Wednesday, 29 July 2020

होम आयसोलेशन / घरीच स्वविलगीकरण कसे करावे? - भाग ३




केअर गिव्हरनी सुद्धा विलगीकरण करावे का?

  • भारतात बऱ्याचदा कुटुंबीयच आजारी व्यक्तीची काळजी घेतात. पण हल्ली परिस्थितीमुळे अनेक लोक एकटे राहत असतात. अश्या वेळी  हो केअर गिव्हरची भूमिका पार पडू शकते. 

  • हे केअर गिव्हर कोणाताही शारीरिक त्रास नसलेले असावेत. 

  • त्यांनी काळजी घेताना किंवा रुग्णाला सामान देताना कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घ्यावी. 

  • जर रुग्णाच्या खोलीत जायचेच असेल तर अश्या वेळी सोशल डिस्टंसिंग ,मास्कचे बंधन तर पाळावेच व त्याचबरोबर खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. 

  • तरीही जर लक्षणे दिसली किंवा रुग्णाच्या आयसोलेशनचा कालावधी संपल्यावर खबरदारी म्हणून केअर गिव्हरनी वेगळे राहिल्यास फायदा होईल. 

 

होम आयसोलेशन (स्वविलगीकरण) आणि मानसिक स्वास्थ्य - 


१. मन रमवण्याचे अनेक उपाय आतापर्यंत अनेकांनी सांगितले आहेत त्यामुळे मी काही उपाय सांगणार नाही.कोणाला माहिती हवी असल्यास लेखाच्या शेवटी दिलेल्या क्रमांकावर मेसेज करू शकता. पण एका मुद्द्यावर पुन्हा जोर देऊन सांगेन की स्वविलगीकरणात असलेले रुग्ण आधीच आजाराविषयी वेगवेगळी माहिती वाचून घाबरलेले असतात त्यात हा एकटेपणा जाचक वाटू शकतो. पण तरीही तो महत्त्वाचा आहे. भावनेला बळी  पडू हे बंधन तोडू नका. कुटुंबीयांनीसुद्धा प्रत्यक्ष भेटण्याचा मोह टाळावा.


२. गरज वाटल्यास समुपदेशकाची मदत घ्यावी. आम्ही वैद्यासुद्धा तुमच्या/या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत.

COVID १९ साठी ट्रीटमेंट आणि आयुर्वेद - 


1.हा आम्हा वैद्यांना कायम विचारला जाणारा प्रश्न आहे. होम आयसोलेशन मधील व्यक्ती तर याविषयी विचारणा करतातच.


2.आयुष मंत्रालय याविषयावर पहिल्या दिवसापासून आरोग्य मंत्रालय व केंद्र सरकार यांच्याशी समन्वय साधून काम करत आहे.


3. सुरुवातीला आयुर्वेदीय वैद्यांना करोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी व्याधिक्षमत्त्व वर्धक उपायांची (Immunity booster measures) परवानगी मिळाली होती. यामध्ये रोज करायच्या 13 उपायांबरोबरच दिनचर्या/ऋतुचर्येचा म्हणजेच ‘आपले आरोग्य कायम राखण्यासाठी दिनक्रम कसा असावा’ याविषयी माहिती दिली होती. त्यानुसार बऱ्याच वैद्यांनी या उपक्रमांचा जनसामान्यांमध्ये प्रसार केला.वैयक्तिक स्तरावर सांगायचे तर  समन्वय आयुर्वेदातर्फे आम्ही, आयुष मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली सूची अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.  ज्यांनी  या उपक्रमांबद्दल स्वारस्य दाखवले  त्यांना दिनचर्या-ऋतुचर्येविषयी मार्गदर्शन केले होते, (डाएट अँड लाईफस्टाईल करेक्शन )

 

4. त्यानंतर  आयुष मंत्रालयाने,उपचाराच्या दुसऱ्या टप्प्यात क्वारंटाईन तसेच होम आयसोलेशन मध्ये असलेल्या अलाक्षणिक तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या गेल्या. केरळ,दिल्ली,गुजरात येथे यशस्वीरीत्या या ट्रायल्स घेतल्या गेल्या.नुसत्या 100- 200 नाही तर या  प्रत्येक ठिकाणी 5000-6000 पेशंट्सवर औषधोपचार केले गेले होते. त्यांनतर उपचाराची मार्गदर्शक तत्त्वे (Treatment Guidelines for asymptomatic and mild symptomatic cases) जाहीर केली.आता या तत्त्वांनुसार भारतभरातील आणि महाराष्ट्रातीलसुद्धा अनेक वैद्य आपापल्या ठिकाणी उपरोक्त वर्गवारीतील रुग्णांना यशस्वीरित्या चिकित्सा देत आहेत.

