची साखर (Raw Sugar) , खांडसरी (Brown Sugar) असे प्रकारही ऑरगॅनिक पद्धतीने बनवले जातात. या प्रकारांचा वापर आपल्याला जेवण बनवताना वापरता येईल.”

“अच्छा म्हणजे जर आपण ऑरगॅनिक साखर वापरली तर काही टेन्शन नाही ना?”

“हो चालू शकेल ,पण  अगं मग तुझ्या आवडीच्या डेझर्ट्सचं काय करणार तू? ही प्लांटेशन व्हाईट शुगर स्वस्त असल्यामुळे विकतच्या सगळ्याच गोड पदार्थांमध्ये जसे केक,मूस,डोनट, आईसक्रीम, मिठाई सगळीकडेच वापरली जाते.”

“हम्म, म्हणजे आता गोड पदार्थ जपूनच खावे लागणार तर...... बरं आयुर्वेदामध्ये साखरेचे  काही गुण  सांगितले आहेत का?”

“ हो, आयुर्वेदामध्ये साखर आहे ना. पण हि साखर म्हणजे उसाच्या रसापासून नैसर्गिकरित्या तयार केली जाणारी साखरआहे. आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार साखर ही मधुर रस-विपाकी ,रुचिकर, वात आणि पित्तदोषाचे शमन करणारी, रक्ताचे आजार कमी करते. दाह कमी करणारी आहे. साखर शरीराला बळ  देते , तृप्तता देते. कारण मधुर रस सप्तधातूंना बळ देणारा आहे. पण अति प्रमाणात सेवन केले तर स्थौल्य,प्रमेह ,वारंवार गळवे  येणे , भूक न लागणे असे त्रासही होऊ शकतात. आणि शुगर ऍडिक्शनचाही धोका होऊ शकतो. ”

शुगर ऍडिक्शन??? म्हणजे काय?”

“कपकेक्सपासून कोल्ड्रिंक्सपर्यंत हल्ली बऱ्याचशा तयार गोड पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते आणि बऱ्याच वेळेला असं होतं  की चाळा म्हणून, कधी कधी खूप निराश वाटत असताना, भावनिक स्थिती चांगली नसताना मनाला उल्हसित करण्यासाठी या गोड पदार्थांचा आधार घेतला जातो. यातील साखरेमुळे शरीरात डोपामिन नावाच्या रसायनाची जास्त निर्मिती होते.हे डोपामिन शरीराला उल्हसित करते. त्यामुळे सतत मानसिक,शारीरिक ताण-तणाव सहन करणाऱ्यांचा ओढा सहसा गोड पदार्थांकडे असतो. बऱ्याचदा अश्या व्यक्ती एखादा तणावाचा प्रसंग घडताना वा घडून गेल्यावर गोड पदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त करतात. आणि या पदार्थांत वापरली जाणारी साखर ही ग्लुकोस, सुक्रोस आणि डेक्सट्रोस या प्रकारांतली असते. त्यामुळे ती रक्तात पटकन शोषली  जाते आणि मेंदूला तिचा पुरवठा होऊन उल्हसित वाटते पण जर असे सारखे सारखे झाले तर जेव्हा साखर खाण्यात  येत नाही तेव्हा मेंदूला मरगळ आल्यासारखे वाटते मग परत गोडाचा आधार घेतला जातो.”

“मग हे थांबवायचं कसं ?”

“कटाक्षाने हळूहळू थोडी थोडी साखर कमी करायची. व्यायाम करायचा. गोड चवीचे पण जास्त तंतुमय असे पदार्थ उदा. गाजर,फळे खायचे. , कोमट पाणी प्यायचे.”

“ह्म्म्म, छानच माहिती मिळाली हं मावशी आज. प्लांटेशन व्हाईट शुगर , आयुर्वेदातील साखरेचं वर्णन आणि शुगर ऍडिक्शन या तीनही मुद्द्यांवर मस्त मुद्दे बनवते मी .”

