Sunday, 3 October 2021

*संध्याछाया…… विचार ज्येष्ठांच्या प्रश्नांचा, भाग 1* वृद्धावस्था आणि वातदोष -


ब
ऱ्याचदा चिकित्सलयात येणाऱ्या मध्यमवयीन अथवा ज्येष्ठांकडून एक वाक्य नेहमी ऐकायला मिळते  की मला वाताचा त्रास आहे/ सांधेदुखी म्हणजे वात का? 

तर असे नाही.

आपल्या जीवनाचे ढोबळमानाने 3 टप्पे असतात. 

बाल्यावस्था , तरुणावस्था आणि वृद्धावस्था.


■ *बाल्यावस्था* - बाल्यावस्थेत कफ दोषाचे प्राबल्य असते.

हे वाढीचे वय असल्याने बाल्यावस्थेत शरीरामध्ये कोशिका आणि उतींची वाढ होत असते. काही दुखले-खुपले (wear and tear) तर त्या जखमा लवकर भरून येतात.कारण या टप्प्यात वाढ होण्याचा वेग हा झीजेच्या वेगापेक्षा जास्त असतो.

साधारण 18 ते 20 वर्षापर्यंत ही अवस्था दिसून येते. 


■ *तरुणावस्था* -  ही अवस्था साधारणतः पुढील 25 ते 30 वर्षे राहते. या अवस्थेत पित्त दोषाचे प्राबल्य असते. तरुणाईचा जोश,धडाडी, नवीन काही करून दाखवण्याची उर्मी या पित्त दोषामुळेच मिळते. या काळात आपल्या सवयी, दिनचर्येनुसार शरीरातील सूक्ष्म पचन होत असते. वाढीचा (नवीन कोशिका-उती तयार होण्याचा) वेग आणि जीझेचा वेग हा सामान्यतः सारखाच असतो. पण या वयात आपला जो आहार-विहार (lifestyle) असतो त्यातच आपल्या वृद्धावस्थेची बीजे रोवली जातात.

                 या दोन अवस्थांबद्दल अजून बरेच काही सविस्तर सांगता येईल, जे आपण इतर लेखनामध्ये त्या - त्या  अनुषंगाने पाहूच. पण आता या लेखमालेत आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत ते वृद्धावस्थेबद्दल. 

■ *वृद्धावस्था* - आपण सगळेच कधी ना कधी वृद्ध होणार असतो. आणि खरं सांगायचं तर ,

*शीर्यते तत् शरीरम्* ।

म्हणजेच क्षरण पावते (झीजते) ते शरीर. 

थोडक्यात आणि अचूक सांगणे ही आयुर्वेद शास्त्राची खासियत आहे. त्याचाच नमुना म्हणजे आयुर्वेदाच्या अभ्यासाला आम्ही सर्वप्रथम अभ्यासतो ते हे वाक्य. ' *जे क्षणोक्षणी झीजते ते शरीर* .' म्हणजे 'लय' होणे,नाश पावणे हाच या शरीराचा मूलभूत गुणधर्म आहे. या काळात वात दोषाचे प्राबल्य असते. तर वात दोष हा शरीरातील गतिशील क्रियांना कारणीभूत असणारा दोष आहे. त्यामुळे वृद्धावस्थेत हा झीज होण्याचा वेग अधिक वाढतो. याचा परिणाम सात धातू, तीन मल, अग्नि व ओज यांवर ही दिसून येतो.

 त्यामुळे विविध प्रणाली उदा. पचनसंस्था, चेतासंस्था, तसेच विविध शरीरावयवांचे कार्य मंदावते.

पूर्वी जसे आजारातून बरे होण्यासाठी शरीराची साथ मिळे, तशी ती या वयात मिळत नाही. त्यामुळे आजार बरे होण्यास वेळ लागतो. उदा. हळूहळू झिजत जाणाऱ्या सांध्यांमुळे संधीवातासारखे आजार, रक्तगत वात दोषामुळे उच्च रक्तदाब, स्वादुपिंडाच्या प्रभावित झाल्यास मधुमेहाची लक्षणे दिसतात, पचनशक्ती मंदावल्यामुळे पोटात गुबारा धरणे,शौचाला साफ ना होणे यासारखी लक्षणे दिसतात. आपल्या ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांवरही याचा परिणाम दिसून येतो. दृष्टी कमी होते,मोतीबिंदू तयार होतो,शब्दोच्चरण करताना त्रास होऊ शकतो, वास घेण्याची-ओळखण्याची शक्ती कमी होते, जिभेची चव-ऐकू येण्याची क्षमता कमी होते, हालचाली मंदावतात, एकाग्रता-स्मरणशक्ती-जाणिवा मंदावतात (various mental and cognitive functions (e.g., memory, intellect, reception, retention, analytic ability, etc.)., त्वचेवर सुरकुत्या येतात, केस पिकणे सुरू होते. अर्थात सर्वांनाच काही सगळीच लक्षणे दिसून येणार नाहीत पण शरीरप्रकृती तसेच शरीरातील दोषस्थिती यानुसार ही लक्षणे व्यक्त होतात.

