Wednesday, 29 July 2020

होम आयसोलेशन / घरीच स्वविलगीकरण कसे करावे? - भाग ३




केअर गिव्हरनी सुद्धा विलगीकरण करावे का?

  • भारतात बऱ्याचदा कुटुंबीयच आजारी व्यक्तीची काळजी घेतात. पण हल्ली परिस्थितीमुळे अनेक लोक एकटे राहत असतात. अश्या वेळी  हो केअर गिव्हरची भूमिका पार पडू शकते. 

  • हे केअर गिव्हर कोणाताही शारीरिक त्रास नसलेले असावेत. 

  • त्यांनी काळजी घेताना किंवा रुग्णाला सामान देताना कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घ्यावी. 

  • जर रुग्णाच्या खोलीत जायचेच असेल तर अश्या वेळी सोशल डिस्टंसिंग ,मास्कचे बंधन तर पाळावेच व त्याचबरोबर खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. 

  • तरीही जर लक्षणे दिसली किंवा रुग्णाच्या आयसोलेशनचा कालावधी संपल्यावर खबरदारी म्हणून केअर गिव्हरनी वेगळे राहिल्यास फायदा होईल. 

 

होम आयसोलेशन (स्वविलगीकरण) आणि मानसिक स्वास्थ्य - 


१. मन रमवण्याचे अनेक उपाय आतापर्यंत अनेकांनी सांगितले आहेत त्यामुळे मी काही उपाय सांगणार नाही.कोणाला माहिती हवी असल्यास लेखाच्या शेवटी दिलेल्या क्रमांकावर मेसेज करू शकता. पण एका मुद्द्यावर पुन्हा जोर देऊन सांगेन की स्वविलगीकरणात असलेले रुग्ण आधीच आजाराविषयी वेगवेगळी माहिती वाचून घाबरलेले असतात त्यात हा एकटेपणा जाचक वाटू शकतो. पण तरीही तो महत्त्वाचा आहे. भावनेला बळी  पडू हे बंधन तोडू नका. कुटुंबीयांनीसुद्धा प्रत्यक्ष भेटण्याचा मोह टाळावा.


२. गरज वाटल्यास समुपदेशकाची मदत घ्यावी. आम्ही वैद्यासुद्धा तुमच्या/या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत.

COVID १९ साठी ट्रीटमेंट आणि आयुर्वेद - 


1.हा आम्हा वैद्यांना कायम विचारला जाणारा प्रश्न आहे. होम आयसोलेशन मधील व्यक्ती तर याविषयी विचारणा करतातच.


2.आयुष मंत्रालय याविषयावर पहिल्या दिवसापासून आरोग्य मंत्रालय व केंद्र सरकार यांच्याशी समन्वय साधून काम करत आहे.


3. सुरुवातीला आयुर्वेदीय वैद्यांना करोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी व्याधिक्षमत्त्व वर्धक उपायांची (Immunity booster measures) परवानगी मिळाली होती. यामध्ये रोज करायच्या 13 उपायांबरोबरच दिनचर्या/ऋतुचर्येचा म्हणजेच ‘आपले आरोग्य कायम राखण्यासाठी दिनक्रम कसा असावा’ याविषयी माहिती दिली होती. त्यानुसार बऱ्याच वैद्यांनी या उपक्रमांचा जनसामान्यांमध्ये प्रसार केला.वैयक्तिक स्तरावर सांगायचे तर  समन्वय आयुर्वेदातर्फे आम्ही, आयुष मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली सूची अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.  ज्यांनी  या उपक्रमांबद्दल स्वारस्य दाखवले  त्यांना दिनचर्या-ऋतुचर्येविषयी मार्गदर्शन केले होते, (डाएट अँड लाईफस्टाईल करेक्शन )

 

4. त्यानंतर  आयुष मंत्रालयाने,उपचाराच्या दुसऱ्या टप्प्यात क्वारंटाईन तसेच होम आयसोलेशन मध्ये असलेल्या अलाक्षणिक तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या गेल्या. केरळ,दिल्ली,गुजरात येथे यशस्वीरीत्या या ट्रायल्स घेतल्या गेल्या.नुसत्या 100- 200 नाही तर या  प्रत्येक ठिकाणी 5000-6000 पेशंट्सवर औषधोपचार केले गेले होते. त्यांनतर उपचाराची मार्गदर्शक तत्त्वे (Treatment Guidelines for asymptomatic and mild symptomatic cases) जाहीर केली.आता या तत्त्वांनुसार भारतभरातील आणि महाराष्ट्रातीलसुद्धा अनेक वैद्य आपापल्या ठिकाणी उपरोक्त वर्गवारीतील रुग्णांना यशस्वीरित्या चिकित्सा देत आहेत.