 

5. आयुर्वेद शास्त्रानुसार औषधोपचार करताना ऍलोपॅथीच्याच पद्धतीने केले जात नाही.उदा. दम  लागत असेल तर अमुकच औषध असे नाही. रुग्णाची प्रकृती , व्याधीची प्रकृती(लक्षणांनुसार) यानुसार दम  लागणे या लक्षणामध्येसुद्धा व्यक्तीनुसार वेगळे दोष असू शकतात.याचे कारण आयुर्वेदातील निदानपंचक पद्धती (pathogenesis & diagnosis). या सगळ्यांचा विचार करूनच हे प्रोटोकॉल्स आहेत. 


६. तसेच याहीपुढे जाऊन आयुर्वेदशास्त्राने रसायनचिकित्सा सांगितली आहे. रसायन म्हणजे कायाकल्प (Rejuvination) एखाद्या दीर्घकालीन  किंवा कोरोनासारख्या तीव्रवेगी म्हणजेच पटकन हल्ला करणाऱ्या आजारातून एखादी व्यक्ती  बरी झाली तरी अश्या आजाराचा शरीरावर दुष्परिणाम होत असतोच. आणि त्यामुळे नन्तरही काही लक्षणे दिसतात. हे दुष्परिमाण कमी करण्यासाठी काही  औषधं सांगितली  ज्यांना रसायन ही  संज्ञा आहे. मात्र हे सर्व औषधे घेताना पूर्वी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच मुद्द्यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे ही  औषधे वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत.


७. सुरुवातीपासूनच आयुर्वेदीय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वेळीच उपचार सुरु झाल्यामुळे उपशयही लवकर मिळत आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा विचार जरूर करा.  


८. मात्र हे करताना व्हाट्सएप  युनिव्हर्सिटीला लांब ठेवा. फेसबुक/व्हाट्सएप  वरील वरील मेसेजेस माहितीसाठी वाचणे ठीक आहे पण त्या मेसेजेसद्वारे स्वतःच स्वतःचे औषधोपचार करणे  योग्य आहे?


९. कोरोना चिनी षडयंत्र आहे की हॉस्पिटलचा पैसे उकळायचा खेळ याविषयी मीठमसाला लावून चर्चा होऊ शकते पण लक्षणे  असताना  योग्य वैद्यकीय सल्ला न घेता मेसेजमधले घरगुती उपाय करत राहणे कसे समर्थनीय होईल?


१०. आपल्या जवळ अनेक चांगले,नोंदणीकृत वैद्य आहेत. त्यांचा सल्ला जरूर घ्या.स्वघोषित आणि सवंग  लोकप्रियता असलेले आणि मुख्य म्हणजे कोणतीही पदवी नसलेले लोक टाळा. 

                    वेळीच निदान आणि उपचार झाले तर कोरोनावर मात शक्य आहे त्यामुळे वेळ दवडू नका. काळजी करू नका , काळजी घ्या. आयुर्वेद तुमच्या बरोबर नेहमीच आहे.  


टीप - वैद्यांचा सल्ला घेताना ते शिक्षित आणि नोंदणीकृत वैद्य आहेत याची खात्री करून घ्यावी.

आपली मते व काही शंका असल्यास त्या आपण मला वैयक्तिक क्रमांक अथवा इमेलद्वारे विचारू शकता. यापुढील लेख दर रविवारी सकाळी ब्लॉगवर प्रसिद्ध केले जातील. हे लेख आपल्याला व्हाट्सऍप /ईमेलद्वारे हवे असल्यास आपण खाली दिलेल्या क्रमांकावर मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. अथवा आमचे फेसबुक पेज like करा.

https://m.facebook.com/drsnigdhasclinic/ 


डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 26 जुलै 2020 रोजी आपल्या *https://samanwayayurved.blogspot.com/2020/07/blog-post_26.html?m=0* या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


Sunday, 26 July 2020

होम आयसोलेशन / घरीच स्वविलगीकरण कसे करावे? - भाग 1 , 2


सध्याच्या परिस्थितीत बऱ्याचदा ऐकू येणाऱ्या संज्ञा  म्हणजे ‘संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन.) आणि ‘होम आयसोलेशन’.यातील ‘संस्थात्मक विलगीकरण’ सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. पण ‘होम आयसोलेशन’बाबत काहीजणांनी विचारणा केली होती. नक्की कसे असते हे ‘होम आयसोलेशन ? कोण करू शकेल ?आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकतो का हो, होम आयसोलेशन मध्ये एखादा रुग्ण असेल तर? हे   प्रश्न आपल्या मनात येतात आणि त्यासाठीच आपण आज हा विषय समजून घेणार आहोत. पण हे समजण्यासाठी मुळात आयसोलेशन (Isolation ) आणि क्वारंटाईन (Quarantine) या दोन संज्ञांतील फरक समजून घ्यावा लागेल. 