 धन्वंतरी जयंती व राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2020 च्या निमित्ताने वात-पित्त-कफ दोष म्हणजे नक्की काय हे मी याआधीच सविस्तर सांगितले आहे त्यामुळे आता विस्तारभयास्तव ते परत सांगणार नाही. त्या ऐवजी त्या लेखाची लिंक येथे देत आहे.

https://samanwayayurved.blogspot.com/2020/11/2020.html?m=0

कधी कधी,  काही व्यक्तींचे वय तेवढे जास्त नसते परंतु त्यांची शारीरिक लक्षणे पाहता त्यांचे शरीर लवकर थकले आहे असे जाणवते. असे का होते तर याचे ही कारण आहे वात दोष, आपण वरील लिंक मध्ये वात-पित्त-कफाची लक्षणे पाहिली यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की या वात विकृतीला आता विकृत (बिघडलेल्या)पित्ताची जोड मिळाली तर शरीराची झीज अधिक वेगाने होते. काही वेळा पूर्वी झालेले क्षयात्मक मोठे आजार, मनमानी-स्वच्छंदपणे जगलेले आयुष्य (ज्यावेळी आहार-निद्रा-मैथुन यांचे नियम नीट पाळलेले नसतात म्हणजेच lifestyle disorders ज्यामुळे ओज क्षय होतो), जसे की शिळे अन्न,पचायला जड अन्न,आहारात अम्ल(आंबट), लवण (खारट), कटु(तिखट) चवींच्या पदार्थांचा  भरमसाठ वापर, रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करणाऱ्या झोपेच्या सवयी, शारीरिक व मानसिक ताणतणाव या सगळ्यामुळे शरीर कमकुवत होते. आणि याचा परिणाम म्हणून अकाली वार्धक्य येते.

(क्रमशः)


मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 03 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2021/10/1.html 

या  ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)


Friday, 1 October 2021

संध्याछाया…… विचार ज्येष्ठांच्या प्रश्नांचा - प्रस्तावना.

 




आज 1 ऑक्टोबर, International day for the elderly अर्थात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन. आता Father's day/Mother's day सारखे हे काय वेगळे खूळ असेही कोणाला वाटेल पण हा काही फक्त साजरा करण्याचा एक दिवस नाही तर ज्येष्ठांचे समाजातील योगदान, त्यांचे घरातील महत्त्व तसेच ज्येष्ठ नागरिकांना  वयोमानानुसार येणाऱ्या समस्या यांची सर्वाना जाणीव करून देणे या हेतूने हा दिवस साजरा केला जातो.


            मावळतीचे रंग, कुणाला सुखावणारे तर कुणाला भिववणारे….

अशीच काहीशी स्थिती वृद्धावस्थेतही होत असते. वार्धक्य / ज्येष्ठपर्व / वानप्रस्थाश्रम / Second innings , प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यातील या कालखंडाकडे पाहतो. कितीही अपरिहार्य आणि अविभाज्य असले तरी जेव्हा खरोखरच वृद्धावस्था जवळ येते तेव्हा नाही म्हटलं तरी सर्वांच्या मनात थोडीशी धाकधूक असतेच.

यामध्ये बऱ्याचदा शारीरिक, मानसिक, आर्थिक अथवा नातेसंबंधातून निर्माण होणारे तणाव, जबाबदाऱ्या यामुळे असे होत असावे कदाचित. ताण-तणाव हेसुद्धा बऱ्याचदा शारीर स्थितीमुळेही होत असतात. का बरं होतं असं?

आपल्या जीवनाचे ढोबळमानाने 3 टप्पे असतात. 

बाल्यावस्था , तरुणावस्था आणि वृद्धावस्था.

बाल्यावस्था व तरुणावस्थेबद्दल बरेच काही सविस्तर सांगता येईल, जे आपण इतर लेखनामध्ये त्या - त्या  अनुषंगाने पाहूच. पण आता या लेखमालेत आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत ते वृद्धावस्थेबद्दल. 

