Wednesday, 20 May 2020

स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू - भाग 5


साखर .






“स्निग्धा मावशी,आज मी साखरेबद्दल वाचत होते तेव्हा मी सल्फरलेस शुगर असा शब्द ऐकला.म्हणजे काय गं?”

“उसाचा रस यंत्राने काढताना त्या रसात अनेक प्रकारचे इतरही घटक असतात. जसे कि सालीचे तुकडे,गोंदासारखे चिकट पदार्थ, तंतुमय पदार्थ ज्यामुळे साखर नीट तयार होऊ शकत नाही आणि हे सगळे पदार्थ फक्त गाळल्याने निघू शकत नाहीत.तसेच उसाच्या रसापासून साखर बनवताना,तो आटवला जातो. त्यामुळे त्याचा रंग गडद तपकिरी असतो. गुळाचा रंग असतो तसा. आता त्यापासून साखरेचे पांढरेशुभ्र स्फटिक तयार व्हावेत, साखर जास्त दिवस टिकावी आणि या अशुद्धी काढता याव्यात यासाठी म्हणून सल्फरचा वापर केला जातो. कधीकधी ऊस तयार व्हायच्या आधीच काढला गेला असेल तर सल्फरचा वापर केला जातो.या पद्धतीला Double sulphatization असे नाव आहे.  हे सल्फर प्रामुख्याने सल्फर डायॉक्साईड म्हणून वापरले जाते. आणि या प्रक्रियेत साखरेच्या स्फटिकांमध्ये सल्फरचे अंश राहतात.  या सल्फरमुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. हे  सल्फरचे अंश शरीरात शोषले गेल्यावर कोशिकाभित्तीना (Cell Membranes ) इजा पोहोचवतात. कारण हे सल्फर डायॉक्साईड जेव्हा शरीरातील पाण्याच्या अंशासोबत मिसळते तेव्हा H2SO3 / H2SO4 चे अंश तयार होतात.आणि यामुळे सर्दी-खोकला-श्वास घ्यायला त्रास होणे-छातीआवळाल्याप्रमाणे वाटणे असे श्वसनसंस्थेचे आजार जाणवतात.वारंवार सर्दी-खोकला होणारी माणसे,लहान मुले, दम्याचे रुग्ण,COPD,LUNG FRIBOSIS, INTERSTITIAL LUNG DISEASE असे श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांसाठी हि साखर म्हणजे विषच. आपण जेव्हा साखरेला शत्रू असे म्हणतो तेव्हा ही पांढरी साखरच आपल्या शरीरावर विषसमान कार्य करत असते. कारण फक्त आधीपासून श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तीच नाही तर लक्षणे नसलेल्या निरोगी व्यक्तींनाही अशी साखर सतत खाल्ल्यामुळे त्रास होतो. तसेच या साखर कारखान्यांतून निघणारा सल्फर पुढे वायू प्रदूषणाचालासुद्धा कारणीभूत ठरतो. ”

“अरे बापरे, कठीणच आहे हे सगळं प्रकरण.”

“हो तर, आणि सल्फरलेस साखरेमध्ये calcium क्षार वापरून मळी शुद्ध केली जाते. “

“पण  मग कळणार कसे  कि साखर कशी  बनवली आहे?”

“कसं  आहे , सल्फर वापरून बनवलेल्या साखरेला म्हणतात  प्लांटेशन व्हाईट शुगर (Plantation White Sugar) आणि सल्फरलेस साखरेबाबत पिशवीवर उल्लेखसुद्धा असतो तसेच त्या साखरेला म्हणतात रिफाईंड शुगर (Refined Sugar).आता तिसरा एक प्रकार असतो तो म्हणजे ऑरगॅनिक साखर , या प्रकारात मळी  शुद्ध करण्यासाठी ऑरगॅनिक म्हणजे नैसर्गिक स्वरूपाचे पदार्थ वापरले जातात. तसेच कच्ची साखर (Raw Sugar) , खांडसरी (Brown Sugar) असे प्रकारही ऑरगॅनिक पद्धतीने बनवले जातात. या प्रकारांचा वापर आपल्याला जेवण बनवताना वापरता येईल.”

“अच्छा म्हणजे जर आपण ऑरगॅनिक साखर वापरली तर काही टेन्शन नाही ना?”

“हो चालू शकेल ,पण  अगं मग तुझ्या आवडीच्या डेझर्ट्सचं काय करणार तू? ही प्लांटेशन व्हाईट शुगर स्वस्त असल्यामुळे विकतच्या सगळ्याच गोड पदार्थांमध्ये जसे केक,मूस,डोनट, आईसक्रीम, मिठाई सगळीकडेच वापरली जाते.”

“हम्म, म्हणजे आता गोड पदार्थ जपूनच खावे लागणार तर...... बरं आयुर्वेदामध्ये साखरेचे  काही गुण  सांगितले आहेत का?”

“ हो, आयुर्वेदामध्ये साखर आहे ना. पण हि साखर म्हणजे उसाच्या रसापासून नैसर्गिकरित्या तयार केली जाणारी साखरआहे. आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार साखर ही मधुर रस-विपाकी ,रुचिकर, वात आणि पित्तदोषाचे शमन करणारी, रक्ताचे आजार कमी करते. दाह कमी करणारी आहे. साखर शरीराला बळ  देते , तृप्तता देते. कारण मधुर रस सप्तधातूंना बळ देणारा आहे. पण अति प्रमाणात सेवन केले तर स्थौल्य,प्रमेह ,वारंवार गळवे  येणे , भूक न लागणे असे त्रासही होऊ शकतात. आणि शुगर ऍडिक्शनचाही धोका होऊ शकतो. ”

शुगर ऍडिक्शन??? म्हणजे काय?”