आयसोलेशन (Isolation ) म्हणजे  संसर्गजन्य आजाराने बाधित/आजारी व्यक्तीला स्वस्थ व्यक्तींपासून दूर  ठेवणे आणि त्यांचे औषधोपचार करणे. 

Quarantine (क्वारंटाईन ) म्हणजे संसर्गजन्य विषाणू जीवाणूच्या संपर्कात आलेल्या माणसांना वेगळे ठेवून त्यांच्यात आजाराची काही लक्षणे दिसतात का ते तपासणे. क्वारंटाईन हा आयसोलेशन चा सौम्य प्रकार आहे. कारण या प्रकारच्या विलगीकरणात व्यक्ती बाधित असेलच असे नाही. 


स्वविलगीकरण कोणी करावे?

१. रिपोर्ट पॉसिटीव्ह आलेल्या पण कोणतीही लक्षणे नसलेल्या (Asymptomatic Positives ) व्यक्ती. 

२. सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले रुग्ण.

३. कोरोना चाचणी सकारात्मक आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती. (Contacts), उदा. - 

  • COVID १९ बाधित रुग्णासोबत एकाच घरात राहणारे कुटुंबीय. 

  • अशी व्यक्ती जी कोरोनाबाधित  रुग्णाच्या संपर्कात असताना PPE कीट  वापरत नव्हती / त्यांचे परिधान केलेले PPE किट खराब झाले होते. 

  • अश्या व्यक्ती ज्यांचा COVID १९ बाधित रुग्णाशी १ मीटरपेक्षा कमी अंतरावरून संपर्क आला आहे किंवा ज्यांना COVID १९ रुग्णासोबत एखाद्या बंदिस्त जागेमध्ये राहावे लागले, जसे की  विमानप्रवास , वाहनप्रवास अथवा ऑफिस अश्या बंदिस्त जागा.  

  •  माझे वैयक्तिक मत असे आहे की जे मी माझ्या रुग्णांना पूर्वीही सांगत होते आणि सध्याच्या काळात तर ते खास गरजेचे आहे, की  इतर कारणांमुळेही वायरल ताप-सर्दी-खोकला असल्यास  इतरांपासून वेगळे राहावे. असे केल्यास आपल्यासोबत घरात राहणाऱ्या कुटुंबियांना , विशेषतः वृद्धांना याचा त्रास होणार नाही. बऱ्याचदा असे दिसून येते की  RT-PCR टेस्टचा निकाल येईपर्यंत रुग्णाने विलगीकरण केलेले नसेल तर घरातील इतर सदस्यांनाही लागण झालेली असू शकते.  

४. सगळ्यात महत्त्वाचे हे समजून घ्यायला हवे की कोरोना इन्फेक्शन म्हणजे काही लाजिरवाणी गोष्ट नाही की सगळ्यांपासून लपवायला हवी. उलट सुरुवातीलाच लक्षणे दिसू लागल्यावर योग्य औषधोपचारासोबत स्वविलगिकरण आणि पूर्ण विश्रांती घेतली तर लवकर  बरे होण्यास मदतच होईल.

स्वविलगीकरण कोणाला करता येणार नाही?

  • असे पेशंट ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी  आहे. उगा. - कॅन्सर झाला असल्यास अथवा ट्रीटमेंट सुरु आहे किंवा अवयव प्रत्यारोपणाची (ऑर्गन ट्रान्सप्लांट )ची शस्त्रक्रिया झाली असून त्याविषयीची औषधे सुरु आहेत, HIV बाधित व्यक्ती. (कारण अश्या केसेसमध्ये आजारामुळे तसेच चालू असलेल्या औषधांमुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते,ऑर्गन ट्रान्सप्लांट झाले असल्यास नवीन अवयव शरीराकडून नाकारला जाऊ नये यासाठी प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे चालू असल्यास, त्यातच इतर कुठलेही इन्फेक्शन त्रासदायक होईल. त्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्यास उत्तम.

  • ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच उच्चरक्तदाब (High BP ), मधुमेह, हृदयविकार , फुफ्फुसे-यकृत-किडनी च्या संबंधी काही त्रास असल्यास , चेतासंस्थेचे विकार (या सर्वांना  को -मॉर्बिड स्थिती असे मानतात.) असलेल्या व्यक्ती , यांनी स्वविलगीकरण करण्या आधी सर्व नियम. स्वतःची शरीरस्थिती आधी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून नीट तपासून घ्यावी. मगच स्वविलगीकरणाचा निर्णय घ्यावा. 


 

किती दिवस करावे?


आपल्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे १४ ते १७ दिवस स्वविलगीकरण करावे.  कारण तुम्ही एखाद्या बाधित व्यक्तीच्या/या संपर्कात आल्यास साधारणतः १४ दिवसांमध्ये लक्षणे उत्त्पन्नहोऊ शकतात. तसेच इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तींना जर सलग १० दिवस लक्षणांमध्ये वाढ नसेल आणि शेवटचे सलग ३ दिवस ताप नसेल तर रजा  मिळू शकते , मात्र या व्यक्तींनी घरी पुढे ७ दिवस स्व विलगीकरण करून स्वतःची लक्षणे तपासणे अपेक्षित आहे. 


