Sunday, 1 September 2019

गणेशोत्सव, उकडीचे मोदक आणि आयुर्वेद


गणेशोत्सव, उकडीचे मोदक आणि आयुर्वेद


                                                                छायाचित्र सौजन्य सौ. मधुरा पोडूवाल


घरी गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरु होती. अनया आजीला म्हणाली, "आजी गं, यावर्षीही नैवेद्याला उकडीचेच मोदक करूया. मला,नीलला, आरवला,श्रीयाला सगळ्यांनाच आवडतात, मऊ मऊ मोदक आणि गणपती बाप्पालासुद्धा…. पण आजी बाप्पाला मोदकच का गं आवडतात?"
आजी म्हणाली, " एकदा काय झालं,गणेशाचे परशुरामाशी युद्ध झाले आणि तेव्हा बाप्पाचा एक दात तुटला. या तुटलेल्या दातामुळे त्यांना काही खाता येईना म्हणून मग बाप्पासाठी मऊ मोदक बनवण्यात आला. हा पदार्थ खाल्ल्यावर गणरायाला त्याची चव खूप आवडली आणि ते आनंदित झाले.म्हणून या पदार्थाला मोद(आनंद ) देणारा असा, मोदक असे नाव मिळाले."
"पण मग आज्जी,मोदकच का? श्रीखंड, पुरणपोळी किंवा केक का नाही?"
"त्याचं काय आहे…" एवढा वेळ त्या दोघींच्या गप्पा ऐकत असलेली स्निग्धा मावशी म्हणाली, "उकडीचे मोदक बनवण्यासाठी वापरतात, ओलं खोबरं, गूळ, जायफळाची आणि वेलचीची पूड,केशर आणि तांदळाचे पीठ. यातील तांदळाच्या पिठीची छान,मऊ उकड बनवून बाहेरचे आवरण बनवतात. तांदुळ मुळात पचण्यास हलके, त्यात उकड काढताना झालेल्या अग्निसंस्कारामुळे(उकड काढण्याच्या प्रक्रियेत पिठावर होणारी अग्नीची क्रिया) ते अधिक पथ्यकर बनते. शिवाय तांदुळ मधुर रसात्मक असून शक्तिवर्धन करणारे आहे, ओलं खोबरं चवीला गोड, गुरु गुणाचे(पचावयास जड), स्निग्ध, पौष्टिक आणि वात व पित्त कमी करणारे आहे तसेच शरीरातील दाह, तहान कमी करणारे, बल देणारे, केसांसाठी हितकर, कान्ति वाढवणारे आहे. त्यासोबत वापरला जाणारा गुळ हा सुद्धा उत्तम कफ-वातशामक,गुरु गुणाचा(पचायला जड), अग्निवर्धक, पौष्टिक, उष्ण, श्रम-थकवा कमी करणारा आहे. गूळ जेवढा जुना तेवढा वापरायला चांगला. वेलची आणि जायफळ हे फक्त सुगंधासाठी किंवा स्वादासाठीच नाही तर पचनासाठी, अजीर्ण, पित्त, सर्दी-पडसे यासारख्या आजारांवर गुणकारी आहे, तसेच पाचक गुणांचे असल्याने गूळ-खोबऱ्याचे सारण पचवण्यासही मदत करते. त्यात घातलेले केशरसुद्धा वातशामक, दीपक(पचनशक्ती वाढवणारे),
असा हा मोदक पुन्हा उकडल्यामुळे अजून चवदार, पौष्टिक आणि पचण्यास हलका बनतो."
"आणि मावशी ह्या गरमागरम मोदकाची शेंडी मोडून त्यात तूपाची धार धरुन खायला कित्ती मज्जा येते गं…"
"हो तर, आणि अनया, तूपसुद्धा विशेषतः गाईच्या दुधाचे लोण्यापासून कढवलेले तूप हे बुद्धि, कांति, स्मृति वाढवणारे, बल्य, वात-पित्त कमी करणारे, थकवा घालवणारे आहे. जठराग्नि वाढवून, वीर्यवर्धक, दृष्टिला हितकर, शरीराला स्थैर्य, बळकटी देणारे असं आहे."
"काय अनया, कसल्या गप्पा चालल्यात?" , आईने आत येत विचारले.
"अगं आई, स्निग्धामावशी सांगत होती आयुर्वेदात उकडीच्या मोदकाबद्दल काय सांगितलं आहे."

"अच्छा, काय सांगितलंय मग?"

मग स्निग्धा थोडक्यात सांगू लागली, "श्रावण-भाद्रपद महिन्याचा काळ म्हणजे वर्षा ऋतू. या काळात पावसामुळे गारवा वाढलेला असतो.शरीरात वात दोषाचा प्रकोप झाला असल्याने रुक्षता,क्लम(थकवा), वाताचे आजार वाढलेले असतात.अश्या वेळी येणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक केले जातात. हे मोदक चवीला गोड असल्याने पौष्टिक, उत्साह वाढवणारे, शुक्रल, आणि वातशामक, अस्थि व मांस धातूला बल देतात. मनाला आनंद देणारे आहेत. मुख्य म्हणजे वातावरणातील बदलांमुळे बिघडलेल्या शारिरीक संतुलनाचे, आपल्या स्निग्ध,किंचित् उष्ण, वातघ्न व कफकर गुणांनी नियमन करतात."
मग आजी म्हणाली, " उकडीच्या मोदकाप्रमाणे तळणीचे मोदक हे कणकेपासून बनवतात. यात ओले खोबरे-गूळ /ओले खोबरे-साखर / सुके खोबरे-पिठीसाखर असे सारण असते. म्हणजे सुकं खोबरं किसून ते थोडंसं भाजून घेऊन त्यात पिठी साखर, भाजलेली खसखस, चारोळी, सुका मेवा, वेलदोडा पूड वा पंचखाद्य घालून सारण तयार करायचं आणि कणिक भिजवून त्याची लाटी करून त्यात हे सारण भरून मोदक करायचे आणि तेलात वा तुपात तळायचे."
"अरे वाह, मग या गणपतीत आपण छोटा भीम सारखी मोदक खाण्याची स्पर्धा ठेवू,११-२१ किंवा ५१????"तेवढ्यात धावत आलेल्या नीलने सूचना केली.
"अहो छोटे भीम,मोदक पचायला जड असतात बरं, आणि आपण काही बाप्पा नाही एवढे मोदक एकाच वेळी फस्त करायला.त्यामुळे पोटाची काळजी घेऊन आवडतील तेवढे मोदक खा,पैज लावून नको."
हे ऐकून सगळी वानरसेना एकसाथ ओरडली…
"गणपति बाप्पा मोरया…."

लेखिका-
वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक.
समन्वय आयुर्वेदिक व पंचकर्म क्लिनिक.
बोरीवली, मुंबई.
9870690689
प्रस्तुत लेख शेअर करायचा असल्यास लेखिकेचे नाव पत्त्यासहित शेअर केल्यास हरकत नाही.