 

5. आयुर्वेद शास्त्रानुसार औषधोपचार करताना ऍलोपॅथीच्याच पद्धतीने केले जात नाही.उदा. दम  लागत असेल तर अमुकच औषध असे नाही. रुग्णाची प्रकृती , व्याधीची प्रकृती(लक्षणांनुसार) यानुसार दम  लागणे या लक्षणामध्येसुद्धा व्यक्तीनुसार वेगळे दोष असू शकतात.याचे कारण आयुर्वेदातील निदानपंचक पद्धती (pathogenesis & diagnosis). या सगळ्यांचा विचार करूनच हे प्रोटोकॉल्स आहेत. 


६. तसेच याहीपुढे जाऊन आयुर्वेदशास्त्राने रसायनचिकित्सा सांगितली आहे. रसायन म्हणजे कायाकल्प (Rejuvination) एखाद्या दीर्घकालीन  किंवा कोरोनासारख्या तीव्रवेगी म्हणजेच पटकन हल्ला करणाऱ्या आजारातून एखादी व्यक्ती  बरी झाली तरी अश्या आजाराचा शरीरावर दुष्परिणाम होत असतोच. आणि त्यामुळे नन्तरही काही लक्षणे दिसतात. हे दुष्परिमाण कमी करण्यासाठी काही  औषधं सांगितली  ज्यांना रसायन ही  संज्ञा आहे. मात्र हे सर्व औषधे घेताना पूर्वी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच मुद्द्यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे ही  औषधे वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत.


७. सुरुवातीपासूनच आयुर्वेदीय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वेळीच उपचार सुरु झाल्यामुळे उपशयही लवकर मिळत आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा विचार जरूर करा.  


८. मात्र हे करताना व्हाट्सएप  युनिव्हर्सिटीला लांब ठेवा. फेसबुक/व्हाट्सएप  वरील वरील मेसेजेस माहितीसाठी वाचणे ठीक आहे पण त्या मेसेजेसद्वारे स्वतःच स्वतःचे औषधोपचार करणे  योग्य आहे?


९. कोरोना चिनी षडयंत्र आहे की हॉस्पिटलचा पैसे उकळायचा खेळ याविषयी मीठमसाला लावून चर्चा होऊ शकते पण लक्षणे  असताना  योग्य वैद्यकीय सल्ला न घेता मेसेजमधले घरगुती उपाय करत राहणे कसे समर्थनीय होईल?


१०. आपल्या जवळ अनेक चांगले,नोंदणीकृत वैद्य आहेत. त्यांचा सल्ला जरूर घ्या.स्वघोषित आणि सवंग  लोकप्रियता असलेले आणि मुख्य म्हणजे कोणतीही पदवी नसलेले लोक टाळा. 

                    वेळीच निदान आणि उपचार झाले तर कोरोनावर मात शक्य आहे त्यामुळे वेळ दवडू नका. काळजी करू नका , काळजी घ्या. आयुर्वेद तुमच्या बरोबर नेहमीच आहे.  


टीप - वैद्यांचा सल्ला घेताना ते शिक्षित आणि नोंदणीकृत वैद्य आहेत याची खात्री करून घ्यावी.

आपली मते व काही शंका असल्यास त्या आपण मला वैयक्तिक क्रमांक अथवा इमेलद्वारे विचारू शकता. यापुढील लेख दर रविवारी सकाळी ब्लॉगवर प्रसिद्ध केले जातील. हे लेख आपल्याला व्हाट्सऍप /ईमेलद्वारे हवे असल्यास आपण खाली दिलेल्या क्रमांकावर मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. अथवा आमचे फेसबुक पेज like करा.

https://m.facebook.com/drsnigdhasclinic/ 


डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 26 जुलै 2020 रोजी आपल्या *https://samanwayayurved.blogspot.com/2020/07/blog-post_26.html?m=0* या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)


No comments:

Post a Comment