आयुष मंत्रालयाचे व्याधीक्षमत्त्वाचे उपाय झाल्यानंतर बऱ्याच जणांनी शंका विचारल्या, बऱ्याच जणांच्या संमिश्र प्रतिक्रियाही आल्या. वैयक्तिकरित्या शंका निरसन केले गेले तरी यावर सविस्तर लिहिण्याची जरा चालढकल होत होती.काय करणार लिहिण्याचा कंटाळा...... पण रोज विचारल्या जाणाऱ्या शंकांचे स्वरूप बघता FAQ सारखे काहीतरी लिहिणे गरजेचे लागले. तर काही प्रश्नांच्या उत्तरादाखल लिहिलेली ही पोस्ट,
व्याधीक्षमत्व वर्धक (Immunity booster) उपायांनी कोरोना होणार नाही का?
उत्तर - असे नक्कीच नाही. हे समजून घेणे गरजेचे आहे कि हे सर्व आपली प्रतिकारशक्ती सुधारण्याचे उपाय आहेत. कोणत्याही संसर्गजन्य आजाराविरोधात (infectious disease ) खात्रीपूर्वक इलाज देणारे उपाय नाहीत. त्यामध्ये रुग्णप्रकृतीनुसार थोडेफार वैविध्यसुद्धा येईल त्यासाठी वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.व्याधीक्षमत्त्व (Immunity ) म्हणजे काय?
उत्तर - “त्याची ‘immunity’ लो आहे नं म्हणून त्याला सारखी सारखी infections होतात” अश्या छापाची वाक्य आपण बऱ्याचदा ऐकतो. पण व्याधीक्षमतत्व म्हणजे रोगप्रतिकारशक्ती म्हणजे रोगाशीही मुकाबला करण्याची ताकद यापेक्षा जास्त माहिती आपल्याला नसते. आधुनिक संशोधन असे सांगते की शरीराची रोप्रतिकारक क्षमता ही पांढऱ्या रक्तकणांवर अवलंबून असते. या पांढऱ्या पेशी २ प्रकारच्या असतात Phagocytes - बाहेरून शरीरावर आक्रमण करणाऱ्या शत्रुपेशींचा फडशा पाडणे (जसे सैनिक शत्रूला मारून टाकतात.) आणि Lymphocytes जे शरीरवर पूर्वी झालेले संसर्ग लक्षात ठेवतात व पुन्हा त्याच प्रकारचा हल्ला झाल्यास शरीराला ते लक्षात आणून देऊन त्वरित मुकाबला करण्यास मदत करतात. (म्हणजे IB /RAW सारखे हो) त्यामुळे जेव्हा एखादे शरीरात एखादा संसर्ग होतो तेव्हा हे सगळ्या प्रकारच्या पेशी (phagocytes-lymphocytes चे उपप्रकार ) एकत्र काम करून संसर्ग ओळखण्याचा आणि त्याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करतात.
आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहे रसरक्तादि सप्तधातूंचा सारभाग म्हणजे ‘ओज’ सर्व शरीर-मानस-बौद्धिक कार्ये ही ‘ओजस’ तत्त्वावर अवलंबून असतात. ओजामुळे रोगप्रतिकारक्षमता कार्यक्षम राहते. आयुर्वेदशास्त्रात व्याधीक्षमतत्व हे ‘सहज’ (INNATE ) म्हणजे जन्मजात प्राप्त झालेले, कालज (Aquired/borrowed ) म्हणजे पूर्वी झालेल्या आजारामुळे प्राप्त झालेले किंवा मातेकडून बाळा प्राप्त झालेले आणि युक्तिकृत (artificial ) जसे कि लसीकरणामुळे प्राप्त झालेले असे ३ प्रकार सांगितले आहेत.व्याधीक्षमत्त्व कमी होते का? आणि ते वाढवता येते का ?