“कपकेक्सपासून कोल्ड्रिंक्सपर्यंत हल्ली बऱ्याचशा तयार गोड पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते आणि बऱ्याच वेळेला असं होतं  की चाळा म्हणून, कधी कधी खूप निराश वाटत असताना, भावनिक स्थिती चांगली नसताना मनाला उल्हसित करण्यासाठी या गोड पदार्थांचा आधार घेतला जातो. यातील साखरेमुळे शरीरात डोपामिन नावाच्या रसायनाची जास्त निर्मिती होते.हे डोपामिन शरीराला उल्हसित करते. त्यामुळे सतत मानसिक,शारीरिक ताण-तणाव सहन करणाऱ्यांचा ओढा सहसा गोड पदार्थांकडे असतो. बऱ्याचदा अश्या व्यक्ती एखादा तणावाचा प्रसंग घडताना वा घडून गेल्यावर गोड पदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त करतात. आणि या पदार्थांत वापरली जाणारी साखर ही ग्लुकोस, सुक्रोस आणि डेक्सट्रोस या प्रकारांतली असते. त्यामुळे ती रक्तात पटकन शोषली  जाते आणि मेंदूला तिचा पुरवठा होऊन उल्हसित वाटते पण जर असे सारखे सारखे झाले तर जेव्हा साखर खाण्यात  येत नाही तेव्हा मेंदूला मरगळ आल्यासारखे वाटते मग परत गोडाचा आधार घेतला जातो.”

“मग हे थांबवायचं कसं ?”

“कटाक्षाने हळूहळू थोडी थोडी साखर कमी करायची. व्यायाम करायचा. गोड चवीचे पण जास्त तंतुमय असे पदार्थ उदा. गाजर,फळे खायचे. , कोमट पाणी प्यायचे.”

“ह्म्म्म, छानच माहिती मिळाली हं मावशी आज. प्लांटेशन व्हाईट शुगर , आयुर्वेदातील साखरेचं वर्णन आणि शुगर ऍडिक्शन या तीनही मुद्द्यांवर मस्त मुद्दे बनवते मी .”

“व्हेरी गुड, आता उद्या आपला शेवटचा पदार्थ ‘दूध’. त्या विषयी माहिती घेऊ.”-


(क्रमशः )

-डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

samanwayaayurveda@gmail.com


संदर्भ - double sulphatization - sugarprocesstech.com 


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी २० मे २०२० रोजी आपल्या *https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/5.html* या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


Monday, 18 May 2020

स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू - भाग ४ - पांढरा तांदूळ

पांढरा तांदूळ




“ स्निग्धा मावशी, तू सांगितल्याप्रमाणे आजच्या पदार्थांविषयी मी वाचून आले आहे हं.”

“अरे वाह, मग आज तू गोळा केलेल्या माहितीनेच सुरुवात करूया. काय वाचलं  आहेस बरं  तू?”

श्रीया उत्साहाने सांगू लागली,  “आज मी तांदळाविषयी वाचून आले आहे. तू पहिल्यांदा सांगितलं होतंस ,तेव्हापासून मला खूप उत्सुकता होती. तांदूळ आपल्या आहाराचा मोठा भाग आहे कारण पिष्टमय पदार्थ(कर्बोदके) , प्रथिने, स्निग्धपदार्थ आणि जीवनसत्त्वे अश्या चौरस आहारामध्ये आपल्याला भात/पोळी/भाकरी यामधून कर्बोदके मिळतात. किनारी प्रदेशांत भात हे मुख्य अन्न आहे. पण पूर्वी आपल्याकडे हातसडीचा तांदूळ खायची पद्धत होती. पण आता तांदूळ पांढराशुभ्र दिसावा म्हणून त्याला अति पॉलिश केले जाते. ज्यामुळे तांदळातील चोथा, जीवनसत्त्वे निघून जातात आणि फक्त स्टार्च उरते. हे स्टार्च त्याचा GI जास्त असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. त्यामुळे डायबेटिस होण्याचा धोका वाढतो. म्हणून सरसकट सगळंच नाही तरी हा पॉलिश केलेला तांदूळ खाणे टाळायला हवे.”

“अरे  वाह,छानच केली आहे कि तयारी. बरीचशी माहिती तूच सांगितलीस. आता फक्त थोडासा आयुर्वेदाशी संबंधित भाग मी सांगते म्हणजे झालंच. आयुर्वेदामध्ये तांदळाला ‘शाली’ असे नाव आहे आणि त्यापासूनच आपला ‘साळी’ हा शब्द आला आहे बर का. रक्तशाली, महाशाली,षष्टिक शाली, कलम यासारख्या वेगवेगळ्या जातींचा तांदुळ पूर्वापार आपल्याकडे मिळत होता.आंबेमोहोर, इंद्रायणी, कोलम,सोनामसूरी  अशा जातींची नावे आपल्याला माहित आहेत.खरं तर भात हा आपला पूर्वापार चालत आलेला आहार आहे.भारतीयांच्या आहाराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे  कि तांदळाचे पर्यायी नावच ओदन (म्हणजे अन्न) असे आहे.कारण पचायला हलका असल्याने आजारामध्ये तांदळाची पेज,मऊभात,खिचडी असे पदार्थच खायला दिले जातात.लहान बाळांनासुद्धा पहिल्यांदा बाहेरचे अन्न  देताना तांदूळ भाजून केलेली खिमटी दिली जाते.तांदूळ पित्त-वात शामक आणि कफकर आहे. आणि म्हणूनच कफदोषाचे त्रास कमी करण्यासाठी नवीन तांदूळ न वापरता जुना तांदूळ वापरावा.(आठवतेय का ती “दो सालतक Age किये हुए चावल की” जाहीरात). पूर्वी तांदूळ शिजवताना मोठ्या टोपात शिजवला जाई आणि भात शिजला कि मग जास्तीची पेज निथळून काढत आणि मग भात झाकून ठेवत जेणेकरून वाफ मुरून शीत न शीत मोकळे होई. या पद्धतीत जास्तीचे स्टार्च निघून जाते आणि तू म्हणालीस तसा GI कमी होतो. आणि आपल्याला भात  खाता येईल पण आता आपण कूकरमध्ये भात बनवतो,आणि कूकरमध्ये भात शिजवताना पेज काढली जात नाही त्यामुळे हे जास्तीचे स्टार्च भातातच मुरतात असा भात पचायला जड होतो.” 

