Saturday, 9 April 2022

आपले सण आणि आरोग्य - राम नवमी.

Picture courtesy -ReSanskrit

             आज राम नवमी. राम नवमीच्या निमित्ताने आज मी तुम्हाला आजचा प्रसाद म्हणजेच सुंठवडा, याबद्दल थोडी माहिती देणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढीला प्रसाद म्हणून दाखवल्या जाणाऱ्या कडुनिंबाच्या चटणीचे आयुर्वेदीय महत्त्व आपण जाणून घेतले होते. गेले 10 दिवस ही चटणी थोडी थोडी खाल्ल्यानंतर आता हळूहळू आपल्याला वाढत जाणाऱ्या उन्हाची चिकित्सा करायची आहे. ती कशी , तर अशीच, नेहमीप्रमाणे…. औषधे, "औषध" म्हणून न घेता सहज-सोप्या पद्धतीने घेतली जावी व रोजच्या दगदगीच्या जीवनात आजारांचा मुकाबला करण्याची ताकद यावी म्हणून बऱ्याचदा सण आणि आरोग्य यांचा मेळ आपल्या संस्कृतीत घातलेला आहेच. त्याचा फायदा घ्यायचा.

              तर, आज आहे राम नवमी आणि पुढे 09 दिवसांनी हनुमान जयंती येईल. या दोन्ही दिवशी प्रसाद म्हणून सुंठवडा देण्याची पद्धत आहे. याचे कारण सध्या सुरू असलेला वसंत ऋतू. या काळात शरीरामध्ये साचलेला कफ उष्णतेमुळे पातळ होऊन त्याचे स्राव वाढतात आणि वाढलेली उष्णता पित्तही वाढवते. त्यामुळे सर्दी-खोकला, कणकण (ज्याला मग पटकन viral चे लेबल चिकटवले जाते.), रात्रीच्या वेळी खोकल्याची ढास लागणे, अजीर्ण , अपचन,ऍसिडिटी, मळमळ होणे, भूक न लागणे असे आजार होताना दिसतात. काही जणांना त्वचेचे आजार होतानाही दिसून येतात. या सगळ्या कफ-पित्ताच्या आजारांसाठी हा सुंठवडा एक उत्तम औषध आहे.

               आता हा सुंठवडा बनवायचा कसा? तर,

  1. ताजी सुंठ पूड - 30 ग्रॅम, विकतचे किंवा घरी बनवलेली, पण त्याचा सुगंध यायला हवा.

  2. सुके खोबरे - दीड ते दोन गोटे (आकारानुसार.) खोबरे किसून , तव्यावर शेकवून घ्यावे किंवा उन्हात कडकडीत वाळवून चुरून घ्या.

  3. खडीसाखर - पाव किलो, दळून घ्यावी. (साध्या साखरेपेक्षा खडीसाखर औषधी असते.)

  4. धणेपूड - 100 ग्रॅम

  5. ओवापूड - 50ग्रॅम

  6. वेलचीपूड - साधारण वीसेक वेलच्यांचे दाणे घ्यावे.

हे सर्व साहित्य नीट मिसळून , हवाबंद डब्यात भरून ठेवावे आणि घरातील सर्वांनी पुढील 10-15 दिवस रॉन सेवन करावे.

यापैकी,

  1. सुंठ - लघु गुणाची, उष्ण , मधुर विपाकि पचायला हलकी, आमपाचक, मलातील जलांश शोषणारी (ग्राही), मात्र मलबद्धता न करणारी, कफ-वात नाशक, पित्तशोषक अशी आहे.

  2. सुके खोबरे - हे मधुर रस-विपाकी,वात-पित्तशामक, थंड , गुरु (पचायला जड), वृष्य(शुक्रधातु वर्धक), पोषक आणि केश्य (केसांसाठी उत्तम) आहेत.

  3. खडीसाखर - ही मधुर रस-विपाकी ,रुचिकर, वात आणि पित्तदोषाचे शमन करणारी, रक्ताचे आजार कमी करते. दाह कमी करणारी आहे. साखर शरीराला बळ  देते , तृप्तता देते. कारण मधुर रस सप्तधातूंना बळ देणारा आहे.

  4. धणे - ज्वर,दाह,तहान कमी करणारे आहेत, चवीला कडू, वात-कफदोषनाशक आहेत.

  5. ओवा - ओवा गुणाने तीक्ष्ण, उष्ण, पचायला हलका पण रुक्ष असतो. चवीला कडसर-तिखट आणि तिखट विपाकि आहे. यामुळे ओव्याने पित्त वाढते पण कफ आणि वाताचा नाश होतो. कफवाताच्या रोगांवर ओवा प्रामुख्याने वापरला जातो. तसेच ओवा जंत(कृमी)नाशक आहे. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी सुंठवडा करताना वैद्यांना विचारून वापरावा.

  6. वेलची - कटु-मधुर रसाची, कटु विपाकि , लघु-रुक्ष गुणांची वेलची जंतुघ्न , सुगंधी, पित्त-कफावरील उत्तम औषध आहे. श्वासन्मार्गाचे रोग, मळमळ-उलटी कमी करते.

आता हे सगळे गुण वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की गुढीपाडव्याच्या दिवशी जे शरीर शुद्धीचे काम आपण सुरू केले होते, त्याचीच ही पुढची पायरी आहे. येणाऱ्या वसंत ऋतूच्या संपूर्ण काळात हा सुंठवडा रोज थोडा -थोडा खाल्ला तर बऱ्याचश्या आजारांना अटकाव व्हायला मदत होईल. आणि हो , हा सुंठवडा खाताना चघळून चघळून खायचा आहे बरं. म्हणजे तो नीट शोषला जाईल.

               सण आणि आरोग्य यांचा किती सूक्ष्म दृष्टीने शास्त्रीय विचार केला आहे हे जाणून घेतल्यावर ते थोतांड किंवा अंधश्रद्धा वाटणार नाहीत, होय ना?


मूळ लेखिका- 

वै. स्निग्धा चुरी-वर्तक.

समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.

बोरीवली, मुंबई.

9870690689

(कृपया लेख फॉरवर्ड करताना मूळ लेखिकेच्या नावसाहित फॉरवर्ड करावा.आपल्या या छोट्याशा नैतिक कृतीने त्यांनी लिखाणासाठी केलेले श्रम सार्थकी लागतात.

धन्यवाद.

सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 10 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2022/04/blog-post.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत.)