आपल्याला जन्मजात एक प्रतिकारशक्ती मिळालेली असते जी आपले कुलज प्रकृती (Genetics), जन्मदेश , जन्मकाळ(गर्भसंभव आणि प्रसूतीच्या वेळेचे ऋतुमान) यावरसुद्धा अवलंबून असते
आणि ही रोगप्रतिकारक्षमता आपला आहार-विहार (diet and routine हो ), दिनचर्या, व्यायाम , मानसिक स्थिती यासगळ्यांवर अवलंबून असते. (आठवतंय का,आपणच म्हणतो कि पूर्वी तर हा त्रास मला होत नसे पण आता जरा काही झालं कि लगेच त्रास सुरु होतो.) याचे कारण कदाचित असेही असू शकते कि शरीराने आखून दिलेले आहार-व्यायाम-दिनचर्या-मानसिक शांततेबद्दलचे नियम आपण सतत दुर्लक्षित करत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणारच ना? तुम्हीच तुमच्या बँक अकाऊंटमधून फक्त पैसे काढत राहिलात आणि काहीच जमा केले नाहीत तर तुमचा बॅंकबॅलन्स आटणारच आहे. याउलट जर तुम्ही तुमच्या शरीररूपी अकाउंटमध्ये चांगले अन्न-व्यायाम-शांत झोप (दिनचर्या-ऋतुचर्येचे पालन) यांची नियमित डिपॉसिट्स करत राहिलात तर तुमचा बॅंकबॅलन्स तगडा असेल आणि एखादा आजार होणार असेल त्यावेळी जर शरीराची दोष-धातू-मल-ओज हि चौकट भक्कम असेल तर एखादा आजार होणारच नाही किंवा तो होण्याचा वेग कमी असेल किंवा त्याची लक्षणे सौम्य स्वरूपाची असू शकतील.घरी च्यवनप्राश नाही तर आता कुठे जाऊ आणायला??
लक्षात घ्या, च्यवनप्राश “म्हणजेच(??)” तंदुरुस्ती हे जे काही जनमानसात रुजलंय ना ते आधी मनातून काढा. हे स्तोम आता इतकं वाढलंय ना की अवलेह स्वरूपातील दुसरं औषध दिलं तरी काही रुग्ण त्याला च्यवनप्राशच म्हणतात. च्यवनप्राश हे ओज वाढवणारे रसायन औषध आहे. पण च्यवनप्राश हे फक्त एकच रसायन औषध नाही. च्यवनप्राश उपलब्ध नसल्यास आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने इतर रसायन औषधेसुद्धा वापरता येतील. च्यवनप्राश किती खावा हे सांगताना चरकाचार्यसुद्धा म्हणतात की पचायला जाड असल्याने भूकेवर परिणाम होणार नाही अश्या मात्रेत योग्य वेळी घ्यावा. यावियाशी शंका असेल तर तुमच्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्या. बरं दुसरी गोष्ट अशीही की रोज करण्याजोगे तब्बल १० साधे-सोपे उपाय आयुष्य मंत्रालयाने सांगितले आहेत. वनौषधियुक्त काढा (Herbal Tea ), हळदीचे दूध (गोल्डन मिल्क), आहारात ऋतूनुसार मसाल्यांचा वापर,रोज करायचे व्यायाम-योगासने-प्राणायाम-ध्यान , नस्य ,गुळण्या ,वाफ घेणे असे कितीतरी उपाय आहेत.यातले आहारीय उपाय तर आपल्या मसाल्यांच्या डब्यातच सापडतील आपल्याला इतके सोपे आहेत. ते आवर्जून करा. स्वच्छतेचे नियम पाळा . अनावश्यक स्पर्श टाळा.
सोशल मीडिया आणि बातम्या बघून गांगरून जाऊन काहीतरी शॉर्टकट्सच्या आहारी लागण्यापेक्षा शास्त्र जाणून घेऊन मन खंबीर करा. ‘ब्रेक द चेन’ हे फक्त संसर्गालाच नाही तर नकारात्मक विचारांनाही सांगा मग बघा आयुष्य किती छान वाटते. बाकी आम्ही वैद्यगण तुमच्या मदतीसाठी आहोतच.
वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक.
९८७०६९०६८९
(प्रस्तुत लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०१ मे २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/04/blog-post.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखिकेधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे झाल्यास लेखात कुठलाही बदल न करता शेअर केल्यास हरकत नाही.)
No comments:
Post a Comment