          2011 साली केलेल्या जनगणनेनुसार, भारतात तब्बल 104000000 ज्येष्ठ नागरिक आहेत आणि या गतीने 2050 सालापर्यंत भारतात एकूण लोकसंख्येच्या 20% नागरिक हे ज्येष्ठ वयोगटातील असतील. मग ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहेच ना? 

             वय आणि कार्यक्षमतेनुसार या वयोगटाचे दोन ढोबळ उपप्रकार करता येतील. _साधारणतः 60 ते 75 आणि 75 च्या पुढे_ . अर्थात *विविध मानसिक आणि शारीरिक ताण-तणाव व ते सहन करण्याची क्षमता, शारीरिक आणि बौद्धिक प्रतिसाद* (रिफ्लेक्सेस) आणि मध्यम वयात झालेले काही आजार उदा. मधुमेह,उच्च रक्तदाब, कॅन्सर (अर्थात ही काही वानगीदाखल उदाहरणे झाली, पण सध्या अनेक आजार मध्यम वयातच दिसून येतात.) तर, अश्या आजारांनुसारही वृद्धावस्थेतील कार्यक्षमता ठरते.

पुढील भागांतून आपण वृद्धावस्थेतील वेगवेगळ्या प्रश्नांचा विचार करणार आहोत.मागच्या वेळी या लेखमालेतील पहिल्या लेखानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न आले होते. पण काही कारणास्तव, 'संध्याछाया'चे पुढील लेख येणे लांबले. यावेळी ही लेखमाला इतर लेखांसोबतच, महिन्यातून एक अथवा दोन लेख अश्या प्रकारे , रविवारी प्रसिद्ध केली जाईल. आपले काही प्रश्न, सूचना अथवा एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास आपण तसे वैयक्तिक मेसेज करून सूचित करू शकता.


(क्रमशः) 



मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 01 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2021/10/blog-post.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)

Sunday, 3 January 2021

उदकाचिया आर्ति.....अर्थात पाणी किती आणि कसे प्यावे - उत्तरार्ध.



                'उदकाचिया आर्ति' अर्थात पाणी कसे आणि किती प्यावे या लेखमालेच्या पूर्वार्धात आपण, 'पाणी कसे प्यावे? / जेवताना पाणी किती प्यावे? / RO चे पाणी व उकळलेले पाणी / कोष्ण जल- श्रुतशीत जल याविषयी थोडक्यात माहिती घेतली. आजच्या भागात,

◆टॉक्सिन फ्लश करण्यासाठी प्यायला जाणाऱ्या 5-7 लिटर पाण्याचे दुष्परिणाम,

◆तहान लागली असतानाही पाणी न पिणे

◆अति पाणी आणि किडन्या

◆पाणी-ज्यूस-सरबते 

◆पाणी आणि बद्धकोष्ठता यातील संबंध

या मुद्द्यांची माहिती घेऊ.

©Drsnigdha@samanwaya

*तहान म्हणजे काय?*

             तहान म्हणजे शरीराला आवश्यक असलेले पाणी पिण्यासाठी निर्माण होणारी संवेदना आहे. पण बऱ्याचदा आपण कामाच्या नादात, आळसामुळे या संवेदनेकडे दुर्लक्ष करतो. आयुर्वेदात तहान(तृष्णा) ही एक आधारणीय म्हणजे अडवू नये संवेदना सांगितली आहे. तहानेकडे दुर्लक्ष करुन पाणी न प्यायल्यास टाळू-घशाला शुष्कता येणे, चक्कर येणे ,डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात तसेच हे वारंवार किंवा दीर्घ काळासाठी होत राहिले तर कर्णबधिर्य , श्रमश्वास, हृदय प्रदेशी वेदना यासारखी लक्षणेही दिसतात. त्यामुळे कमी पाणी पिण्याची सवय असल्याससुद्धा ती गंभीरपणे मोडून काढणे गरजेचे आहे.©Drsnigdha@samanwaya

            तहान लागेल तेव्हा घटाघट पाणी न पिता नीट घोट-घोट पाणी प्यावे.तसेच उभ्याने पाणी पिऊ नये. हल्ली सर्व ऑफिसेस AC असतात त्यामुळे घाम येत नाही अश्या वेळी घामावाटे जाणारे पाणी कमी होते.त्यामुळे AC मध्ये काम करणाऱ्या लोकांनी वैद्यांच्या सल्ल्याने आपला पाण्याचा दिनक्रम आखून घ्यावा.


