या वर्षीचा मिनुच्या घराचा गणेशोत्सव थोडा खासच झाला. त्यांच्या घरचा गणपती म्हणजे संपूर्ण सोसायटीचाच असे जणु. त्यामुळे या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने प्रत्यक्ष दर्शनाला जाता आले नाही तरी तरुण मुलांनी जोशीकाकांची प्रतिष्ठापना-आरती , सगळ्यांचं live streaming करण्याची सोय केली. मग बच्चे कंपनी थोडी मागे राहणार?? त्यांनीतर स्पर्धाही online घेतल्या. अनयाने उकडीच्या मोदकांबरोबरच इतर वेगळ्या आणि हटके मोदकांची पाककला स्पर्धा, श्रीया आणि नीलने सहस्रावर्तन झाल्यावर श्लोकांची स्पर्धा घेतली. अगदी ‘वदनी कवळ घेता....’ ‘मोरयामोरया…’ ‘नेत्री दोन हिरे....’ , ‘स्वस्ति श्री.....’ पासून ‘प्रारंभी विनंती…’ , ‘गणाधीश जो....’, ‘विघ्नेश्वराय वरदाय....’ , ‘मूषिकवाहन मोदकहस्त...’, ‘एकदंताय शुध्दाय....’ ‘अमेयाय च...’ 'गणनायकाय गणदेवताय.... " असे वेगवेगळे श्लोक म्हटले.स्निग्धाची पाळी आल्यावर तिने एक श्लोक म्हटला.
गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् ।
उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् ॥
(गज-आननम् भूत-गण-अधिसेवितम् कपित्थ-जम्बू-फल-चारु-भक्षणम् उमा-सुतम् शोक-विनाश-कारकम् नमामि विघ्नेश्वर-पाद-पङ्कजम् ।)
मुलांसाठी हा श्लोक नवीनच होता. “याचा अर्थ काय गं मावशी ?”
“गजमुख असलेले, भूत-गणांच्याद्वारे ज्यांची सेवा केली जाते , कपित्थ (कवठ) आणि जांभूळ फळे आवडीने खाणारे ,शोक (दुःख / कष्ट)विनाशकर्ता अश्या या उमा-पुत्राला मी नमन करते , विघ्नांचे नियमन करणाऱ्या श्री गणेशांच्या चरण-कमलांना मी स्पर्श करते .”
मितूने विचारले,”पण मावशी , तू तर मागच्या वर्षी म्हणाली होतीस कि गणपतीबाप्पाला दूर्वा आणि मोदक प्रिय आहेत. मग आता हे कवठ आणि जांभूळ कसे काय?”
“हो मावशी , नक्की काय आवडतं ?”
“अरे अरे , तुम्हाला कशी,पुरणपोळी,लाडू आवडतात तसेच वडापाव,कोथिंबीर वडीपासून अगदी पिझ्झा,पास्ता,चॉकलेट,आईस क्रीम सगळेच पदार्थ सारखेच आवडतात ना तसेच गणपतीबाप्पालासुद्धा वेगवेगळे पदार्थ खूप प्रिय आहेत.”
“पण मग २१ पत्रीप्रमाणे या वनस्पतीसुद्धा महत्त्वाच्या आहेत का?”
“अरे वाह शिवम, २१ पत्रींविषयी सांगितलेली लक्षात आहे तर तुझ्या. हो, कवठ आणि जांभूळ ही दोन्ही फळझाडे आहेत.या दोन्ही फळांचे गर (फलसार) अतिशय चविष्ट असतात. आणि एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे गणपती बाप्पाला इंग्लिशमध्ये एलिफन्ट गॉड म्हणतात तर कवठाच्या झाडाला एलिफन्ट ऍपल (हत्तींना कवठाचे फळ खायला खूप आवडते.) या फळाला बाहेरून जाड कवच असते ज्याच्या आत मऊ गर असतो. आयुर्वेद शास्त्रानुसार कच्चे कवठफळ कडू-तिखट आणि तुरट चवीचे असून वात-पित्त वाढवणारे आणि कफ कमी करणारे, संग्राही (द्रवभाग कमी करणारे), लेखन (शरीरातील चिकटपणा,अवरोध दूर करणारे) आहे. पिकलेलेफळ आंबट-गॉड चवीचे,थंड गुणाचे आणि त्यामुळे वात-पित्त कमी करणारे आहे.”
“पोटाच्या आजारासाठी कवठ फळाचा विशेषत्त्वाने वापर केला जातो.उलटी,डिसेंट्री,भूक न लागणे,अपचन,रोज पोट साफ न होणे, जुलाब,मूळव्याध,पोटाचे अल्सर, अश्या वेगवेगळ्या पचनसंस्थेच्या आजारात कवठ फळ औषधी म्हणून वापरले जाते.
कवठाच्या फळातील काही रसायने जंतुघ्न (अँटी फंगल/अँटी प्रोटोझोअल) म्हणजेच बऱ्याच कृमींना,जंतांचा नाश करणारी आहेत.त्यामुळे त्वचाविकार,पोटात जंत होणे,टायफॉईड-मलेरियासारखे ताप अश्या आजारात ते वापरले जाते.”
“मधुमेह,रक्तदाब कवठ लाभदायक आहे.”
