Thursday, 22 October 2015

नवरंग , नवरात्राचे…… स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग 3)

     नवरंग , नवरात्राचे…… स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग 3)




७                            गर्भिणी (Pregnant Women) गरोदरपणाचा काळ खूप महत्वाचा असतो.या अवस्थेत स्त्रीने स्वतःची व पोटातल्या बाळाची काळजी घेणे गरजेचे असते.या काळात जर आईला अपुरे पोषण मिळाले तर गर्भाला त्रास होतोच.पण आईलासुद्धा पोषण कमी मिळते ज्यामुळे तिच्या शरीराची सुद्धा हानी होते.याचा परिणाम म्हणून अकाली प्रसव,गरोदरपणातील रक्तस्राव या व अशा अनेक गुंतागुंतीचे त्रास दिसतात ज्यामुळे माता व बालमृत्युच्या घटना दिसतात.
हे होऊ नये म्हणून आईने षड्रसात्म क ,चौरस आहार घ्यावा.आवश्यक प्रथिनांचे योग्य प्रमाणात सेवन करावे.लोह Calcium व Folic Acid चे नियमित सेवन करावे.मातेची मानसिक स्थिति आनंदी असावी यासाठी स्वतः आई व घरातील इतर सदस्यांनी काळजी घ्यावी.यासाठी ध्यानधारणा,योगासने,स्नेहाभ्यंग यासरखे उपाय करावेत.

८.                     चिंता (Sterss ) - घर - मुले- काम यांचा सुवर्णमध्य साधताना स्त्रियांची मोठ्या प्रमाणावर दमछाक होत असते.त्यामुळे स्त्रिया/गृहिणींना मोठ्या प्रमाणावर ताण-तणावांना सामोरे जावे लागते. 
                       हे तणाव वेळीच ओळखून ते मुळापासून दूर करणे गरजेचे आहे. घरच्यांशी किवा जवळच्या मित्र-मैत्रिणींशी याबाबत बोलता येईल. यासाठी स्वतःला आवर्जून वेळ द्या. ग़रज वाटली तर ब्रेक घ्या . आवडीचे छंद जोपासा. छंद तुमच्या आयुष्याला एक वेगळीच आनंदी दिशा देतील. जीवनातील आनंद अधिक जाणवू लागेल. (फक्त TV Serials बघणे किवा gossip column वाचणे ,कुचाळक्या करणे असे छंद असू नयेत,)  समस्या गंभीर वाटत असेल तर तज्ञ सायकोलोजिस्ट शी सुद्धा बोलावे. 
                     ताणमुक्त जीवन हा आयुष्याचा भाग असू दे,  Antidepressants किंवा झोप येण्याच्या गोळ्या नाही. 

९.                स्त्रीच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा  टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती (Menopause ) -
 टप्प्यावर मासिकपाळी हळूहळू बंद होऊ लागते . त्यामुळे शरीरातील संप्रेरकांची (Hormones) ची पातळी बदलते. बेचैनी , उष्णता वाढणे (Hot  Flushes ) अंग दुखणे, भावनाप्रधान वागणूक (Mood Swings ) दिसून येतात . काही स्त्रियांना महिनोंमहिने पाळी न येणे किंवा भरपूर रक्तस्राव होणे यासारखे त्रास होतात .
                  त्यातच हे वय येईपर्यंत मुले मोठी झालेली असतात . त्यामुळे Generation Gap , Empty Nest Syndrome (मुले शिक्षण-नोकरीसाठी इतर शहरात किंवा देशात स्थायिक होतात) अशा गोष्टींचीसुद्धा भर पडते. स्त्रियांना आयुष्यात वेगवेगळ्या आघाडीवर होत असलेले हे मोठ्या प्रमाणातील बदल अस्वस्थ करतात. आपल्याला होणारा त्रास समजून घेणे, तो नेमक्या शब्दात व्यक्त करणे आणि या त्रासाचे उपाय शोधणे जमतेच असे नाही.
                  त्यामुळे Menopause जवळ आल्याचे जाणवले की  वैद्यकीय सल्ल्याने वात-पित्तशामक चिकित्सा घ्यावी. 
दक्षिणात्य अभिनेत्री व दिग्दर्शक रेवती हिचा  Mitra -My   Friend नावाचा या नावाचा एक सुंदर सिनेमा  आहे.
या मध्ये घर न  मुली मध्ये रमलेली  स्त्री मुलगी मोठी होत असताना जीवनात येणारे बदल स्वीकारून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्त्व आवडी-निवडी यांची निवड कशी करते हे खूप सुंदररीत्या दाखवले आहे.
                   आपल्यालाही जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर अशा मित्राची-खंबीर आधाराची गरज असते. पण स्वतः स्वतःचे मित्र होणे हे जास्त गरजेचे आहे. स्वतःचे प्रश्न ओळखून ते सोडवणे गरजेच्जे असते.
                    म्हणून या नवरात्रीच्या निमित्ताने तुमच्यातील स्त्रीशक्तिलासुद्धा बळ  मिळो  ही  देवीच्या चरणी प्रार्थना.
                                                     ।।   शुभं  भवतु ।।