“व्हेरी गुड, आता उद्या आपला शेवटचा पदार्थ ‘दूध’. त्या विषयी माहिती घेऊ.”-


(क्रमशः )

-डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

samanwayaayurveda@gmail.com


संदर्भ - double sulphatization - sugarprocesstech.com 


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी २० मे २०२० रोजी आपल्या *https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/5.html* या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


Monday, 18 May 2020

स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू - भाग ४ - पांढरा तांदूळ

पांढरा तांदूळ




“ स्निग्धा मावशी, तू सांगितल्याप्रमाणे आजच्या पदार्थांविषयी मी वाचून आले आहे हं.”

“अरे वाह, मग आज तू गोळा केलेल्या माहितीनेच सुरुवात करूया. काय वाचलं  आहेस बरं  तू?”

श्रीया उत्साहाने सांगू लागली,  “आज मी तांदळाविषयी वाचून आले आहे. तू पहिल्यांदा सांगितलं होतंस ,तेव्हापासून मला खूप उत्सुकता होती. तांदूळ आपल्या आहाराचा मोठा भाग आहे कारण पिष्टमय पदार्थ(कर्बोदके) , प्रथिने, स्निग्धपदार्थ आणि जीवनसत्त्वे अश्या चौरस आहारामध्ये आपल्याला भात/पोळी/भाकरी यामधून कर्बोदके मिळतात. किनारी प्रदेशांत भात हे मुख्य अन्न आहे. पण पूर्वी आपल्याकडे हातसडीचा तांदूळ खायची पद्धत होती. पण आता तांदूळ पांढराशुभ्र दिसावा म्हणून त्याला अति पॉलिश केले जाते. ज्यामुळे तांदळातील चोथा, जीवनसत्त्वे निघून जातात आणि फक्त स्टार्च उरते. हे स्टार्च त्याचा GI जास्त असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. त्यामुळे डायबेटिस होण्याचा धोका वाढतो. म्हणून सरसकट सगळंच नाही तरी हा पॉलिश केलेला तांदूळ खाणे टाळायला हवे.”

“अरे  वाह,छानच केली आहे कि तयारी. बरीचशी माहिती तूच सांगितलीस. आता फक्त थोडासा आयुर्वेदाशी संबंधित भाग मी सांगते म्हणजे झालंच. आयुर्वेदामध्ये तांदळाला ‘शाली’ असे नाव आहे आणि त्यापासूनच आपला ‘साळी’ हा शब्द आला आहे बर का. रक्तशाली, महाशाली,षष्टिक शाली, कलम यासारख्या वेगवेगळ्या जातींचा तांदुळ पूर्वापार आपल्याकडे मिळत होता.आंबेमोहोर, इंद्रायणी, कोलम,सोनामसूरी  अशा जातींची नावे आपल्याला माहित आहेत.खरं तर भात हा आपला पूर्वापार चालत आलेला आहार आहे.भारतीयांच्या आहाराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे  कि तांदळाचे पर्यायी नावच ओदन (म्हणजे अन्न) असे आहे.कारण पचायला हलका असल्याने आजारामध्ये तांदळाची पेज,मऊभात,खिचडी असे पदार्थच खायला दिले जातात.लहान बाळांनासुद्धा पहिल्यांदा बाहेरचे अन्न  देताना तांदूळ भाजून केलेली खिमटी दिली जाते.तांदूळ पित्त-वात शामक आणि कफकर आहे. आणि म्हणूनच कफदोषाचे त्रास कमी करण्यासाठी नवीन तांदूळ न वापरता जुना तांदूळ वापरावा.(आठवतेय का ती “दो सालतक Age किये हुए चावल की” जाहीरात). पूर्वी तांदूळ शिजवताना मोठ्या टोपात शिजवला जाई आणि भात शिजला कि मग जास्तीची पेज निथळून काढत आणि मग भात झाकून ठेवत जेणेकरून वाफ मुरून शीत न शीत मोकळे होई. या पद्धतीत जास्तीचे स्टार्च निघून जाते आणि तू म्हणालीस तसा GI कमी होतो. आणि आपल्याला भात  खाता येईल पण आता आपण कूकरमध्ये भात बनवतो,आणि कूकरमध्ये भात शिजवताना पेज काढली जात नाही त्यामुळे हे जास्तीचे स्टार्च भातातच मुरतात असा भात पचायला जड होतो.” 

