Friday, 8 May 2020

आयुष काढा

 

 



                   सुंठेच्या (सुकवलेल्या आल्याचे चूर्ण) परिणामकतेबद्दल व्हाट्सअपवर फिरणारा एक मेसेज वाचला. आणि लोकांना सुंठेच्या वापराचे चांगले अनुभव आल्याबद्दल वाचून खूप आनंद झाला. खरं तर आम्ही वैद्य गेल्या काही दिवसांपासून 'आयुष मंत्रालया'द्वारे सांगितलेल्या *रोगप्रतिकारकक्षमता वर्धक* उपायांचा प्रचार करत आहोत. त्यामध्ये एक महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे ' *आयुष काढा*. ' हा काढा कसा बनवायचा? तर तुळशीची पाने, दालचिनी, काळे मिरे आणि सुंठ हे महत्त्वाचे घटक आणि गूळ, काळ्या मनुका आणि लिंबाचा रस हे *व्यक्तीच्या प्रकृतीनुरूप* आणि चवीनुरूप वापरायचे घटक यापासून तयार होणारा हा काढा, प्रत्येकाने रोज घ्यावा अशी अपेक्षा आहे.

आता ही सगळी औषधे आपल्या घरात सहज उपलब्ध आहेत. आणि दिसायला साधी दिसत असली तरी अत्यंत प्रभावी आहेत. आता या द्रव्यांबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. 

१. *सुंठ* - आयुर्वेदात सुंठेला *‘विश्वभेषज/महौषध’* अशी हि पर्यायी नावे आहेत. कारण अपचन,जुलाबासारखे पोटाचे आजार, आमवात,वातरक्त तसेच सांधेदुखीसारखे वाताचे आजार , शरीरावयवांवरील सूज , श्वसनाचे विकार, वारंवार येणारा ताप अश्या अनेक आजारांसाठी आम्ही वैद्य सुंठीचा वापर आजाराच्या अवस्थेनुरूप करत असतो. ‘छोटा पॅकेट बडा धमाल’ असे हे औषध आहे. *आमपाचन* म्हणजे चुकीच्या सवयी,बिघडलेले पचन यामुळे शरीरात तयार होणारी विषद्रव्ये (आम) यांचा निचरा करण्याचे काम सुंठ करत असते.  


२. *तुळस* - देवपूजेत तुळशीच्या पानांचे महत्त्व खूप मोठे आहे. तुळशीच्या रोगनिवारक गुणांमुळेच पूर्वजांनी ही योजना केली असावी. त्यामुळे बहुतांश  घरात एखादे तरी तुळशीचे रोप असतेच. कफाचा खोकला झाला असेल तर तुळशीचा रसाचे चाटण किंवा पान सर्रास खाल्ले जाते. विषमज्वरामध्येही केला जाणारा  तुळशीचा वापर काहींच्या वाचनात असेलही.
वात-कफदोषनाशक पण पित्तकारक अशी ही तुळस श्वसनसंस्थेचे आजार,पार्श्वशूल (फासळ्यांमध्ये होणाऱ्या वेदना), रक्तदुष्टी यासारख्या आजारांत खूप छान काम करते. तुळस कृमिघ्न आणि ज्वरघ्नसुद्धा आहे. 


३. *दालचिनी* - गरम मसाल्यांमधली दालचिनी हे आयुर्वेदातील खूप छान औषध आहे बरं  का…. कफ-वात दोष कमी करणारी,गोड चवीची असल्याने पिट नियंत्रणात ठेवणारी दालचिनी प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर कार्यकारी आहे. त्यामुळे श्वासाच्या आजारावर वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये दालचिनी असतेच. तसेच अरुची,अग्निमांद्य यासारखे त्रास दालचिनीच्या वापराने नियंत्रणात येतात. 


