Thursday, 10 October 2019

श्वेतप्रदर (Leucorrhea )

श्वेतप्रदर (Leucorrhea )

             आजचा विषय आहे, श्वेतप्रदर (Leucorrhea), ज्याला सामान्य भाषेत अंगावरुन पांढरे जाणे असे म्हणतात. आपल्या समाजात मासिकपाळीप्रमाणेच हासुद्धा कुजबुजत बोलण्याचा विषय आणि त्यामुळेच स्त्रियांमध्ये अगदी सहज आढळणारा आजार. आजही ‘पांढरे जाणे’ यासारख्या साध्या आजाराभोवती गैरसमजांचे वलय आहे त्यामुळे बऱ्याचदा बायका याविषयी इतरांकडे बोलणे- वैद्यकीय सल्ला घेणे टाळतात. त्यामुळे या आजाराचे समाजातील प्रमाण व गांभीर्य वाढते. श्वेतप्रदर म्हणजे मासिक पाळीच्या व्यतिरिक्त अंगावरुन जाणारा पाण्यासारखा पातळ किंवा शेंबडासारखा  पांढरा स्राव. सामान्यतः योनिमार्ग जंतुसंसर्गमुक्त, ओलसर तसेच सौम्य राखला जावा यासाठी शरीर योनिमार्गा मध्ये वंगणासारखा , पातळ द्रवाचा स्राव करत असते, ही क्रिया ईस्ट्रोजेन या हॉर्मोनच्या नियंत्रणाखाली असते. त्यामुळे गरोदरपणात, दर महिन्याला स्त्री बीज निर्माण (Ovulation) तसेच वयात येताना योनिमार्गातील स्राव प्राकृत प्रमाणात वाढतात. मात्र या सर्व घटना तात्कालिक आणि स्वाभाविक असतात, त्यासाठी कुठल्याही औषधोंपचारांची गरज नसते, ते आपोआप कमी होतात. पण जेव्हा या स्रावांचे प्रमाण, कालावधी नेहमीपेक्षा वाढतो तेव्हा मात्र या प्रकाराची चिकित्सा अत्यावश्यक आहे. पूर्वी स्त्रीरोगतज्ञ श्वेतप्रदर हा वेगळा आजार मानत नसत. डॉ. राणी बंग यांनी त्यांच्या ‘सर्च’ या संस्थेद्वारे गडचिरोली जिल्ह्यात श्वेतप्रदर या समस्येवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. त्यावेळी एका  ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञांनी श्वेतप्रदर हा सर्दीच्या वेळी वाहाणाऱ्या नासास्रावा इतकाच मामुली असल्याचे सांगून त्यांच्या कामाला कमी लेखले होते पण त्यांनी आकडेवारीनिशि या आजाराचे गांभीर्य सिध्द केले.
              व्यवहारात मात्र श्वेतप्रदर आणि प्राकृत योनिस्राव यात वैद्यकीय तपासणी करुनच फरक जाणून घ्यावा लागतो. कारण श्वेतप्रदर हा विकृत प्रमाणात वाढलेला योनिस्राव असतो. तसेच एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या जन्तुसंसर्ग किंवा फिस्टुला तसेच श्वेतप्रदर यामध्ये स्रावाचा रंग,प्रमाण, प्रकार यांत फरक असतो. तसेच शारीरिक संबंधाच्या वेळी वेदना, इच्छा नसणे, कंबरेचे दुखणे, पोटात दुखणे, योनिप्रदेशी खाज, योनिप्रदेशी-मूत्रमार्गाकडे वेदना,जळजळ अश्या वेळी तज्ञ वैदयांकडून निदान करून घ्यावे. योनिस्राव दोन प्रकारचा असतो. *योनिमार्गातून* होणारा स्राव हा प्राकृत अवस्थेत स्वच्छता राखणे, pH कायम ठेवणे,वंगण पुरवणे यासाठी उपयोगी असतो मात्र गर्भाशय व अंतःफले (ovaries) यांची जागा सरकणे, Pelvic Inflammatory disease (प्रजननसंस्थेचा आजार), योनिमार्गाला येणारी सूज, जीर्ण मलावबंध यामुळे योनिगत स्राव मोठ्या प्रमाणात वाढतो. *गर्भाशयमुखातून* होणाऱ्या स्रावाचे विकृत स्वरूप गर्भाशयमुख क्षरण(cervical erosion) , गर्भाशयमुखाला येणारी सूज (cervical inflammation) , संसर्ग, पॉलीप अश्या आजारांमध्ये दिसते. 