“पण मग आता भात  खायचा असेल तर कसा खायचा?”

“काही ठिकाणी हातसडीचा किंवा सिंगल पॉलिश तांदूळ मिळतो  जो आरोग्यासाठी चांगला आहे.असा तांदूळ आपण विकत घेऊ शकतो. तांदूळ घेताना तो किमान ६ महिने ते वर्षभर जुना तांदूळ घेतला तर त्यात पाण्याचे प्रमाण कमी होते. किंवा भात करण्याआधी तांदूळ नीट भाजून घ्यावेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट, संपूर्ण भारतभरातील भाताच्या पारंपरिक पाककृती  वरण-भात, आमटी-भात, राजमा-चावल, सांबर-भात , डाळ-तांदुळाची खिचडी, भात-मासे, बिर्याणी अश्या आहेत. श्रीया नीट बघितलेस तर तुझ्या लक्षात येईल कि या सगळ्या पारंपरिक पदार्थांमध्ये भाताची जोडी प्रथिनांबरोबर म्हणजे डाळी,कडधान्ये,मांसाहार यांच्याबरोबर आहे.त्यात आपल्याकडे कोशिंबिरी,पालेभाज्या ,फळभाज्या असतातच. त्यामुळे जेवणात फक्त भातच खाल्ला असे होत नाही. “ओके  मावशी, म्हणजे अश्या पद्धतीने भात जेवताना डायरेक्ट कार्बोहैड्रेट न जाता इतर तंतुमय पदार्थसुद्धा पोटात जातील याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर भाताचा ढीग लोणच्याबरोबर खायचा आणि नावडती भाजी-कोशिंबीर गुपचूप टाळायची या सवयीमुळे फक्त स्टार्च च पोटात जाईल, बरोबर ना? ”

“बरोबर , आणि थोडंसं  विषयांतर आहे पण तरीही सांगते, लोणचं -भात , सॉस-चपाती, ब्रेड-जॅम, जॅम-चपाती हेसुद्धा खाणं  शक्यतो टाळायला हवे.आता उद्याचा पदार्थ कोणता ठरवूया?” 

“ते मी तुझ्यासाठी सस्पेन्स ठेवणार आहे मावशी” असे म्हणत श्रीया पळाली .  


(क्रमशः)

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

samanwayaayurveda@gmail.com


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/blog-post_18.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


Sunday, 17 May 2020

स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू - भाग ३ - मीठ

मीठ - 




दुसऱ्या दिवशी श्रीयाचा फोन आला तेव्हा मी तयार होतेच.

“तर आजचा पांढरा  शत्रू आहे मीठ.”

“हो हो , मीठ जास्त खाऊ नये म्हणतात ब्लड प्रेशर वाढतं  म्हणतात. पण मीठ शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचा समतोल राखायला मदत करते ना? आणि मीठ नाही खाल्लं तर मग खायचे कसं कारण अळणी जेवण्याचीही कल्पना नाही करता येत गं.”