Wednesday, 21 October 2015

नवरंग , नवरात्राचे…… स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग २)

        नवरंग , नवरात्राचे…… स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग २)



     4.           संधिवात  - पूर्वी साठीच्या वयात दिसणारा संधिवाताचा आजार हल्ली चोरपावलांनी चाळीशीच्या आसपास दिसू लागला आहे.वाढणारे वय,कामाची दगदग,व्यायामाचा अभाव,अपुरे पोषण यामुळे वात दोष वाढतो व शरीरातील सांध्यांची झीज होते. 
              वेदनाशामक (painkillers) च्या गोळ्या किंवा मलम,Calcium च्या गोळ्या खाणे हे तात्पुरते ठरते मात्र हा कायम स्वरूपी इलाज नाही.शेवटी Knee Replacementसाठी अस्थिरोगविशारदाची (Orthopedic Surgeonची  पायरी चढावी लागते. 
               त्याऐवजी आहारात दूध,बदाम,नाचणी,तीळ,हिरव्या पालेभाज्य असाव्यात.वजनावर ताबा ठेवावा.आवश्यकता असल्यास वैद्यांच्या सल्ल्याने स्नेहन-स्वेदन,बस्तिक्रमासारखे उपाय करता येतील. Menopause च्या नंतर वातशामक आहार-विहार आणि औषधे वापरता येतील . 

5.           अंगावरून पांढरे जाणे(Leucorrhea) -
           या आजाराची बऱ्याचदा लज्जेस्तव चर्चा केली जात नाही.पण याचे गांभीर्य खूप जास्त आहे. अंगावरून पांढरे-पिवळे पाणी किंवा घट्ट स्त्राव जात असेल,योनिमार्गात घाण  वास, खाज किंवा पुरळ येत असेल तर वैद्यांचा सल्ला घ्यावा. स्त्री विवाहित असेल तर पति-पत्नी दोघांनाही औषध घेण्याची गरज असते. 
               तसेच योनीमार्ग आणि जननांगे स्वच्छ ठेवावी.  अन्तर्वस्त्रे स्वच्छ,फिक्या रंगाची,सुति आणि पूर्णपणे सुकलेली असावीत.अतिघट्ट किंवा दमट वस्त्रे हा त्रास वाढण्यास कारणीभूत असतात. 

6.          व्यायाम - नियमित व्यायाम करणे हे अत्यावश्यक आहे.व्यायामामुळे शरीर लवाचिक बनते.उत्साह वाढतो.त्यामुळे शरीर आणि मनाचीसुद्धा ताण सहन करण्याची ताकद वाढते.
             व्यायाम करण्यासाठी सकाळी चालायला जाणे , Warm -Up ,योगासने ,Cardio Exercise यांचा क्षमतेनुसार वापर करावा 

(क्रमशः )

Tuesday, 20 October 2015

नवरंग , नवरात्राचे…… स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग १)

 नवरंग , नवरात्राचे……  स्त्रीशक्तीचे आणि आरोग्याचे (भाग १)





 

