Saturday, 4 July 2020

निद्रा - भाग १.



आयुर्वेदात  वर्णन केलेले जैविक घड्याळ (सर्काडियन ऱ्हिदम ) आणि व्याधीक्षमत्त्व (Immunity) या विषयावरील लेख वाचल्यानन्तर  (https://samanwayayurved.blogspot.com/2020/06/blog-post.html?m=0) बऱ्याच वाचकांनी झोप कशी-किती-कधी घ्यावी? याविषयी  निरनिराळे प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना वैयक्तिकरित्या उत्तरे दिल्यानंतर त्या सर्व प्रश्नांच्या उत्तर स्वरूप हा लेख लिहिला आहे. आयुर्वेद शास्त्रात झोपेसाठी ‘निद्रा’ ही  संज्ञा वापरली आहे. तसेच आहार-निद्रा-ब्रह्मचर्य हे तीन उपस्तंभ सांगितले आहेत. उपस्तंभ  म्हणजे खांब. या खांबांवरच आपल्या  शरीराचा आरोग्यरूपी डोलारा उभा असतो. एवढे या निद्रेचे महत्त्व आहे आपल्या शरीरासाठी. झोपेचे ७ प्रकार सांगितले आहेत. 


१. तमोभवा - शरीरातील तमोगुण वाढल्यामुळे येणारी 

२. श्लेष्मसमुद्भवा - शरीरातील कफ दोष जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होतो तेव्हा झोप 

३. मनःश्रमजन्य - बुद्धीचे काम करणाऱ्या, जास्त चिंता केल्यामुळे  थकते  व  त्यामुळे झोप येते. 

४. शारीर  श्रमजन्य - शारीरिक श्रमाचे काम केल्यामुळे येणारी 

५. आगन्तुकी - काहीही कारण नसताना येणारी झोपू 

६. व्याधी अनुवर्तिनी -  एखाद्या आजारामुळे येणारी झोप 

७. रात्रीस्वभवा - रात्रीच्या वेळी येणारी झोप. 

आता, या सात प्रकारांपैकी फक्त रात्रीच्या वेळी येणारी झोप प्राकृत म्हणजे नॉर्मल सांगितली आहे. या रात्रीच्या झोपेचे महत्त्व विषद  करताना आचार्य तिला ‘भूतधात्री’ या नावाने संबोधतात.भूतधात्री म्हणजे सर्व सजीवांची (भूतांची ) आईप्रमाणे काळजी घेणारी,पोषण देणारी अशी. या एका शब्दात रात्रीच्या झोपेचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला सहज लक्षात येते. हे आयुर्वेदाचे आणि  संस्कृत भाषेचे सौंदर्य आहे. 

आता वेगवेगळी संशोधने झोपेबद्दल काय  सांगतात ते आपण पाहू,

पूर्वी  समजले  जाई की झोपेमध्ये शरीर आणि मेंदू निष्क्रिय असतो पण संशोधनाअंति  लक्षात आले की झोपेच्या कालावधीत मेंदू विश्रांती घेण्याबरोबरच वेगवेगळ्या प्रक्रियासुद्धा पार पडतो ज्या शरीराचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाच्या असतात. (भूतधात्री हे नाव किती सार्थ आहे पहा.) ही  झोप अगदी सलग नसते बरं. झोपेच्या ४ स्थिती असतात. ( NON - REM आणि REM  हे दोन ढोबळ भाग व NON - REM स्थितीचे ३ उपभाग असे हे वर्गीकरण असते.) रात्रभर हे चक्र पुन्हा पुन्हा सुरु  राहते. 


यामध्ये सर्काडियन ऱ्हिदम (जैविक घड्याळ) महत्त्वाचा का आहे?

तर, हे जैविक घड्याळ काम करण्यासाठी प्रकाशावर अवलंबून असते.संध्याकाळ झाली की प्रकाश कमी होऊ लागतो आणि मग हे घड्याळ मेंदूकडे मेलॅटोनीन या रसायनाद्वारे संदेश पाठवते की ‘रात्र होते आहे, झोपेची वेळ झाली.’ म्हणून आपल्याला रात्र झाली की झोप जाणवते.


झोप पूर्ण झाली की  कोणती लक्षणे जाणवतात?

झोप चांगली होत असल्यास श्वास संथ होतो. डोळ्याच्या हालचाली कमी होतात. मांसपेशी शिथिल होतात. (REM सायकलचा कालावधी कमी होऊन दीर्घ झोपेचा काळ वाढतो.) तसेच झोप पूर्ण झाली की आपोआप जाग येते. मन आणि शरीर उल्हसित होते.


झोप अपुरी का राहते आणि अपुर्ण राहिल्यास कोणती लक्षणे ?

