Thursday, 21 May 2020

स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू - भाग 6 व अंतिम

दूध 




“काय श्रीया , करायची का सुरुवात?”

“हो, आजचा विषय थोडा समजावून सांग हं मावशी , दूध आणि शत्रू हे जरा गोंधळवून टाकणारे आहे.”

“नक्कीच, आयुर्वेदशास्त्रात दूध खूप महत्त्वाचे सांगितले आहे. ‘मधुर,पिच्छिल (viscous /दाट ) , शीत (थंड), स्निग्ध , गुरु ,श्लक्ष्ण ,सर (सारक), आणि  गुणांचे आहे.मधुर रस आणि विपाकाचे आहे. त्यामुळे ते आपले शरीर  बनवणाऱ्या सातही धातूंना पोषण देणारे आहे. आयुर्वेदामध्ये एक संकल्पना आहे ‘ओजस’. हे ओज रस-रक्तादी सप्तधातूंचा सारभाग असते. या ओजाचे आणि दुधाचे गुण सारखेच आहेत त्यामुळे दुध खूप महत्त्वाचे आहे.आपल्याला जन्मापासून आईच्या दुधाची सवय असते त्यामुळे मूल  सहा महिन्यांचे झाल्यावर त्याला बाहेरचे अन्न  सुरु करताना दुधापासूनच सुरुवात करतात. यालाच ‘आजन्मसात्म्य’ असेही म्हणतात. गायीचे दूध बुद्धिवर्धक , बलवर्धक आहे. सतत श्रम करणारी माणसे,मग ते शारीरिक श्रम असो किंवा अभ्यास-ऑफिसच्या कामामुळे येणारे मानसिक श्रम , यांच्यासाठी गायीचे दूध खूप लाभदायक असते.”

“म्हशीचे दूध पण वापरतात ना?”

“हो, म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा स्निग्धपदार्थ जास्त असतात, त्यामुळे ते पचायला जड, जास्त थंड गुणाचे आणि कफ वाढवणारे असते. त्यामुळे ज्यांना वारंवार भूक लागते , झोप येत नाही अश्या व्यक्तींनी वैद्यांच्या सल्ल्याने म्हशीचे दूध घेता येईल.”

“पण मग एवढं चांगलं आहे तरी दुधाला पांढरा  शत्रू का म्हणत आहेत सध्या?”

“कारण हे सगळे गुण  जेव्हा आयुर्वेदात सांगितले गेले तेव्हा भारतात देशी गाई होत्या. देशी गाई म्हणजे पांढऱ्या किंवा तपकिरी रंगाच्या आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वशिंड असलेल्या गायी. पूर्वी संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात गीर, राठी , हरियाणवी , देवणी ,डांगी , कंधारी, खिल्लारी अश्या तब्बल ३८ वेगवेगळ्या जातींच्या गायीचे दूध वापरले जाई. आजही या जाती आहेत पण यांचे दूध कमी प्रमाणात वापरले जाते. दूध देण्याची क्षमता आणि कालावधी कमी असल्यामुळे हळूहळू यांचा वापर कमी झाला आणि त्याचवेळी जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन मिळवण्यासाठी भारतात जर्सी - होल्स्टिन फ्रिजियन या जातीच्या विदेशी गायींचे  दूध वापरले जाऊ लागले. त्यातही उत्पादन मिळावे म्हणून दुधात पाणी मिसळणे , त्याहीपुढे जाऊन आरारूट सारखे स्टार्च , कॉस्टिक सोडा , युरियासारखी घातक  रसायने मिसळणे असे प्रकार होऊ लागले. भारतात दुधाची मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने असे प्रकार वारंवार घडतात आणि त्यावर नियंत्रण आणणे कठीण होऊन बसले आहे. काही ठिकाणी उत्पादकच गायींना दूध जास्त यावे म्हणून हार्मोन्सची इंजेकशन्स देतात किंवा त्या आजारी पडू नयेत म्हणून अँटिबायोटिक्स त्यांच्या अन्नात आधीपासूनच मिसळले जातात. हे हॉर्मोन्स आणि अँटिबायोटिक्सचे घातक अंश गायींच्या  दुधातून शेवटी ते पिणाऱ्यांच्या शरीरातही जाऊन अपाय करतात.तसेच गायींना आणि हा प्रकार तर म्हशीच्या दुधाबाबतसुद्धा होतो.त्यात सध्या दुधावर होमोजिनायझशन नावाची प्रक्रिया केली जाते.हे करताना दुधातील स्निग्धांश (fat  globule ) चा आकार लहान केला जातो ज्यामुळे दूध दात होते. दूध लवकर खराब होत नाही. दुधाची प्रत चांगली दिसते. आणि या दुधाला साय येत नाही.पण त्याचमुळे हे छोटे स्निग्धकण रक्तात सहज शोषले जातात. ज्यामुळे रक्तवाहिनीत हे कण  साचण्याची शक्यता वाढते. तसेच होमोजिनायझेशनच्या प्रक्रियेत व्हिटॅमिन D  आणि A चा ह्रास होतो. यासाठी मग काहीवेळा बाहेरून व्हिटॅमिन D  आणि A त्यामध्ये मिसळले जाते पण ते शरीरात शोषले जाईलच याची खात्री देता येत नाही.   ”

“अरे बाप रे!!   आणि मावशी A2 हे काय आहे?”