                               नवरात्र हा जागर आहे स्त्री शक्तिचा.आदिशक्तिने महिषासुराशी नऊ दिवस घनघोर युध्द करून विजय  मिळवला.या स्त्री शक्तीचा सन्मान आपण नवरात्रा मध्ये देवीची स्तुती करून करत असतो.पण हे करताना घरातली कर्ती स्त्री मात्र दुर्लक्षितच असते. किंबहुना सर्वांच्या गरजांकडे लक्ष देणारी,घरचे आवरून ऑफिसला पळणाऱ्या,वाण सामान आणताना कुशलतेने घरचे बजट पण सांभाळणाऱ्या,मुलांचे अभ्यास परीक्षा,वडीलधाऱ्याच्या गरजा,पाहुणे-रावळे,सणवार सांभाळणारी स्त्री रोज घरात अष्टावधानी योद्धयाप्रमाणे सर्व आघाड्यांवर तोंड देत असते.हे करताना बऱ्याचदा तिला स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो.हे वाचत असतानाही आपल्यातील महिला होकाराच्या माना डोलावत असतील. 
             एवढी तारेवरची कसरत कुशलतेने करायची असेल तर स्त्रीला स्वतःचे आरोग्य जपलेच पाहिजे, आपले शक्तिस्वरूप टिकवलेच पाहिजे म्हणूनच नवरात्राच्या निमित्ताने 'स्त्री आरोग्याच्या' या नऊ टिप्स. 
  1. मुलीच्या जन्मापासूनच तिला योग्य आचार-विचार संस्कार देऊन एक समर्थ व्यक्ती म्हणून वाढविण्याचा निश्चय करावा. 
    आजच्या बालिका हे उद्याचे खंबीर आधारस्तम्भ आहेत हे समजून घेऊन त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचीसुद्धा  काळजी घ्यावी. या साठी योग्य आहार,व्यायाम,योगासने,ध्यानधारणा यांचा वापर करता येईल. (हा मुद्दा फक्त मुलीच नाही तर सर्वच लहान मुलांच्या बाबतीत लागू आहे.)
  2. स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे मासिकपाळीचे दिवस. या काळात शक्य तितकी विश्रांती घ्यावी.सकस आहार घ्यावा.शारीरिक -मानसिक ताण-तणाव टाळले पाहिजेत.
                हल्ली मासिकपाळीच्या तक्रारी वाढत आहेत.अनियमित पाळी,अंगावरून एकदम कमी किंवा एकदम जास्त जाणे,पाळीच्या वेळेस वेदना,पाळी न येणे हे सर्रास दिसून येते. अशा सर्व तक्रारींचे मूळ हल्लीच्या बदललेल्या जीवनशैली आणि आहारात आहे. त्यामुळे मासिकपाळीच्या त्रासाकडे कडे दुर्लक्ष करू नका.वेळीच वैद्यांचा सल्ला घ्या. 
  3. शिळे अन्न - उरलेले/शिळे अन्न संपवणे ही फक्त आईची जबाबदारी आहे असा अलिखित नियम आहे कि काय असे वाटावे इतक्या मोठ्या प्रमाणात शिळे जेवण स्त्रीया खात असतात .'कमी नको बाई पडायला,सगळ्यांना  पोटभर जेऊ दे ' म्हणून जेवण थोडे जास्तच बनवले जाते आणि मग उरलेले  दुसऱ्या दिवशी आईच संपवते.
    शिळे अन्न हे अम्लपित्त(Hyperacidity) चा आजार निर्माण करते.परत त्यात पोषणमूल्येही फारच कमी उरलेली असतात.मग असे अन्न टाळलेलेच बरे,हो नं?
    यासाठी मोजून-मापून अन्न शिजवावे.घरातील सर्वांनी  आपण किती जेवणार आहोत/घरी जेवणार नाही याचा अंदाज आईला द्यावा. तरीही अन्न उरले तर सर्वांनी मिळून थोडे थोडे संपवावे.
    आपल्या आई/आजी/बायको/ताईसाठी आपण हे एवढे तर करुच शकतो नं? 
(क्रमशः)

Friday, 4 September 2015

दातांची निगा ( Dental Care )








दातांची निगा ( Dental Care )

…..   अर्थातच आयुर्वेदानुसार 




          ती  - क्या आपके टूथपेस्ट में चारकोल,नमक , निम्बू, लौंग , बबूल है???? 
मी - नाही , पण आम्ही दंत मंजन वापरतो , त्यात हे सगळे आहेच. 
ती - किती आउट डेटेड ,  colurfull toothpaste is soooo coool