“पण मग आता भात  खायचा असेल तर कसा खायचा?”

“काही ठिकाणी हातसडीचा किंवा सिंगल पॉलिश तांदूळ मिळतो  जो आरोग्यासाठी चांगला आहे.असा तांदूळ आपण विकत घेऊ शकतो. तांदूळ घेताना तो किमान ६ महिने ते वर्षभर जुना तांदूळ घेतला तर त्यात पाण्याचे प्रमाण कमी होते. किंवा भात करण्याआधी तांदूळ नीट भाजून घ्यावेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट, संपूर्ण भारतभरातील भाताच्या पारंपरिक पाककृती  वरण-भात, आमटी-भात, राजमा-चावल, सांबर-भात , डाळ-तांदुळाची खिचडी, भात-मासे, बिर्याणी अश्या आहेत. श्रीया नीट बघितलेस तर तुझ्या लक्षात येईल कि या सगळ्या पारंपरिक पदार्थांमध्ये भाताची जोडी प्रथिनांबरोबर म्हणजे डाळी,कडधान्ये,मांसाहार यांच्याबरोबर आहे.त्यात आपल्याकडे कोशिंबिरी,पालेभाज्या ,फळभाज्या असतातच. त्यामुळे जेवणात फक्त भातच खाल्ला असे होत नाही. “ओके  मावशी, म्हणजे अश्या पद्धतीने भात जेवताना डायरेक्ट कार्बोहैड्रेट न जाता इतर तंतुमय पदार्थसुद्धा पोटात जातील याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर भाताचा ढीग लोणच्याबरोबर खायचा आणि नावडती भाजी-कोशिंबीर गुपचूप टाळायची या सवयीमुळे फक्त स्टार्च च पोटात जाईल, बरोबर ना? ”

“बरोबर , आणि थोडंसं  विषयांतर आहे पण तरीही सांगते, लोणचं -भात , सॉस-चपाती, ब्रेड-जॅम, जॅम-चपाती हेसुद्धा खाणं  शक्यतो टाळायला हवे.आता उद्याचा पदार्थ कोणता ठरवूया?” 

“ते मी तुझ्यासाठी सस्पेन्स ठेवणार आहे मावशी” असे म्हणत श्रीया पळाली .  


(क्रमशः)

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

samanwayaayurveda@gmail.com


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/blog-post_18.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


Sunday, 17 May 2020

स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू - भाग ३ - मीठ

मीठ - 




दुसऱ्या दिवशी श्रीयाचा फोन आला तेव्हा मी तयार होतेच.

“तर आजचा पांढरा  शत्रू आहे मीठ.”

“हो हो , मीठ जास्त खाऊ नये म्हणतात ब्लड प्रेशर वाढतं  म्हणतात. पण मीठ शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचा समतोल राखायला मदत करते ना? आणि मीठ नाही खाल्लं तर मग खायचे कसं कारण अळणी जेवण्याचीही कल्पना नाही करता येत गं.”

“अगं बाळा मीठ त्रासदायक आहे पण अजिबातच खाऊ नये असं नाही सांगितलंय आयुर्वेदात. पण प्रमाणात खायला हवं हे मात्र निक्षून सांगितलंय. कारण षड्रसांपैकी लवण रस(खारट चव) हा वात दोषाचे शमन करणारा, पित्त दोष वाढवणारा आणि कफ दोष पातळ करणारा आहे. त्यामुळे तोंडाला चव येते (रुचकर), स्तंभ (पेशी-शिरा जखडणे) कमी होतो, स्वेदनिर्मिती (घाम येणे), स्नेहन (शरीरात मृदुता निर्माण करणारे), संघात कमी होतात  (गाठी/चिकटपणा फुटून मोकळे होते), शरीरात शोषण वाढवण्यासाठी मदत होते आणि तू म्हणालीस तसे शरीरात इलेक्ट्रोलाईटस् चा समतोल  राखला जातो.  पण जर सतत खाण्यात मीठ जास्त खाल्ले जात असेल  तर केस गळणे-पिकणे, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येणे,वेगवेगळे त्वचाविकार, वातरक्तासारखे आजार होऊ शकतात.कधी-कधी त्वचेतून-हिरड्यांतून रक्त येते, वारंवार तहान लागते, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे  सोडियमचे प्रमाण वाढून शरीरात पाण्याचा अंश वाढतो (Water Retention) आणि सूज येते. सामुद्र  मीठ म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून बनलेले मीठ हे पचायला जड आणि कफ वाढवणारे आहे.  ”

“हे झाले आयुर्वेदिक विचारांबद्दल आणि सध्या आपण जे मीठ रोज वापरतो ते समुद्राच्या पाण्यापासून बनलेले असले तरी सामुद्र मीठ(Sea Salt) नाही.”