स्वविलगीकरण करताना कुठल्या सोयी उपलब्ध असणे गरजेचे?


  • सर्वप्रथम घरामध्ये स्वतंत्र टॉयलेट - बाथरूमची जोडणी असलेली खोली (शय्यागृह) असावे. (master bedroom ) 

  • स्वविलगीकरणात असलेल्या रुग्णाची काळजी घेण्यासाठी २४ तास केअरटेकर उपलब्ध असणे आवश्यक आहे. केअरटेकर म्हणजे घरातील सदस्य/शेजारी अथवा व्यावसायिक पद्धतीने हे काम करणाऱ्या व्यक्तीही असू शकतात पण त्या रुग्णासाठी  २४ X  ७ उपलब्ध असणे गरजेचे. आणि हे काम एकाच व्यक्तीने करावे. 

  • रुग्ण, केअर टेकर व रुग्णालय यांच्यात उत्तम समन्वय व सतत संपर्क असायला हवा.

  • रुग्ण व केअरगिव्हर यांना  PPE किट (किमानपक्षी चांगले 3 ply मास्क आणि ग्लोव्हस यांचा पुरेसा पुरवठा असावा.) 

  • रुग्णाने रोज स्वतःही आपली तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना रोजच्या रोज कळवावे . 

  • यासाठी  एक थर्मोमीटर , १ पल्स ऑक्सिमीटर घरी आणल्यास आपल्या रक्तातील ऑक्सिजन चे प्रमाण , तापमान नियमितपणे तपासता येईल . (हे खूप उपयोगी होऊ शकते हे एक वैद्य म्हणून माझे मत आहे.)

  • कोणती लक्षणे तपासावीत -
    १. ताप - खोकला
    २. श्वास घेण्यास त्रास होणे.
    ३. छाती जड  वाटणे किंवा छातीत वेदना होणे.
    ४. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे. (यासाठी पल्स  ऑक्सिमीटर आवश्यक असतो.)
    ५. उत्साह न वाटणे,
    ६.  गोंधळल्यासारखे होणे. 

७. चक्कर येणे / तोल जाणे. 

८. गाळून गेल्याप्रमाणे वाटणे. 

९. ओठ किंवा चेहऱ्यावर निळसर झाक. 

  • Happy hypoxia  (हॅपी हायपॉक्सिया सिंड्रोम) - ही संज्ञा अपल्यापैकी कोणी वाचली आहे का? काही COVID बाधित रुग्णांमध्ये हे लक्षण दिसते. हायपॉक्झिया म्हणजे रक्तातील कमी झालेली ऑक्सिजनची पातळी. आणखी सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर आपल्या शरीरातील अवयवांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे हे लक्षण आहे. असे होत असेल तर वर नमूद केलेली लक्षणे दिसू शकतात. *हॅपी हायपॉक्झिया* या अवस्थेत असे काही दिसत नाही. रुग्ण व्यवस्थित , विनातक्रार आपली कामे पार पाडत असतो. मात्र ऑक्सिजनची पातळी कमी झालेली असल्यामुळे शरीर अवयावांवर ताण येत असतो. ज्यामुळे अचानक तातडीची गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. हे असे नक्की का होत असावे यामागचे कारण अजून कळलेले नाही पण हे लक्षण दिसत आहे हे मात्र खरे.

    यामुळेच पल्स ऑक्सिमीटर सारख्या यंत्राच्या वापराने आपली रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासावी.

स्वविलगीकरण करताना काय खबरदारी घ्यावी?


  • रुग्णाने घरातही मास्क वापरावा. खोलीत एकटे असताना नाही वापरला  तरी चालेल पण जर खोलीत इतर कोणी असेल तर मास्क वापराने बंधनकारक आहे. मास्क दार ६ ते ८ तासांनी बदलावा. /भिजल्यास किंवा खराब झाल्यास त्वरित बदलावा. 

  • रुग्णाच्या सर्व वस्तू वेगळ्या ठेवाव्या. (अंथरूण -पांघरूण ,टॉवेल,नॅपकिन,रुमाल,कपडे,जेवणाची भांडी,पाण्याचे जग )

  • शक्यतो लक्षणे नसल्यास स्वतःची हलकी कामे स्वतःच केल्यास विरंगुळा होतो. (नियमित दिनचर्येसोबतच लक्षणांसाठी  निरीक्षण करतच राहावे) 

  • रुग्णाने आपले कपडे स्वतःच धुवून निर्जंतुक करावे व  खोलीतच वेगळ्या जागी वाळत  घालावे.

