नमस्कार,
कालच्या भागात आपण झोप आणि जैविक घड्याळ यांचा संबंध,झोप न येण्याची करणे आणि त्यांचे परिणाम याविषयी माहिती बघितली. आजच्या या लेखात अजून काही तथ्ये घेऊया.
1. दिवसा झोपणे योग्य आहे कि टाळावे?
आपण जेव्हा झोपतो तेव्हा शरीरावर कफदोषाचा अंमल वाढतो. त्यामुळे रात्री झोपणे योग्य असते. याउलट दिवसा झोपले की कफ वाढल्याने अपचन,रक्ताभिसरणात अडथळा,स्थौल्य, तंद्रा(सतत झोप आल्याप्रमाणे वाटणे ) असे त्रास जाणवतात.
मात्र याला काही अपवादही आहेत हं. गायक-जास्त रियाज करणारे ,खूप व्यायाम-शरीरश्रमाचे काम करणारे,आजारी व्यक्ती,रात्री जागरण करणारे विद्यार्थी, रात्रपाळीचे कामगार यांनी दुपारी थोडा वेळ झोप घ्यावी.तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये दुपारी झोपले तर चालते.
2. वामकुक्षी आणि दुपारची झोप यात काय फरक आहे?
वामकुक्षी आणि दुपारची झोप हे पर्यायवाची नाहीत. आधी सांगितल्याप्रमाणे दुपारी कोणी झोपावे याचे काही निर्देश आहेत.याउलट वाम = डावी आणि कुक्षी = कूस या नावाप्रमाणेच डाव्या कुशीवर झोपणे म्हणजे वामकुक्षी. दुपारच्या जेवणाचे पचन नीट व्हावे यासाठी वामकुक्षी सांगितली आहे. पण त्यासाठी जेवल्यानन्तर १.५ ते २ तासांनी डाव्या कुशीवर १५-२० मिनिटे झोपावे असे सांगितले आहे.दुपारी आडवा हात मारून जेवल्यावर २-३ तास ताणून देणे म्हणजे वामकुक्षी नाही.
3. झोप येण्यासाठी आहार कसा असावा?
पचायला जड असणारे पदार्थ हे कफ वाढवणारे असतात. उदा. म्हशीचे दूध हे कफ वाढवणारे आणि उत्तम निद्राकर असे सांगितले आहे.रात्री झोपताना दूध पिण्याची सवय झोपेसाठी चांगली आहे. ताजे दही, दुधाचा चीक,जलचर पक्षांचे मांस, मासे हे पदार्थही पचायला जड असल्याने खाल्ल्यावर झोप येते. पण हे सगळे जड पदार्थ सेवन करण्याआधी आपली पचनशक्ती जरूर तपासून पाहावी.
4. झोप येण्यासाठी अजून कोणते उपाय करता येतील?
१. संपूर्ण शरीराला तेलाने हलके मालिश करणे, टाळू भरणे, डोक्याला तेल लावणे.
२. पायाच्या तळव्यांना काशाच्या वाटीनं तुपाचा मसाज करावा.
३. सैल कपडे घालावे, झोपण्याची खोलीसुद्धा हवेशीर असावी.
४. मन चिंतामुक्त असावे . यासाठी ध्यान-धारणा किंवा मंद संगीत ऐकता येईल. मात्र तीव्र संगीत ,प्रखर प्रकाश, वाचन - टीव्ही बघणे टाळावे.
५. शक्यतो झोपण्याआधी कोणत्याही प्रकारे स्क्रिन (टीव्ही ,लॅपटॉप,मोबाईल ) पाहू नयेत.
६. रात्री उशिरा जेवू नये.
७. संध्याकाळी उशीरानन्तर चहा,कॉफीसारख्या उत्तेजक द्रव्यांचे प्रमाण टाळावे.
5. चांगल्या झोपेसाठी काही औषधे घ्यावीत का?
वारंवार झोपेच्या गोळ्यांचे सेवन हे मुळात झोपेची प्रत ( क्वालिटी) बिघडवते.या गोळ्यांनी झोप तर येते पण ती आपल्या नैसर्गिक झोपेप्रमाणे नसते. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नयेत. शक्यतो आपल्या वैद्यांशी बोलून आपले आहार व दिनचर्या यांबद्दल मार्गदर्शन घेऊन योग्य ते बदल करावेत. तसेच शिरोधारा,शिरोभ्यंग ,कर्णपूरण नेत्रतर्पण यासारखी काही पंचकर्मे आम्ही वैद्य करतो ज्यामुळे झोपेचे चक्र नियमित व्हायला मदत होते. तसेच काही बाहेरून लावण्याची आयुर्वेदिक औषधे वैद्यकीय सल्ल्याने आपापल्या शरीर प्रकृतीनुरूप वापरता येतात.
खरे तर रात्री झोप येणे हीच शरीराची प्रकृती आहे. पूर्वीच्या काळी दिवेलागण झाली की प्रार्थना,परवचा झाल्यावर जेवणे होत आणि लवकरच आवराआवर होऊन सगळे झोपी जात. पण आता विजेचा वापर वाढल्यामुळे उशिरापर्यंत जागरणे होतात. हल्ली टीव्हीच्या नादात सीरिअल संपेपर्यंत रात्रीची जेवणे होत नाहीत. त्यामुळे आपल्या झोपेवर परिणाम होत आहे.आणि मग काल सांगितल्याप्रमाणे त्रास होतात. मग हे सगळे टाळायचे असेल तर आपल्याला कुठेतरी हे टाळावे ना ?
(समाप्त)
टीप - वैद्यांचा सल्ला घेताना ते नोंदणीकृत वैद्य आहेत याची खात्री करून घ्यावी.
आपली मते व काही शंका असल्यास त्या आपण मला वैयक्तिक क्रमांक अथवा इमेलद्वारे विचारू शकता. यापुढील लेख दर रविवारी सकाळी ब्लॉगवर प्रसिद्ध केले जातील. हे लेख आपल्याला व्हाट्सऍप /ईमेलद्वारे हवे असल्यास आपण खाली दिलेल्या क्रमांकावर मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. अथवा आमचे *Samanwaya Ayurvdic and Panchakarma Clinic* हे फेसबुक पेज like करा. https://m.facebook.com/drsnigdhasclinic/
लेखिका -
डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक.
*9870690689*
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०६ जुलै २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/07/blog-post_5.html ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)
वयोमानामुळे रात्रीची झोप कमी झाल्यास काय करावे?
ReplyDelete