                         हल्ली सगळीकडे थोड्याफार फरकाने असेच संवाद ऐकायला मिळतात . ( क्लिनिकमध्ये तर फारच ) . हल्ली सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या गोड - गोड टूथपेस्ट  "IN" झाल्या आहेत . आणि त्यांच्या या गोड चवीमुळे बरीचशी जनता पेपर वाचत / TV  बघत तोंडातला ब्रश चावत असते . लहान मुलांची तर वेगळीच कथा , त्यांच्यासाठी खास   कार्टून्सच्या , रंगीबेरंगी , गोड टूथपेस्ट आल्या आहेत . परत त्या Floride Free सुद्धा आहेत . त्यामुळे ब्रश करताना दात साफ होण्यापेक्षा पेस्ट खाणेच जास्त होते . 
                           आयुर्वेदानुसार मधुर (गोड) चव हि तोंडाला चिकटा  आणणारी असते . (मधुरं  रसं  वक्त्रमनुलिम्पति  । ) मग तोंडाला चिकटा  आणणाऱ्या रसाची ही गोड  टूथपेस्ट आपले तोंड कसे बरे नीट स्वच्छ करेल? 
                            आता तुम्ही विचाराल, मग करायचे तरी काय? डॉक्टर 'तुमच्या'  (हासुद्धा पेशंटच्या डिक्शनरीमधला खास शब्द ) आयुर्वेदाने तरी याबद्दल काही सांगितले आहे का?
                            तर हो , आयुर्वेदात 'दंतधावन विधी ' सांगितला आहे. 
दंतधावन काष्ठ (टूथब्रश) बनवण्यासाठी खैर , करंज,निंब,वड ,अर्जुन,मधुक  यापैकी झाडाची कोवळी फांदी ( साधारण १२ अंगुळे लांब व करंगळी एवढी जाड अशी ) घेऊन एका टोकाला चावून मऊ  भाग तयार करावा आणि या ब्रशने दात,हिरड्या व जीभ घासावी.  ही  कोवळी काडी चावल्यामुळे दात -हिरड्यांना व्यायाम होतो. नंतर दात घासल्यामुळे जीभ न हिरड्या स्वच्छ होतात, तोंडाचा चिकटपणा - किटण कमी होतो. त्यानंतर जीभ साफ करावी. यासाठी तांब्याचा जिव्हानिर्लेखक ( Tongue  Cleaner ) वापरावा. जीभ नियमित साफ केल्यामुळे जिभेच्या मुळाशी असलेला कफ निघतो आणि मुखदुर्गंधी दूर होते. 
                             गंडूष /कवल (Gargling) - त्यानंतर व्यक्तीच्या प्रकृतीनुसार औषधी काढ्यांच्या गुळण्या कराव्यात किंवा काढे तोंडात धरावे. यामुळे जबड्याच्या हाडांना बळकटी येते. स्वर सुधातो, ओठ फुटत नाहीत तसेच सध्याचा Popular त्रास म्हणजे Sensetiveness of  teeth ( दात शिवशिवणे / दाँतों की झुनझुनाहट ) खूप कमी होते. ( सध्या यासाठी सुद्धा महागड्या टूथपेस्ट्स  prescribe केल्या जातात. )
                             आता तरीही कोणी विचारेल कि हे  सगळे कसे काय करायचे तर हे लक्षात घ्या कि एवढे  सगळे फायदे मिळणार असतील तर तर असे करण्यात काय हरकत आहे ? आणि नेहमीएवढाच किंवा कदाचित थोडासाच जास्त वेळ यासाठी लागेल . तरीही कोणाला अगदीच जमत नसेल तर त्यांनी किमान दंतमंजन वापरावे.फ़क्त हे दंतमंजन अगदी बारीक चूर्ण आहे याची खात्री करून घ्या. म्हणजे Dental  Enamel खराब होणार नाही. 
                            तसेच टाळू,ओठ,जिभेचे रोग झाले असतील किंवा तोंड आले असेल तर दंतधावन वापरू नये (म्हणजेच ब्रशने दात घासू नये. ) तर  अशा वेळी बोटाने हळू दंतमंजन चोळावे आणि औषधी गुळण्या कराव्यात. 
                            तर असे हे दंत आख्यान सफल संपूर्ण झाले . आता तुम्ही हे उपाय जरूर करून बघा आणि मला नक्की कळवा. 