४ *काळे मिरे* - मसाल्याच्या डब्यातला दुसरा पदार्थ कटू रस-विपाकी आणि उष्णवीर्य असे मिरे कात-वाट कमी करणारे आणि पित्त वाढवणारे आहे. जंतुघ्न, श्वासरोगहर आहे, वारंवार येणाऱ्या तापावर खूप छान काम करते. पचन सुधारते. Piperine हे काळ्या मिरीमधील तत्त्व प्रतिदाह (Inflammation ) कमी करायला मदत करते,शरीर  शोधन करते. पण *पित्त वाढवणारे असल्याने सध्याच्या ग्रीष्म ऋतूत वैद्यकीय सल्ल्यानेच वापरावे.*

 

५. *काळ्या मनुका* - पित्ताचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी काळ्या मनुका वापराव्यात. आकाराने छोट्या पण गुणांनी मोठ्या अश्या या मनुका रक्तपित्त,ताप,श्वासरोग ,सतत तहान लागणे अश्या त्रासांमध्ये खूप छान काम करतात. तिन्ही दोषांचे शमन करतात ,सारक आहेत त्यामुळे *सध्याच्या ग्रीष्म ऋतूसाठी अगदी योग्य.* दुर्बलता-थकवा जाणवत असेल तर काळ्या मनुका जरूर खाव्यात. यातील लोहाच्या प्रमाणामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पण शर्करेचे प्रमाण जास्त असल्याने *मधुमेहींनी वैद्यकीय सल्ल्याने मनुका कशा व किती प्रमाणात* खायचे हे ठरवावे. मनुकांची सविस्तर माहिती वाचायची असेल तर या लिंकवर क्लिक करा.

 https://samanwayayurved.blogspot.com/2014/09/black-raisins_17.htm

तर आयुष काढ्याच्या सर्व घटकद्रव्यांचे गुण  आपण इथे थोडक्यात पाहिले. सविस्तर लिहायचे झाल्यास ‘आयुष काढ्यामागचे विज्ञान’ हा एका मोठ्या लेखाचा विषय होईल. या सर्व वनस्पतींच्या गुणांविषयी झालेली संशोधने आंतरजालावर सहज उपलब्ध आहेत जी आयुर्वेदातील ज्ञानाचे महत्त्व “रिसर्च”च्या माध्यमातूनही अधोरेखिचत करतील. स्वयंपाकघरात असलेल्या या औषधांनी आपले आरोग्य कसे सांभाळायचे आणि काढा कसा बनवायचा याचे प्रमाण व कृती सोबतच्या फोटोमध्ये दिली आहे तरी काही शंका असतील तर जरूर विचारू शकता. 


१ व्यक्तीसाठी काढा बनवण्याचे प्रमाण


▪पाणी १०० मिली 

साधारण २ कप

▪तुळशीची ४ पाने (सुकवलेली / ताजी )

▪दालचिनी (कुटून घेणे) पूड २ चिमूट

▪सुंठ पूड २ चिमूट

▪मिरेपूड १ चिमूट (पित्ताचा त्रास होत असल्यास नको.)

मंदाग्नीवर

उकळून आटवून १/२ ते १/४ भाग म्हणजे ३० ते ५० मिली काढा उरवणे व गाळून घेणे.


त्यात पुढील घटक 

चव / सवय व उपयुक्ततेनुसार मिश्रण करुन घेणे.


▪मनुके ४-५ (पित्त विकारांवर उपयुक्त )

▪गुळ पूड चवीप्रमाणे 

▪लिंबू रस १/२ चमच ( चवी व सवयीनुसार त्रास होत नसल्यास )


असा काढा सकाळ संध्याकाळ घेणे.

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक.

9870690689


l


(प्रस्तुत लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०१ मे  २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/blog-post.html  या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखिकेधिन  आहेत. इतरत्र शेअर करायचे झाल्यास लेखात कुठलाही बदल न करता शेअर केल्यास हरकत नाही.)


No comments:

Post a Comment