“एक मिनिट, समुद्राच्या पाण्यापासून बनलेले पण सामुद्र मीठ नाही??? म्हणजे??”

“अगं, म्हणजे  सामुद्र  मीठ म्हणजे ज्याला sea  salt  म्हटले जाते ते समुद्राचे पाणी ऊर्ध्वपातित करून बनवतात. आपल्याला भाईंदरला किंवा अलिबागला जाताना जी मिठागरे दिसतात ना तिथे समुद्राचे पाणी अडवून त्यातला पाण्याचा अंश उडाल्यावर मीठ जमा होते ते सामुद्र  मीठ यात मुख्यतः सोडियम क्लोराईड असते पण त्याचबरोबर मॅग्नेशिअम,पोटॅशिअम,कॅल्सिअमचे क्षारसुद्धा असतात.आपली आजी-पणजी आजी हे मीठ वापरत  तेव्हा ते खडेमीठ नावाने मिळे. पण त्याला पाणी पाझरे ,ते नीट जपून ठेवावे लागे  म्हणून बाजारात जेव्हा “Vaccume evaporated,free-flow आणि सबसे शुद्ध(??) असे मिठाचे ब्रँड आले तेव्हा सोयीचे असल्यामुळे गृहिणी लगेच तिथे वळल्या  आपण यात मेख अशी आहे कि हे मीठ Vaccume Evaporated बनवताना त्यातील इतर क्षार काढून टाकले जातात आणि फक्त सोडियम क्लोराइडचेच क्षार उरतात.त्यामुळे हे मीठ वापरताना शरीरात मोठ्या प्रमाणात सोडियम आणि क्लोराईड जाते जे इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्सला कारणीभूत ठरते. तसेच ते free flow बनवण्यासाठी जे Anti-caking agents (गुठळ्या होऊ नये म्हणून) वापरले जातात. ते पाहता पाझरलेले-चिकट मीठ खाल्लेलेपरवडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे सध्या.”

“अरे बाप रे , मग मीठ नाही खायचे मग काय खायचे ?”

“अगं , मीठ खायचेच नाही असे नाही तर अत्यंत कमी प्रमाणात खायचे, प्रत्येक वेळी वरून मीठ घ्यायचे नाही. कणकेत-भातात मीठ घालायचे नाही , जिथे शक्य होईल तिथे सैंधव वापरायचे. गंमत सांगू आयुर्वेदात तर म्हटलेच आहे की  जिथे लवण शब्द वापरला असेल तिथे सैंधवच वापरायला हवे.”

“पण मग मावशी , शरीरात सोडियम कमी होईल ना ?”
“चांगला प्रश्न विचारलास श्रीया , मोठ्या माणसांमध्ये  दर दिवसाला दीड ते अडीच ग्राम मिठाची गरज असते.म्हणजे लक्षात घे, संपूर्ण दिवसात फक्त १ छोटा चमचा मीठ घ्यायचे आहे. तेवढे पुरेसे आहे. आणि दूध-दुधाचे पदार्थ, अंडी,मासे,ओला नारळ,बीट,पालक यासारख्या भाज्यांमधनंही सोडियम मिळते.त्यामुळे सोडिअमची कमतरता होईल अशी भीती बाळगायचे कारण नाही.
आता आपण उद्या बोलूयात पुढच्या पदार्थविषयी”

(क्रमशः )


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी १७ मी २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/blog-post_17.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


Friday, 15 May 2020

स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू - भाग २

मैदा 



“चला तर मग श्रीया करायची का सुरुवात? आजचा पहिला पदार्थ आहे मैदा.”
मैदा म्हणजेच Refined Wheat Flour म्हणजे गव्हाच्या पिठातील चोथा/कोंडा काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ. आपण जो गहू बाजारातून आणतो तो दलिया, रवा, कणिक अशा वेगवेगळ्या स्वरूपात वापरतो.या सर्व प्रकारात गव्हाचा कोंडा म्हणजेच बाहेरचे तूस-टरफल थोड्याफार प्रमाणात असते आणि हा कोंडाच  महत्त्वाचा किंबहुना पिठापेक्षाही महत्त्वाचा असतो. कारण कोंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ (चोथा/ fiber) असतो आणि या कोंड्यातच जीवनसत्त्वे, खनिजे असतात. असतात. कोंड्याशिवाय मैदा म्हणजे जवळजवळ ९८% पौष्टिक घटक नसलेले पांढरेशुभ्र पीठ आहे ज्यात फक्त कॅर्बोहायड्रेट्स असतात. असा हा मैदा सगळयांना आवडतो कारण मैद्यापासून ब्रेड,बिस्किटे ,खारी ,टोस्ट,पिझ्झा बेस, लादी पाव,पॅटिस, केक्ससारखे बेकरी प्रॉडक्ट्स्, समोसा,पास्ता, नान ,कुलचा,रुमाली रोटीसारखे हॉटेलमधले पदार्थ बनवले जातात.”
“हो गं  मावशी मला पाव-भाजी खूप आवडते आणि पिझ्झा पण.”

