आला उन्हाळा… आरोग्य सांभाळा…
( ग्रीष्म ऋतुचर्या )
हे शीर्षक वाचूनच तुम्ही म्हणाल की ‘अहो, उन्हाळा येतोय कसला, आता तर अगदी ठाणच मांडून बसलाय! हीटवेव्ह तर दोनदा येऊन गेली. बसल्या बसल्या शिजतोय आम्ही रोज.’ तुमचंही खरंच आहे म्हणा,यावर्षी आल्हाददायी वसंत फारसा असा जाणवलाच नाही. सध्या वसंत ऋतू सुरु आहे असं फक्त झाडावरची कोवळी पालवी आणि गाणारा कोकिळच म्हणेल, बाकी हवामान तर ग्रीष्माचीच लक्षणं दाखवतं आहे.सूर्याची प्रखर किरणं अंगाची काहिली करत आहेत आणि म्हणून यावर उतारा देण्यासाठी गल्लोगल्ली टपाटप लिंबू सरबत,ज्यूस,ताक, लस्सी,सोडापब ची दुकानं उभी राहिलीत आणि त्यांच्या समोरची गर्दी ही शीतपेयं पटापट रिचवू लागलीय. पण इथेच खरा घात होतो. हे असे गारेगार उपचारच उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात त्यामुळे त्यांचा वापर हा मर्यादितच हवा.
कर्कवृत्तावर असलेल्या आपल्या संपूर्ण भारतात उन्हाळा अंमळ कडकच असतो. उन्हाळ्यात सूर्यकिरणे लंबरूप पडत असल्याने अधिक प्रखर असतात. त्यात आपण प्रगतीच्या नावाखाली केलेल्या विकास(??)कामांनी वाढवलेले ग्रीन हाऊस इफेक्ट्स या तीव्रतेत अधिकच भर घालतात. या अतिउष्णतेमुळे वातावरण आणि जमीन उष्ण,रुक्ष बनते. यामुळे या काळात शरीरामध्ये वातदोषाचा नैसर्गिक संचय आणि कफ दोषाचे नैसर्गिक शमन होते. यामुळे शरीराची रुक्षता वाढते.शरीरबल, पचनशक्ती आणि जाठराग्नि मंद होतात.
अशा वेळी शीतोपचार मर्यादा पाळून करायला हवेत. म्हणजे बाह्योपचार शीत असावेत पण आभ्यंतर उपचार करताना या गारव्याचा मारा नको. बाह्योपचार म्हणजे आंघोळीसाठी कोमट किंवा साधे नळाचे पाणी वापरावे.आंघोळीनंतर शरीराला चंदनाचा लेप किंवा चंदनाचे वस्त्रगाळ चूर्ण लावावे(म्हणजे नेहमीच्या टाल्कम पावडरऐवजी चंदनाचे चूर्ण वापरता येईल.),मोगरा-जाई-जुई सारख्या सुगंधी फुलांच्या सहवासात राहावे.सध्याच्या काळात कोणी गजरे माळत नाही पण फुले फक्त सौंदर्यासाठी महत्वाची नाहीत तर चंदन,मोगरा,जाई-जुई या शीतवीर्यात्मक वनस्पती आहेत. त्यांचा सहवास बाह्य वा आभ्यंतर वापर पित्तशामक असतो. तसेच त्यांचा सुगंध मनाला आल्हाददायक असतो.(ही एक प्रकारची Aroma therapy म्हणा ना). याखेरीज घरात,ऑफिसेस मध्ये वावरणाऱ्या व्यक्तींसाठी पंखा, वातानुकूलन यंत्र आणि कूलर यामध्ये दमट हवामानात वातानुकूलन यंत्र आणि कोरड्या हवामानासाठी आर्द्रता आणि तापमान नियंत्रित करणारा (temperature and humidity control) कूलर हितकर. पण यामुळे बाहेरच्या आणि आतल्या तापमानात जास्त फरक असू नये. कारण बाहेर नागपूर आणि आत महाबळेश्वर असेल तर एवढा तीव्र तापमानातील फरक उलट त्रासदायकच ठरेल. तसेच गार हवेचा झोत,पंख्याचा वारा थेट अंगावर येणार नाही याची ही काळजी घ्यावी.कारण यामुळे शरीरातील रुक्षतेला आणि पर्यायाने संचित वात दोषाला बळ मिळतं आणि पुढे वातप्रकोप काळात म्हणजेच वर्षा ऋतूत एखादा वात विकार होण्याची शक्यता बळावते. या काळात उन्हात फिरणे अनावश्यक असल्यास टाळावे.मात्र ज्यांची नोकरी, व्यवसाय फिरतीचा आहे त्यांना हे जमत नसल्यास त्यांनी किमान संपूर्ण अंग झाकून घेणारा हलका,सुती पेहराव, स्कार्फ,टोपी, गॉगल,छत्री अशा साधनांचा वापर करावा,बरोबर सामान्य तापमानाचे पाणी,मीठ,साखर बरोबर ठेवावे.