“अगं बाळा मीठ त्रासदायक आहे पण अजिबातच खाऊ नये असं नाही सांगितलंय आयुर्वेदात. पण प्रमाणात खायला हवं हे मात्र निक्षून सांगितलंय. कारण षड्रसांपैकी लवण रस(खारट चव) हा वात दोषाचे शमन करणारा, पित्त दोष वाढवणारा आणि कफ दोष पातळ करणारा आहे. त्यामुळे तोंडाला चव येते (रुचकर), स्तंभ (पेशी-शिरा जखडणे) कमी होतो, स्वेदनिर्मिती (घाम येणे), स्नेहन (शरीरात मृदुता निर्माण करणारे), संघात कमी होतात  (गाठी/चिकटपणा फुटून मोकळे होते), शरीरात शोषण वाढवण्यासाठी मदत होते आणि तू म्हणालीस तसे शरीरात इलेक्ट्रोलाईटस् चा समतोल  राखला जातो.  पण जर सतत खाण्यात मीठ जास्त खाल्ले जात असेल  तर केस गळणे-पिकणे, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येणे,वेगवेगळे त्वचाविकार, वातरक्तासारखे आजार होऊ शकतात.कधी-कधी त्वचेतून-हिरड्यांतून रक्त येते, वारंवार तहान लागते, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे  सोडियमचे प्रमाण वाढून शरीरात पाण्याचा अंश वाढतो (Water Retention) आणि सूज येते. सामुद्र  मीठ म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून बनलेले मीठ हे पचायला जड आणि कफ वाढवणारे आहे.  ”

“हे झाले आयुर्वेदिक विचारांबद्दल आणि सध्या आपण जे मीठ रोज वापरतो ते समुद्राच्या पाण्यापासून बनलेले असले तरी सामुद्र मीठ(Sea Salt) नाही.”

“एक मिनिट, समुद्राच्या पाण्यापासून बनलेले पण सामुद्र मीठ नाही??? म्हणजे??”

“अगं, म्हणजे  सामुद्र  मीठ म्हणजे ज्याला sea  salt  म्हटले जाते ते समुद्राचे पाणी ऊर्ध्वपातित करून बनवतात. आपल्याला भाईंदरला किंवा अलिबागला जाताना जी मिठागरे दिसतात ना तिथे समुद्राचे पाणी अडवून त्यातला पाण्याचा अंश उडाल्यावर मीठ जमा होते ते सामुद्र  मीठ यात मुख्यतः सोडियम क्लोराईड असते पण त्याचबरोबर मॅग्नेशिअम,पोटॅशिअम,कॅल्सिअमचे क्षारसुद्धा असतात.आपली आजी-पणजी आजी हे मीठ वापरत  तेव्हा ते खडेमीठ नावाने मिळे. पण त्याला पाणी पाझरे ,ते नीट जपून ठेवावे लागे  म्हणून बाजारात जेव्हा “Vaccume evaporated,free-flow आणि सबसे शुद्ध(??) असे मिठाचे ब्रँड आले तेव्हा सोयीचे असल्यामुळे गृहिणी लगेच तिथे वळल्या  आपण यात मेख अशी आहे कि हे मीठ Vaccume Evaporated बनवताना त्यातील इतर क्षार काढून टाकले जातात आणि फक्त सोडियम क्लोराइडचेच क्षार उरतात.त्यामुळे हे मीठ वापरताना शरीरात मोठ्या प्रमाणात सोडियम आणि क्लोराईड जाते जे इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्सला कारणीभूत ठरते. तसेच ते free flow बनवण्यासाठी जे Anti-caking agents (गुठळ्या होऊ नये म्हणून) वापरले जातात. ते पाहता पाझरलेले-चिकट मीठ खाल्लेलेपरवडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे सध्या.”

“अरे बाप रे , मग मीठ नाही खायचे मग काय खायचे ?”

“अगं , मीठ खायचेच नाही असे नाही तर अत्यंत कमी प्रमाणात खायचे, प्रत्येक वेळी वरून मीठ घ्यायचे नाही. कणकेत-भातात मीठ घालायचे नाही , जिथे शक्य होईल तिथे सैंधव वापरायचे. गंमत सांगू आयुर्वेदात तर म्हटलेच आहे की  जिथे लवण शब्द वापरला असेल तिथे सैंधवच वापरायला हवे.”