“ हे सगळे पदार्थ आपल्याला आवडतात कारण त्यांचा मऊ स्पर्श आणि गोडसर चव. हे शक्य होते गव्हामधील ग्लुटेनमुळे. ग्लूटेन हे बऱ्याचशा तृणधान्यांमध्ये आढळणारे प्रथिन आहे. गव्हामध्ये याचे प्रमाण सगळ्यात जास्त असते. आणि बरं का या ग्लुटेनमुळेच गव्हाच्या पिठाला चिवटपणा- चिकटपणा येतो जो ही सर्व बेकरी प्रॉडक्ट्स बनवताना आवश्यक असतो.
एक Fun Fact  सांगू का? मुळात Gluten हा शब्दच लॅटिन भाषेतील Glue अर्थाच्या शब्दापासून बनला आहे.म्हणजे विचार कर.” 
“इतर धान्यांमध्येही ग्लूटेन असते त्यामुळेच आपण त्या पिठापासून भाकरी बनवू शकतो. पण गव्हामध्ये हे प्रमाण जास्त असते आणि मैद्यामध्ये तर कोंडा नसल्यामुळे ग्लुटेनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हा मैदा आपल्या आतड्यांच्या आतल्या बाजूला चिकट थर निर्माण  करतो आणि ज्यामुळे अन्नाचे नीट पचन आणि शोषण होत नाही. त्यामुळे अपचन , आम्लपित्त, मलबद्धता, पोटात वायू धरल्यासारखे होणे असे त्रास होतात. परत मैद्यामध्ये कोणत्याही प्रकारची खनिजे , जीवनसत्त्वे नसतात. त्यामुळे मैद्याचे पोषणमूल्य शून्य आहे. वारंवार मैद्याचे पदार्थ खाल्ले तर तोंड येणे,त्वचाविकार, मधुमेह,स्थौल्य, पचनाचे त्रास , हृदयरोग यासारखे आजार होतात.” 

“अरे बापरे खूपच त्रासदायक आहे गं या मैद्यामुळे ,अगं  मावशी पण संध्याकाळी खायचं काय??”

“अगं बरेच वेगवेगळे पदार्थ आहेत की गव्हाची पोळी, तंदूर रोटी आणि अगदी पुरणपोळीसुद्धा गव्हाच्या पिठापासून करता येते. गव्हाच्या पिठापासूनसुद्धा केक-पाव असे बेकरी पदार्थ बनवता येतात पण तसे असले तरी हे पदार्थ कधीतरीच खायचे आणि खाताना ताव नाही मारायचा हं. त्याऐवजी छान गरम गरम आई बनवते तो नाश्ता, घरी केलेले लाडू,चिवडा, सुका मेवा,फळे असे पदार्थ खायचे. ”

“हं  म्हणजे मी एरवी नाही खाणार पण माझ्या आणि दादाच्या वाढदिवसाला केक खाईन चालेल ना?”

“अरे वाह , लगेच संकल्प करून झालासुद्धा?? Very  good , चला आता पुढच्या वेळी मीठाबद्दल थोडी माहिती मिळवू.”

(क्रमशः )

छायाचित्र सौजन्य - आंतरजाल.


डॉ. स्निग्धा वर्तक.
samanwayaayurveda@gmail.com


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी १५ मे २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.in या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


Thursday, 14 May 2020

स्वयंपाकघरातील पाच पांढरे शत्रू - भाग १

#Samanwaya_Ayurveda
#Five_white_poisons_part_1
#healthy_diet_series_स्वास्थ्यवेद


               लॉकडाऊनच्या काळातही अनया आणि टीम स्वतःला व्यस्त ठेवत होती रोजचे शाळेतील ऑनलाईन तासिका, चित्रकला-हस्तकला याबरोबरच स्वतःला बिझी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठीसुद्धा कामकरत होती. अश्या वेळी एका दुपारी माझा फोन गुणगुणला आणि उचलल्या-उचलल्या श्रीयाचा समोरून आवाज आला.
“मावशी, मला विज्ञान परिषदेत आपला आहार-आपले आरोग्य या विषयावर काहीतरी सादर करायचं  आहे. काय गं  बोलू मी?”
“अरे वाह, छानच विषय आहे की. काय विचार केला आहेस तू?”
“मला वाटतं , आपण जे खातो तसेच आपले आरोग्य असते. म्हणजे रोज घरी शिजवलेला चौरस आहार घेतला तर आपण निरोगी राहू.”’
“छान, अजून काही?”
“हं , तू सांगतेस तसं , त्या त्या ऋतूतली फळं  आणि भाज्या ताज्या खायच्या. सगळ्या भाज्या न कुरकुरता खायच्या.”
“अरे वाह, अजून??”
“अजून??? आणखी काय गं ?? हं जंक फूड नाही खायचं.”
“बरोबर, खूप छान मुद्दे सांगितलेस तू श्रीया. यासगळ्या बरोबरच आपल्या सगळ्या स्वयंपाकघरात नेहमीच असणाऱ्या आणि रोजच्या आहाराचा मुख्य भाग बनलेले ५ पदार्थ आहेत ते म्हणजे साखर , मीठ , मैदा , दूध आणि तांदूळ. सध्या यांना ५ पांढरी विषे (White  Poisons ) म्हणतात.
“काय??? मावशी अगं  दूध आणि तांदुळसुद्धा?? आई मला नेहमी गोड कमी खा. सारखं वरून मीठ घेऊ नकोस म्हणून ओरडते. आजोबांनासुद्धा ब्लड प्रेशर-डायबेटीसमुळे मीठ-साखर कमी खायला सांगितली आहे. पण दूध आणि तांदुळसुद्धा?? अगं  मग खायचे काय?”
“हो हो अगं , थांब जरा. बघ मी तुला नीट सविस्तर सांगते मग तू तुझे मुद्दे तयार कर, ठीके?”
(क्रमशः)

टीप - या लेखमालेचे सहा भाग आजपासून दररोज एक याप्रमाणे प्रसिद्ध होतील.

