सध्याच्या परिस्थितीत बऱ्याचदा ऐकू येणाऱ्या संज्ञा म्हणजे ‘संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन.) आणि ‘होम आयसोलेशन’.यातील ‘संस्थात्मक विलगीकरण’ सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. पण ‘होम आयसोलेशन’बाबत काहीजणांनी विचारणा केली होती. नक्की कसे असते हे ‘होम आयसोलेशन ? कोण करू शकेल ?आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकतो का हो, होम आयसोलेशन मध्ये एखादा रुग्ण असेल तर? हे प्रश्न आपल्या मनात येतात आणि त्यासाठीच आपण आज हा विषय समजून घेणार आहोत. पण हे समजण्यासाठी मुळात आयसोलेशन (Isolation ) आणि क्वारंटाईन (Quarantine) या दोन संज्ञांतील फरक समजून घ्यावा लागेल.
आयसोलेशन (Isolation ) म्हणजे संसर्गजन्य आजाराने बाधित/आजारी व्यक्तीला स्वस्थ व्यक्तींपासून दूर ठेवणे आणि त्यांचे औषधोपचार करणे.
Quarantine (क्वारंटाईन ) म्हणजे संसर्गजन्य विषाणू जीवाणूच्या संपर्कात आलेल्या माणसांना वेगळे ठेवून त्यांच्यात आजाराची काही लक्षणे दिसतात का ते तपासणे. क्वारंटाईन हा आयसोलेशन चा सौम्य प्रकार आहे. कारण या प्रकारच्या विलगीकरणात व्यक्ती बाधित असेलच असे नाही.
स्वविलगीकरण कोणी करावे?
१. रिपोर्ट पॉसिटीव्ह आलेल्या पण कोणतीही लक्षणे नसलेल्या (Asymptomatic Positives ) व्यक्ती.
२. सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले रुग्ण.
३. कोरोना चाचणी सकारात्मक आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती. (Contacts), उदा. -
COVID १९ बाधित रुग्णासोबत एकाच घरात राहणारे कुटुंबीय.
अशी व्यक्ती जी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात असताना PPE कीट वापरत नव्हती / त्यांचे परिधान केलेले PPE किट खराब झाले होते.
अश्या व्यक्ती ज्यांचा COVID १९ बाधित रुग्णाशी १ मीटरपेक्षा कमी अंतरावरून संपर्क आला आहे किंवा ज्यांना COVID १९ रुग्णासोबत एखाद्या बंदिस्त जागेमध्ये राहावे लागले, जसे की विमानप्रवास , वाहनप्रवास अथवा ऑफिस अश्या बंदिस्त जागा.
माझे वैयक्तिक मत असे आहे की जे मी माझ्या रुग्णांना पूर्वीही सांगत होते आणि सध्याच्या काळात तर ते खास गरजेचे आहे, की इतर कारणांमुळेही वायरल ताप-सर्दी-खोकला असल्यास इतरांपासून वेगळे राहावे. असे केल्यास आपल्यासोबत घरात राहणाऱ्या कुटुंबियांना , विशेषतः वृद्धांना याचा त्रास होणार नाही. बऱ्याचदा असे दिसून येते की RT-PCR टेस्टचा निकाल येईपर्यंत रुग्णाने विलगीकरण केलेले नसेल तर घरातील इतर सदस्यांनाही लागण झालेली असू शकते.
४. सगळ्यात महत्त्वाचे हे समजून घ्यायला हवे की कोरोना इन्फेक्शन म्हणजे काही लाजिरवाणी गोष्ट नाही की सगळ्यांपासून लपवायला हवी. उलट सुरुवातीलाच लक्षणे दिसू लागल्यावर योग्य औषधोपचारासोबत स्वविलगिकरण आणि पूर्ण विश्रांती घेतली तर लवकर बरे होण्यास मदतच होईल.
स्वविलगीकरण कोणाला करता येणार नाही?
असे पेशंट ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे. उगा. - कॅन्सर झाला असल्यास अथवा ट्रीटमेंट सुरु आहे किंवा अवयव प्रत्यारोपणाची (ऑर्गन ट्रान्सप्लांट )ची शस्त्रक्रिया झाली असून त्याविषयीची औषधे सुरु आहेत, HIV बाधित व्यक्ती. (कारण अश्या केसेसमध्ये आजारामुळे तसेच चालू असलेल्या औषधांमुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते,ऑर्गन ट्रान्सप्लांट झाले असल्यास नवीन अवयव शरीराकडून नाकारला जाऊ नये यासाठी प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे चालू असल्यास, त्यातच इतर कुठलेही इन्फेक्शन त्रासदायक होईल. त्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्यास उत्तम.