ही झाली बाह्योपचारांची गोष्ट आता आभ्यंतर उपचार पाहू.आभ्यंतर उपचारामध्ये मात्र हे कृत्रिम शैत्य वापरण्यास अगदी मज्जाव आहे कारण बर्फाळलेले,फ्रिजमधले "थंडग्गार" पाणी मनाला जसे थंड करते तसंच शरीरालाही थंड-सुस्त करते. मग आधीच उन्हामुळे त्रासलेल्या,पचनशक्ती मंदावलेल्या शरीराला हा कृत्रिम गारवा त्रस्त करून सोडतो. कारण पूर्वी नमूद केल्याप्रमाणे या काळात पचन आणि जाठराग्नी मंद झालेले असतात. आजकालच्या भाषेत सांगायचे झाले तर आधीच क्षीण झालेल्या अग्निला ही शीतपेय पुरतं झोपवून टाकतात. त्यामुळे ‘कित्ती गरम होतंय,चला बाटल्या भरून फ्रिजमध्ये ठेवू….आत्ताच गार पाणी हवंय म्हणून थेट फ्रीजरमध्येच ठेवू...दुकानातून ही भली थोरली chilled cold-drink ची बाटलीच आणू…’ असले कोणतेही अघोरी उपाय या काळात चालत नाहीत.
त्याऐवजी सामान्य तापमानाचे किंवा नैसर्गिकरित्या थंड झालेलं माठाचं पाणी,ज्यात पित्ताशमनासाठी वाळा/गुलाब यासारख्या वनस्पती घातल्या आहेत असं प्यायला,सरबत बनवायला वापरता येईल.तसंच शहाळ्याचे पाणी,डाळिंब-कलिंगड-अननस यांचे घरी बनवलेले आणि न गाळलेले ज्युस , आवळा-लिंबू-कोकम-अननस-आंबा यांची सरबतं घ्यावी. दही-ताक यासारखे उन्हाळ्यासाठी सर्वांच्या पसंतीचे पदार्थ मात्र जपूनच वापरावे.कारण हे उष्ण गुणांचे पदार्थ आहेत.यापैकी ताक स्वभावाने उष्ण असले तरी पाचक आहे त्यामुळे मर्यादित प्रमाणात,धने-जीरे पूड घालून घेता येईल,मात्र दही उष्ण आणि पचायला जड आहे त्यामुळे त्याचा वापर टाळावा.
यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे ‘आंबा आणि आमरस’ वसंत-ग्रीष्मात आंब्याची मजा न चाखणे म्हणजे शिक्षाच म्हणा ना. त्यामुळे उन्हाळ्यात रसपुरीचा बेत होत नाही असे घर विरळाच. हा आंबा “हाणताना” जरा जपून, बरं का? म्हणजे असं की आंबा पचायला जड असतो त्यामुळे रसपुरी टाळावी.साध्या चपाती/पोळीशी आमरस खावा,तेसुद्धा पोळ्यांचे प्रमाण नेहमीपेक्षा निम्मे ठेवून. स्थूल,मधुमेही व्यक्तींनी आंबा खाताना नेहमीच्या जेवणाऐवजी व पोटात थोडी जागा आणि भूक शिल्लक ठेवून आंब्याचा आस्वाद घ्यावा.इतर अन्नपदार्थांत काय खावे,काय खाऊ नये याची यादी लेखाच्या शेवटी देत आहे.
इतर दिनचर्येचं म्हणाल तर रात्री जागरण टाळावे,ज्यांच्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांनी पहाटे,सकाळच्या वेळेत अभ्यास करावा(पहाटेच्या वेळेत मेंदू शांत आणि ताजातवाना असतो.त्यामुळे अभयस चांगला होऊ शकतो.) ज्यांना सुट्ट्या आहेत त्यांनी "Binge watching" टाळावे. व्यायाम अगदी हलक्या स्वरूपाचा असावा.पोहोण्याचा व्यायाम केल्यास जिममध्ये जाऊ नये.वृद्ध,लहान मुले, सुकुमार(नाजूक व्यक्ती) आणि आजारी व्यक्तींनी तर व्यायाम करूच नये. या काळात रतिक्रीडा १५ दिवसांतून एकदाच करावी असा शास्त्र निर्देश आहे. दुपारची झोप याकाळात चालते. पण ती प्रमाणात (साधारण ३० ते ४५ मि. ) असावी. अशा प्रकारे उन्हाळा आणि त्याचे उपाय समजून घेऊन आचरण ठेवले तर उन्हाळा सुसह्य होईलच पण उन्हाळ्याचे आजारही आटोक्यात येतील.
टीप -
१. तरीही आईस क्रीम खाणाऱ्यांसाठी खास सूचना. सध्या आईस क्रीम आणि फ्रोझन डेझर्ट मध्ये नक्की कशासाठी युद्ध सुरु आहे आणि त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होणार आहेत हे खालील लिंक वर जाणून घ्या.
२. आंब्याचे गुणधर्म खालील लिंक वर वाचा.
३.पथ्य-अपथ्यकारक पदार्थ
आभ्यंतर म्हणजे काय?
ReplyDeleteआभ्यंतर म्हणजे शरीराच्या आतील. जसे की आभ्यंतर उष्मा म्हणजे शरीरातील उष्णता. आभ्यंतर औषधे म्हणजे तोंडावाटे/नाकावाटे घ्यायची औषधे जी शरीरात आत जाऊन आपले काम करतात.
ReplyDelete