श्वेतप्रदराचे गंभीर स्वरूप
  •            अंगावरुन जाणारे हे पांढरे पाणी बऱ्याचदा दुर्लक्षिले जाते. पण जर हा त्रास बरेच दिवस होत राहिला तर स्त्रीला अशक्तपणा जाणवतो. तसेच श्वेतप्रदराबरोबर इतर दुय्यम प्रकारचे जंतुसंसर्ग होण्याची शक्यतासुद्धा असते. बऱ्याचदा तर हे दूसरे इन्फेक्शन (दुर्लक्ष केल्यामुळे) अधिक गंभीर असू शकते. कारण Candidaisis, Gonorrhea, Trichomonas, Chlamydia अथवा Bacterial infection यामुळे होणाऱ्या संसर्गात योनिस्रावाचे प्रमाण , रंग , गंध बदलतात व सामान्य माणसाना यातील फरक ओळखता येत नाही आणि आजाराची गंभीरता वाढते.
  • आयुर्वेद शास्त्रात श्वेतप्रदर हा वेगळा आजार सांगितला नाही तर वेगवेगळ्या स्त्रीरोगांमध्ये लक्षणस्वरूप वर्णन केला आहे. पण कधी कधी हेच लक्षण एवढे त्रासदायक ठरते कि मूळ आजार सोडून श्वेतप्रदराचीच चिकित्सा करावी लागते. आयुर्वेदानुसार वात-कफ दोषांची विकृती असलेला हा आजार. जेव्हा प्रकुपित वात दोष शरीरातील आप धातुला प्रकुपित करतो आणि हा आप(द्रव) धातु अधोमार्गाने स्रवतो त्याला ‘सोमरोग- श्वेतप्रदर’ असे म्हणतात. या आजारात 
  • गावपातळीवर स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा त्रास दिसतो यामागे तज्ञ डॉक्टरांचा अभाव, पुरुष डॉक्टरांकडे जायचा प्रसंग आल्यास वाटणारी लाज, आर्थिक दुर्बलता यासारखी कारणे असतात.
  • प्रजननसंस्थेशी निगडित त्रास असल्याने याचे पडसाद घरात, वैवाहिक ताण-तणाव यासारख्या स्वरुपात दिसतात.

व्याधीनिश्चिती आणि उपाय - 
  
  •            श्वेतप्रदराचे निदान निश्चित करण्यासाठी संपूर्ण माहिती(History taking) , योनिमार्गाची बाहेरुन तसेच आतून नीट तपासणी, गरज पडल्यास गर्भाशयमुख व योनिमार्ग यांच्या पृष्ठभाग व तेथील स्राव यांची तपासणी गरजेची असते. तसेच पुढील तपासणीसाठी या स्रावांचे माइक्रोस्कोपद्वारे परीक्षण केले जाते.
  • यानंतर गरजेप्रमाणे व प्रकृतीप्रमाणे तोंडावाटे काढे अथवा चूर्ण वापरली जातात. खालच्या भागाला लावण्यासाठी जेल, मलम किंवा चूर्ण दिले जाते.
  • योनिप्रदेशी धावन (Vaginal Douches )केले जाते व योनी वर्तीचा (Vaginal  Suppositories ) वापर केला जातो. 
  • विवाहित स्त्रियांना हा त्रास असेल तर एकाकडून दुसऱ्याला होणारे संक्रमण टळावे यासाठी पती-पत्नी दोघांनीही औषधोपचार घ्यावेत.

Saturday, 5 October 2019

नऊ रंग नवरात्राचे...... स्त्रीशक्तीचे ..... आरोग्याचे......... या मालिकेतील लेख हा रक्ताल्पता याआजाराविषयी.....







नऊ रंग नवरात्राचे...... स्त्रीशक्तीचे ..... आरोग्याचे......... या मालिकेतील लेख हा रक्ताल्पता याआजाराविषयी.....

पण्डु रोग (रक्ताल्पता)

          रक्ताल्पता आणि स्त्री या विषयावर लिहीण्याआधी जरा या आजाराची भारतीय समाजातील सद्यस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर काही धक्कादायक माहिती मिळेल. काही अभ्यास सर्वेक्षणांनुसार भारतात अर्ध्याहून अधिक ( ५५-५९% ) स्त्रिया या रक्ताल्पता (Anaemia) या आजाराने ग्रस्त आहेत. म्हणजेच दर दोन स्त्रियांमधील एक स्त्री ही अॅनिमिक असते.
                आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर स्त्रियांचे हिमोग्लोबिन किमान १२ mg/dl असणे ही आहे आदर्श स्थिती पण बऱ्याच स्त्रियांमध्ये हे असते साधारण १०- ११.९ mg/dl च्या पातळीत, ज्याला कमी तीव्रतेची रक्ताल्पता (Mild Form Anaemia) असे म्हणतात. ( “बऱ्याच बायकांमध्ये असतं नं मग ठीक आहे,बघू नंतर”, हा संवाद याच स्टेजला ऐकायला मिळतो आणि खरं तर हाच दृष्टिकोन पुढे जास्त घातक असतो). त्यानंतर नंबर असतो यापेक्षा कमी म्हणजे ७ - ९.९ mg/dl Hb (हीमोग्लोबिन) असणाऱ्यांचा (Moderate form) आणि ६.९ mg/dl पेक्षाही कमी हिमोग्लोबिन असल्यास स्थिती गंभीर मानली जाते व या अवस्थेत तातडीचे उपाय आवश्यक असतात.