  • तसेच भांडी सुद्धा स्वतःची स्वतः घासून ठेवावी. 

  • लक्षणे जास्त असल्यास किंवा ही  कामे स्वतःची स्वतः करणे शक्य न झाल्यास कपडे , भांडी १% सोडियम हायपोक्लोराइटच्या द्रावणात  वेगवेगळे भिजवून ठेवावे.असे कपडे व भांडी  नंतर केअर टेकरनी  वेगळे धुवावे . 

  • बाधित व्यक्तीने वापरलेल्या वस्तू धुताना केअर गिव्हर नी  पूर्ण PPE किट परिधान करावे. 

  • बाधित व्यक्तीची खोली साफ करण्यासाठी जातानासुद्धा केअर गिव्हर नी  पूर्ण PPE किट परिधान करावे.

  • PPE किट घालण्यापूर्वी व काढल्यानन्तर ४० सेकंदांपर्यंत साबणाने हात धुवावेत. 

  • वापरलेले मास्क , PPE किट १% सोडियम हायपोक्लोराइटच्या द्रावणात भिजवून मग खोलवर गाडावे किंवा जाळून टाकावे. (वापरलेले मास्क पुन्हा विकले जात असल्याचा तसेच या मास्कमुळे इन्फेशन पसरत असल्याचा संदर्भ लक्षात घेतला तर या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात येईल.)

  • खोली साफ करताना लादी, दरवाज्याचे मूठ/कडी  (हॅन्डल) जंतुनाशक-साबणपाण्याने (१% सोडियम हायपोक्लोराइटने) धुवून , पुसून घ्यावे. फोन्स अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने पुसावे.

  • अंथरूण-पांघरूण झटकू नये. 

  • COVID बाधित रुग्णाचा कचरा वेगळा ठेवावा. तो रोजच्या कचऱ्यात मिसळू नये. 

  • शक्यतो हा कचरा एका पिशवीत गोळा करून ती पिशवी पुन्हा दुसऱ्या पिशवीत घट्ट बांधावी. आणि हा कचरा पिवळ्या रंगाच्या/या पिशवीत बांधून द्यावा. (जरा ओला कचरा हिरव्या पिशवीत व सुका कचरा लाल पिशवीत द्यायचा असतो तसाच COVID १९ बाधित व्यक्तीचा कचरा पिवळ्या पिशवीत द्यावा. हे आपल्यासाठी, आपल्या शेजाऱ्यांसाठी तसेच कचरा हाताळणाऱ्या लोकांच्या/आहि सुरक्षेसाठी आहे.)

  • घरीच विलगीकरण असले तरीही ते गांभीर्याने पाळावे. नियम मोडून इतरांमध्ये मिसळू नये. अगदी घरच्यांशी सुद्धा नाही.(चौकशी करण्यासाठी विलगीकरणाच्या खोलीत जाऊ नये.) 

  • औषधे आणायला किंवा सामान आणायला बाहेर जाऊ नये, घरात एकटेच राहत असलात तरीही. 

 

खालील मुद्द्यांविषयी माहिती घेऊ पुढील भागात -

केअर गिव्हर आणि कुटुंबीयांनीसुद्धा  विलगीकरण करावे का?

होम आयसोलेशन आणि मानसिक स्वास्थ्य - 

COVID 19 ची ट्रीटमेंट आणि आयुर्वेद -

Sunday, 5 July 2020

निद्रा - भाग २.




नमस्कार, 

कालच्या भागात आपण झोप आणि जैविक घड्याळ यांचा संबंध,झोप न येण्याची करणे आणि त्यांचे परिणाम याविषयी माहिती बघितली. आजच्या या लेखात अजून काही तथ्ये घेऊया.


1. दिवसा झोपणे योग्य आहे कि टाळावे?

आपण जेव्हा झोपतो तेव्हा शरीरावर कफदोषाचा अंमल वाढतो. त्यामुळे रात्री झोपणे योग्य  असते. याउलट दिवसा झोपले की कफ वाढल्याने अपचन,रक्ताभिसरणात अडथळा,स्थौल्य, तंद्रा(सतत झोप  आल्याप्रमाणे वाटणे ) असे त्रास जाणवतात.

मात्र याला काही अपवादही आहेत हं. गायक-जास्त रियाज करणारे ,खूप व्यायाम-शरीरश्रमाचे काम करणारे,आजारी व्यक्ती,रात्री जागरण करणारे विद्यार्थी, रात्रपाळीचे कामगार यांनी दुपारी थोडा वेळ झोप घ्यावी.तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये दुपारी झोपले तर चालते.


2. वामकुक्षी आणि दुपारची झोप यात काय फरक आहे?