“पण मग मावशी , शरीरात सोडियम कमी होईल ना ?”
“चांगला प्रश्न विचारलास श्रीया , मोठ्या माणसांमध्ये  दर दिवसाला दीड ते अडीच ग्राम मिठाची गरज असते.म्हणजे लक्षात घे, संपूर्ण दिवसात फक्त १ छोटा चमचा मीठ घ्यायचे आहे. तेवढे पुरेसे आहे. आणि दूध-दुधाचे पदार्थ, अंडी,मासे,ओला नारळ,बीट,पालक यासारख्या भाज्यांमधनंही सोडियम मिळते.त्यामुळे सोडिअमची कमतरता होईल अशी भीती बाळगायचे कारण नाही.
आता आपण उद्या बोलूयात पुढच्या पदार्थविषयी”

(क्रमशः )


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी १७ मी २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/blog-post_17.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


Friday, 15 May 2020

स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू - भाग २

मैदा 



“चला तर मग श्रीया करायची का सुरुवात? आजचा पहिला पदार्थ आहे मैदा.”
मैदा म्हणजेच Refined Wheat Flour म्हणजे गव्हाच्या पिठातील चोथा/कोंडा काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ. आपण जो गहू बाजारातून आणतो तो दलिया, रवा, कणिक अशा वेगवेगळ्या स्वरूपात वापरतो.या सर्व प्रकारात गव्हाचा कोंडा म्हणजेच बाहेरचे तूस-टरफल थोड्याफार प्रमाणात असते आणि हा कोंडाच  महत्त्वाचा किंबहुना पिठापेक्षाही महत्त्वाचा असतो. कारण कोंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ (चोथा/ fiber) असतो आणि या कोंड्यातच जीवनसत्त्वे, खनिजे असतात. असतात. कोंड्याशिवाय मैदा म्हणजे जवळजवळ ९८% पौष्टिक घटक नसलेले पांढरेशुभ्र पीठ आहे ज्यात फक्त कॅर्बोहायड्रेट्स असतात. असा हा मैदा सगळयांना आवडतो कारण मैद्यापासून ब्रेड,बिस्किटे ,खारी ,टोस्ट,पिझ्झा बेस, लादी पाव,पॅटिस, केक्ससारखे बेकरी प्रॉडक्ट्स्, समोसा,पास्ता, नान ,कुलचा,रुमाली रोटीसारखे हॉटेलमधले पदार्थ बनवले जातात.”
“हो गं  मावशी मला पाव-भाजी खूप आवडते आणि पिझ्झा पण.”

“ हे सगळे पदार्थ आपल्याला आवडतात कारण त्यांचा मऊ स्पर्श आणि गोडसर चव. हे शक्य होते गव्हामधील ग्लुटेनमुळे. ग्लूटेन हे बऱ्याचशा तृणधान्यांमध्ये आढळणारे प्रथिन आहे. गव्हामध्ये याचे प्रमाण सगळ्यात जास्त असते. आणि बरं का या ग्लुटेनमुळेच गव्हाच्या पिठाला चिवटपणा- चिकटपणा येतो जो ही सर्व बेकरी प्रॉडक्ट्स बनवताना आवश्यक असतो.
एक Fun Fact  सांगू का? मुळात Gluten हा शब्दच लॅटिन भाषेतील Glue अर्थाच्या शब्दापासून बनला आहे.म्हणजे विचार कर.” 
“इतर धान्यांमध्येही ग्लूटेन असते त्यामुळेच आपण त्या पिठापासून भाकरी बनवू शकतो. पण गव्हामध्ये हे प्रमाण जास्त असते आणि मैद्यामध्ये तर कोंडा नसल्यामुळे ग्लुटेनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हा मैदा आपल्या आतड्यांच्या आतल्या बाजूला चिकट थर निर्माण  करतो आणि ज्यामुळे अन्नाचे नीट पचन आणि शोषण होत नाही. त्यामुळे अपचन , आम्लपित्त, मलबद्धता, पोटात वायू धरल्यासारखे होणे असे त्रास होतात. परत मैद्यामध्ये कोणत्याही प्रकारची खनिजे , जीवनसत्त्वे नसतात. त्यामुळे मैद्याचे पोषणमूल्य शून्य आहे. वारंवार मैद्याचे पदार्थ खाल्ले तर तोंड येणे,त्वचाविकार, मधुमेह,स्थौल्य, पचनाचे त्रास , हृदयरोग यासारखे आजार होतात.” 

