Wednesday, 12 August 2020

जन्माष्टमी आणि लोण्याचे महत्त्व.

  

picture courtsey - Internet (Little Krishana cartoon series) Discovery kids.

आज जन्माष्टमी…. भगवान श्रीकृष्णाचा हा जन्मदिवस, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा उत्साहात साजरा होत आहे. मार्ग कमी असले तरी उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. कारण कृष्ण भगवान आपल्याला जास्त जवळचे वाटतात. हसऱ्या, खट्याळ मुद्रेचे, लोण्याने माखलेले हात-तोंड यांची पर्वा न करता तल्लीन होऊन लोण्याचा आस्वाद घेणारी बालकृष्णाची मूर्ती सर्वांनाच लोभसवाणी वाटते.

अश्या या श्रीकृष्णाला प्रिय असणाऱ्या लोण्याची माहिती आपण घेणार आहोत. 

लोणी म्हणजे नवनीत. दूधाच्या सायीचे  दही विरजून त्याचे ताक बनवायचं, हे ताक घुसळून वर तरंगणारे लोणी काढून घ्यायचे अशी साधी सोपी कृती आहे लोणी बनवण्याची पण याचे फायदे मात्र अनेक आहेत बरं का.

नवनीतं नवं  वृष्यम शीतं बलवर्णाग्निकृत |

संग्राहि वातपित्तसृकक्षयार्शादितकासजित ||

क्षीरोद्भवं तु संग्रहि  रक्तपित्तरोगजित |

(अष्टांग हृदय)  

संग्राहि दीपनं हृदयं नवनीतं नवोद्धृतं |

ग्रहण्यो विकारग मर्दितरुचि नाशनम ||

(चरक संहिता )

ताजे लोणी मधुर रसाचे ( चवीला गोड ) , शीत गुणाचे आहे. तोंडाची चव सुधारते (अरूचिनाशक) , पचन सुधारणारे, वृष्य ( शुक्रधातू वाढवणारे), शरीरबल-वर्ण सुधारणारे आहे. वात आणि पित्त दोषांचे शमन करते. त्यामुळे शरीराचे पोषण करण्यास मदत करते. हृद्य (हृदयासाठी पोषक, आश्चर्य वाटले ना? हो,पण हे खरे आहे.)

त्यामुळे ग्रहणी (पचनाचे आजार), रक्तपित्त (ब्लीडिंग डिसॉर्डर्स),मूळव्याध,अर्दित (चेहऱ्याचा पक्षाघात), जुना खोकला,क्षयरोग यासारख्या आजारांत आम्ही वैद्यगण  नुसतेच किंवा वेगवेगळ्या औषधांसोबत लोणी वापरतो. 


  • संशोधने काय सांगतात?

  1. लोणी म्हणजेच दुधातील स्निग्धांश. त्यामुळे 100gm लोण्यामध्ये 81 gm स्निग्धपदार्थ असतात. त्यापैकी सॅच्युरेटेड स्निग्धांश ५१ gm. पॉलीअनसॅच्युरेटेड स्निग्धांश ३gm , मोनोअनसॅच्युरेटेड स्निग्धांश २१gm  आहेत.  ०१gm  कोलेस्टेरॉल आहे.  

  2. ४९% अ जीवनसत्त्व आहे. (१००gm मध्ये ३३०० IU  इतके. ) तर ड  जीवनसत्त्वसुद्धा असते. 

  3. ताज्या लोण्यामध्ये मोठया प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आहेत. 

  4. हे पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड स्निग्धांश शरीरासाठी लाभदायक आहेत कारण याच्या रासायनिक संयूगांच्या (chemical composition) रचनेमुळे शरीरातील वाढलेले LDL कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते. 

  5. मात्र सॅच्युरेटेड स्निग्धांश शरीराला त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे लोणी आरोग्याला वाईट असल्याचा अपप्रचार झाला आहे.

 

  • आयुर्वेद शास्त्र काय सांगते ?

  1. वर  जे सगळे गुण वर्णन केले आहेत ते गायीच्या (हो, दूध-दुभत्याच्या संदर्भात,सर्वप्रथम गाय मग म्हैस यांचा उल्लेख येतो व जेथे गरज असते तेथे स्वतंत्र उल्लेख करून शेळी-मेंढीचा  स्वतंत्र उल्लेख केला जातो, असो .) ताज्या लोण्यासंदर्भात आहेत. विकतच्या ‘टेबल बटर’चे नाहीत. 

  2. हे लोणी मीठ न घालता खायला हवे मात्र टेबल बटर मध्ये तर ३%-५% मीठ preservative म्हणून घातले जाते. 

  3. दूध --->साय -->विरजलेले  दही --->ताक --->घुसळलेले ताक -->ताजे लोणी अश्या कृतीने काढलेले लोणीच लाभदायक असते. कारण विरजण न मंथन (घुसळणे) हे महत्त्वाचे संस्कार आहेत. 

  4. खाल्लेले लोणी पचून ते अंगी लागण्यासाठी व्यायामही तेवढा करायला हवा. बाळकृष्ण लोण्यावर ताव मारून गायी चरायला नेत असे.त्यामुळे ताव नाही मारला तरी लोण्याचे फायदे मिळायला हवे असतील तर व्यायाम करून रोज चमचाभर लोणी जरूर खाता येईल.  

  5. वृद्ध आणि शिशुंसाठी  लोणी हे अमृताप्रमाणे आहे त्यामुळे ते जरूर खावे. 

  6. लहान मुले तर दिवसभर हुंदडत असतात, तसेच हा शरीराणीची बुद्धीच्या वाढीचा काळ आहे. त्यामुळे मुलांसाठी तर लोणी आवश्यकच आहे. 

  7. आजारी, अपचनाचे त्रास असलेल्या व्यक्ती, कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्या व्यक्ती यांनी लोणी  सुरु करण्याआधी वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.  

तर असे हे भगवंताला प्रिय असलेले लोणी आपल्याही आहाराचा भाग व्हावा यासाठी जरूर प्रयत्न करा. 



संदर्भ - चरकसंहिता, सुश्रुतसंहिता अन अष्टांगहृदय

           आंतरजाल -  heart.org

          चित्रसौजन्य - little krishna cartoon series



लेखिका -

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

*9870690689*

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०६ जुलै २०२० रोजी आपल्या  https://samanwayayurved.blogspot.com/2020/08/blog-post_12.html  ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)



1 comment:

  1. खूप सुंदर माहिती आहे... सगळे किंतु परंतु यांचे शंका निरर्सन झाले

    ReplyDelete