आयुर्वेदानुसार रक्ताल्पता - 

              आयुर्वेद शास्त्रामध्ये हा आजार पंडुरोग या नावाने वर्णन केला आहे. पंडु या शब्दाचा अर्थ आहे फिकटपणा . ------>  ज्या आजारात रुग्णाच्या त्वचा,नेत्र,नख या अवयवांच्या ठिकाणी पांडुता येते आणि रोगी केवड्याच्या कणसातील गाभ्याप्रमाणे फिकट आणि निस्तेज दिसू लागतो असा हा पंडुरोग या आजाराविषयी विस्तारपूर्वक सांगताना फक्त रक्ताल्पता हा एकच निकष न मानता इतर शरीरलक्षणेही विचारात घेतली जातात.  तसेच ओजक्षय ही संकल्पनासुद्धा सांगितली आहे. त्यानुसार अंग गळून गेल्यासारखे वाटणे, त्वचेवर कोरडेपणा जाणवणे,अशी लक्षणे सुरूवातीपासूनच जाणवतात. ( या लक्षणांना पूर्वरूपे असे म्हणतात. म्हणजे असे की या अवस्थेत आजाराचे व्यक्त स्वरूप दिसेलच असे नाही पण ही सुरूवात असू शकते.) यानंतर वेळेत औषधोपचार केले नाहीत तर अधिक तीव्र लक्षणे दिसू लागतात. भूक न लागणे, भ्रम(गरगरणे) ,श्रम (नेहमीचे काम करतानाही याआधी न जाणवलेला थकवा), दम-धाप लागणे, सर्वांग वेदना, पोटऱ्यांमध्ये गोळे येणे, केस गळणे, छातीमध्ये धडधड-घाबरल्यासारखे वाटणे यापैकी काही अथवा सर्व लक्षणे आजाराच्या तीव्रतेनुसार दिसतात. अधिक तीव्र लक्षणांमध्ये त्वचा,नखे,डोळ्यांच्या ठिकाणि फिकटपणा येतो,हे अवयव निस्तेज दिसतात, स्वभाव त्रासिक-चिडचिडा होतो, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळल्यासारखे वाटते, अंगात बारीक ताप जाणवतो.