“अरे बापरे खूपच त्रासदायक आहे गं या मैद्यामुळे ,अगं  मावशी पण संध्याकाळी खायचं काय??”

“अगं बरेच वेगवेगळे पदार्थ आहेत की गव्हाची पोळी, तंदूर रोटी आणि अगदी पुरणपोळीसुद्धा गव्हाच्या पिठापासून करता येते. गव्हाच्या पिठापासूनसुद्धा केक-पाव असे बेकरी पदार्थ बनवता येतात पण तसे असले तरी हे पदार्थ कधीतरीच खायचे आणि खाताना ताव नाही मारायचा हं. त्याऐवजी छान गरम गरम आई बनवते तो नाश्ता, घरी केलेले लाडू,चिवडा, सुका मेवा,फळे असे पदार्थ खायचे. ”

“हं  म्हणजे मी एरवी नाही खाणार पण माझ्या आणि दादाच्या वाढदिवसाला केक खाईन चालेल ना?”

“अरे वाह , लगेच संकल्प करून झालासुद्धा?? Very  good , चला आता पुढच्या वेळी मीठाबद्दल थोडी माहिती मिळवू.”

(क्रमशः )

छायाचित्र सौजन्य - आंतरजाल.


डॉ. स्निग्धा वर्तक.
samanwayaayurveda@gmail.com


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी १५ मे २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.in या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


Thursday, 14 May 2020

स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू - भाग १

#Samanwaya_Ayurveda
#Five_white_poisons_part_1
#healthy_diet_series_स्वास्थ्यवेद


               लॉकडाऊनच्या काळातही अनया आणि टीम स्वतःला व्यस्त ठेवत होती रोजचे शाळेतील ऑनलाईन तासिका, चित्रकला-हस्तकला याबरोबरच स्वतःला बिझी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठीसुद्धा कामकरत होती. अश्या वेळी एका दुपारी माझा फोन गुणगुणला आणि उचलल्या-उचलल्या श्रीयाचा समोरून आवाज आला.
“मावशी, मला विज्ञान परिषदेत आपला आहार-आपले आरोग्य या विषयावर काहीतरी सादर करायचं  आहे. काय गं  बोलू मी?”
“अरे वाह, छानच विषय आहे की. काय विचार केला आहेस तू?”
“मला वाटतं , आपण जे खातो तसेच आपले आरोग्य असते. म्हणजे रोज घरी शिजवलेला चौरस आहार घेतला तर आपण निरोगी राहू.”’
“छान, अजून काही?”
“हं , तू सांगतेस तसं , त्या त्या ऋतूतली फळं  आणि भाज्या ताज्या खायच्या. सगळ्या भाज्या न कुरकुरता खायच्या.”
“अरे वाह, अजून??”
“अजून??? आणखी काय गं ?? हं जंक फूड नाही खायचं.”
“बरोबर, खूप छान मुद्दे सांगितलेस तू श्रीया. यासगळ्या बरोबरच आपल्या सगळ्या स्वयंपाकघरात नेहमीच असणाऱ्या आणि रोजच्या आहाराचा मुख्य भाग बनलेले ५ पदार्थ आहेत ते म्हणजे साखर , मीठ , मैदा , दूध आणि तांदूळ. सध्या यांना ५ पांढरी विषे (White  Poisons ) म्हणतात.
“काय??? मावशी अगं  दूध आणि तांदुळसुद्धा?? आई मला नेहमी गोड कमी खा. सारखं वरून मीठ घेऊ नकोस म्हणून ओरडते. आजोबांनासुद्धा ब्लड प्रेशर-डायबेटीसमुळे मीठ-साखर कमी खायला सांगितली आहे. पण दूध आणि तांदुळसुद्धा?? अगं  मग खायचे काय?”
“हो हो अगं , थांब जरा. बघ मी तुला नीट सविस्तर सांगते मग तू तुझे मुद्दे तयार कर, ठीके?”
(क्रमशः)

टीप - या लेखमालेचे सहा भाग आजपासून दररोज एक याप्रमाणे प्रसिद्ध होतील.