*पाणी-ज्यूस-सरबते* - 

           हल्ली बऱ्याच वेळा पार्टीमध्ये/कॉम्बो मील्स बरोबर खाद्यपदार्थांबरोबर शीतपेयाचा उंच ग्लास असतो.स्टाईल म्हणून कोल्डड्रिंक्स,स्टेटस म्हणून हार्डड्रिंक्स, "हेल्दी" म्हणून ज्यूसेस/हर्बल टीज बऱ्याचदा पाण्याला "रिप्लेसमेंट" म्हणून वापरले जातात. पाण्याची गरज असताना प्यायलेली ज्यूस-सरबते-कोल्डड्रिंक पाण्याबरोबरच कृत्रिम रंग,प्रिहर्वेटिव्हज,क्षार तसेच  मोठया प्रमाणात साखरेचा अनावश्यक साठा शरीरात घेऊन जातात. आणि त्यामुळे दुसरेच काही त्रास सुरू होतात.©Drsnigdha@samanwaya

'जब वी मेट'मध्ये आपली लाडकी गीत रतलाम स्टेशनवर त्या स्टॉलवाल्याला सांगतेच ना, 'कोला-शोला सब अपनी जगह पर है पर पानी का काम पानी ही करता है,बाय गॉड ।' तुम्ही सर्वांनीही हे कधी ना कधी नक्कीच अनुभवले असेल.


*अति पाणी व किडन्या*

           देवाने जसा आपल्या शरीरात जठररूपी मिक्सर-ग्राईंन्डर बसवला आहे तश्याच फिल्टररूपी किडन्यासुद्धा दिल्या आहेत. शरीरातील हानिकारक द्रव्ये, चयापचयातील उत्सर्जन करण्याजोगे पदार्थ(end products of metabolism) हे सर्व शरीरातून शौच व लघवीद्वारे बाहेर टाकले जातात. शरीरातील रक्त किडनीमध्ये आले की  सर्व द्रवांशातील अशुद्ध घटक दूर करून मूत्राद्वारे काढून टाकण्याचे काम या किडनी करत असतात. पण बऱ्याचदा अभिनेते-अभिनेत्री आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतात की 'नितळ त्वचेसाठी मी दिवसभरात 8-10 लिटर पाणी पिऊन सगळी टॉक्सिन्स फ्लश करते' आणि मग सगळी जनता "टॉक्सिन्स फ्लश" करण्यासाठी भरपूर पाणी पिऊ लागते. यात मग सकाळी सकाळी पाणी पिण्यापासून दिवसभरात 1 लिटरच्या 10 ते 12 बाटल्या बाटल्या पिणारे सगळेच प्रकार आले. माझे एक पेशंट तर सकाळी तब्बल 2 लिटर पाणी अनशापोटी पीत आणि मग दिवसभरातील वेगळे. पण शरीर हे काही टॉयलेट नाही ना की फ्लशचे बटन दाबले की बदाबदा वाहणाऱ्या पाण्याने स्वच्छ होईल, उलट असे अति पाणी किडन्यांवर अतिरिक्त आणि अनावश्यक दाब निर्माण करेल.


*अति पाणी प्यायल्याने शरीरावर होणारे इतर हानीकारक परिणाम.*

                फक्त किडन्याच नाही तर इतर शरीरावरसुद्धा अति पाणी पाण्यामुळे दुष्परिणाम होत असतात. आणि गमतीची गोष्ट म्हणजे टॉक्सिन्स थिअरीची वकिली करणारे ही दुसरी बाजू लक्षात घेतच नाहीत. शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकताना त्याबरोबर सोडियमचे प्रमाणही कमी होते. सोडियमचे प्रमाण कमी झाल्यास थकवा,मसल क्रॅम्पस,डोकेदुखी, रक्तदाब वाढणे अशी लक्षणे दिसतात. अतिरिक्त पाणी शरीरातील उतींमध्ये राहिल्याने सूज येते. आयुर्वेद शास्त्रात तर अजीर्णाच्या प्रकारांमध्ये पाण्याचे अजीर्ण सुद्धा सांगितले आहे.


