Sunday, 23 July 2017

रिमझिम गिरे सावन…….. ( वर्षा ऋतुचर्या )


रिमझिम गिरे सावन…….. ( वर्षा ऋतुचर्या )



                   पावसाला सुरुवात झाली की सगळ्यांच्या उत्साहाला बहर येतो. भजी-समोसे-फ्राइज आणि चहा यांच्या पटापट जोड़या जुळवल्या जातात. पावसाळी रेसिपीजमध्ये गरमागरम मॅगी पासून झणझणीत सूप्स, चहा-कॉफीच्या कप्सचे फोटो, पावसाळी शुभेच्छा, हवामान खाते आणि पावसाच्या “मैत्रीचे” जोक्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतात. मग हळूहळू पोटदुखी , एसिडिटी, सर्दी-ताप-खोकला यांच्या तक्रारी घेऊन पेशंट दवाखान्यात दाखल होऊ लागतात. आता लगेच काही हौशी लोक म्हणतील की ‘काय डॉक्टर, पाऊस म्हटले की लगेच आजारच दिसतात का तुम्हाला? जरा वर्षा सहल,धबधबे, चटपटीत खाऊ असं काही बोला की..  पण काय करणार, सध्या इथं दवाखान्यात येणारी गर्दी या आजारांसाठीच प्रामुख्याने येते आहे आणि या आजारांचे कारण आहे, न पाळलेले ऋतुचर्येचे नियम.
             जसं की आपण पूर्वी उन्हाळ्यासाठी ग्रीष्म ऋतुचर्या पाहिली त्याचप्रमाणे आताही ऋतु बदलला, हवामान बदलले त्यानुसार आचरण बदलायला हवे. ग्रीष्म ऋतुतील कडक उष्णता आणि रुक्षता यामुळे आधीच वाढलेल्या वातदोषाला सततच्या पावसामुळे गारव्याची जोड मिळते आणि वातप्रकोप  झालेला दिसतो.(प्रामुख्याने वात दोषाची लक्षणे अधिक वाढलेली दिसून येणे) तसेच वाढलेली आर्द्रता/कमी तापमान/सततच्या पावसामुळे येणारा ओलावा हे कफाच्या (सर्दी,खोकला,दमा) यासारख्या आजारांना बळ देतात. तसेच या काळात पाणी गढूळ , अशुद्ध असते.वनस्पति प्रामुख्याने नवीन उगवलेल्या, कमी गुणाच्या (हीन), अम्ल रसप्राधान्य असलेल्या असतात त्यामुळे नैसर्गिकरित्या शरीरात पित्त दोष अधिक साचू लागतो. यामुळे भूक कमी होणे, अपचन,शौचाला साफ न होणे किंवा बरोब्बर याउलट, जुलाब होणे, पोटदुखी यासारखे त्रास होताना दिसतात. या अश्या वात-पित्त-कफ, तीनही दोष कमी-अधिक प्रमाणात बिघडलेल्या शरीरस्थितिमुळे पाचनशक्ति मंदावलेली आणि शरीरबळ हीन झाल्याचे जाणवते. त्यामुळे सतत उत्साह नसणे, मरगळल्यासारखे वाटणे, बेचैनी वाटत राहते. त्यातच सूर्यकिरणांचा अभाव,ढगाळलेले वातावरण,अशुद्ध पाणी, आर्द्रता,ओलावा यामुळे साथीचे रोग पसरतात (viral आणि bacterial infections हो..)
अशा वेळी ऋतुनिहाय आहार-विहार-आचरण महत्वाचे आहे. यासाठी,