Sunday, 16 August 2015

A Date or Two

A Date or Two





                       A  Date  or  Two  नावाचा धडा, आपल्याला  शाळेत असताना इंग्रजीच्या पुस्तकात होता . त्यात खजूराचे गुणधर्म आणि आहारातील उपयोग याबद्दल सांगितले होते . आज तोच धडा मी आयुर्वेदिक दृष्टीकोनातून पुढे नेणार आहे . 
                       खजूर (मराठी/हिंदी )    खर्जूर (संस्कृत )     Dates (इंग्रजी ) 
                       Phoenix  dactylifera ( Latin)



मधुरं बृहणं वृष्यं खर्जुरं गुरु शीतलम ।
क्षये sभिघाते दाहे च वातपित्ते च तद्हितम  ।।
                       रस - मधुर  वीर्य - शीत  विपाक - मधुर 

खजूर हे मधुर रसाचे , बृहण ,वीर्यवर्धक ,गुरु (पचायला जड ) , शीत आहे . क्षय , मार लागल्यामुळे झालेल्या जखमा , दाह तसेच वात-पित्त विकारांमध्ये  उपयोगी आहे . 

Nutritional  Values :


        Principle                  Nutrient Value           Percentage of RDA


   Energy                          277 Kcal                               14%
 Carbohydrates                  74.97 g                                58%
 Total Fat                          0.15 g                                  <1%
  Protein                            1.81g                                   3%
 Cholesterol                       0 mg                                    0%
 Dietary Fiber                     6.7 g                                   18%

Vitamins

Folates                              15 µg                                   4%
Niacin                               1.610 mg                             10%
Pantothenic acid                 0.805 mg                             16%
Pyridoxine                          0.249 mg                             19%
Riboflavin                          0.060 mg                              4.5%
Thiamin                            0.050 mg                              4%
Vitamin A                         149 IU                                   5%

Electrolytes

Sodium                            1 mg
Potassium                        696 mg                                 16%


                        
Minerals 

Calcium                          64 mg                                 6.5%
Copper                           0.362 mg                            40%
Iron                               0.90 mg                             
Magnesium                     54 mg 





थोडक्यात काय तर खजूर हे एक Power House म्हणता येईल . 
  1. खजूर बृहण  करत असल्यामुळे क्षय म्हणजेच , झीज होत असेल (अतिश्रमामुळे, रस-रक्तादि धातू क्षीण असल्याने ) तर खजूर लाभदायी ठरतो . 
  2. खजूर श्रमहर आहे त्यामुळे थकवा आला असता , बराच काळ कुपोषण होत असेल तर खजूर उत्तम . (त्यामुळे प्रवासात,trecking -hiking करताना, श्रमाचे काम करताना जवळ खजूर असावेत .)
  3. दम,खोकला किंवा T.B . च्या रुग्णांना थोडा थोडा खजूर द्यावा . 
  4. फायबर चे प्रमाण अधिक असल्याने मलावरोध (Constipation ) होत असेल तर खजूर जरूर खावेत . 
  5. खजुरामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्ताल्पता (Anaemia ) असल्यास आहारात खजूर असावेत . 
  6. शुक्रधातु  वाढविण्यासाठी खजूर लोणी व दुधाबरोबर घ्यावा . ( स्त्री व पुरुष दोघांनीही )
  7. तापामध्ये अशक्तपणा जाणवत असेल तर ताकद येण्यासाठी खजूर द्यावा . 
  8. लहान बाळांना  खारीक/खजूर  दुधात उगाळून द्यावा . साप्तधातुच्या पोषणासाठी लाभदायक ठरते 
  9. १ ते १० वर्षापर्यंत मुलांना साधारण पचनशक्ती प्रमाणे रोज सकाळी अर्धी किवा एक खारीक अथवा खजूर द्यावे . 
  10. बृहण  , तर्पण, रसादि  धातुवर्धक असल्यामुळे  बाळंतिणीस खजूर द्यावा,  
  11. वजन कमी करण्याची इच्छा  असलेल्या  व्यक्तींनी तसेच Diabetes असलेल्या व्यक्तींनी खजूर नियंत्रित प्रमाणात खावा . 
  12. सध्या पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातसुद्धा Lactose Intolerence च्या केसेस दिसून येत आहेत . दुधातील Lactose शर्करेची Allergy असल्याने , दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने  हा त्रास होतो . अशा वेळी सप्त धातुवर्धन आणि शरीर पोषणासाठी खजूर खूपच उपयोगी आहे . 
टीप 
  •  खजूर लाडू रेसिपी -  खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे. नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात खसखस घालून काही सेकंद परतावे. त्यात भरडसर वाटलेले बदाम, खोबरे आणि खजूर घालून मंद आचेवर गरम करावे.
               नीट मिक्स झाले कि थाळीमध्ये काढून ठेवावे. हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावून मिश्रण कोमटसर असतानाच लाडू बांधावेत. 
  • स्वतःच्या आवडीनुसार मिश्रण केले तरी चालेल . यासाठी येथे प्रमाण मुद्धामच दिलेले नाही . 
  • ह्याच साहित्याच्या वड्या  किंवा रोल सुद्धा करू शकता . 
  • मोठ्यांना आणि मुलांना डब्यात मधल्या वेळेचे खाणे म्हणून Snack bar / protein bars देण्याऐवजी हे लाडू अधिक फायदेशीर ठरतील . 

