साखर .
“स्निग्धा मावशी,आज मी साखरेबद्दल वाचत होते तेव्हा मी सल्फरलेस शुगर असा शब्द ऐकला.म्हणजे काय गं?”
“उसाचा रस यंत्राने काढताना त्या रसात अनेक प्रकारचे इतरही घटक असतात. जसे कि सालीचे तुकडे,गोंदासारखे चिकट पदार्थ, तंतुमय पदार्थ ज्यामुळे साखर नीट तयार होऊ शकत नाही आणि हे सगळे पदार्थ फक्त गाळल्याने निघू शकत नाहीत.तसेच उसाच्या रसापासून साखर बनवताना,तो आटवला जातो. त्यामुळे त्याचा रंग गडद तपकिरी असतो. गुळाचा रंग असतो तसा. आता त्यापासून साखरेचे पांढरेशुभ्र स्फटिक तयार व्हावेत, साखर जास्त दिवस टिकावी आणि या अशुद्धी काढता याव्यात यासाठी म्हणून सल्फरचा वापर केला जातो. कधीकधी ऊस तयार व्हायच्या आधीच काढला गेला असेल तर सल्फरचा वापर केला जातो.या पद्धतीला Double sulphatization असे नाव आहे. हे सल्फर प्रामुख्याने सल्फर डायॉक्साईड म्हणून वापरले जाते. आणि या प्रक्रियेत साखरेच्या स्फटिकांमध्ये सल्फरचे अंश राहतात. या सल्फरमुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. हे सल्फरचे अंश शरीरात शोषले गेल्यावर कोशिकाभित्तीना (Cell Membranes ) इजा पोहोचवतात. कारण हे सल्फर डायॉक्साईड जेव्हा शरीरातील पाण्याच्या अंशासोबत मिसळते तेव्हा H2SO3 / H2SO4 चे अंश तयार होतात.आणि यामुळे सर्दी-खोकला-श्वास घ्यायला त्रास होणे-छातीआवळाल्याप्रमाणे वाटणे असे श्वसनसंस्थेचे आजार जाणवतात.वारंवार सर्दी-खोकला होणारी माणसे,लहान मुले, दम्याचे रुग्ण,COPD,LUNG FRIBOSIS, INTERSTITIAL LUNG DISEASE असे श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांसाठी हि साखर म्हणजे विषच. आपण जेव्हा साखरेला शत्रू असे म्हणतो तेव्हा ही पांढरी साखरच आपल्या शरीरावर विषसमान कार्य करत असते. कारण फक्त आधीपासून श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तीच नाही तर लक्षणे नसलेल्या निरोगी व्यक्तींनाही अशी साखर सतत खाल्ल्यामुळे त्रास होतो. तसेच या साखर कारखान्यांतून निघणारा सल्फर पुढे वायू प्रदूषणाचालासुद्धा कारणीभूत ठरतो. ”
“अरे बापरे, कठीणच आहे हे सगळं प्रकरण.”
“हो तर, आणि सल्फरलेस साखरेमध्ये calcium क्षार वापरून मळी शुद्ध केली जाते. “
“पण मग कळणार कसे कि साखर कशी बनवली आहे?”
“कसं आहे , सल्फर वापरून बनवलेल्या साखरेला म्हणतात प्लांटेशन व्हाईट शुगर (Plantation White Sugar) आणि सल्फरलेस साखरेबाबत पिशवीवर उल्लेखसुद्धा असतो तसेच त्या साखरेला म्हणतात रिफाईंड शुगर (Refined Sugar).आता तिसरा एक प्रकार असतो तो म्हणजे ऑरगॅनिक साखर , या प्रकारात मळी शुद्ध करण्यासाठी ऑरगॅनिक म्हणजे नैसर्गिक स्वरूपाचे पदार्थ वापरले जातात. तसेच कच्ची साखर (Raw Sugar) , खांडसरी (Brown Sugar) असे प्रकारही ऑरगॅनिक पद्धतीने बनवले जातात. या प्रकारांचा वापर आपल्याला जेवण बनवताना वापरता येईल.”