मेंदूला सतत चेतना मिळत राहिल्यास झोप आली तरीही शरीर आणि मेंदू झोपू शकत नाहीत. मानसिक ताण, चिंता,राग, मोठे आवाज, तीव्र प्रकाश,सतत कार्यमग्न असणे, बिछाना आरामदायी नसणे अश्या कारणांमुळे झोप अपुरी राहू शकते. तसेच आजारी व्यक्ती, मेंदूचे आजार,झोप यावी यासाठी वारंवार घेतली जाणारी औषधे यामुळेही झोप कमी होते. वृद्धावस्थेत (वातवृद्धीमुळे) झोप कमी होते.

झोप अपूर्ण राहिली तर अस्वस्थता,डोकेदुखी, उत्साह नसणे  किंवा दिवसभर पेंगुळल्याप्रमाणे वाटत राहते. अश्या अवस्थेत काम काही चुका/अपघात होऊ शकतात.दीर्घकाळ झोप अपुरी राहीली,म्हणजे रोजच आपला दिनक्रम बिघडून आपण कमी झोप घेत राहिलो तर आपली स्मृती कमी होताना जाणवते, क्रियाशीलता कमी होते,एकाग्रता कमी होते, भाव-भावनांवरील ताबा कमी होतो त्यामुळे छोट्याश्या कारणांनीसुद्धा चिडचिड,राग,भिती किंवा अगदी नैराश्य यासारख्या तीव्र भावना आपल्याला जाणवतात. दिवसभर क्रियाशील असणाऱ्या मेंदूला विश्रांती घ्यायला, क्रियाशील काळात तयार होणारी रसायने नष्ट करायला पुरेसा वेळ न मिळाल्याने हा सगळा कचरा तिथेच साचून राहतो आणि म्हणून स्मृतिभ्रंशासारख्या आजाराचे मूळही आपल्याला या झोपेमध्ये दिसून येते. सतत कमी झोप मिळत राहिली तर आपली चेतासंस्था सतत उत्तेजित स्थितीत राहते.ज्यामुळे स्ट्रेस इंड्यूस्ड (सततच्या ताणामुळे निर्माण होणारे) रक्तदाब,हृदयविकार यांना खतपाणी मिळते. सध्या कोरोना संसर्गामुळे जग धास्तावलेले आहे,संसर्गजन्य आजारांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला चांगली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) आवश्यक असते. ही  इम्युनिटी सतत तल्लख राहावी म्हणून आपल्याला चांगली झोप गरजेची असते. विश्व आरोग्य संघटनेने सांगितलेल्या कोरोनाविरुद्धच्या  निर्देशांमध्ये ताजे अन्न आणि पुरेशी झोप यांचा आवर्जून उल्लेख केला आहे.अपुऱ्या झोपेचा हा डोकेदुखीपासून सुरु झालेला प्रवास पुढे आपल्याला लठ्ठपणा (स्थौल्य), डायबेटीस (मधुमेह) तसेच कॅन्सरसारख्या आजारांपर्यंतसुद्धा घेऊन जातो. 


“वीकडेज”ना न मिळणारी झोप आम्ही शनिवार-रविवारी भरून काढतो. 

मुळात हे समजून घ्यायला हवे की आपले शरीर आणि क्रेडिट कार्डचे बिल यात फरक आहे. महिनाभर थोडे-थोडे उधार घेऊन नन्तर महिनाअखेरीस बिल भरणे ही  सिस्टीम शरीराला लागू पडत नाही. तुम्ही आठवडाभर कमी घेतलेली झोप आणि त्याचे शरीरावर  होणारे दुष्परिणाम एखाद-दोन दिवस १०-१२ तास झोपल्याने दुर होत नसतात. 

(क्रमशः)


निद्रा-नाश करणाऱ्या गोष्टी, झोप यावी यासाठीचे उपाय ,दुपारची झोप व वामकुक्षी यातील फरक याविषयी वाचूया पुढच्या भागात. हा भाग सोमवारी ०६ जुलै रोजी सकाळी प्रसिद्ध होईल. 


टीप - वैद्यांचा सल्ला घेताना ते शिक्षित आणि नोंदणीकृत वैद्य आहेत याची खात्री करून घ्यावी.

आपली मते व काही शंका असल्यास त्या आपण मला वैयक्तिक क्रमांक अथवा इमेलद्वारे विचारू शकता. यापुढील लेख दर रविवारी सकाळी ब्लॉगवर प्रसिद्ध केले जातील. हे लेख आपल्याला व्हाट्सऍप /ईमेलद्वारे हवे असल्यास आपण खाली दिलेल्या क्रमांकावर मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. अथवा आमचे फेसबुक पेज like करा. https://m.facebook.com/drsnigdhasclinic/


लेखिका -

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०५ जुलै २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/07/blog-post.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


1 comment:

  1. खूप छान माहिती. झोप कमी असल्यामुळे मधुमेह कसा होऊ शकतो?

    ReplyDelete