डॉ. स्निग्धा वर्तक.
samanwayaayurveda@gmail.com

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी १४ मे २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/blog-post_14.html?m=1 या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


Friday, 8 May 2020

आयुष काढा

 

 



                   सुंठेच्या (सुकवलेल्या आल्याचे चूर्ण) परिणामकतेबद्दल व्हाट्सअपवर फिरणारा एक मेसेज वाचला. आणि लोकांना सुंठेच्या वापराचे चांगले अनुभव आल्याबद्दल वाचून खूप आनंद झाला. खरं तर आम्ही वैद्य गेल्या काही दिवसांपासून 'आयुष मंत्रालया'द्वारे सांगितलेल्या *रोगप्रतिकारकक्षमता वर्धक* उपायांचा प्रचार करत आहोत. त्यामध्ये एक महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे ' *आयुष काढा*. ' हा काढा कसा बनवायचा? तर तुळशीची पाने, दालचिनी, काळे मिरे आणि सुंठ हे महत्त्वाचे घटक आणि गूळ, काळ्या मनुका आणि लिंबाचा रस हे *व्यक्तीच्या प्रकृतीनुरूप* आणि चवीनुरूप वापरायचे घटक यापासून तयार होणारा हा काढा, प्रत्येकाने रोज घ्यावा अशी अपेक्षा आहे.

आता ही सगळी औषधे आपल्या घरात सहज उपलब्ध आहेत. आणि दिसायला साधी दिसत असली तरी अत्यंत प्रभावी आहेत. आता या द्रव्यांबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. 

१. *सुंठ* - आयुर्वेदात सुंठेला *‘विश्वभेषज/महौषध’* अशी हि पर्यायी नावे आहेत. कारण अपचन,जुलाबासारखे पोटाचे आजार, आमवात,वातरक्त तसेच सांधेदुखीसारखे वाताचे आजार , शरीरावयवांवरील सूज , श्वसनाचे विकार, वारंवार येणारा ताप अश्या अनेक आजारांसाठी आम्ही वैद्य सुंठीचा वापर आजाराच्या अवस्थेनुरूप करत असतो. ‘छोटा पॅकेट बडा धमाल’ असे हे औषध आहे. *आमपाचन* म्हणजे चुकीच्या सवयी,बिघडलेले पचन यामुळे शरीरात तयार होणारी विषद्रव्ये (आम) यांचा निचरा करण्याचे काम सुंठ करत असते.  


२. *तुळस* - देवपूजेत तुळशीच्या पानांचे महत्त्व खूप मोठे आहे. तुळशीच्या रोगनिवारक गुणांमुळेच पूर्वजांनी ही योजना केली असावी. त्यामुळे बहुतांश  घरात एखादे तरी तुळशीचे रोप असतेच. कफाचा खोकला झाला असेल तर तुळशीचा रसाचे चाटण किंवा पान सर्रास खाल्ले जाते. विषमज्वरामध्येही केला जाणारा  तुळशीचा वापर काहींच्या वाचनात असेलही.
वात-कफदोषनाशक पण पित्तकारक अशी ही तुळस श्वसनसंस्थेचे आजार,पार्श्वशूल (फासळ्यांमध्ये होणाऱ्या वेदना), रक्तदुष्टी यासारख्या आजारांत खूप छान काम करते. तुळस कृमिघ्न आणि ज्वरघ्नसुद्धा आहे. 


३. *दालचिनी* - गरम मसाल्यांमधली दालचिनी हे आयुर्वेदातील खूप छान औषध आहे बरं  का…. कफ-वात दोष कमी करणारी,गोड चवीची असल्याने पिट नियंत्रणात ठेवणारी दालचिनी प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर कार्यकारी आहे. त्यामुळे श्वासाच्या आजारावर वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये दालचिनी असतेच. तसेच अरुची,अग्निमांद्य यासारखे त्रास दालचिनीच्या वापराने नियंत्रणात येतात. 


४ *काळे मिरे* - मसाल्याच्या डब्यातला दुसरा पदार्थ कटू रस-विपाकी आणि उष्णवीर्य असे मिरे कात-वाट कमी करणारे आणि पित्त वाढवणारे आहे. जंतुघ्न, श्वासरोगहर आहे, वारंवार येणाऱ्या तापावर खूप छान काम करते. पचन सुधारते. Piperine हे काळ्या मिरीमधील तत्त्व प्रतिदाह (Inflammation ) कमी करायला मदत करते,शरीर  शोधन करते. पण *पित्त वाढवणारे असल्याने सध्याच्या ग्रीष्म ऋतूत वैद्यकीय सल्ल्यानेच वापरावे.*

 

५. *काळ्या मनुका* - पित्ताचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी काळ्या मनुका वापराव्यात. आकाराने छोट्या पण गुणांनी मोठ्या अश्या या मनुका रक्तपित्त,ताप,श्वासरोग ,सतत तहान लागणे अश्या त्रासांमध्ये खूप छान काम करतात. तिन्ही दोषांचे शमन करतात ,सारक आहेत त्यामुळे *सध्याच्या ग्रीष्म ऋतूसाठी अगदी योग्य.* दुर्बलता-थकवा जाणवत असेल तर काळ्या मनुका जरूर खाव्यात. यातील लोहाच्या प्रमाणामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पण शर्करेचे प्रमाण जास्त असल्याने *मधुमेहींनी वैद्यकीय सल्ल्याने मनुका कशा व किती प्रमाणात* खायचे हे ठरवावे. मनुकांची सविस्तर माहिती वाचायची असेल तर या लिंकवर क्लिक करा.