*पाणी आणि बद्धकोष्ठता यातील संबंध.*

               पोट साफ न होण्याची किंवा शौचाला कठीण होण्याची तक्रार असणाऱ्या व्यक्तिना बऱ्याचदा अशी सकाळी पाणी पिण्याची सवय असते. क्लिनिकमध्ये मी प्रत्येक पेशंटला पाणी पिण्याच्या सवयीबद्दल विचारतेच आणि बहुतांश जण पोट साफ होण्यासाठी सकाळी पाणी आवर्जून पितात. एका वेळी भरपूर पाणी प्यायल्याने पोटावर दाब येतो आणि त्यामुळे ते आतड्यांना संकेत पाठवून पोट रिकामे करायला सांगते. पण जर बद्धकोष्ठतेचे कारण वेगळेच असेल तर ही युक्ती दर वेळी काम करेलच असे नाही. *सतत पाणी कमी प्यायल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते पण दर वेळी बद्धकोष्ठतेचे कारण कमी पाणी पिणे हेच असेल असे गरजेचे नाही.* ©Drsnigdha@samanwaya

             न्याय-वैशेषिक दर्शनशास्त्रात सांगितलेला 'पिंड ब्रह्मांड न्याय' (जे पिंडी ते ब्रह्मांडी) आयुर्वेदातही आहे. जे संपूर्ण ब्रह्मांडात असते तसेच पिंडातही (शरीरात) असते. पिंडसुद्धा ब्रह्मांडाप्रमाणे आहे असे हा न्याय सांगतो. त्यामुळे वर वर साधे निरुपद्रवी वाटणारे पाणी जेव्हा अति होते, साठून राहते तेव्हा त्रासदायकच होते हे आपल्याला निसर्गात येणारे पूर, फुटलेली धरणे,घरातले लिकेज पुरेपूर दाखवून देतात.

तसेच असे अतिरिक्त पाणी शरीरासाठी किती त्रासदायक ठरू शकते हे आपल्याला लक्षात येईल.

 आपल्या काही शंका असल्यास वर दिलेल्या लिंकवर क्लिक करुन कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.


मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.

बोरीवली.

9870690689


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 04 जानेवारी 2021 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2021/01/blog-post_3.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)


Saturday, 2 January 2021

उदकाचिये अर्ती.....अर्थात पाणी किती आणि कसे प्यावे

   


    

  सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आंग्ल नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्ष 2021 मधील पहिल्याच लेखाचा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. *तो म्हणजे पाणी*. अर्ति म्हणजे पीडा/व्यथा. मिलिंद बोकीलांचे हे पुस्तक खरं तर पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे होणाऱ्या व्यथा सांगणारे आहे. तसेच आज या लेखात आपण कमी पाणी पिणे किंवा अति पाणी पिणे या दोन्ही टोकाच्या विचारांमुळे शरीरावर ओढावणाऱ्या समस्या(अर्तिंचा) विचार करणार आहोत.

*पाणी कसे प्यावे?*

              कोविड काळात सर्वांनी काढे/गरम पाणी यांचा जोरदार मारा केला शरीरावर. पण आयुर्वेदात ऋतूनुसार जल,द्रवपदार्थ दिले आहेत. शीत ऋतूंमध्ये काढे,कोष्ण जल (कोमट पाणी) तर उष्ण ऋतूंमध्ये पानक,फांट असे सौम्य प्रकार, सिद्ध जल किंवा श्रुतशीत जल (उकळवून थंड केलेले पाणी वापरण्यास सांगितले आहेत. यातील कोष्ण जल आणि श्रुतशीत जल या प्रकाराबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कारण दैनंदिन जीवनात यांचाच वापर जास्त होतो. इतर प्रकार हे व्यक्तीची प्रकृती-विकृतीनुरूप वैद्यकीय सल्ल्यानेच वापरावेत.

             तर कोष्ण जल म्हणजे उकळलेले पाणी. सर्वप्रथम उकळलेले पाणी म्हणजे पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा नसतो तर *पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करून किमान 10 मिनिटे तरी उकळवावे* . त्यामुळे ते पचायला हलके होते,त्यातील बॅक्टरीया, मायक्रोब्स नष्ट होतात. औषधोपचार करताना आम्ही वैद्य तर कधीकधी आजारानुसार एक अष्टमांश (१/८) , एक चतुर्थांश (१/४) आटवलेले पाणी पिण्याचाही सल्ला देतो. असे गरम पाणी,उकळते नव्हे फक्त गरम, शीत ऋतू, जसे की हिवाळा-पावसाळा असताना प्यावे. उकळलेले पाणी थर्मासमध्ये भरून मग गरजेप्रमाणे ऊनऊन पिता येईल.

याउलट श्रुतशीत जल म्हणजे उकळून थंड केलेले पाणी. उन्हाळ्यात, शरद ऋतूंमध्ये (ऑक्टोबर हीट हो) असे श्रुतशीत जल प्यावे.