      विहार
  1. घर-ऑफिस स्वच्छ व कोरडे असेल याकडे लक्ष ठेवावे. जेणेकरून बुरशीची वाढ होणार नाही.
  2. घरात संध्याकाळी धूप करावा, धूपनाने सूर्यास्तानंतर घरात येणारे किटक दूर होण्यास मदत होते.
  3. बाहेर असताना पावसात भिजणे टाळावे,नेहमी छत्री, रेनकोट जवळ ठेवावे.
  4. गळ्याचा - छातीचा भाग , जॅकेट-स्कार्फने झाकून घ्यावा.
  5. भिजल्यास लगेचच अंग विशेषतः डोके कोरडे करावे व शक्य असल्यास स्वच्छ व  कोरडे कपडे घालावे.
  6. पावसाळ्यासाठी बंद तोंडाचे बूट वापरावे. चिखल व साचलेल्या पाण्यातून चालू नये.  यामुळे किटक दंश,उंदीर चावणे तसेच Leptospirosis यासारखे आजार टाळता येतात.
  7. कपडे व अंतर्वस्त्रे कोरडी वापरावीत. दमट कपडयांमुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊन त्वचाविकार,गुप्तांगांमध्ये खाज-चट्टे उठणे असे त्रास होऊ शकतात.
  8. केस ओले-अस्वच्छ राहिले किंवा ओल्या केसांना तेल लावले गेले तर कोंडा, फोड, पुटकुळ्या होऊ शकतात.
  9. सकाळी उठल्यावर गरम पाण्याने गुळण्या कराव्यात.
  10. व्यायाम हलक्या स्वरूपाचा असावा.
  11. वातशामक तेलाने अभ्यंग (मसाज)  करून मग कोमट पाण्याने आंघोळ करावी.
  12. दिवसा झोप व रात्री जागरण टाळावे.नाहीतर वात-पित्ताचे त्रास वाढतात.

     आहार  
  1. पावसाळ्यात भाज्यांची कमतरता व चमचमीत पदार्थांची आवड यामुळे पापड, भरलेल्या मिरच्या-सांडगे, लोणची असे साठवणिचे पदार्थ बाहेर येतात.मांसाहारी घरामध्ये सुके मांस,सुके मासे यांचा वापर वाढतो.
  2. पण सुकवलेले पदार्थ पचायला जड असतात तसेच टिकवण्यासाठी त्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ, तेल अथवा मसाले वापरतात. त्यामुळे या सर्व पदार्थांचा वापर जपूनच करावा.
  3. जेवणात आंबट-खारट चवींचे पदार्थ कमी वापरावे. रुचिकर म्हणून सैंधव, आले लिम्बू यांचा मर्यादित वापर करावा.
  4. चण्याची डाळ, बेसन याऐवजी मूग डाळ, मूग डाळीचे पीठ,मसूर डाळीचे पीठ वापरावे.
  5. धान्य शक्यतो जुने वापरावे किंवा नवीन असल्यास भाजून घ्यावे.
  6. आंबवलेले किंवा दही मिसळून शिजवलेले पदार्थ (इडली,उत्तप्पा, मेदूवडा, ब्रेड,ढोकळा) खाऊ नये. नाइलाजाने खायचे झाल्यास नीट भाजलेला टोस्ट,डोसा खावा)
  7. कच्चे सलाड, फ्रूट प्लेट खाऊ नये.सलाड खायचे झाल्यास थोडे वाफवून खावे.
  8. दूध पिताना एक कप दूधासाठी पाव चमचा सूंठ घालून उकळून प्यावे.
  9. पचन, अग्नि दीपन यासाठी ताक उत्तम आहे त्यामुळे ते शक्यतो दुपारी जेवणानंतर जीरे-सैंधव घालून प्यावे.
  10. हल्ली फिटनेसबद्दल गैरसमजापोटी लोणी-तूप टाळले जाते.मात्र पावसाळ्यात घरगुती लोणी-तूप आवर्जून वापरावे. (मात्र हे लोणी-तूप तळणासाठी न वापरता पोळी-चपाती-थालीपीठ-पराठे यावर लावून,वरण-भातावार असे कच्च्या स्वरुपात खावे.)
  11. शिळे अन्न खाऊ नये.
  12. भूक मंदावलेली असेल तर हलका, द्रव स्वरुपाचा आहार घ्यावा. (Ref. कुळीथाचे कढण http://samanwayhealth.blogspot.com/2015/07/blog-post_1.html?m=1, मांसरस http://samanwayhealth.blogspot.com/2015/07/blog-post_16.html?m=1 )
  13. पाणी नेहमी उकळलेले  व कोमटच प्यावे.
  14. इतर पथ्य-अपथ्य पदार्थांचा तक्ता खाली सविस्तर दिला आहे. तो नीट वाचावा व काही शंका असल्यास कमेन्ट/मेसेज बॉक्स मध्ये निःसंकोच विचारु शकता.