६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच उच्चरक्तदाब (High BP ), मधुमेह, हृदयविकार , फुफ्फुसे-यकृत-किडनी च्या संबंधी काही त्रास असल्यास , चेतासंस्थेचे विकार (या सर्वांना को -मॉर्बिड स्थिती असे मानतात.) असलेल्या व्यक्ती , यांनी स्वविलगीकरण करण्या आधी सर्व नियम. स्वतःची शरीरस्थिती आधी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून नीट तपासून घ्यावी. मगच स्वविलगीकरणाचा निर्णय घ्यावा.
किती दिवस करावे?
आपल्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे १४ ते १७ दिवस स्वविलगीकरण करावे. कारण तुम्ही एखाद्या बाधित व्यक्तीच्या/या संपर्कात आल्यास साधारणतः १४ दिवसांमध्ये लक्षणे उत्त्पन्नहोऊ शकतात. तसेच इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तींना जर सलग १० दिवस लक्षणांमध्ये वाढ नसेल आणि शेवटचे सलग ३ दिवस ताप नसेल तर रजा मिळू शकते , मात्र या व्यक्तींनी घरी पुढे ७ दिवस स्व विलगीकरण करून स्वतःची लक्षणे तपासणे अपेक्षित आहे.
स्वविलगीकरण करताना कुठल्या सोयी उपलब्ध असणे गरजेचे?
सर्वप्रथम घरामध्ये स्वतंत्र टॉयलेट - बाथरूमची जोडणी असलेली खोली (शय्यागृह) असावे. (master bedroom )
स्वविलगीकरणात असलेल्या रुग्णाची काळजी घेण्यासाठी २४ तास केअरटेकर उपलब्ध असणे आवश्यक आहे. केअरटेकर म्हणजे घरातील सदस्य/शेजारी अथवा व्यावसायिक पद्धतीने हे काम करणाऱ्या व्यक्तीही असू शकतात पण त्या रुग्णासाठी २४ X ७ उपलब्ध असणे गरजेचे. आणि हे काम एकाच व्यक्तीने करावे.
रुग्ण, केअर टेकर व रुग्णालय यांच्यात उत्तम समन्वय व सतत संपर्क असायला हवा.
रुग्ण व केअरगिव्हर यांना PPE किट (किमानपक्षी चांगले 3 ply मास्क आणि ग्लोव्हस यांचा पुरेसा पुरवठा असावा.)
रुग्णाने रोज स्वतःही आपली तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना रोजच्या रोज कळवावे .
यासाठी एक थर्मोमीटर , १ पल्स ऑक्सिमीटर घरी आणल्यास आपल्या रक्तातील ऑक्सिजन चे प्रमाण , तापमान नियमितपणे तपासता येईल . (हे खूप उपयोगी होऊ शकते हे एक वैद्य म्हणून माझे मत आहे.)
कोणती लक्षणे तपासावीत -
१. ताप - खोकला
२. श्वास घेण्यास त्रास होणे.
३. छाती जड वाटणे किंवा छातीत वेदना होणे.
४. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे. (यासाठी पल्स ऑक्सिमीटर आवश्यक असतो.)
५. उत्साह न वाटणे,
६. गोंधळल्यासारखे होणे.
७. चक्कर येणे / तोल जाणे.
८. गाळून गेल्याप्रमाणे वाटणे.
९. ओठ किंवा चेहऱ्यावर निळसर झाक.
Happy hypoxia (हॅपी हायपॉक्सिया सिंड्रोम) - ही संज्ञा अपल्यापैकी कोणी वाचली आहे का? काही COVID बाधित रुग्णांमध्ये हे लक्षण दिसते. हायपॉक्झिया म्हणजे रक्तातील कमी झालेली ऑक्सिजनची पातळी. आणखी सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर आपल्या शरीरातील अवयवांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे हे लक्षण आहे. असे होत असेल तर वर नमूद केलेली लक्षणे दिसू शकतात. *हॅपी हायपॉक्झिया* या अवस्थेत असे काही दिसत नाही. रुग्ण व्यवस्थित , विनातक्रार आपली कामे पार पाडत असतो. मात्र ऑक्सिजनची पातळी कमी झालेली असल्यामुळे शरीर अवयावांवर ताण येत असतो. ज्यामुळे अचानक तातडीची गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. हे असे नक्की का होत असावे यामागचे कारण अजून कळलेले नाही पण हे लक्षण दिसत आहे हे मात्र खरे.