*RO चे पाणी VS उकळलेले पाणी*

               क्लिनिकमध्ये बरेच पेशन्ट्स विचारतात की वॉटर फिल्टर्स किंवा UV/RO वापरत असताना पाणी उकळवण्याची खरंच गरज आहे का? शुद्धच असते ते पाणी. पण पाणी फक्त शुद्ध करण्यासाठीच उकळले पाहिजे असे नाही तर उकळल्यामुळे ते लघु आणि सुपाच्य (पचायला हलके) होते. त्यामुळे पाणी उकळवून प्यावे आणि रोज उकळलेले पाणी त्या दिवशीच संपवावे.


*जेवताना पाणी किती?*

या संदर्भात एक छोटेसे संस्कृत सुभाषित मी उद्धृत करू इच्छिते,


*अजीर्णे भेषजं वारि, जीर्णे वारि बलप्रदम्* ।

*भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्* ।।


अर्थात-अपचन झाले असता,थोडे थोडे पाणी पित रहावे.अन्नपचन पूर्ण झाल्यानंतर(जेवणानंतर 2-3 तासांनी) पाणी पिणे शरीराला बळ देते. जेवताना अधून-मधून पाणी पिणे हे अमृतासमान उपकारक आहे;तर जेवणानंतर लागलीच पाणी पिणे हे विषासमान आहे.

            खरंच असे असते का हो? तर हो. क्लिनिकमध्ये अपचनाचे त्रास घेऊन येणाऱ्या बऱ्याच रुग्णांमध्ये चुकीच्या पाणी पिण्याच्या सवयी के कारण मोठया प्रमाणात दिसून येते. बघा हं,  म्हणजे त्रास खाण्याशी संबंधित पण त्याचे मूळ पाण्याशी संबंधित. अजीर्ण म्हणजे अपचन झाले असतानाही 'ताकद कशी येणार' म्हणून हट्टाने खात राहणे अजून त्रास देते. तशीच बऱ्याच जणांना सवय असते , _जेवताना पाणी न पिता जेवण झाले की मोठा पेला/दोन-तीन पेले पाणी रिचवतात अगदी लोटाभर पाणी सुद्धा पिणारे काही लोक पाहिलेत मी_ पण असे पाणी पोटाचे व्यापार बिघडवते. साधा विचार करा हं, मिक्सरमध्ये वाटण करायचे असेल तर आपण एकदाच मोठा पेलाभर पाणी ओतू का त्यात?काय होईल मग त्या वाटणाचे?,चोथापाणीच राहील ना?किंवा कणिक मळतानासुद्धा आई त्यात हळूहळू थोडे पाणी घालून मळते ना? तसेच आहे आपल्या जठराचे. हा शरीरातील सगळ्यात मोठा , physical मिक्सर आहे आणि फिजिक्स,केमिस्ट्रीचे सगळे गुण या बायोलॉजीमध्ये पण लागू होतात बरं. असे अति पाणी अन्न आणि पाचक रस पातळ करेल त्यामुळे पचनक्रिया नीट होणार नाही. त्यामुळे जेवताना थोडे-थोडे छोटे घोट पाणी प्यावे, म्हणजे अन्नाचा नीट गोळा होतो. वाग्भट म्हणतात, जेवताना 2 भाग अन्नासाठी,  1 भाग द्रवपदार्थांसाठी (फक्त पाणी नव्हे) आणि एक भाग रिकामा ठेवावा म्हणजे पोटावर ताण न येता पचन नीट होईल.

           जेवणापूर्वी पाणी पिणे जी सुद्धा एक अशीच चुकीची सवय. मुख्यत्वे वजन कमी करणाऱ्या लोकांमध्ये पाहायला मिळणारी. हे जेवणाआधी प्यायलेले पाणी, जेवण पचवण्यासाठी लागणारे पाचकरस धुवून पुढे घेऊन जाते. हे पाचकरस भुकेच्या वेळेसच स्रवतात आणि पचनाला मदत करतात. जर पाचकरसच नसतील तर पचन कसे होईल? तसेच भूक आणि तहान या दोन वेगळ्या संवेदना आहेत कारण त्या शरीराच्या दोन वेगळ्या  गरजा आहेत. भूक लागली असता आपण शरीराला , अग्निला (पचनसंस्थेला) पाणी देणार असू तर ते अग्निमांद्य आणि पचनाचे विविध आजार निर्माण करेल. पण जेवणाआधी पाणी प्यायले की मग अशी बिघडलेली पचनसंस्था ,शरीराचे पोषण करू शकत नाही. मग दिसतात केस गळणे, त्वचा खराब होणे,सांधेदुखी, अस्थिसौषिर्य, दौर्बल्य यासारखे आजार. डाएट करूनही हे असे का होते याचे उत्तर चुकीच्या डाएटमध्ये असते. म्हणून डाएट गुगल करण्याऐवजी/स्वघोषित डाएटीशीयन्स कडून घेण्याऐवजी क्वालिफाईड डॉक्टरांकडून घ्यावे.