डॉ. स्निग्धा वर्तक.
samanwayaayurveda@gmail.com

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी १४ मे २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/blog-post_14.html?m=1 या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


Friday, 8 May 2020

आयुष काढा

 

 



                   सुंठेच्या (सुकवलेल्या आल्याचे चूर्ण) परिणामकतेबद्दल व्हाट्सअपवर फिरणारा एक मेसेज वाचला. आणि लोकांना सुंठेच्या वापराचे चांगले अनुभव आल्याबद्दल वाचून खूप आनंद झाला. खरं तर आम्ही वैद्य गेल्या काही दिवसांपासून 'आयुष मंत्रालया'द्वारे सांगितलेल्या *रोगप्रतिकारकक्षमता वर्धक* उपायांचा प्रचार करत आहोत. त्यामध्ये एक महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे ' *आयुष काढा*. ' हा काढा कसा बनवायचा? तर तुळशीची पाने, दालचिनी, काळे मिरे आणि सुंठ हे महत्त्वाचे घटक आणि गूळ, काळ्या मनुका आणि लिंबाचा रस हे *व्यक्तीच्या प्रकृतीनुरूप* आणि चवीनुरूप वापरायचे घटक यापासून तयार होणारा हा काढा, प्रत्येकाने रोज घ्यावा अशी अपेक्षा आहे.

आता ही सगळी औषधे आपल्या घरात सहज उपलब्ध आहेत. आणि दिसायला साधी दिसत असली तरी अत्यंत प्रभावी आहेत. आता या द्रव्यांबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. 

१. *सुंठ* - आयुर्वेदात सुंठेला *‘विश्वभेषज/महौषध’* अशी हि पर्यायी नावे आहेत. कारण अपचन,जुलाबासारखे पोटाचे आजार, आमवात,वातरक्त तसेच सांधेदुखीसारखे वाताचे आजार , शरीरावयवांवरील सूज , श्वसनाचे विकार, वारंवार येणारा ताप अश्या अनेक आजारांसाठी आम्ही वैद्य सुंठीचा वापर आजाराच्या अवस्थेनुरूप करत असतो. ‘छोटा पॅकेट बडा धमाल’ असे हे औषध आहे. *आमपाचन* म्हणजे चुकीच्या सवयी,बिघडलेले पचन यामुळे शरीरात तयार होणारी विषद्रव्ये (आम) यांचा निचरा करण्याचे काम सुंठ करत असते.  


२. *तुळस* - देवपूजेत तुळशीच्या पानांचे महत्त्व खूप मोठे आहे. तुळशीच्या रोगनिवारक गुणांमुळेच पूर्वजांनी ही योजना केली असावी. त्यामुळे बहुतांश  घरात एखादे तरी तुळशीचे रोप असतेच. कफाचा खोकला झाला असेल तर तुळशीचा रसाचे चाटण किंवा पान सर्रास खाल्ले जाते. विषमज्वरामध्येही केला जाणारा  तुळशीचा वापर काहींच्या वाचनात असेलही.
वात-कफदोषनाशक पण पित्तकारक अशी ही तुळस श्वसनसंस्थेचे आजार,पार्श्वशूल (फासळ्यांमध्ये होणाऱ्या वेदना), रक्तदुष्टी यासारख्या आजारांत खूप छान काम करते. तुळस कृमिघ्न आणि ज्वरघ्नसुद्धा आहे. 


३. *दालचिनी* - गरम मसाल्यांमधली दालचिनी हे आयुर्वेदातील खूप छान औषध आहे बरं  का…. कफ-वात दोष कमी करणारी,गोड चवीची असल्याने पिट नियंत्रणात ठेवणारी दालचिनी प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर कार्यकारी आहे. त्यामुळे श्वासाच्या आजारावर वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये दालचिनी असतेच. तसेच अरुची,अग्निमांद्य यासारखे त्रास दालचिनीच्या वापराने नियंत्रणात येतात. 


