मीठ -
दुसऱ्या दिवशी श्रीयाचा फोन आला तेव्हा मी तयार होतेच.
“तर आजचा पांढरा शत्रू आहे मीठ.”
“हो हो , मीठ जास्त खाऊ नये म्हणतात ब्लड प्रेशर वाढतं म्हणतात. पण मीठ शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचा समतोल राखायला मदत करते ना? आणि मीठ नाही खाल्लं तर मग खायचे कसं कारण अळणी जेवण्याचीही कल्पना नाही करता येत गं.”
“अगं बाळा मीठ त्रासदायक आहे पण अजिबातच खाऊ नये असं नाही सांगितलंय आयुर्वेदात. पण प्रमाणात खायला हवं हे मात्र निक्षून सांगितलंय. कारण षड्रसांपैकी लवण रस(खारट चव) हा वात दोषाचे शमन करणारा, पित्त दोष वाढवणारा आणि कफ दोष पातळ करणारा आहे. त्यामुळे तोंडाला चव येते (रुचकर), स्तंभ (पेशी-शिरा जखडणे) कमी होतो, स्वेदनिर्मिती (घाम येणे), स्नेहन (शरीरात मृदुता निर्माण करणारे), संघात कमी होतात (गाठी/चिकटपणा फुटून मोकळे होते), शरीरात शोषण वाढवण्यासाठी मदत होते आणि तू म्हणालीस तसे शरीरात इलेक्ट्रोलाईटस् चा समतोल राखला जातो. पण जर सतत खाण्यात मीठ जास्त खाल्ले जात असेल तर केस गळणे-पिकणे, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येणे,वेगवेगळे त्वचाविकार, वातरक्तासारखे आजार होऊ शकतात.कधी-कधी त्वचेतून-हिरड्यांतून रक्त येते, वारंवार तहान लागते, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे सोडियमचे प्रमाण वाढून शरीरात पाण्याचा अंश वाढतो (Water Retention) आणि सूज येते. सामुद्र मीठ म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून बनलेले मीठ हे पचायला जड आणि कफ वाढवणारे आहे. ”
“हे झाले आयुर्वेदिक विचारांबद्दल आणि सध्या आपण जे मीठ रोज वापरतो ते समुद्राच्या पाण्यापासून बनलेले असले तरी सामुद्र मीठ(Sea Salt) नाही.”
“एक मिनिट, समुद्राच्या पाण्यापासून बनलेले पण सामुद्र मीठ नाही??? म्हणजे??”
“अगं, म्हणजे सामुद्र मीठ म्हणजे ज्याला sea salt म्हटले जाते ते समुद्राचे पाणी ऊर्ध्वपातित करून बनवतात. आपल्याला भाईंदरला किंवा अलिबागला जाताना जी मिठागरे दिसतात ना तिथे समुद्राचे पाणी अडवून त्यातला पाण्याचा अंश उडाल्यावर मीठ जमा होते ते सामुद्र मीठ यात मुख्यतः सोडियम क्लोराईड असते पण त्याचबरोबर मॅग्नेशिअम,पोटॅशिअम,कॅल्सिअमचे क्षारसुद्धा असतात.आपली आजी-पणजी आजी हे मीठ वापरत तेव्हा ते खडेमीठ नावाने मिळे. पण त्याला पाणी पाझरे ,ते नीट जपून ठेवावे लागे म्हणून बाजारात जेव्हा “Vaccume evaporated,free-flow आणि सबसे शुद्ध(??) असे मिठाचे ब्रँड आले तेव्हा सोयीचे असल्यामुळे गृहिणी लगेच तिथे वळल्या आपण यात मेख अशी आहे कि हे मीठ Vaccume Evaporated बनवताना त्यातील इतर क्षार काढून टाकले जातात आणि फक्त सोडियम क्लोराइडचेच क्षार उरतात.त्यामुळे हे मीठ वापरताना शरीरात मोठ्या प्रमाणात सोडियम आणि क्लोराईड जाते जे इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्सला कारणीभूत ठरते. तसेच ते free flow बनवण्यासाठी जे Anti-caking agents (गुठळ्या होऊ नये म्हणून) वापरले जातात. ते पाहता पाझरलेले-चिकट मीठ खाल्लेलेपरवडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे सध्या.”
“अरे बाप रे , मग मीठ नाही खायचे मग काय खायचे ?”
“अगं , मीठ खायचेच नाही असे नाही तर अत्यंत कमी प्रमाणात खायचे, प्रत्येक वेळी वरून मीठ घ्यायचे नाही. कणकेत-भातात मीठ घालायचे नाही , जिथे शक्य होईल तिथे सैंधव वापरायचे. गंमत सांगू आयुर्वेदात तर म्हटलेच आहे की जिथे लवण शब्द वापरला असेल तिथे सैंधवच वापरायला हवे.”
“पण मग मावशी , शरीरात सोडियम कमी होईल ना ?”
“चांगला प्रश्न विचारलास श्रीया , मोठ्या माणसांमध्ये दर दिवसाला दीड ते अडीच ग्राम मिठाची गरज असते.म्हणजे लक्षात घे, संपूर्ण दिवसात फक्त १ छोटा चमचा मीठ घ्यायचे आहे. तेवढे पुरेसे आहे. आणि दूध-दुधाचे पदार्थ, अंडी,मासे,ओला नारळ,बीट,पालक यासारख्या भाज्यांमधनंही सोडियम मिळते.त्यामुळे सोडिअमची कमतरता होईल अशी भीती बाळगायचे कारण नाही.
आता आपण उद्या बोलूयात पुढच्या पदार्थविषयी”
(क्रमशः )
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी १७ मी २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/blog-post_17.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)
No comments:
Post a Comment