आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, हिंदू नववर्षातील पहिला दिवस. मावळत्या सूर्याबरोबर गतवर्षाला निरोप देताना नविन वर्षाचे स्वागत उगवत्या सूर्याबरोबर करण्यासाठी एक नवीन परिपाठ,विचार, आपणा सर्वांसमोर मांडायला मला आवडेल. आणि हा विचार आहे आयुर्वेदीय जीवनशैली म्हणजेच दिनचर्येचा.
दिनचर्या हा आयुर्वेदाच्या स्वस्थवृत्त विचाराचा एक महत्वाचा भाग आहे. आजारी नसतानाही आपल्या आरोग्याच्या जपणुकीसाठी जे नियमित उपाय आपण करतो त्यांना स्वस्थवृत्त असे म्हणतात. तुकोबा म्हणतात ‘देह हे देवाचे मंदिर आहे आणि आत जो आत्मा आहे तो परमेश्वरस्वरूप आहे.’ मग या मंदिराची स्वच्छता, पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपण काय करतो? ज्याप्रमाणे घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण रोज केरवारे , सडासंमार्जन करतो तसेच शरीराच्या-मनाच्या स्वच्छतेसाठी दिनचर्या पाळणे आवश्यक आहे. सगळयात आधी दिनचर्या म्हणजे काय आणि हे सर्व केल्याने काय फायदे होतात ते आपण समजून घेऊ.
- सकाळी उठणे - सकाळी उठण्यासाठी ब्राह्म मुहूर्ताचा काळ प्रशस्त मानला आहे. या काळात वात दोष प्रबळ असतो त्यामुळे शौच- मलमूत्र विसर्जन सहज आणि योग्य होते. उठायला उशीर झाला किंवा रोज उठण्याचा वेळा वेगवेगळ्या असतील तर पोटाच्या/मलविसर्जनाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दिसतात. तसेच मल-मूत्र प्रवृत्ती कुठल्याही बाह्य साधनाशिवाय ( औषधे-गरम पाणी) व्हायला हवी. त्यामुळे सकाळी ४ ते ६ या काळातच आपली उठण्याची वेळ असावी.
- दंतधावन विधी - दंतधावन म्हणजे दात घासणे. दात घासणे व मंजन याविषयी यापूर्वीच सविस्तर लेखन झालेले आहे. त्यामुळे विस्तार टाळण्यासाठी इथे पुन्हा ते सर्व सांगत नाही पण सारांशाने सांगायचे झाले तर दात घासण्याचे दातवण किंवा मंजन तिक्त, कटु किंवा कषाय रसात्मक असावे. दंतधावनाविषयी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंक वर दिलेला लेख वाचावा.
- अंजन - त्यानंतर दोन्ही डोळ्यांत अंजन वापरावे. अंजन केल्याने डोळ्यांतील जास्तीचा कफ कमी होतो.
- नस्य आणि गंडूष - नस्य म्हणजे दोन्ही नाकपुड्यांत औषधी तेलाचे थेंब टाकणे. आणि गंडुष म्हणजे औषधी काढे-तेलाच्या गुळण्या.यामुळे शरीरात साचलेला अतिरिक्त कफ कमी होतो. हे सगळे उपाय कफ कमी करण्यासाठी केले जातात कारण मस्तक आणि सर्व शिरस्थ अवयव कफप्रधान आहेत. त्यामुळे अतिरिक्त कफामुळे या अवयवांना होणारा त्रास कमी करण्यासाठी या कफाची शोधन करणे गरजेचे असते.
- यानंतर करायचे कार्य म्हणजे स्नेहाभ्यंग अर्थात सर्वांगाला तेलाने मालिश करणे (विशेषतः डोक्याला, कानांना, पावलांना) . यासाठी कोमट केलेले तिळाचे, खोबरेल तेल अथवा आजारानुरुप औषधीसिद्ध तेल वापरले जाते.
याचे लाभ - थकवा, वार्धक्य घालविणारे. डोळ्यांची ताकद वाढवणारे,पुष्टीदायी, आयुष्य देणारे, झोप शांत करणारे. मात्र अजीर्णाचा त्रास असणारे, आम विकाराने त्रस्त लोकांनी अभ्यंग टाळावे.
- व्यायाम - तेलाने मालिश केल्यावर लवचिक झालेल्या शरीराला पिळदार बनवण्यासाठी त्यानंतर व्यायाम करावा. यामुळे व्यायाम करताना मांसपेशी जखडणे, उसण भरणे कमी होते. दररोज व्यायाम केल्याने शरीराची श्रम करण्याची क्षमता (स्टॅमिना हो…) वाढते. , अग्नि प्रदीप्त होतो, अतिरिक्त मेद कमी होतो आणि अवयव पिळदार बनतात.
- स्नान - व्यायामानंतर शरीराला उटणे लावून कोमट पाण्याने स्नान करावे यामुळे शरीराला हलकेपणा येतो, मन प्रसन्न होते. मात्र केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये.
- ध्यान - स्नान केल्यानंतर ध्यानधारणा केल्याने मनावरील ताण कमी होतो व मन शांत होते, जे आपल्याला या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अत्यंत गरजेचे आहे. यानंतर आपल्या नित्याचे काम, व्यवसाय याला सुरुवात करावी.
( क्रमशः)
टीप - पुढील लेखात आपण दिनाचर्येचा उर्वरित भाग म्हणजेच दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, आहारातील पाण्याचे पाण्याचे प्रमाण, निद्रा या उर्वरित भागाविषयी माहिती घेऊ.
सविस्तर माहितीपूर्ण लेख. पुढील भागाविषयी ऊत्सुकता आहे.
ReplyDeleteMahitipar lekh. Waiting for next part.
ReplyDelete