Thursday, 16 July 2015

स्वास्थ्यवेद - पावसाळ्यातील पदार्थ ( २ ) - मांसरस


मांसरस 


मांसरस म्हणजे अगदी  सोप्या भाषेत सांगायचे तर मांसापासून बनवलेले अर्थात  Meat soup . 
(अहो असे दचकू नका … हो  हो .. आयुर्वेदातसुद्धा  मांसाहाराचा  चिकित्सेसाठी उल्लेख  आहे  हो )
या मांसरसाचे ३ प्रकार आहेत . 
  •     घन      -  १भाग मांस तर २ भाग पाणी ( १:२ )
  • मध्यम     -  १भाग मांस तर ३ भाग पाणी ( १:३ )
  •    तनु        -  १ भाग मांस तर ४ भाग पाणी ( १:४ )
म्हणजेच पाणी आणि मांस यांच्या प्रमाणानुसार हे प्रकार आहेत. पाण्याच्या प्रमाणानुसार अर्थात जितका पातळ मांसरस तितका पचायला अधिक सोपा असतो. सध्याच्या भाषेत सांगायचे तर मांसरस हा Clear  Soup  चा  प्रकार आहे.



साहित्य 

मांस       - १ भाग ( हे मांस सामान्यतः कोंबडी अथवा बकरीचे व हाडांसहित घ्यावे)
पाणी      -  २/३/४ पट 
हळद 
आले - लसूण वाटण 
जिरेपूड 
मिरेपूड 
सुंठ पूड 
पिंपळी चूर्ण 
हिंग 
मीठ 

तूप


कृती 


  1. मांसाला हळद आले-लसूण वाटण लावून १/२ तास ठेवावे . 
  2. कुकर मध्ये आवश्यक त्या प्रमाणात , म्हणजेच २/३/४ पट  पाणी , मांस घेऊन पूर्ण शिजेपर्यंत ( हाडे मऊ  होऊन आतील मज्जाभाग पाण्यात विरघळेपर्यंत ) शिजवावे . 
  3. शिजल्यावर त्यातील पाणी व मांस वेगळे करून घ्यावेत . (अकृत मांसरस )
  4. भांड्यात तूप गरम करून त्यात लसून पाकळी ठेचून हिंग घालून फोडणी करावी . 
  5. मांसरस त्यामध्ये घालून जिरेपूड मिरेपूड सुंठ पिंपळी याचे चूर्ण घालावे  आणि उकळी येऊ द्यावी . 
  6. चवीपुरते मीठ घालावे . 
मांसरस तयार आहे . 