(क्रमशः)

उद्याच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत, 

◆टॉक्सिन फ्लश करण्यासाठी प्यायला जाणाऱ्या 5-7 लिटर पाण्याचे दुष्परिणाम,

◆तहान लागली असतानाही पाणी न पिणे

◆अति पाणी आणि किडन्या

◆पाणी-ज्यूस-सरबते

◆पाणी आणि बद्धकोष्ठता यातील संबंध.


मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 3 जानेवारी 2021 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2021/01/blog-post.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)



Saturday, 14 November 2020

'अ' आयुर्वेदाचा - राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2020.

 


'अ' आयुर्वेदाचा - राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2020.


परवा धनत्रयोदशी होती. देवता व असुरांनी केलेल्या समुद्र मंथनातून धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरींचे अवतरण झाले म्हणून त्यांच्या जन्मदिवशी भगवान धन्वंतरींचे पूजन केले जाते. दरवर्षी धनत्रयोदशीचा दिवस 'राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' म्हणूनही साजरा करतात. यापूर्वी मी वेगवेगळ्या विषयांमधील आयुर्वेदीय दृष्टिकोनाबद्दल लिखाण केले आहे. मात्र आज मी थोडेसे आयुर्वेद शास्त्राबद्दलच लिहिणार आहे. आयुर्वेद म्हटले की वात-पित्त-कफ या संज्ञा आपण बऱ्याचदा ऐकतो. पण नक्की हे वात-पित्त-कफ म्हणजे असतात तरी काय हे जरा आज संक्षेपाने जाणून घेऊया.


त्रिदोष - त्रिदोष म्हणजेच तीन दोष ही आयुर्वेदातील महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे.वात-पित्त-कफ हे तीन दोष आहेत हे हल्ली काही जणांना माहीत असते.मात्र बऱ्याचदा वात म्हणजे गॅस, पित्त म्हणजे ऍसिडिटी आणि कफ म्हणजे सर्दी-खोकला असे समजले जाते त्यामुळे मग वातामुळे(गॅसमुळे) सांधे कसे झिजतात?ऍसिडिटी नाही तरी डोळ्यांचे त्रास,त्वचाविकार पित्तामुळे कसे होतात ? हे समजत नाही आणि मग संपूर्ण आयुर्वेद शास्त्रच "अशास्त्रीय" असल्याचा गैरसमज करून घेतला जातो. गॅस-ऍसिडिटी-सर्दी एवढे मर्यादित स्वरुप नाही या तीन दोषांचे. वात-पित्त-कफ हे तीन दोष शरीराचा मूलभूत पाया आहेत. सम अवस्थेत (नॉर्मल स्टेट) हे दोष सर्व शरीरव्यापार नियंत्रणात ठेवतात. मात्र विषमवस्थेत ते शरीरधातूंना दूषित करतात म्हणून त्यांना 'दोष' असे म्हटले जाते. (रोगस्तु दोषवैषम्यं दोषसाम्यम् अरोगता। ) अगदी सध्या सर्दीपासून कॅन्सरपर्यंत सर्व आजार हे त्रिदोष बिघडल्यामुळे होतात.

          वात दोष - त्रिदोषांमध्ये वात दोष श्रेष्ठ मानला जातो. पंचमहाभूतानुसार वात म्हणजे वायू. इतर दोषांची कार्ये वायूवर अवलंबून असतात. कारण हा एकच दोष गतिशील आहे.पण हा वात असल्याने त्याचे प्रमाण मोजता येत नाही. लक्षणांवरून तो ओळखला जातो. (सोपे उदाहरण द्यायचे झाले तर वारा वाहतो तेव्हा तो दिसत नाही मात्र स्पर्श, हलणाऱ्या वस्तू पाहून त्याचे अस्तित्त्व कळते.शरीरातही वात दिसत नाही पण हॉर्मोन्स, न्यूरोट्रान्समीटर्सचे स्रावांद्वारे वेगवेगळे इम्पल्स,रिफ्लेक्स यासारख्या गतिशील क्रियांमध्ये त्याचे अस्तित्व आणि कार्य दिसून येते.) सर्व शरीराचे धारण, सर्व शरीरक्रियांचे प्रवर्तन व नियंत्रण, शरीरपरमाणूंचे संयोजन व वियोजन, गर्भाची निर्मिती, दोषांचे शोषण करणे, धातूंना स्थैर्य व बल प्राप्त व्हावे म्हणून योग्य घटकांचा पुरवठा करणे , धातूंची झीज भरून काढणे, धातूंच्या त्याज्य घटकांना मलायनांकडे नेणे, रक्तधातूला प्राणवायूचा पुरवठा करून विशुद्ध करणे. सर्व धातूंकडे रक्त पुरविणे, सर्व इंद्रियांना प्रेरक, इंद्रियार्थवाहक, मनःकार्यप्रवर्तक-नियंत्रक, इंद्रियार्थ-इंद्रिये,श्रोत्रेंद्रिय व स्पर्शेंद्रिय यांचे कार्य सुरळीत ठेवणे. वाक्‌प्रवृत्ती करणे ही सर्व कार्ये वात दोषाची कार्ये आहेत. यावरून लक्षात येते की वात दोष दिसत नसला तरी त्याची शरीरात होणारी सर्व कार्ये पाहून क्षीणता , साम्यावस्था किंवा प्रकोप समजता येतो.