 https://samanwayayurved.blogspot.com/2014/09/black-raisins_17.htm

तर आयुष काढ्याच्या सर्व घटकद्रव्यांचे गुण  आपण इथे थोडक्यात पाहिले. सविस्तर लिहायचे झाल्यास ‘आयुष काढ्यामागचे विज्ञान’ हा एका मोठ्या लेखाचा विषय होईल. या सर्व वनस्पतींच्या गुणांविषयी झालेली संशोधने आंतरजालावर सहज उपलब्ध आहेत जी आयुर्वेदातील ज्ञानाचे महत्त्व “रिसर्च”च्या माध्यमातूनही अधोरेखिचत करतील. स्वयंपाकघरात असलेल्या या औषधांनी आपले आरोग्य कसे सांभाळायचे आणि काढा कसा बनवायचा याचे प्रमाण व कृती सोबतच्या फोटोमध्ये दिली आहे तरी काही शंका असतील तर जरूर विचारू शकता. 


१ व्यक्तीसाठी काढा बनवण्याचे प्रमाण


▪पाणी १०० मिली 

साधारण २ कप

▪तुळशीची ४ पाने (सुकवलेली / ताजी )

▪दालचिनी (कुटून घेणे) पूड २ चिमूट

▪सुंठ पूड २ चिमूट

▪मिरेपूड १ चिमूट (पित्ताचा त्रास होत असल्यास नको.)

मंदाग्नीवर

उकळून आटवून १/२ ते १/४ भाग म्हणजे ३० ते ५० मिली काढा उरवणे व गाळून घेणे.


त्यात पुढील घटक 

चव / सवय व उपयुक्ततेनुसार मिश्रण करुन घेणे.


▪मनुके ४-५ (पित्त विकारांवर उपयुक्त )

▪गुळ पूड चवीप्रमाणे 

▪लिंबू रस १/२ चमच ( चवी व सवयीनुसार त्रास होत नसल्यास )


असा काढा सकाळ संध्याकाळ घेणे.

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक.

9870690689


l


(प्रस्तुत लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०१ मे  २०२० रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/blog-post.html  या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखिकेधिन  आहेत. इतरत्र शेअर करायचे झाल्यास लेखात कुठलाही बदल न करता शेअर केल्यास हरकत नाही.)


Thursday, 30 April 2020

व्याधीक्षमत्त्व म्हणजे काय रे भाऊ?



आयुष मंत्रालयाचे व्याधीक्षमत्त्वाचे उपाय झाल्यानंतर बऱ्याच जणांनी शंका विचारल्या, बऱ्याच जणांच्या संमिश्र प्रतिक्रियाही आल्या. वैयक्तिकरित्या शंका निरसन केले गेले तरी यावर सविस्तर लिहिण्याची जरा चालढकल होत होती.काय करणार लिहिण्याचा कंटाळा...... पण रोज विचारल्या जाणाऱ्या शंकांचे स्वरूप बघता FAQ सारखे काहीतरी लिहिणे गरजेचे लागले. तर काही प्रश्नांच्या उत्तरादाखल लिहिलेली ही पोस्ट,


  1. व्याधीक्षमत्व वर्धक (Immunity  booster) उपायांनी कोरोना होणार नाही का?
    उत्तर - असे नक्कीच नाही. हे समजून घेणे गरजेचे आहे कि हे सर्व आपली प्रतिकारशक्ती सुधारण्याचे उपाय आहेत. कोणत्याही संसर्गजन्य आजाराविरोधात (infectious disease ) खात्रीपूर्वक इलाज देणारे उपाय नाहीत. त्यामध्ये रुग्णप्रकृतीनुसार थोडेफार वैविध्यसुद्धा येईल त्यासाठी वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.

  2. व्याधीक्षमत्त्व  (Immunity ) म्हणजे काय?
    उत्तर - “त्याची ‘immunity’ लो आहे नं म्हणून त्याला सारखी सारखी infections होतात” अश्या छापाची वाक्य आपण बऱ्याचदा ऐकतो. पण व्याधीक्षमतत्व म्हणजे रोगप्रतिकारशक्ती म्हणजे रोगाशीही मुकाबला करण्याची ताकद यापेक्षा जास्त माहिती आपल्याला नसते. आधुनिक संशोधन असे सांगते की शरीराची  रोप्रतिकारक क्षमता ही  पांढऱ्या रक्तकणांवर अवलंबून असते. या पांढऱ्या पेशी २ प्रकारच्या असतात Phagocytes - बाहेरून शरीरावर आक्रमण करणाऱ्या शत्रुपेशींचा फडशा पाडणे  (जसे सैनिक शत्रूला  मारून टाकतात.) आणि Lymphocytes जे शरीरवर पूर्वी झालेले संसर्ग लक्षात ठेवतात व पुन्हा त्याच प्रकारचा हल्ला झाल्यास शरीराला ते लक्षात आणून देऊन त्वरित मुकाबला करण्यास मदत करतात. (म्हणजे IB /RAW  सारखे हो) त्यामुळे जेव्हा एखादे शरीरात एखादा संसर्ग होतो तेव्हा हे सगळ्या प्रकारच्या पेशी (phagocytes-lymphocytes चे उपप्रकार ) एकत्र काम करून संसर्ग ओळखण्याचा आणि त्याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करतात.
    आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहे रसरक्तादि  सप्तधातूंचा सारभाग  म्हणजे ‘ओज’ सर्व शरीर-मानस-बौद्धिक कार्ये  ही  ‘ओजस’ तत्त्वावर अवलंबून असतात. ओजामुळे रोगप्रतिकारक्षमता कार्यक्षम राहते. आयुर्वेदशास्त्रात व्याधीक्षमतत्व हे ‘सहज’ (INNATE ) म्हणजे जन्मजात प्राप्त झालेले, कालज (Aquired/borrowed ) म्हणजे पूर्वी झालेल्या आजारामुळे प्राप्त झालेले किंवा मातेकडून बाळा प्राप्त झालेले आणि युक्तिकृत (artificial ) जसे कि लसीकरणामुळे प्राप्त झालेले असे ३ प्रकार सांगितले आहेत.