यामुळेच पल्स ऑक्सिमीटर सारख्या यंत्राच्या वापराने आपली रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासावी.
स्वविलगीकरण करताना काय खबरदारी घ्यावी?
रुग्णाने घरातही मास्क वापरावा. खोलीत एकटे असताना नाही वापरला तरी चालेल पण जर खोलीत इतर कोणी असेल तर मास्क वापराने बंधनकारक आहे. मास्क दार ६ ते ८ तासांनी बदलावा. /भिजल्यास किंवा खराब झाल्यास त्वरित बदलावा.
रुग्णाच्या सर्व वस्तू वेगळ्या ठेवाव्या. (अंथरूण -पांघरूण ,टॉवेल,नॅपकिन,रुमाल,कपडे,जेवणाची भांडी,पाण्याचे जग )
शक्यतो लक्षणे नसल्यास स्वतःची हलकी कामे स्वतःच केल्यास विरंगुळा होतो. (नियमित दिनचर्येसोबतच लक्षणांसाठी निरीक्षण करतच राहावे)
रुग्णाने आपले कपडे स्वतःच धुवून निर्जंतुक करावे व खोलीतच वेगळ्या जागी वाळत घालावे.
तसेच भांडी सुद्धा स्वतःची स्वतः घासून ठेवावी.
लक्षणे जास्त असल्यास किंवा ही कामे स्वतःची स्वतः करणे शक्य न झाल्यास कपडे , भांडी १% सोडियम हायपोक्लोराइटच्या द्रावणात वेगवेगळे भिजवून ठेवावे.असे कपडे व भांडी नंतर केअर टेकरनी वेगळे धुवावे .
बाधित व्यक्तीने वापरलेल्या वस्तू धुताना केअर गिव्हर नी पूर्ण PPE किट परिधान करावे.
बाधित व्यक्तीची खोली साफ करण्यासाठी जातानासुद्धा केअर गिव्हर नी पूर्ण PPE किट परिधान करावे.
PPE किट घालण्यापूर्वी व काढल्यानन्तर ४० सेकंदांपर्यंत साबणाने हात धुवावेत.
वापरलेले मास्क , PPE किट १% सोडियम हायपोक्लोराइटच्या द्रावणात भिजवून मग खोलवर गाडावे किंवा जाळून टाकावे. (वापरलेले मास्क पुन्हा विकले जात असल्याचा तसेच या मास्कमुळे इन्फेशन पसरत असल्याचा संदर्भ लक्षात घेतला तर या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात येईल.)
खोली साफ करताना लादी, दरवाज्याचे मूठ/कडी (हॅन्डल) जंतुनाशक-साबणपाण्याने (१% सोडियम हायपोक्लोराइटने) धुवून , पुसून घ्यावे. फोन्स अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने पुसावे.
अंथरूण-पांघरूण झटकू नये.
COVID बाधित रुग्णाचा कचरा वेगळा ठेवावा. तो रोजच्या कचऱ्यात मिसळू नये.
शक्यतो हा कचरा एका पिशवीत गोळा करून ती पिशवी पुन्हा दुसऱ्या पिशवीत घट्ट बांधावी. आणि हा कचरा पिवळ्या रंगाच्या/या पिशवीत बांधून द्यावा. (जरा ओला कचरा हिरव्या पिशवीत व सुका कचरा लाल पिशवीत द्यायचा असतो तसाच COVID १९ बाधित व्यक्तीचा कचरा पिवळ्या पिशवीत द्यावा. हे आपल्यासाठी, आपल्या शेजाऱ्यांसाठी तसेच कचरा हाताळणाऱ्या लोकांच्या/आहि सुरक्षेसाठी आहे.)
घरीच विलगीकरण असले तरीही ते गांभीर्याने पाळावे. नियम मोडून इतरांमध्ये मिसळू नये. अगदी घरच्यांशी सुद्धा नाही.(चौकशी करण्यासाठी विलगीकरणाच्या खोलीत जाऊ नये.)
औषधे आणायला किंवा सामान आणायला बाहेर जाऊ नये, घरात एकटेच राहत असलात तरीही.
खालील मुद्द्यांविषयी माहिती घेऊ पुढील भागात -
केअर गिव्हर आणि कुटुंबीयांनीसुद्धा विलगीकरण करावे का?
होम आयसोलेशन आणि मानसिक स्वास्थ्य -
COVID 19 ची ट्रीटमेंट आणि आयुर्वेद -
No comments:
Post a Comment