“A2 आणि A1 हे बीटा केसीन नावाच्या प्रथिनांचे प्रकार आहेत. जे गायीच्या दुधात आढळतात. A2 प्रथिन भारतीय वाणाच्या गायीच्या दुधात तर  A1 विदेशी वाणाच्या गायीच्या दुधात आढळते. काही संशोधने असे सांगतात कि हे A1 बीटा केसीन मधुमेह , हृदयरोग,स्वमग्नतेसारख्या आजारांना कारणीभूत असू शकते.”

“मग आता काय करायचं ग?

“यासाठी देशी गायीचं होमोजिनायझेशनची प्रक्रिया न केलेलं दूध वापरता येईल. दुधाची भेसळ टाळण्यासाठी खात्रीच्या विक्रेत्याकडून दूध घेता येईल.  आपले पचन कसे आहे हे बघून , गरज वाटली तर वैद्यांचा सल्ला घेऊन, गायीचे दूध वापरावे कि म्हशीचे हे ठरवावे. रोज दूध पिताना त्यामध्ये थोडी हळद किंवा सुंठ घालून उकळवून घ्यावे. पण दूध हे गुरु म्हणजे पचायला जड असते त्यामुळे मेहनत,व्यायाम  करणाऱ्या व्यक्तीला , ज्याची पचनशक्ती चांगली आहे त्यालाच ते पचेल. पोटभर नाश्ता करून वर भलामोठ्ठा पेला भरून दूध पिणे अजिबातच नको, प्रमेह ,मधुमेहाच्या रुग्णांसाठी दूध आणि दुधाचे पदार्थ वर्ज्य सांगितले आहेत. त्यामुळे त्यांनी तर वैद्यकीय सल्ल्यानुसारच दूध घ्यावे. चला आज आपले  पाचवे आणि शेवटचे सत्र झाले. काय काय मुद्दे मिळालेत तुला?”

“खूप इंटरेस्टिंग माहिती मिळाली आहे मला. आपल्या आहारातले नेहमीचे ,पारंपरिक आणि गुणकारी असे हे पाच पदार्थ पण तपकिरी-पिंगट म्हणजे वाईट आणि पांढरे म्हणजे शुद्ध , चांगले अश्या गैरसमजामुळे आणि खूप प्रक्रिया करण्याच्या नादात आपण त्यांचा चांगुलपणा हरवून बसलो आणि अनावश्यक आजारांना निमंत्रण दिले. सोपं- इन्स्टंट करण्याच्या नादात कस,पोषणमूल्ये हरवली , चवीच्या-दिखाऊपणाच्या सोसामुळे निकृष्ट अन्न  आपणच आपल्या घरात घेऊ लागलो. या सगळ्याच्या परिणामस्वरूप देशी वाणे , बी-बियाणे यांचा ह्रास होत आहे. त्यामुळे हे दुष्टचक्र मोडून आपल्या पारंपरिक  पद्धती पुन्हा प्रवाहात आणणे हेच आपल्यापुढील मुख्य ध्येय असायला हवे.”

“वाहवा, क्या बात है!! श्रीया  तू आपल्या चर्चेचं सार तर सांगितलंसच  आणि सादरीकरणाचा अगदी परिपूर्ण समारोप केलास. असेच उत्तम सादरीकरण कर. स्पर्धेसाठी तुला शुभेच्छा. ‘विजयी भव’. “

“थँक यु , मावशी.”

(समाप्त)


टीप - स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू या लेखमालेचा आज समारोप होत आहे. आशा  आहे कि आपल्याला ही  लेखमाला जरूर आवडली असेल. आपली मते व काही शंका असल्यास त्या आपण मला वैयक्तिक क्रमांक अथवा इमेलद्वारे विचारू शकता. यापुढील लेख दर रविवारी सकाळी ०९:०० ते ११:०० च्या दरम्यान प्रसिद्ध केले जातील. हे लेख आपल्याला व्हाट्सऍप /फेसबुक/इमेलद्वारे हवे असल्यास आपण खाली दिलेल्या क्रमांकावर मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. 


डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी २१ मे २०२० रोजी आपल्या *https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/6.html* या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)



No comments:

Post a Comment