वामकुक्षी आणि  दुपारची झोप हे पर्यायवाची नाहीत. आधी सांगितल्याप्रमाणे  दुपारी कोणी झोपावे याचे काही निर्देश आहेत.याउलट वाम = डावी आणि कुक्षी = कूस या नावाप्रमाणेच डाव्या कुशीवर झोपणे म्हणजे वामकुक्षी. दुपारच्या जेवणाचे पचन नीट व्हावे यासाठी वामकुक्षी सांगितली आहे. पण त्यासाठी जेवल्यानन्तर १.५ ते २ तासांनी डाव्या कुशीवर १५-२० मिनिटे झोपावे असे सांगितले आहे.दुपारी आडवा हात मारून जेवल्यावर २-३ तास ताणून देणे म्हणजे वामकुक्षी नाही. 


3. झोप येण्यासाठी आहार कसा असावा?

पचायला जड असणारे पदार्थ हे कफ वाढवणारे असतात. उदा. म्हशीचे दूध हे कफ वाढवणारे आणि उत्तम निद्राकर  असे सांगितले आहे.रात्री झोपताना दूध पिण्याची सवय झोपेसाठी चांगली आहे. ताजे दही, दुधाचा चीक,जलचर पक्षांचे मांस, मासे हे पदार्थही पचायला जड असल्याने खाल्ल्यावर झोप येते. पण हे सगळे जड पदार्थ सेवन करण्याआधी आपली पचनशक्ती जरूर तपासून पाहावी. 


4. झोप येण्यासाठी अजून कोणते उपाय करता येतील?

१. संपूर्ण शरीराला तेलाने हलके मालिश करणे, टाळू भरणे, डोक्याला तेल लावणे. 

२. पायाच्या तळव्यांना काशाच्या वाटीनं तुपाचा मसाज करावा. 

३. सैल कपडे घालावे, झोपण्याची खोलीसुद्धा हवेशीर असावी. 

४. मन चिंतामुक्त असावे . यासाठी ध्यान-धारणा किंवा मंद संगीत ऐकता येईल. मात्र तीव्र संगीत ,प्रखर प्रकाश, वाचन - टीव्ही बघणे टाळावे. 

५. शक्यतो झोपण्याआधी कोणत्याही प्रकारे  स्क्रिन (टीव्ही ,लॅपटॉप,मोबाईल ) पाहू नयेत. 

६. रात्री उशिरा जेवू नये. 

७. संध्याकाळी  उशीरानन्तर चहा,कॉफीसारख्या उत्तेजक द्रव्यांचे प्रमाण टाळावे. 


5. चांगल्या झोपेसाठी काही औषधे घ्यावीत का?

वारंवार झोपेच्या गोळ्यांचे सेवन हे मुळात झोपेची प्रत ( क्वालिटी) बिघडवते.या गोळ्यांनी झोप तर येते पण ती आपल्या नैसर्गिक झोपेप्रमाणे नसते.  त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नयेत. शक्यतो आपल्या वैद्यांशी बोलून आपले आहार व दिनचर्या यांबद्दल मार्गदर्शन घेऊन योग्य ते बदल करावेत. तसेच शिरोधारा,शिरोभ्यंग ,कर्णपूरण नेत्रतर्पण यासारखी काही पंचकर्मे आम्ही वैद्य करतो ज्यामुळे झोपेचे चक्र नियमित व्हायला मदत होते. तसेच काही बाहेरून लावण्याची आयुर्वेदिक औषधे वैद्यकीय सल्ल्याने आपापल्या शरीर प्रकृतीनुरूप वापरता येतात. 


खरे तर रात्री झोप येणे हीच शरीराची प्रकृती आहे. पूर्वीच्या काळी  दिवेलागण झाली की प्रार्थना,परवचा झाल्यावर जेवणे होत आणि लवकरच आवराआवर होऊन सगळे झोपी जात. पण आता विजेचा वापर वाढल्यामुळे उशिरापर्यंत जागरणे होतात. हल्ली टीव्हीच्या नादात  सीरिअल संपेपर्यंत रात्रीची जेवणे होत नाहीत. त्यामुळे आपल्या झोपेवर परिणाम होत आहे.आणि मग काल सांगितल्याप्रमाणे त्रास होतात. मग हे सगळे टाळायचे असेल तर आपल्याला कुठेतरी हे टाळावे  ना ?

(समाप्त)

टीप - वैद्यांचा सल्ला घेताना ते नोंदणीकृत वैद्य आहेत याची खात्री करून घ्यावी.

आपली मते व काही शंका असल्यास त्या आपण मला वैयक्तिक क्रमांक अथवा इमेलद्वारे विचारू शकता. यापुढील लेख दर रविवारी सकाळी ब्लॉगवर प्रसिद्ध केले जातील. हे लेख आपल्याला व्हाट्सऍप /ईमेलद्वारे हवे असल्यास आपण खाली दिलेल्या क्रमांकावर मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. अथवा आमचे *Samanwaya Ayurvdic and Panchakarma Clinic* हे फेसबुक पेज like करा. https://m.facebook.com/drsnigdhasclinic/ 


लेखिका -

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

*9870690689*

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०६ जुलै २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/07/blog-post_5.html    ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


Saturday, 4 July 2020

निद्रा - भाग १.