४ *काळे मिरे* - मसाल्याच्या डब्यातला दुसरा पदार्थ कटू रस-विपाकी आणि उष्णवीर्य असे मिरे कात-वाट कमी करणारे आणि पित्त वाढवणारे आहे. जंतुघ्न, श्वासरोगहर आहे, वारंवार येणाऱ्या तापावर खूप छान काम करते. पचन सुधारते. Piperine हे काळ्या मिरीमधील तत्त्व प्रतिदाह (Inflammation ) कमी करायला मदत करते,शरीर  शोधन करते. पण *पित्त वाढवणारे असल्याने सध्याच्या ग्रीष्म ऋतूत वैद्यकीय सल्ल्यानेच वापरावे.*

 

५. *काळ्या मनुका* - पित्ताचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी काळ्या मनुका वापराव्यात. आकाराने छोट्या पण गुणांनी मोठ्या अश्या या मनुका रक्तपित्त,ताप,श्वासरोग ,सतत तहान लागणे अश्या त्रासांमध्ये खूप छान काम करतात. तिन्ही दोषांचे शमन करतात ,सारक आहेत त्यामुळे *सध्याच्या ग्रीष्म ऋतूसाठी अगदी योग्य.* दुर्बलता-थकवा जाणवत असेल तर काळ्या मनुका जरूर खाव्यात. यातील लोहाच्या प्रमाणामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पण शर्करेचे प्रमाण जास्त असल्याने *मधुमेहींनी वैद्यकीय सल्ल्याने मनुका कशा व किती प्रमाणात* खायचे हे ठरवावे. मनुकांची सविस्तर माहिती वाचायची असेल तर या लिंकवर क्लिक करा.

 https://samanwayayurved.blogspot.com/2014/09/black-raisins_17.htm

तर आयुष काढ्याच्या सर्व घटकद्रव्यांचे गुण  आपण इथे थोडक्यात पाहिले. सविस्तर लिहायचे झाल्यास ‘आयुष काढ्यामागचे विज्ञान’ हा एका मोठ्या लेखाचा विषय होईल. या सर्व वनस्पतींच्या गुणांविषयी झालेली संशोधने आंतरजालावर सहज उपलब्ध आहेत जी आयुर्वेदातील ज्ञानाचे महत्त्व “रिसर्च”च्या माध्यमातूनही अधोरेखिचत करतील. स्वयंपाकघरात असलेल्या या औषधांनी आपले आरोग्य कसे सांभाळायचे आणि काढा कसा बनवायचा याचे प्रमाण व कृती सोबतच्या फोटोमध्ये दिली आहे तरी काही शंका असतील तर जरूर विचारू शकता. 


१ व्यक्तीसाठी काढा बनवण्याचे प्रमाण


▪पाणी १०० मिली 

साधारण २ कप

▪तुळशीची ४ पाने (सुकवलेली / ताजी )

▪दालचिनी (कुटून घेणे) पूड २ चिमूट

▪सुंठ पूड २ चिमूट

▪मिरेपूड १ चिमूट (पित्ताचा त्रास होत असल्यास नको.)

मंदाग्नीवर

उकळून आटवून १/२ ते १/४ भाग म्हणजे ३० ते ५० मिली काढा उरवणे व गाळून घेणे.


त्यात पुढील घटक 

चव / सवय व उपयुक्ततेनुसार मिश्रण करुन घेणे.


▪मनुके ४-५ (पित्त विकारांवर उपयुक्त )

▪गुळ पूड चवीप्रमाणे 

▪लिंबू रस १/२ चमच ( चवी व सवयीनुसार त्रास होत नसल्यास )


असा काढा सकाळ संध्याकाळ घेणे.

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक.

9870690689


l


(प्रस्तुत लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०१ मे  २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/blog-post.html  या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखिकेधिन  आहेत. इतरत्र शेअर करायचे झाल्यास लेखात कुठलाही बदल न करता शेअर केल्यास हरकत नाही.)