शरीरामध्ये वात त्वचा,कानाची हाडे,मोठे आतडे,कटि प्रदेश ही प्रामुख्याने वाताची स्थाने मानली जातात.


पित्त दोष - पित्त हे पांचभौतिक द्रव्य आहे. अग्नी व जल या महाभूतांचे आधिक्य त्यात असते.शरीरात असलेल्या द्रव्यांचे पचन(चयापचय क्रिया-metabolism) करणे. शरीर उष्ण राखणे, तहान व भूक निर्माण करणे, रुची उत्पन्न करणे, शरीरातील अतिरिक्त द्रवांचे शोषण करणे, शरीर मृदू ठेवणे, त्वचा तेजस्वी व प्रभायुक्त राखणे यासारखी शारीरिक कार्ये तसेच स्मरण,  विचारांत निश्चितता ठेवणे, धैर्य, शौर्य, पराक्रम व मनःप्रसाद निर्माण करणे, ही मानसिक कार्ये पित्त दोषामुळे होतात. पित्त दोष बिघडल्यास या कार्यांमध्ये बिघाड होतो. यकृत,हृदय,मस्तिष्क,प्लिहा,अग्न्याशय ही पित्त दोषाची प्रमुख स्थाने आहेत.


कफ दोष - तिसरा दोष कफ हेसुद्धा पांचभौतिक द्रव्य असून पृथ्वी आणि जल या महाभूतांच्या आधिक्याने निर्माण होते. '‘क’ म्हणजे जल व जलाप्रमाणे फल देणारा तो कफ. (केन फलति इति कफ। ) शरीराला स्थिरता,बल देणारा असा दोष म्हणजे कफ. कफाच्या अंगभूत स्निग्धता-ओलाव्यामुळे , जसा कण-कण चिकटून गोळा तयार होतो तसेच शरीर घटकांचा संचय होऊन शरीराची वाढ होते. त्यामुळे सुदृढता, पोषण,शरीरवाढ,ताकद, शरीर थंड ठेवणे , एकाग्रता यासाठी कफ दोष महत्त्वाचा असतो.

छाती,मस्तिष्क,शरीरातील विविध सांधे,मुख या ठिकाणी कफ दोष प्रामुख्याने दिसतो.


त्रिदोषांची प्रमुख स्थाने सांगितलेली असली तरीही हे तिन्ही दोष सर्व शरीरात पसरलेले असतात आणि त्यांच्या प्रत्येकी 5 उपप्रकारांद्वारे शरीरव्यापार पार पाडतात.(विस्तारभयास्तव आपण येथे त्यांचे सविस्तर वर्णन करण्याचे टाळले आहे पण पुढे त्यांची माहिती घेऊच.)

तर असे हे तीन दोष आपल्या शरीराचा मूलभूत पाया आहेत. त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे आपली शारीर प्रकृती ठरते. सम अवस्थेत असतात तेव्हा हे त्रिदोष आपले शरीर निरोगी ठेवतात तर त्यांच्या बिघाडामुळे रोगांना आमंत्रण मिळते. आपल्या आहार-विहारामुळे , त्यातील नियमित-अनियमिततेमुळे हे बिघाड होत असतात त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कोणत्याही आजाराचे मूळ शोधून त्यावर मुळासकट उपचार करणे खूप महत्त्वाचे असते.


सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 15 नोव्हेंबर 2020 रोजी आपल्या

https://samanwayayurved.blogspot.com/2020/11/2020.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)


डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक.

9870690689

समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.

बोरीवली(पू.) मुंबई.