आयुर्वेदात  वर्णन केलेले जैविक घड्याळ (सर्काडियन ऱ्हिदम ) आणि व्याधीक्षमत्त्व (Immunity) या विषयावरील लेख वाचल्यानन्तर  (https://samanwayayurved.blogspot.com/2020/06/blog-post.html?m=0) बऱ्याच वाचकांनी झोप कशी-किती-कधी घ्यावी? याविषयी  निरनिराळे प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना वैयक्तिकरित्या उत्तरे दिल्यानंतर त्या सर्व प्रश्नांच्या उत्तर स्वरूप हा लेख लिहिला आहे. आयुर्वेद शास्त्रात झोपेसाठी ‘निद्रा’ ही  संज्ञा वापरली आहे. तसेच आहार-निद्रा-ब्रह्मचर्य हे तीन उपस्तंभ सांगितले आहेत. उपस्तंभ  म्हणजे खांब. या खांबांवरच आपल्या  शरीराचा आरोग्यरूपी डोलारा उभा असतो. एवढे या निद्रेचे महत्त्व आहे आपल्या शरीरासाठी. झोपेचे ७ प्रकार सांगितले आहेत. 


१. तमोभवा - शरीरातील तमोगुण वाढल्यामुळे येणारी 

२. श्लेष्मसमुद्भवा - शरीरातील कफ दोष जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होतो तेव्हा झोप 

३. मनःश्रमजन्य - बुद्धीचे काम करणाऱ्या, जास्त चिंता केल्यामुळे  थकते  व  त्यामुळे झोप येते. 

४. शारीर  श्रमजन्य - शारीरिक श्रमाचे काम केल्यामुळे येणारी 

५. आगन्तुकी - काहीही कारण नसताना येणारी झोपू 

६. व्याधी अनुवर्तिनी -  एखाद्या आजारामुळे येणारी झोप 

७. रात्रीस्वभवा - रात्रीच्या वेळी येणारी झोप. 

आता, या सात प्रकारांपैकी फक्त रात्रीच्या वेळी येणारी झोप प्राकृत म्हणजे नॉर्मल सांगितली आहे. या रात्रीच्या झोपेचे महत्त्व विषद  करताना आचार्य तिला ‘भूतधात्री’ या नावाने संबोधतात.भूतधात्री म्हणजे सर्व सजीवांची (भूतांची ) आईप्रमाणे काळजी घेणारी,पोषण देणारी अशी. या एका शब्दात रात्रीच्या झोपेचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला सहज लक्षात येते. हे आयुर्वेदाचे आणि  संस्कृत भाषेचे सौंदर्य आहे. 

आता वेगवेगळी संशोधने झोपेबद्दल काय  सांगतात ते आपण पाहू,

पूर्वी  समजले  जाई की झोपेमध्ये शरीर आणि मेंदू निष्क्रिय असतो पण संशोधनाअंति  लक्षात आले की झोपेच्या कालावधीत मेंदू विश्रांती घेण्याबरोबरच वेगवेगळ्या प्रक्रियासुद्धा पार पडतो ज्या शरीराचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाच्या असतात. (भूतधात्री हे नाव किती सार्थ आहे पहा.) ही  झोप अगदी सलग नसते बरं. झोपेच्या ४ स्थिती असतात. ( NON - REM आणि REM  हे दोन ढोबळ भाग व NON - REM स्थितीचे ३ उपभाग असे हे वर्गीकरण असते.) रात्रभर हे चक्र पुन्हा पुन्हा सुरु  राहते. 


यामध्ये सर्काडियन ऱ्हिदम (जैविक घड्याळ) महत्त्वाचा का आहे?

तर, हे जैविक घड्याळ काम करण्यासाठी प्रकाशावर अवलंबून असते.संध्याकाळ झाली की प्रकाश कमी होऊ लागतो आणि मग हे घड्याळ मेंदूकडे मेलॅटोनीन या रसायनाद्वारे संदेश पाठवते की ‘रात्र होते आहे, झोपेची वेळ झाली.’ म्हणून आपल्याला रात्र झाली की झोप जाणवते.


झोप पूर्ण झाली की  कोणती लक्षणे जाणवतात?

झोप चांगली होत असल्यास श्वास संथ होतो. डोळ्याच्या हालचाली कमी होतात. मांसपेशी शिथिल होतात. (REM सायकलचा कालावधी कमी होऊन दीर्घ झोपेचा काळ वाढतो.) तसेच झोप पूर्ण झाली की आपोआप जाग येते. मन आणि शरीर उल्हसित होते.


झोप अपुरी का राहते आणि अपुर्ण राहिल्यास कोणती लक्षणे ?

