'अ' आयुर्वेदाचा - राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2020.
परवा धनत्रयोदशी होती. देवता व असुरांनी केलेल्या समुद्र मंथनातून धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरींचे अवतरण झाले म्हणून त्यांच्या जन्मदिवशी भगवान धन्वंतरींचे पूजन केले जाते. दरवर्षी धनत्रयोदशीचा दिवस 'राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' म्हणूनही साजरा करतात. यापूर्वी मी वेगवेगळ्या विषयांमधील आयुर्वेदीय दृष्टिकोनाबद्दल लिखाण केले आहे. मात्र आज मी थोडेसे आयुर्वेद शास्त्राबद्दलच लिहिणार आहे. आयुर्वेद म्हटले की वात-पित्त-कफ या संज्ञा आपण बऱ्याचदा ऐकतो. पण नक्की हे वात-पित्त-कफ म्हणजे असतात तरी काय हे जरा आज संक्षेपाने जाणून घेऊया.
त्रिदोष - त्रिदोष म्हणजेच तीन दोष ही आयुर्वेदातील महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे.वात-पित्त-कफ हे तीन दोष आहेत हे हल्ली काही जणांना माहीत असते.मात्र बऱ्याचदा वात म्हणजे गॅस, पित्त म्हणजे ऍसिडिटी आणि कफ म्हणजे सर्दी-खोकला असे समजले जाते त्यामुळे मग वातामुळे(गॅसमुळे) सांधे कसे झिजतात?ऍसिडिटी नाही तरी डोळ्यांचे त्रास,त्वचाविकार पित्तामुळे कसे होतात ? हे समजत नाही आणि मग संपूर्ण आयुर्वेद शास्त्रच "अशास्त्रीय" असल्याचा गैरसमज करून घेतला जातो. गॅस-ऍसिडिटी-सर्दी एवढे मर्यादित स्वरुप नाही या तीन दोषांचे. वात-पित्त-कफ हे तीन दोष शरीराचा मूलभूत पाया आहेत. सम अवस्थेत (नॉर्मल स्टेट) हे दोष सर्व शरीरव्यापार नियंत्रणात ठेवतात. मात्र विषमवस्थेत ते शरीरधातूंना दूषित करतात म्हणून त्यांना 'दोष' असे म्हटले जाते. (रोगस्तु दोषवैषम्यं दोषसाम्यम् अरोगता। ) अगदी सध्या सर्दीपासून कॅन्सरपर्यंत सर्व आजार हे त्रिदोष बिघडल्यामुळे होतात.
वात दोष - त्रिदोषांमध्ये वात दोष श्रेष्ठ मानला जातो. पंचमहाभूतानुसार वात म्हणजे वायू. इतर दोषांची कार्ये वायूवर अवलंबून असतात. कारण हा एकच दोष गतिशील आहे.पण हा वात असल्याने त्याचे प्रमाण मोजता येत नाही. लक्षणांवरून तो ओळखला जातो. (सोपे उदाहरण द्यायचे झाले तर वारा वाहतो तेव्हा तो दिसत नाही मात्र स्पर्श, हलणाऱ्या वस्तू पाहून त्याचे अस्तित्त्व कळते.शरीरातही वात दिसत नाही पण हॉर्मोन्स, न्यूरोट्रान्समीटर्सचे स्रावांद्वारे वेगवेगळे इम्पल्स,रिफ्लेक्स यासारख्या गतिशील क्रियांमध्ये त्याचे अस्तित्व आणि कार्य दिसून येते.) सर्व शरीराचे धारण, सर्व शरीरक्रियांचे प्रवर्तन व नियंत्रण, शरीरपरमाणूंचे संयोजन व वियोजन, गर्भाची निर्मिती, दोषांचे शोषण करणे, धातूंना स्थैर्य व बल प्राप्त व्हावे म्हणून योग्य घटकांचा पुरवठा करणे , धातूंची झीज भरून काढणे, धातूंच्या त्याज्य घटकांना मलायनांकडे नेणे, रक्तधातूला प्राणवायूचा पुरवठा करून विशुद्ध करणे. सर्व धातूंकडे रक्त पुरविणे, सर्व इंद्रियांना प्रेरक, इंद्रियार्थवाहक, मनःकार्यप्रवर्तक-नियंत्रक, इंद्रियार्थ-इंद्रिये,श्रोत्रेंद्रिय व स्पर्शेंद्रिय यांचे कार्य सुरळीत ठेवणे. वाक्प्रवृत्ती करणे ही सर्व कार्ये वात दोषाची कार्ये आहेत. यावरून लक्षात येते की वात दोष दिसत नसला तरी त्याची शरीरात होणारी सर्व कार्ये पाहून क्षीणता , साम्यावस्था किंवा प्रकोप समजता येतो.