  3. व्याधीक्षमत्त्व  कमी होते का? आणि ते वाढवता येते का ?
    आपल्याला जन्मजात एक प्रतिकारशक्ती मिळालेली असते जी आपले कुलज प्रकृती (Genetics), जन्मदेश , जन्मकाळ(गर्भसंभव आणि प्रसूतीच्या वेळेचे ऋतुमान) यावरसुद्धा अवलंबून असते
    आणि ही  रोगप्रतिकारक्षमता आपला आहार-विहार (diet  and  routine हो ), दिनचर्या, व्यायाम , मानसिक स्थिती यासगळ्यांवर अवलंबून असते. (आठवतंय का,आपणच म्हणतो कि पूर्वी तर हा त्रास मला होत नसे पण आता जरा काही झालं कि लगेच त्रास सुरु होतो.) याचे कारण कदाचित असेही असू शकते कि शरीराने आखून दिलेले आहार-व्यायाम-दिनचर्या-मानसिक शांततेबद्दलचे नियम आपण सतत दुर्लक्षित करत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणारच ना? तुम्हीच तुमच्या बँक अकाऊंटमधून फक्त पैसे काढत राहिलात आणि काहीच जमा केले नाहीत तर तुमचा बॅंकबॅलन्स  आटणारच आहे. याउलट जर तुम्ही तुमच्या शरीररूपी अकाउंटमध्ये चांगले अन्न-व्यायाम-शांत झोप (दिनचर्या-ऋतुचर्येचे पालन) यांची नियमित डिपॉसिट्स करत राहिलात  तर तुमचा बॅंकबॅलन्स तगडा असेल आणि  एखादा आजार होणार असेल त्यावेळी जर शरीराची दोष-धातू-मल-ओज हि चौकट भक्कम असेल तर एखादा आजार होणारच नाही किंवा तो होण्याचा वेग कमी असेल किंवा त्याची लक्षणे सौम्य स्वरूपाची असू शकतील.

  4. घरी च्यवनप्राश नाही तर आता कुठे जाऊ आणायला??
    लक्षात घ्या, च्यवनप्राश “म्हणजेच(??)” तंदुरुस्ती हे जे काही जनमानसात रुजलंय ना ते आधी मनातून काढा. हे स्तोम आता इतकं वाढलंय  ना की  अवलेह स्वरूपातील दुसरं औषध दिलं तरी काही रुग्ण त्याला च्यवनप्राशच म्हणतात. च्यवनप्राश हे ओज वाढवणारे रसायन औषध आहे. पण च्यवनप्राश हे फक्त एकच रसायन औषध नाही. च्यवनप्राश उपलब्ध नसल्यास आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने इतर रसायन औषधेसुद्धा वापरता येतील. च्यवनप्राश किती खावा हे सांगताना चरकाचार्यसुद्धा म्हणतात की पचायला जाड असल्याने भूकेवर परिणाम होणार नाही अश्या मात्रेत योग्य वेळी घ्यावा. यावियाशी शंका असेल तर तुमच्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्या. बरं  दुसरी गोष्ट अशीही की  रोज करण्याजोगे तब्बल १० साधे-सोपे उपाय आयुष्य मंत्रालयाने सांगितले आहेत. वनौषधियुक्त काढा (Herbal  Tea ), हळदीचे दूध (गोल्डन मिल्क), आहारात ऋतूनुसार मसाल्यांचा वापर,रोज करायचे व्यायाम-योगासने-प्राणायाम-ध्यान , नस्य ,गुळण्या ,वाफ घेणे असे कितीतरी उपाय आहेत.यातले आहारीय उपाय तर आपल्या मसाल्यांच्या डब्यातच सापडतील आपल्याला इतके सोपे आहेत. ते आवर्जून करा. स्वच्छतेचे नियम पाळा . अनावश्यक स्पर्श टाळा.
    सोशल मीडिया आणि बातम्या बघून गांगरून जाऊन काहीतरी शॉर्टकट्सच्या आहारी लागण्यापेक्षा शास्त्र जाणून घेऊन मन खंबीर करा. ‘ब्रेक द चेन’ हे फक्त संसर्गालाच नाही तर नकारात्मक विचारांनाही सांगा मग बघा आयुष्य किती छान वाटते. बाकी आम्ही वैद्यगण  तुमच्या मदतीसाठी आहोतच.

वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक. 

९८७०६९०६८९

(प्रस्तुत लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०१ मे  २०२० रोजी आपल्या  https://samanwayayurved.blogspot.com/2020/04/blog-post.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखिकेधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे झाल्यास लेखात कुठलाही बदल न करता शेअर केल्यास हरकत नाही.)