Wednesday, 31 July 2019

स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन



        स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन 
              (वर्ल्ड ब्रेअस्टफीडिंग डे - जागतिक स्तनपान सप्ताह २०१९)








               आई व बाळाचे नाते यावर सर्व भाषा-संस्कृतीमध्ये भरभरुन लिहिले- बोलले जाते.आई आणि बाळाच्या नात्याचा बांध हा स्तनपानामुळेही जास्त घट्ट होताना दिसतो . आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसेच मानसिक विकासाच्या दृष्टिकोनातून आईचे दूध व स्तनपान, आई व बाळ दोघांसाठी महत्वाचे आहे.
             हे महत्व जगातील सर्व मातांपर्यंत पोहोचावे आणि जगभरातील प्रत्येक नवीन मातेला, मग तिचा आर्थिक स्तर-सामाजिक स्तर कुठलाही असो,तिला आपल्या बाळाला स्तनपान देता यावे यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या पहिल्या आठवडयामध्ये १९९१ सालापासून ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ साजरा केला जातो. स्तनदा माता व त्यांचे कुटुंबिय यांना स्तनपानाबाबत शास्त्रशुद्ध माहिती मिळून स्तनपानासाठी नवीन मातेला जास्तीत जास्त आधार मिळावा हाच यामागचा उद्देश आहे.
             याचसाठी  मागील दोन वर्षांपासून समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक सदर ब्लॉगद्वारे  लेखमाला प्रसारित करत आहोत. मागील दोन वर्षांत आपण प्रेमस्वरूप आई.... वात्सल्यरूप आई... या लेखामालेत स्तनपान , आहारशास्त्रीय महत्व (Nutritive value ), स्तनपानाची योग्य पद्धत , स्तनपानसाठी अर्ह-अनर्ह (Indications -Contraindications ), ब्रेस्ट क्रॉल पद्धत यांची माहिती पाहिली . यावर्षी आपण आयुर्वेदीय दृष्टिकोनातून स्तनपान कसे असावे हे पाहणार आहोत. 
  1. धात्री  -  आयुर्वेदीय संहितांमध्ये सगळ्यात आधी धात्रीचे वर्णन आहे. धात्री म्हणजे बाळाची आई किंवा आईच्या अभावात बाळाला दूध पाजणारी स्त्री. पूर्वीच्या काळी  तिला दूधआई म्हणत. हल्ली याच प्रकारची संकल्पना ब्रेस्टमिल्क बँकच्या स्वरूपात पाहायला मिळते.  दोन्ही संकल्पनांमध्ये आईचे दूध मिळत नसल्यास बाळाला किमान स्त्रीदुग्ध मिळावे याचा प्रयत्न दिसतो. 
                       यासाठी सगळ्यात आधी बाळाच्या आईने/धात्रीने  कसे राहावे , हे सांगितले आहे. स्त्रीने आहार-विहाराचे पथ्य पाळावे. कारण चुकीचा आहार- विहार करणाऱ्या स्त्रीचे वातादि दोष कुपित होऊन स्तन्य दूषित करतात.  ज्यामुळे बालकांमध्ये काही आजार होताना दिसतात.याशिवाय धात्री ही मध्यमवयीन (साधारणतः २० ते ४५ वयाची), अतिकृश किंवा अतिस्थूल नसावी, अव्यसनी, शुचिर्भूत (स्वच्छतेचे नियम पाळणारी), अरोगा (निरोगी), वत्सल,आनंदी  व प्रेमळ असावी. या सगळ्या नियमांकडे नीट लक्ष दिल्यास लक्षात येईल कि यामध्ये स्वच्छता, शारिरीक  व मानसिक स्वास्थ्य यावर जास्त भर दिला आहे.  
  2. स्तन्यानाश (दूध कमी होणे) कारणे  - क्रोध, शोक, अवात्सल्य(lack of love for child ) , कुपोषण ही कारणे  दूधाचे स्रवण कमी करणारी ठरू शकतात असे आचार्य सांगतात . आधुनिक संशोधनाद्वारे सुद्धा  हे  सिद्ध  झाले आहे की Oxytocin आणि prolactin  ही  संप्रेरके आणि स्तनपानाची मुख्य प्रक्रिया (let down  reflex ) यामध्ये मातेच्या भावना महत्त्वाच्या असतात.तसेच नकारात्मक-दुःख्खी  विचार करणाऱ्या स्त्रियांच्या स्तन्यातील IgA  या इम्युनोग्लोब्युलिनचे प्रमाण कमी असते. यामुळे आयुर्वेदीय संहितांमधील दावे योग्य असल्याचेच सिद्ध होते. 
  3. मातेने करावयाचे पथ्य - यासाठी मातेने पुरेशी विश्रांती घ्यावी. मन प्रसन्नचित्त ठेवावे.रोज संपूर्ण अंगाला मालिश करून शेक घ्यावा.  आहारात गहू,ज्वारी, साठेसाळी किंवा तांदळाची उकड काढून केलेली भाकरी, शिंगाड्याचे पीठ,खोबरे (ओले किंवा सुके), अहळीव , तीळ, दुधी भोपळा , पडवळ, शिराळे ,हिरवे मूग, मुगाची डाळ, शेवगा,सुरण, कच्ची केळी , मसाल्याच्या पदार्थांत लसूण , जीरे ,धणे, काळे मिरे,दालचिनी,खसखस,शेपा  , खारीक ,खजूर, अक्रोड,बदाम  यासारखा सुकामेवा , शतावरी ,ज्येष्ठमध, विदारीकंद  यासारखी द्रव्ये आहारातमोठ्या प्रमाणात वापरावी. 


(क्रमशः )

               

No comments:

Post a Comment