टीप 

  1. वरील कृतीपैकी तिसऱ्या  पायरीपर्यंत तयार केल्यास त्याला 'अकृत मांसरस' (फोडणी न देता) म्हणतात . हा असाच पिता येतो व तुलनेने पचायला हलका असतो . 
  2. ५-६ पायरी पर्यंत तयार केल्यास त्याला 'कृत मांसरस' म्हणतात 
  3. हाच मांसरस  आधी मांसाचे  तुकडे तूप - हिंग, जिरे, मिरे आदि  मसाल्यावर भाजून घेऊन  मग पाणी  घालून सुद्धा बनवता येतो . 
  4. चार पट  पाणी घालून बनवताना जर मांसरस खूप पातळ वाटत असेल तर मांसासकट  उकळी काढून आटवून दाट करावा . 
  5. वेसवार - यामध्ये बोनलेस मांस वापरून १ ते ३ पायऱ्या  कराव्यात व नंतर हे मांस मिक्सर मध्ये वाटून ४-५ कृती करावी . 
गुण 
            मांसरस हा वात-पित्तनाशक , बलदायी,थकवा दूर करणारा , तृप्ती देणारा, शुक्र धातुला वाढविणारा आहे . त्यामुळे उरःक्षत  , तापातून उठेलेले रोगी,fracture - dislocations चा त्रास असल्यास, जुनाट तापामध्ये शक्ती येण्यासाठी, पचनशक्ती कमी झाली असेल तर, थकवा आला असेल तर,विस्मरणाचा त्रास होत असेल तर मांसरस आहारात वापरावा . 
            तसेच वेसवारसुद्धा मांसरसाप्रमाणेच असतो, पण मांसाचा वापर असल्याने पचायला अधिक जड पण बलदायी,स्निग्ध, वातरोगनाशक  असतो.



Wednesday, 1 July 2015

स्वास्थ्यवेद - पावसाळ्यातील पदार्थ १ - कुळीथाचे कढण

   कुळीथाचे कढण / कळण 
आयुर्वेदोक्त नाव ( कुलत्थ यूष )


साहित्य 

कुळीथ          -    १/४ वाटी 
पाणी             -    ४ वाट्या
फोडणीसाठी  साहित्य 
तूप                    -   २ चमचे 
लसूण  पाकळी   -    १ 
हिंग 
जिरे 
मीठ  (चवीनुसार)

कृती 

  1. कुळीथ आदल्या रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी कुकरला ३-४ शिट्या होईपर्यंत शिजवावे 
  2. यातील शिजलेले कुळीथ वेगळे काढून पाणी कढण बनवण्यासाठी वापरावे 
  3. तूप,जिरे,हिंग, व लसूण यांची फोडणी या पाण्याला द्यावी. 
  4. चवीनुसार मीठ घालावे. 
  5. आवडत असल्यास फोडणीत कढीपत्ता घालू शकतो.
कुळीथाचे कढण तयार आहे.


टीप 
  1. हे कढण  करताना  त्या पाण्यात शिजलेले कुळीथ घोटून घातले व तिखट-हळद ,गोडा  मसाला, गूळ , नारळ घालून कुळीथाचे सार करता येईल . हे सार  भाताबरोबर खाण्यास छान लागते . 
  2. आयुर्वेदिक गुण - हे कढण  कफ-वात शामक ,उष्ण गुणाचे आणि पित्तकारक असते. वातव्याधी ,आमवात ,किडनी स्टोन या सारख्या आजारात तसेच वजन कमी करणाऱ्या माणसांसाठी आहाराचा भाग म्हणून  हे कढण वापरता येते . 
  3. मात्र गर्भिणी , क्षयरोगी ,  आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी कुळीथ टाळावे . 

स्वास्थ्यवेद -

स्वास्थ्यवेद 

 आज जागतिक डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने एका अल्पशा विश्रांतीनंतर समन्वय  पुन्हा आपल्या  भेटीला येत आहे. यामध्ये नेहमीच्या लेख मालिके बरोबरच ' स्वास्थ्यवेद ' हि संकल्पना घेऊन येत आहोत. या मध्ये आपण सहज-सोपे , "Healthy " तरीही चवीला रुचकर असे पदार्थ पाहणार आहोत . 
तुम्हाला या पाककृती आवडतील ही  आशा आहे