मेंदूला सतत चेतना मिळत राहिल्यास झोप आली तरीही शरीर आणि मेंदू झोपू शकत नाहीत. मानसिक ताण, चिंता,राग, मोठे आवाज, तीव्र प्रकाश,सतत कार्यमग्न असणे, बिछाना आरामदायी नसणे अश्या कारणांमुळे झोप अपुरी राहू शकते. तसेच आजारी व्यक्ती, मेंदूचे आजार,झोप यावी यासाठी वारंवार घेतली जाणारी औषधे यामुळेही झोप कमी होते. वृद्धावस्थेत (वातवृद्धीमुळे) झोप कमी होते.

झोप अपूर्ण राहिली तर अस्वस्थता,डोकेदुखी, उत्साह नसणे  किंवा दिवसभर पेंगुळल्याप्रमाणे वाटत राहते. अश्या अवस्थेत काम काही चुका/अपघात होऊ शकतात.दीर्घकाळ झोप अपुरी राहीली,म्हणजे रोजच आपला दिनक्रम बिघडून आपण कमी झोप घेत राहिलो तर आपली स्मृती कमी होताना जाणवते, क्रियाशीलता कमी होते,एकाग्रता कमी होते, भाव-भावनांवरील ताबा कमी होतो त्यामुळे छोट्याश्या कारणांनीसुद्धा चिडचिड,राग,भिती किंवा अगदी नैराश्य यासारख्या तीव्र भावना आपल्याला जाणवतात. दिवसभर क्रियाशील असणाऱ्या मेंदूला विश्रांती घ्यायला, क्रियाशील काळात तयार होणारी रसायने नष्ट करायला पुरेसा वेळ न मिळाल्याने हा सगळा कचरा तिथेच साचून राहतो आणि म्हणून स्मृतिभ्रंशासारख्या आजाराचे मूळही आपल्याला या झोपेमध्ये दिसून येते. सतत कमी झोप मिळत राहिली तर आपली चेतासंस्था सतत उत्तेजित स्थितीत राहते.ज्यामुळे स्ट्रेस इंड्यूस्ड (सततच्या ताणामुळे निर्माण होणारे) रक्तदाब,हृदयविकार यांना खतपाणी मिळते. सध्या कोरोना संसर्गामुळे जग धास्तावलेले आहे,संसर्गजन्य आजारांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला चांगली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) आवश्यक असते. ही  इम्युनिटी सतत तल्लख राहावी म्हणून आपल्याला चांगली झोप गरजेची असते. विश्व आरोग्य संघटनेने सांगितलेल्या कोरोनाविरुद्धच्या  निर्देशांमध्ये ताजे अन्न आणि पुरेशी झोप यांचा आवर्जून उल्लेख केला आहे.अपुऱ्या झोपेचा हा डोकेदुखीपासून सुरु झालेला प्रवास पुढे आपल्याला लठ्ठपणा (स्थौल्य), डायबेटीस (मधुमेह) तसेच कॅन्सरसारख्या आजारांपर्यंतसुद्धा घेऊन जातो. 


“वीकडेज”ना न मिळणारी झोप आम्ही शनिवार-रविवारी भरून काढतो. 

मुळात हे समजून घ्यायला हवे की आपले शरीर आणि क्रेडिट कार्डचे बिल यात फरक आहे. महिनाभर थोडे-थोडे उधार घेऊन नन्तर महिनाअखेरीस बिल भरणे ही  सिस्टीम शरीराला लागू पडत नाही. तुम्ही आठवडाभर कमी घेतलेली झोप आणि त्याचे शरीरावर  होणारे दुष्परिणाम एखाद-दोन दिवस १०-१२ तास झोपल्याने दुर होत नसतात. 

(क्रमशः)


निद्रा-नाश करणाऱ्या गोष्टी, झोप यावी यासाठीचे उपाय ,दुपारची झोप व वामकुक्षी यातील फरक याविषयी वाचूया पुढच्या भागात. हा भाग सोमवारी ०६ जुलै रोजी सकाळी प्रसिद्ध होईल. 


टीप - वैद्यांचा सल्ला घेताना ते शिक्षित आणि नोंदणीकृत वैद्य आहेत याची खात्री करून घ्यावी.

आपली मते व काही शंका असल्यास त्या आपण मला वैयक्तिक क्रमांक अथवा इमेलद्वारे विचारू शकता. यापुढील लेख दर रविवारी सकाळी ब्लॉगवर प्रसिद्ध केले जातील. हे लेख आपल्याला व्हाट्सऍप /ईमेलद्वारे हवे असल्यास आपण खाली दिलेल्या क्रमांकावर मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. अथवा आमचे फेसबुक पेज like करा. https://m.facebook.com/drsnigdhasclinic/


लेखिका -

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०५ जुलै २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/07/blog-post.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)