     पंचकर्म
  • पावसाळ्यात वात प्रकोप झालेला असतो.त्यामुळे गुडघेदुखी,कंबर दूखणे, सायटिका,टाचा दूखणे, पायात गोळे येणे, यूरिक एसिड वाढून होणारा gout सारखा आजार असे वातविकार मोठ्या प्रमाणात दिसतात.अश्या आजारांसाठी बस्ति चिकित्सा अतिशय उत्तम आहे.
  • पोटात गुबारा धरणे, वारंवार गॅसेस होणे,बद्धकोष्ठता यासारख्या आजारांवर सुद्धा बस्तिकर्म हा उत्तम उपाय आहे.
  • जेव्हा आजाराची लक्षणे अधिक तीव्र असतात किंवा आजार जुनाट असतो किंवा औषधे थांबवली की त्रास परत उफाळून  येत असेल अश्या वेळी वैद्य सखोल आणि विस्तृत तपासणी करून बस्ति कर्म करतात.

      पथ्य-अपथ्य तक्ता



            पथ्य
              अपथ्य
 धान्य
तांदूळ,ज्वारी,बाजारी, नाचणी, जव, गहू(मर्यादित प्रमाणात)
मैदा-मैद्याचे पदार्थ,वरी तांदूळ,नवीन धान्य
 डाळी
मूग,मसूर, कुळीथ(कढण/पिठले)
तूर, वाल,चणे, छोले,राजमा, वाटाणे
 भाज्या/फळभाज्या
दूधी भोपळा,शिराळी, घोसाळी, पडवळ,भेंडी,सुरण
पालेभाज्या, कारली, गवार,बटाटा
 


  फळे
अननस, पपई, डाळींब,करवंद, आंबा(मर्यादित)
फणस,ताडगोळे,काकड़ी, कवठ, खरबूज, टरबूज, केळी,
 दूध व दुग्धजन्य पदार्थ
दूध(सुंठ/हळद सिद्ध), तूप, लोणी(टेबल बटर नव्हे), ताक.
दही,लस्सी,पनीर,चीज़, कंडेंसड मिल्क
 मांसाहार
गावठी कोंबडा, गावठी कोंबडीची अंडी, छोटे मासे
सुके मांस,सुके मासे, मटण, मोठे मासे
गोड पदार्थ
मध,गुळ, खडीसाखर
 पांढरी साखर, माव्याची मिठाई
मसाले
आले, लसूण, मिरे, जीरे,धने, लाल तिखट
मोहरी,हिरवी मिरची
आंबट पदार्थ
कोकम, लिम्बू
 चिंच, कैरी,आमचूर,आंबवलेले सॉस , टॉमेटो(मर्यादित)
इतर
लाहया - ज्वारी,तांदूळ, राजगिरा, मका(पॉप कॉर्न्स)
तळलेले ,शिळे पदार्थ, जळजळ निर्माण करणारे असे , आंबट पदार्थ






Image courtesy intenet
चित्र सौजन्य आंतरजाल

(प्रस्तुत लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी २३ जून २०१७ रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2017/07/blog-post.html?m=1 या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखिकेधिन  आहेत. इतरत्र शेअर करायचे झाल्यास लेखात कुठलाही बदल न करता शेअर केल्यास हरकत नाही