शरीरामध्ये वात त्वचा,कानाची हाडे,मोठे आतडे,कटि प्रदेश ही प्रामुख्याने वाताची स्थाने मानली जातात.
पित्त दोष - पित्त हे पांचभौतिक द्रव्य आहे. अग्नी व जल या महाभूतांचे आधिक्य त्यात असते.शरीरात असलेल्या द्रव्यांचे पचन(चयापचय क्रिया-metabolism) करणे. शरीर उष्ण राखणे, तहान व भूक निर्माण करणे, रुची उत्पन्न करणे, शरीरातील अतिरिक्त द्रवांचे शोषण करणे, शरीर मृदू ठेवणे, त्वचा तेजस्वी व प्रभायुक्त राखणे यासारखी शारीरिक कार्ये तसेच स्मरण, विचारांत निश्चितता ठेवणे, धैर्य, शौर्य, पराक्रम व मनःप्रसाद निर्माण करणे, ही मानसिक कार्ये पित्त दोषामुळे होतात. पित्त दोष बिघडल्यास या कार्यांमध्ये बिघाड होतो. यकृत,हृदय,मस्तिष्क,प्लिहा,अग्न्याशय ही पित्त दोषाची प्रमुख स्थाने आहेत.
कफ दोष - तिसरा दोष कफ हेसुद्धा पांचभौतिक द्रव्य असून पृथ्वी आणि जल या महाभूतांच्या आधिक्याने निर्माण होते. '‘क’ म्हणजे जल व जलाप्रमाणे फल देणारा तो कफ. (केन फलति इति कफ। ) शरीराला स्थिरता,बल देणारा असा दोष म्हणजे कफ. कफाच्या अंगभूत स्निग्धता-ओलाव्यामुळे , जसा कण-कण चिकटून गोळा तयार होतो तसेच शरीर घटकांचा संचय होऊन शरीराची वाढ होते. त्यामुळे सुदृढता, पोषण,शरीरवाढ,ताकद, शरीर थंड ठेवणे , एकाग्रता यासाठी कफ दोष महत्त्वाचा असतो.
छाती,मस्तिष्क,शरीरातील विविध सांधे,मुख या ठिकाणी कफ दोष प्रामुख्याने दिसतो.
त्रिदोषांची प्रमुख स्थाने सांगितलेली असली तरीही हे तिन्ही दोष सर्व शरीरात पसरलेले असतात आणि त्यांच्या प्रत्येकी 5 उपप्रकारांद्वारे शरीरव्यापार पार पाडतात.(विस्तारभयास्तव आपण येथे त्यांचे सविस्तर वर्णन करण्याचे टाळले आहे पण पुढे त्यांची माहिती घेऊच.)
तर असे हे तीन दोष आपल्या शरीराचा मूलभूत पाया आहेत. त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे आपली शारीर प्रकृती ठरते. सम अवस्थेत असतात तेव्हा हे त्रिदोष आपले शरीर निरोगी ठेवतात तर त्यांच्या बिघाडामुळे रोगांना आमंत्रण मिळते. आपल्या आहार-विहारामुळे , त्यातील नियमित-अनियमिततेमुळे हे बिघाड होत असतात त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कोणत्याही आजाराचे मूळ शोधून त्यावर मुळासकट उपचार करणे खूप महत्त्वाचे असते.
सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 15 नोव्हेंबर 2020 रोजी आपल्या
https://samanwayayurved.blogspot.com/2020/11/2020.htmlया ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)
डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक.
9870690689
समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.
बोरीवली(पू.) मुंबई.
No comments:
Post a Comment