Saturday, 3 October 2020

संध्याछाया…… विचार ज्येष्ठांच्या प्रश्नांचा, भाग 1

 



            मावळतीचे रंग, कुणाला सुखावणारे तर कुणाला भिववणारे….

अशीच काहीशी स्थिती वृद्धावस्थेतही होत असते. वार्धक्य / ज्येष्ठपर्व / वानप्रस्थाश्रम / Second innings , प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यातील या कालखंडाकडे पाहतो. कितीही अपरिहार्य आणि अविभाज्य असले तरी जेव्हा खरोखरच वृद्धावस्था जवळ येते तेव्हा नाही म्हटलं तरी सर्वांच्या मनात थोडीशी धाकधूक असतेच.

यामध्ये बऱ्याचदा शारीरिक, मानसिक, आर्थिक अथवा नातेसंबंधातून निर्माण होणारे तणाव, जबाबदाऱ्या यामुळे असे होत असावे कदाचित. ताण-तणाव हेसुद्धा बऱ्याचदा शारीर स्थितीमुळेही होत असतात. का बरं होतं असं?

आपल्या जीवनाचे ढोबळमानाने 3 टप्पे असतात. 

बाल्यावस्था , तरुणावस्था आणि वृद्धावस्था.


■ बाल्यावस्था - बाल्यावस्थेत कफ दोषाचे प्राबल्य असते.

हे वाढीचे वय असल्याने बाल्यावस्थेत शरीरामध्ये कोशिका आणि उतींची वाढ होत असते. काही दुखले-खुपले (wear and tear) तर त्या जखमा लवकर भरून येतात.कारण या टप्प्यात वाढ होण्याचा वेग हा झीजेच्या वेगापेक्षा जास्त असतो.

साधारण 18 ते 20 वर्षापर्यंत ही अवस्था दिसून येते. 


■ तरुणावस्था -  ही अवस्था साधारणतः पुढील 25 ते 30 वर्षे राहते. या अवस्थेत पित्त दोषाचे प्राबल्य असते. तरुणाईचा जोश,धडाडी, नवीन काही करून दाखवण्याची उर्मी या पित्त दोषामुळेच मिळते. या काळात आपल्या सवयी, दिनचर्येनुसार शरीरातील सूक्ष्म पचन होत असते. वाढीचा (नवीन कोशिका-उती तयार होण्याचा) वेग आणि जीझेचा वेग हा सामान्यतः सारखाच असतो. पण या वयात आपला जो आहार-विहार (lifestyle) असतो त्यातच आपल्या वृद्धावस्थेची बीजे रोवली जातात.

                 या दोन अवस्थांबद्दल अजून बरेच काही सविस्तर सांगता येईल, जे आपण इतर लेखनामध्ये त्या - त्या  अनुषंगाने पाहूच. पण आता या लेखमालेत आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत ते वृद्धावस्थेबद्दल. 

■ वृद्धावस्था - आपण सगळेच कधी ना कधी वृद्ध होणार असतो. आणि खरं सांगायचं तर ,

शीर्यते तत् शरीरम् ।

म्हणजेच क्षरण पावते (झीजते) ते शरीर. 

थोडक्यात आणि अचूक सांगणे ही आयुर्वेद शास्त्राची खासियत आहे. त्याचाच नमुना म्हणजे आयुर्वेदाच्या अभ्यासाला आम्ही सर्वप्रथम अभ्यासतो ते हे वाक्य. 'जे क्षणोक्षणी झीजते ते शरीर.' म्हणजे 'लय' होणे हाच या शरीराचा गुणधर्म. या काळात वात दोषाचे प्राबल्य असते.आणि वाताचे लक्षण म्हणजे गती. त्यामुळे वृद्धावस्थेत हा झीज होण्याचा वेग अधिक वाढतो. त्यामुळे विविध प्रणाली उदा. पचनसंस्था, चेतासंस्था, तसेच विविध शरीरावयवांचे कार्य मंदावते.

2011 साली केलेल्या जनगणनेनुसार, भारतात तब्बल 104000000 ज्येष्ठ नागरिक आहेत आणि या गतीने 2050 सालापर्यंत भारतात एकूण लोकसंख्येच्या 20% नागरिक हे ज्येष्ठ वयोगटातील असतील. मग ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहेच ना? 

             वय आणि कार्यक्षमतेनुसार या वयोगटाचे दोन ढोबळ उपप्रकार करता येतील. साधारणतः 60 ते 75 आणि 75 च्या पुढे. अर्थात विविध मानसिक आणि शारीरिक ताण-तणाव व ते सहन करण्याची क्षमता, शारीरिक आणि बौद्धिक प्रतिसाद (रिफ्लेक्सेस) आणि मध्यम वयात झालेले काही आजार उदा. मधुमेह,उच्च रक्तदाब, कॅन्सर (अर्थात ही काही वानगीदाखल उदाहरणे झाली, पण सध्या अनेक आजार मध्यम वयातच दिसून येतात.) तर, अश्या आजारांनुसारही वृद्धावस्थेतील कार्यक्षमता ठरते.

पुढील भागांतून आपण वृद्धावस्थेतील वेगवेगळ्या प्रश्नांचा विचार करणार आहोत.

(क्रमशः) 



मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 04 ऑक्टोबर 2020 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/10/1.html  ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करतााना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)



No comments:

Post a Comment