स्त्रियांमध्ये दिसणारे गंभीर परिणाम - 
             स्त्रियांमध्ये पंडुता अधिक तीव्रतेने दिसण्याची पुढील मुख्य कारणे आहेत.
  • मासिक पाळी - दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या काळात प्रत्येक वेळी साधारण ३० ते ४० मिली रक्तस्राव होतो होतो. (हे फक्त एका महिन्याचे प्रमाण आहे जे प्रकृतीनुसार कमी-जास्त असू शकते पण सरासरी काढली तर एका वर्षात साधारण 350-500मिली रक्तस्राव होतो. ) जर अंगावरुन जास्त जात असेल किंवा पाळी २१ दिवसापेक्षा कमी कालावधीत येत असेल तर हे प्रमाण अजून जास्त होईल. यामुळे रक्ताल्पतेची लक्षणे दिसतात.
                    पाळीवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होऊन पाळी अनियमित होणे,कमी प्रमाणात रक्तस्राव किंवा अधिक दिवस थोडे-थोडे अंगावर जाणे अशी लक्षणे दिसतात.
  • गर्भारपण - या काळात स्त्री दोन जीवांची असते.ज्यामुळे शरीरातील रक्त वाढते.(Hypervolemia- यात serum व plasma यांचे प्रमाण वाढल्याने रक्तकणांचे प्रमाण कमी होते.अशा वेळी मातेला ३०-६०mg लोह व ४००माइक्रोग्राम फोलिक ऍसिड मिळणे गरजेचे असते. ज्यामुळे हीमोग्लोबिन चे प्रमाण वाढू शकेल. रक्ताल्पता असल्यास अपूऱ्या कालावधीत प्रसूतीचा धोका वाढतो, बाळाचे वजन कमी असणे,प्रसूतिच्या वेळी जंतुसंसर्गाचा धोका शक्यता वाढते.
भारतात शिक्षणाचा अभाव, वैद्यकीय सुविधांबद्दल अज्ञान,आर्थिक अडचणी,वारंवार होणाऱ्या बाळंतपणामुळे येणारा निष्काळजीपणा यामुळे गरोदरपणातील रक्तल्पतेचे प्रमाण अधिक आहे.
  • प्रसूती - एका प्रसूतिच्या वेळी साधारण 500-800मिली रक्तस्राव होतो. प्रसूतीनंतर रक्तस्राव (Post partum haemorrhage) झाल्यास हे प्रमाण वाढते व प्रसंगी मातेचा जीव धोक्यात येऊ शकतो.
  • अस्वच्छता <----> कृमि प्रादुर्भाव - स्वयंपाक बनवताना , जेवताना स्वच्छता न राखणे, अस्वच्छ भांडी-हात यामुळे कृमि संसर्ग होतो जे रक्तल्पतेचे मुख्य कारण आहे.
तसेच अस्वच्छ पाण्यात वाढणाऱ्या anapheles डासांमुळे होणाऱ्या मलेरिया या आजारामुळेही रक्ताल्पता दिसून येते.
  • निकृष्ट दर्जाचे अन्न - सर्वसाधारण भारतीय घरात स्त्रिया व मुलींना पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा मिळत नाही, तसेच परंपरागत विचारांमुळे त्या सुद्धा स्वतःचे स्थान कमी समजतात. त्यामुळे शिळे अन्न जेवणे, कुटुंबातील सगळ्यांना वाढल्यानंतर उशीरा जेवणे , उरलेल्या अन्नातच भूक भागवणे असे प्रकार घरा-घरांतून सर्रास दिसतात. अशा वेळी लोहाचा नैसर्गिक स्रोत असलेले सुकामेवा, डाळी, फळे, मांसाहार यांचे सेवन सगळ्यांना शक्य होत नाही त्यात स्त्रियांच्या वाटयाला त्याचा गरजेइतका भाग येईल याची शक्यता कमी असते. मुलांच्या पोषण -गरजा यांच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणारी आई स्वतःच्या आरोग्याकडे सहज दुर्लक्ष करते.

उपाय
  • आहार - आहारामधून मिळणारे लोह हे सौम्य रक्ताल्पता व हीमोग्लोबिनची पातळी नियमित ठेवण्यासाठी उपयोगी असते. पालक, बीट,टॉमेटो, डाळी, कडधान्ये, राजमा, चवळी यासारख्या भाज्या, मनुका, सुकामेवा, कलेजी, कोंबडीचे- बकरीेचे मांस,मासे यातून पुरेसे लोह मिळते.
  • औषधे - पंडु रोग चिकित्सा करताना फक्त रक्तवाढिसाठी लोह देणे पुरेसे नाही तर रसधातु पासून चांगला रक्तधातु तयार व्हावा यासाठी रक्ताग्निवर्धक  व रक्तधातु वर्धक अशी दुहेरी औषधयोजना करावी लागते. रक्तक्षय---> दुर्बलता---->धातुक्षय---->वातप्रकोप----> रुक्षता ,असे हे दुष्टचक्र आहे. यासाठी स्नेहन, मृदू विरेचन अशी पंचकर्म चिकित्सा करून नंतर पुनर्नवा मंडूर, नवायस लोह यासारखी औषधे  दिली जातात. औषध योजना करताना त्यासोबत फोलिक एसिड देतात ज्यामुळे लोहाचे शोषण वाढते. तोंडावाटे द्यायची औषधे मध्यम तीव्रतेच्या रक्ताल्पतेसाठी उपयोगी असतात.
  • तीव्र रक्ताल्पता असल्यास इंजेक्शन्स किंवा blood transfusion केले जाते व त्यानंतर दीर्घ कालावधीसाठी गोळ्या दिल्या जातात.

टीप - मात्र लोहाच्या कमतरतेमुळे जसा रक्तल्पतेचा त्रास होतो तसेच अति लोह सेवनाने विषाक्तता (लोहाचे शरीरावर दिसून येणारे विषारी परिणाम) दिसून येतात. प्रस्तुत लेखामध्ये व्यक्त केलेली मते ही सामान्य वाचकांच्या माहितीसाठी आहेत. त्यामुळे डॉक्टर नसताना स्वतःच स्वतःवर प्रयोग करु नये वैद्यकीय सल्ल्यानेच औषधे घ्यावित.