“अच्छा म्हणजे जर आपण ऑरगॅनिक साखर वापरली तर काही टेन्शन नाही ना?”
“हो चालू शकेल ,पण अगं मग तुझ्या आवडीच्या डेझर्ट्सचं काय करणार तू? ही प्लांटेशन व्हाईट शुगर स्वस्त असल्यामुळे विकतच्या सगळ्याच गोड पदार्थांमध्ये जसे केक,मूस,डोनट, आईसक्रीम, मिठाई सगळीकडेच वापरली जाते.”
“हम्म, म्हणजे आता गोड पदार्थ जपूनच खावे लागणार तर...... बरं आयुर्वेदामध्ये साखरेचे काही गुण सांगितले आहेत का?”
“ हो, आयुर्वेदामध्ये साखर आहे ना. पण हि साखर म्हणजे उसाच्या रसापासून नैसर्गिकरित्या तयार केली जाणारी साखरआहे. आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार साखर ही मधुर रस-विपाकी ,रुचिकर, वात आणि पित्तदोषाचे शमन करणारी, रक्ताचे आजार कमी करते. दाह कमी करणारी आहे. साखर शरीराला बळ देते , तृप्तता देते. कारण मधुर रस सप्तधातूंना बळ देणारा आहे. पण अति प्रमाणात सेवन केले तर स्थौल्य,प्रमेह ,वारंवार गळवे येणे , भूक न लागणे असे त्रासही होऊ शकतात. आणि शुगर ऍडिक्शनचाही धोका होऊ शकतो. ”
“शुगर ऍडिक्शन??? म्हणजे काय?”
“कपकेक्सपासून कोल्ड्रिंक्सपर्यंत हल्ली बऱ्याचशा तयार गोड पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते आणि बऱ्याच वेळेला असं होतं की चाळा म्हणून, कधी कधी खूप निराश वाटत असताना, भावनिक स्थिती चांगली नसताना मनाला उल्हसित करण्यासाठी या गोड पदार्थांचा आधार घेतला जातो. यातील साखरेमुळे शरीरात डोपामिन नावाच्या रसायनाची जास्त निर्मिती होते.हे डोपामिन शरीराला उल्हसित करते. त्यामुळे सतत मानसिक,शारीरिक ताण-तणाव सहन करणाऱ्यांचा ओढा सहसा गोड पदार्थांकडे असतो. बऱ्याचदा अश्या व्यक्ती एखादा तणावाचा प्रसंग घडताना वा घडून गेल्यावर गोड पदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त करतात. आणि या पदार्थांत वापरली जाणारी साखर ही ग्लुकोस, सुक्रोस आणि डेक्सट्रोस या प्रकारांतली असते. त्यामुळे ती रक्तात पटकन शोषली जाते आणि मेंदूला तिचा पुरवठा होऊन उल्हसित वाटते पण जर असे सारखे सारखे झाले तर जेव्हा साखर खाण्यात येत नाही तेव्हा मेंदूला मरगळ आल्यासारखे वाटते मग परत गोडाचा आधार घेतला जातो.”
“मग हे थांबवायचं कसं ?”
“कटाक्षाने हळूहळू थोडी थोडी साखर कमी करायची. व्यायाम करायचा. गोड चवीचे पण जास्त तंतुमय असे पदार्थ उदा. गाजर,फळे खायचे. , कोमट पाणी प्यायचे.”
“ह्म्म्म, छानच माहिती मिळाली हं मावशी आज. प्लांटेशन व्हाईट शुगर , आयुर्वेदातील साखरेचं वर्णन आणि शुगर ऍडिक्शन या तीनही मुद्द्यांवर मस्त मुद्दे बनवते मी .”
“व्हेरी गुड, आता उद्या आपला शेवटचा पदार्थ ‘दूध’. त्या विषयी माहिती घेऊ.”-
(क्रमशः )
-डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक.
samanwayaayurveda@gmail.com
संदर्भ - double sulphatization - sugarprocesstech.com
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी २० मे २०२० रोजी आपल्या *https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/5.html* या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)
No comments:
Post a Comment