"तसेच जांभूळसुद्धा तुरट गोड चवीचे मधुर विपकी फळ आहे. वात वृद्धी करणारे आणि कफ-पित्त दोषांचे शमन करते. रक्तदुष्टी कमी करते.अग्निदीपक, पाचक, ग्राही (शोषक) , रुचीकर ,असते.जांभळाच्या बीयांमध्ये ‘ग्लुकोसाईड जांबोलिन’ असल्यामुळे साखर वाढल्यावर हा घटक पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करण्यावर आळा घालतो. म्हणूनच जांभूळ व त्याचे बी मधुमेह या आजारावर अत्यंत गुणकारी आहे.
जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. तर किंचित प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. यामध्ये प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ व अत्यंत अल्प प्रमाणात स्निग्धपदार्थ असतात. त्याचबरोबर कोलीन व फोलिक आम्लही त्यामध्ये असते. जांभळाचे पान हे उत्कृष्ट स्तंभक आहे. तसेच कोवळ्या पानात ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे. अतिसार (जुलाब),वारंवार होणारी मूत्रप्रवृत्ती, उलटी होणे , स्त्रियांचे आजार अश्या वेगवेगळ्या परिस्थितीत औषध म्हणून वापरले जाते.”
“"अच्छा , म्हणजे या बहुगुणी वनस्पतींचे रक्षण व्हावे म्हणूनच पत्रींप्रमाणेच यांचासुद्धा समावेश गणपतीबाप्पाच्या आवडत्या पदार्थांत केला आहे ना?”
“हो ते एक कारण तर असतेच. पण या लंबोदराचे मोठे पोट जगातील सर्व चांगल्या-वाईट गुणांना पचवण्याचे प्रतीक आहे. तर हातातील मोदक हे आनंद,इच्छा यांचे प्रतीक आहे.वैद्यकीय भाषेत सांगायचे झाले तर मोठे पोट हे त्या व्यक्तीला चयापचयाचे म्हणजेच सूक्ष्म पचनाचे विकार* असल्याचे दर्शवितात. आपल्या देशात सुटलेले पोट असलेल्या व्यक्ती किती सर्रास दिसतात. आणि बारकाईने तपासले तर अशा व्यक्तींना सूक्ष्म पचनाशी संबंधित काहीनाकाही त्रास नक्कीच असतो.तसेच हातातील मोदक हे सतत आहारात असलेल्या गोड (पिष्टमय) पदार्थांचे प्रतीक मानले तर अति गोड सेवनामुळे (चुकीच्या खाण्यामुळे) होणारे दुष्परिणाम दूर करायचे असतील तर कवठ आणि जांभूळ किती समर्पक आहेत ना?”
“नक्कीच,आपल्या परंपरा शास्त्राधिष्ठितच आहेत पण त्यामागचे विज्ञान समजून न घेता,विचारांऐवजी कृतीचेच स्तोम माजवल्यामुळे कालौघात कुठेतरी त्या हरवून गेल्यात आणि म्हणूनच रूढी म्हणजे अंधश्रद्धा असा उलटाच कांगावा सुरु झाला आहे.”
“खरंय आता आम्ही कोणतीही रीत पाळताना त्याचे शास्त्र समजून घ्यायचा नक्की प्रयत्न करू.” मुले एकसुरात उद्गारली.
“आणि मीसुद्धा लगेचच जांभूळ आणि कवठ आणतो आणि रोज रतीब सुरुच करतो.” श्रियाचे बाबा म्हणाले.
“अनिल,ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, अति सर्वत्र वर्जयेत.हो ना गं ?” श्रियाच्या आजीनेच त्यांना सांगितलं.
“हो,खरं आहे. कवठ आणि जांभूळ , दोन्ही फळे वात दोष वाढवणारी आहेत त्यामुळे अति प्रमाणात खाऊ नयेत आणि आहारीय फळे असल्यामुळे कधीतरीच खायची असल्यास चालेल पण आजाराच्या ट्रीटमेंटसाठी म्हणून रोजच खाणार असाल तर मात्र तरी वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.”
“थँक्स स्निग्ध मावशी , कसलं भारी सांगितलंस तू.एवढं सायन्स बेस्ड आहे आपलं शास्त्र पण माहीतच नव्हतं.”
“म्हणूनच सांगितलं रे बाळांनो आता यापुढे सण साजरे करताना हे नक्की लक्षात ठेवा.”
“बोला, गणपती बाप्पा मोरया.”
टीप - वैद्यांचा सल्ला घेताना ते शिक्षित आणि नोंदणीकृत वैद्य आहेत याची खात्री करून घ्यावी.
आपली मते व काही शंका असल्यास त्या आपण मला वैयक्तिक क्रमांक अथवा इमेलद्वारे विचारू शकता. यापुढील लेख दर रविवारी सकाळी ब्लॉगवर प्रसिद्ध केले जातील. हे लेख आपल्याला व्हाट्सऍप /ईमेलद्वारे हवे असल्यास आपण खाली दिलेल्या क्रमांकावर मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. अथवा आमचे फेसबुक पेज like करा.
https://m.facebook.com/drsnigdhasclinic/
डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक.
9870690689
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 23 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/08/blog-post_22.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)